पंतप्रधानांनी "नवीन भारत- मंथन" या संकल्पनेवर देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. भारत छोडो आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांशी अशा प्रकारचा संवाद आयोजित करण्यात आला होता आणि तळागाळापर्यंत ""नवीन भारत- मंथन" घडवून आणणे हा यामागचा उद्देश होता.
9 ऑगस्ट ही तारीख ""संकल्प से सिद्धी"" मंत्राशी उत्कटपणे जोडलेली आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते म्हणाले कि ही तारीख युवकांच्या इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे.
भारत छोडो आंदोलनाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांना कशी अटक झाली आणि देशभरातील तरुणांनी हे आंदोलन कसे यशस्वीपणे पुढे नेले याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली.
पंतप्रधान म्हणाले कि जेव्हा तरुण मंडळी नेतृत्वाची भूमिका स्वीकारतात, तेव्हा उद्दिष्टे नक्कीच साध्य होतात. जिल्हाधिकारी हे केवळ त्यांच्या जिल्ह्याचे प्रतिनिधी नाहीत तर त्या भागातील तरुणांचेही प्रतिनिधी आहेत असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले कि जिल्हाधिकारी नशीबवान आहेत कारण त्यांना राष्ट्राला स्वतःला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे.
सरकार प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, संघटना यांना विशिष्ट उद्दिष्टे समोर ठेवायला सांगत आहे जे 2022 सालापर्यंत त्यांनी साध्य करायचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आता तुम्ही ठरवायचे आहे कि 2022 पर्यंत तुम्हाला तुमचा जिल्हा कुठवर पोहचायला हवा आहे, कोणत्या त्रुटी आहेत, त्यावर कसा तोडगा काढता येईल आणि कोणत्या सेवा पुरवता येतील अशी सूचना पंतप्रधानांनी केली.
काही जिल्ह्यांमध्ये वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सेवांचा कायम अभाव असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले की जेव्हा सर्वाधिक मागास अशा 100 जिल्ह्यांमधील सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा देशाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल. म्हणूनच आता मोहीम स्वरूपात काम करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे
ज्या जिल्ह्यांनी एखाद्या क्षेत्रात किंवा योजनेत चांगले परिणाम प्राप्त केले आहेत त्यांच्या सर्वोत्तम पद्धतींचे अनुकरण करा असे प्रोत्साहन पंतप्रधानांनी यावेळी दिले.
आपापल्या जिल्ह्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत व्हिजन डॉक्युमेंट किंवा दूरदर्शी आराखडा तयार करा आणि यासाठी सहकारी, जिल्ह्यातील विद्वान मंडळी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांची मदत घ्या असे पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. ते म्हणाले की या आराखड्यामध्ये अशी 10-15 उद्दिष्टे समाविष्ट करा जी 2022 पर्यंत साध्य करावीत असे त्यांना वाटते .
पंतप्रधानांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना www.newindia.in या संकेतस्थळाची माहिती दिली-ज्यात "संकल्प से सिद्धी " चळवळीशी संबंधित माहिती आणि उपक्रमांचा समावेश आहे. ते म्हणाले कि ज्याप्रकारे ते जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मंथन करत आहेत, तसे ते त्यांच्या जिल्ह्यातही करू शकतात.
पंतप्रधानांनी न्यू इंडिया संकेतस्थळाची महत्वाची वैशिष्ट्ये उदा. स्वातंत्र्य लढ्याबाबत ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि "संकल्प से सिद्धी " चळवळीचा भाग म्हणून देशभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमाची व्यापक माहिती समजावून सांगितली.
पंतप्रधानांनी जिल्ह्यातील विकासकामांची तुलना रिले रेसशी केली. ते म्हणाले कि ज्याप्रमाणे रिले रेसमध्ये शर्यत जिंकण्याच्या एकमेव उद्देशाने एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूकडे बॅटन सोपवले जाते, तशाच प्रकारे विकासाचे बॅटन एका जिल्हाधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे यशस्वीपणे सोपवले जाते.
पंतप्रधान म्हणाले कि अनेकदा जनतेला योजनांची माहिती नसल्यामुळे इच्छित परिणाम साधण्यात योजना असफल ठरतात एलईडी दिवे, भीम ऍप यांसारख्या उपक्रमांच्या लाभाविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला अवगत करावे असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान हे प्रतिसादात्मक प्रशासन आणि जनतेमधील जागृती यावर अवलंबून असल्याचे पंतप्रधान म्हणाले. याबाबत खरा बदल केवळ लोकसहभागातून घडेल असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांना फायलींच्या पलीकडे जाण्याचे, प्रत्यक्ष भेट देण्याचे आणि जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य स्थिती कशी आहे यांसारख्या समस्या प्रत्यक्ष जाणून घ्यायचे आवाहन केले. जिल्हाधिकारी जितके प्रत्यक्ष दौरे करतील तितके फायलींवर काम करताना त्याला मदत होईल. जीएसटीबाबत पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना हा कसा "गुड आणि सिम्पल टॅक्स "आहे हे समजावून सांगायला सांगितले. प्रत्येक व्यापारी जीएसटी अंतर्गत नोंदणी करेल हे सुनिश्चित करायला त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या जिल्ह्यात खरेदीसाठी सरकारच्या ई-बाजारपेठेच्या सुविधेचा लाभ घ्यायलाही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी गांधींजींच्या संदेशाची आठवण करून दिली कि गरिबातील गरीब व्यक्तीचे जीवनमान सुधारणे हे प्रशासनाचे अंतिम ध्येय असायला हवे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज मी गरीबाच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी काही केले आहे का असे दररोज स्वतःला विचारण्याचे आवाहन केले. तक्रारी घेऊन येणाऱ्या गरीबांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याचे आवाहन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले.
शेवटी पंतप्रधान म्हणले कि जिल्हाधिकारी तरुण आणि सक्षम आहेत आणि आपल्या जिल्ह्यासंदर्भात 2022 च्या नवीन भारतासाठी ते संकल्प करू शकतात. त्यांचे संकल्प निश्चित पूर्ण होतील आणि पर्यायाने देशही यशाची नवी शिखरे गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.