दिल्लीत आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले. या रॅलीदरम्यान पंतप्रधानांनी मानवंदना स्वीकारली आणि विविध एनसीसी तुकड्यांच्या तसेच अन्य शेजारी देशांमधील छात्र सैनिकांच्या मार्च पास्टचा आढावा घेतला.
बोडो आणि ब्रु-रियांग करार
ईशान्य भागातील विकासाच्या प्रयत्नांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वी हा भाग र्दुलक्षित होता आणि उग्रवाद्यांबरोबरच्या लढ्यात आणि हिंसाचारात अनेक निष्पाप लोक मारले गेले. त्याउलट या सरकारने ईशान्य भागाच्या विकासासाठी अभूतपूर्व योजना हाती घेतल्या आणि खुल्या मनाने आणि खुल्या दिलाने संबंधितांबरोबर चर्चा सुरु केली. याचाच परिणाम हा बोडो करार आहे. युवा भारताची ही विचारसरणी आहे.
मिझोरम आणि त्रिपुरामधील ब्रु-रियांग करारानंतर ब्रु जमातीचा समावेश असलेल्या 23 वर्षीय जुनी समस्या सुटली आहे. हे युवा भारताचे विचार आहेत. प्रत्येकाला सोबत घेऊन, प्रत्येकाचा विकास करुन तसेच प्रत्येकाचा विश्वास जिंकत आपण आपल्या देशाला पुढे नेत आहोत.
नागरिकत्व सुधारणा कायदा:-
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सत्य जाणून घेणे हे भारताच्या युवकासाठी गरजेचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यापासूनच स्वतंत्र भारताने पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख आणि अन्य अल्पसंख्याकांना वचन दिले होते की, आवश्यकता भासल्यास ते भारतात येऊ शकतात. भारत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. गांधीजींची देखील हीच इच्छा होती, 1950 मधील नेहरु-लियाकत कराराची देखील हीच भावना होती असे पंतप्रधान म्हणाले. “या देशांमध्ये ज्या लोकांचा धार्मिक छळ झाला त्यांना भारतात आसरा देणे, त्यांना भारताचे नागरिकत्व देणे ही भारताची जबाबदारी आहे. मात्र हजारो लोकांना माघारी फिरावे लागले. हा ऐतिहासिक अन्याय रोखण्यासाठी आज आमच्या सरकारने भारताचे जुने वचन पूर्ण करण्यासाठी अशा लोकांना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
फाळणीच्या वेळी अनेकजण भारत सोडून गेले मात्र जाताना इथल्या मालमत्तेवर आपला हक्क ठेऊन गेले असे पंतप्रधान म्हणाले. कोट्यवधी रुपयांच्या या मालमत्तांवर भारताचा अधिकार असूनही शत्रूच्या मालमत्तांना अनेक दशकं तात्पुरती स्थगिती दिली गेली. शत्रू मालमत्ता कायद्याला ज्यांनी विरोध केला तेच लोक आता नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.
भारत-बांग्लादेश सीमावाद:-
भारत आणि बांग्लादेशाच्या सीमाभागांमधील वाद सोडवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नव्हती असे पंतप्रधान म्हणाले. सीमेवर वाद सुरु असेपर्यंत घुसखोरी थांबणार नाही असे ते म्हणाले. वाद असाच सुरु ठेवा, घुसखोरांना मोकळा रस्ता द्या आणि तुमचे राजकारण असेच चालू द्या.
या सरकारने बांग्लादेश बरोबरचा सीमावाद सोडवताना परस्परांचे म्हणणे ऐकून घेतले आणि उभय देशांच्या संमतीने त्यावर तोडगा काढला असे पंतप्रधान म्हणाले. दोन्ही देशांमधील सीमावाद तर संपलाच मात्र आता दोन्ही देशांमधील संबंध ऐतिहासिक उंचीवर आहेत आणि दोन्ही देश एकत्रितपणे गरिबीचा सामना करत आहेत. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कर्तारपूर कॉरिडॉर:-
फाळणीमुळे कर्तारपूर साहेब गुरुद्वारा आपल्यापासून हिरावून घेण्यात आले आणि तो पाकिस्तानचा भाग बनवण्यात आला. कर्तारपूर ही गुरुनानक यांची भूमी होती. कोट्यावधी देशवासियांच्या भावना या पवित्र स्थानाशी त्या जोडलेल्या होत्या असे ते म्हणाले. गेली अनेक दशकं शीख बांधव कर्तारपूरला सुलभरित्या पोहचण्याची आणि गुरुभूमीच्या दर्शनाच्या संधीची वाट पाहत होते. या सरकारने बांधलेल्या कर्तारपूर कॉरिडॉरमुळे हे साध्य झाले आहे.