नीति आयोगााने आयोजित केलेल्या ‘आर्थिक धोरण-पुढील वाटचाल’ या चर्चासत्रात पंतप्रधानानी आज अर्थतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांबरोबर चर्चा केली.
या चर्चासत्रात सहभागी झालेल्यांनी कृषी, कृषी विकास आणि रोजगारनिर्मिती, कररचना आणि जकातविषयक बाबी, शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, गृहनिर्माण, पर्यटन, बॅंकिंग प्रशासकीय सुधारणा, माहिती आधारित धोरण आणि विकासासाठी पुढील पावले यावर चर्चा केली.
चर्चासत्रात सहभागी झालेल्या विविध तज्ज्ञांच्या सूचनांबाबत आणि निरिक्षणांबाबत पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. कौशल्य विकास, विकास आणि पर्यटनासारख्या क्षेत्रात नवीनतम दृष्टीकोनाची गरज त्यांनी व्यक्त केली.
अर्थसंकल्प चक्राबाबत ते म्हणाले की, याचा वास्तव अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. आपल्या सध्याच्या अर्थसंकल्प कालगणेत मान्सून सुरु होतो तेव्हा खर्चाला अधिकृत मंजुरी मिळते. त्यामुळे मान्सूनपूर्व उत्पादक महिन्यात सरकारी उपक्रम तुलनेने संथ राहतात. हे लक्षात घेऊन यंदा लवकर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे जेणेकरुन नवी आर्थिक मान्यता मिळेल.
चर्चासत्रात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, नियोजन राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह, नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगरिया आणि केंद्र सरकार तसेच नीति आयोगातले विविध अधिकारी उपस्थित होते. प्रा. प्रवीण कृष्णा, माधव चव्हाण, डॉ. गोविंद राव, नीळकंठ मिश्रा यांच्यासह विविध तज्ज्ञांनी या चर्चासत्रात भाग घेतला.