पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ‘महसूल ज्ञान संगम’चे उद्घाटन केले. तसंच केंद्र आणि राज्य सरकारांच्या कर प्रशासकांना संबोधित केले.
या अधिकाऱ्यांनी आपली कार्यप्रणाली सुधारावी आणि त्यांच्या कामगिरीत निकडीची भावना आणि मापदंड यांचा समावेश करावा असा आग्रह केला.
वस्तू-सेवा कराच्या फायद्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, देशाची आर्थिक एकात्मता आणि प्रणालीतील पारदर्शकता या खेरीज 17 लाख नव्या व्यापाऱ्यांना दोन महिन्याच्या आत अप्रत्यक्ष कर प्रणालीत आणण्यात आले.
वस्तू सेवा कराचा कमाल फायदा सर्व व्यावसायिकांना मिळावा यासाठी सर्व व्यावसायिक अगदी 20 लाख रुपयांहून कमी उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांनी वस्तू सेवा कर प्रणालीत नोंदणी केली पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले. या श्रेणींसाठी प्रणाली विकसित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
2022 म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनापर्यंत देशाचे कर व्यवस्थापन सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष्य निश्चित करावे असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यामध्ये भ्रष्टाचारांचा विश्वास भंग पावेल आणि प्रामाणिक करदात्यांमध्ये विश्वास निर्माण होईल, असे वातावरण निर्मित व्हावे, यासाठी केंद्र सरकार काम करत आहे असे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी केंद्र सरकारने उचललेल्या नोटाबंदी तसेच काळा पैसा आणि बेनामी मालमत्तेविरुद्ध कडक कायद्यांची अंमलबजावणी यासारख्या पावलांचा उल्लेख केला.
कर प्रशासकाच्या कार्यात मानवी हस्तक्षेप किमानच ठेवला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. ‘ई-कर’ तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून निनावी कार्यप्रणालीला चालना देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यामुळे कायद्याच्या योग्य अंमलबजावणीत कोणी खीळ घालू शकणार नाही असेही पंतप्रधानांनी सांगितले. करांशी संबंधित प्रकरणांच्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिलेल्या निकालांबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा अडकून पडला असून त्याचा वापर गरीबांच्या कल्याणासाठी होऊ शकतो, असे ते म्हणाले. महसूल ज्ञान संगम दरम्यान प्रलंबितता निपटून काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी कृती योजना आखावी असे निर्देश त्यांनी दिले.
जाहीर न केलेले उत्पन्न आणि संपत्ती निश्चित करण्यासाठी आणि त्याचा छडा लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने आकडेवारीचं विश्लेषण करणारी साधने वापरावी असे पंतप्रधानांनी सांगितलं. दरवर्षी कराद्वारे मिळणारा महसूल वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असले तरी प्रणालीतून जमा होणाऱ्या निधीबाबतचा अंदाज हा प्रत्यक्षात उतरत नाहीत, असे ते म्हणाले.
या संदर्भात कालबद्ध उपाय शोधण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. अप्रामाणिकांच्या गुन्ह्यांचा शिक्षा प्रामाणिकांना भोगावी लागता कामा नये असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आकडेवारीचे विश्लेषण तसेच तपास विभाग अधिक मजबूत करण्यासाठी कर खात्यातील ‘मनुष्यबळ विकास व्यवस्थापनात बदल’ करण्याची सूचना त्यांनी केली.
दोन दिवसांच्या ज्ञान संगम कार्यक्रमात कर प्रशासनात सुधारणा करण्यासंदर्भात ठोस कल्पना समोर येतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.