पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टेकनपूर इथल्या सीमा सुरक्षा दल अकादमीत पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या समारोप प्रसंगी संबोधित केले.
वर्ष 2014 पासून ही अकादमीची महासंचालक आणि महानिरिक्षकांची परिषद नवी दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी हलवल्यानंतर या परिषदेची व्याप्ती आणि स्वरुपात झालेल्या फरकाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. हा बदल घडवून आणायला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. देशासमोर असलेली आव्हाने आणि कर्तव्ये यांच्या संदर्भात आता ही परिषद अधिक समर्पक झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. परिषदेच्या नव्या स्वरुपामुळे चर्चेच्या दर्जात लक्षणीय बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.
देशाची सुरक्षा निश्चित करतांना देशातील सुरक्षा साधनांच्या कार्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. नकारात्मक वातावरणात कार्य करतानाही परिषदेला उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नेतृत्वगुण दाखवल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षात या परिषदेत झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणून पोलीस दलापुढील लक्ष्य निश्चित केल्यानंतर, ते साध्य करण्यासाठी मोठी एकवाक्यता दिसून येते असे त्यांनी सांगितले. या परिषदेमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा प्रश्न आणि आव्हान या संदर्भात अधिक सर्वंकष दृष्टीकोन तयार होण्यात मदत होत आहे. गेल्या दोन वर्षात चर्चा होणारे विषय अधिक व्यापक झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सर्वंकष नवीन दृष्टीकोन तयार होण्यास मदत झाल्याचेही ते म्हणाले.
या परिषदेच्या मूल्यांना अधिक बळकटी देण्यासाठी संपूर्ण वर्षभर कार्यरत गटांच्या माध्यमातून मागोवा घेतला पाहिजे असे पंतप्रधानांनी सुचवले. या संदर्भात तरुण अधिकाऱ्यांच्या समावेशाच्या महत्वावर पंतप्रधानांनी भर दिला. यामुळे परिणाम वाढवण्यासाठी मोठी मदत होईल, असे ते म्हणाले.
बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासंदर्भात जागतिक स्तरावरील वाढत्या एकमताचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि हे साध्य करण्यासाठी भारताला महत्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, असे सांगितले. जगभरात खुलेपणाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार होत असतांनाच, सुरक्षा मुद्यांबाबत राज्यांमध्ये अधिक खुलेपणा असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सुरक्षा ही एकट्याने किंवा निवडकरित्या साध्य करता येत नाही, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, राज्यांनी माहिती वाटून घेतल्यास सर्वच जण सुरक्षित व्हायला मदत होईल. आपण इथे स्वतंत्र्यरित्या जमलेलो नाही, तर एकत्रित जमलो आहोत यावर त्यांनी भर दिला.
सायबर सुरक्षा विषयक मुद्यांकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असून, त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. या संदर्भात अधिक परिणामकारकता साधण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये संदेश देण्यावर भर दिला पाहिजे. मूलतत्वाबद्दल बोलताना, समस्यांची ठिकाणं निश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांना अतुलनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकं प्रदान करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचे कटिबद्धतेबाबत अभिनंदन केले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि किरिंद्र रिजिजू यावेळी उपस्थित होते.