राष्ट्रीय युवक दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ग्रेटर नॉयडा इथे गौतम बुद्ध विद्यापीठात आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवक महोत्सव 2018 च्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला PSLV-C40च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले. अंतराळ क्षेत्रात आपण करत असलेल्या कामगिरीमुळे आपल्या नागरिकांना मदत होत आहे आणि त्यामुळे आपल्या विकासाच्या प्रवासाला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.
डिसेंबर 2017 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये देशाच्या सर्व जिल्ह्यात अभिरुप संसदेचे आयोजन करण्याच्या आपल्या सूचनेची त्यांनी यावेळी आठवण करुन दिली. अशा प्रकारच्या अभिरुप संसदेमुळे युवकांमध्ये यासंदर्भात विचारमंथन घडून येईल. 1947 नंतर आपला जन्म झाल्याने, स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभले नाही. मात्र, त्या लढ्यात ज्या महान स्त्री-पुरुषांनी आपले आयुष्य समर्पित केले, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य योद्धांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले, त्याची निर्मिती आपण केलीच पाहिजे, असा आग्रह पंतप्रधानांनी धरला.
आपले युवक रोजगार देणारे असले पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. नाविन्यपूर्ण कल्पना असलेले आणि नवनिर्मिती करणारे ते असले पाहिजेत, यावरही त्यांनी भर दिला. सध्याच्या युवकांमध्ये धैर्य किंवा संयम नाही, असे काही लोक म्हणत असतात. मात्र, यामुळेच या युवकांमध्ये काही तरी वेगळे काही तरी नवे करण्याची उमेद निर्माण होते. नेहमीच्या चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची आणि नव्या गोष्टी करण्याची वृत्ती त्यामुळे निर्माण होते. खेळांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय युवक दिवस आणि सर्वधर्म सभा या कार्यक्रमाचे कर्नाटकमधील बेळगाव इथं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देखील पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.
स्वामी विवेकानंद यांनी बंधुभावावर भर दिला, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या विकासामध्ये आपल्या देशाच्या जनतेचे हित सामावलेले आहे, असा त्यांचा विश्वास होता. पाश्चिमात्य जगात भारताबद्दल बरेच गैरसमज निर्माण करण्यात आले होते आणि स्वामी विवेकानंद यांनी ते सर्व दूर केले. समाजातल्या अनिष्ट प्रकारांविरोधातही त्यांनी आवाज उठवला, असे पंतप्रधान म्हणाले.
काही लोक देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या देशातील युवक अशा घटकांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. आपल्या देशातील युवक कधीही चुकीच्या मार्गावर भरकटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत मोहिमेला नव्या उंचीवर नेण्याचे काम देशातील युवक करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. भारत हे समाजाची सेवा करणाऱ्या आणि सुधारणा घडवणाऱ्या अनेक संतांचे माहेरघर आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
सेवाभाव हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. देशभरात अनेक व्यक्ती आणि संस्था निस्वार्थ वृत्तीने समाजाची सेवा करत आहेत, असे त्यांनी सांगितले. देशाला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Click here to read PM's speech at Gautam Buddha University in Noida