नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेच्या समारोप सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.
या परिषदेत झालेल्या विविध चर्चा आणि मते याबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
भागीदारी, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि राज्या-राज्यांमधल्या नागरिकांना परस्परांशी जोडणाऱ्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाला राज्यपालांनीही प्रोत्साहन द्यावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाच्या विविध राज्यांमध्ये एकात्मता आणि सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उपक्रम राबवण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
कुलपती या नात्याने, शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठांना उद्युक्त करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारतातील विद्यापीठांनी जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगत या प्रयत्नात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय व्यवस्थापन संस्थांच्या तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रत्येकी 10 विद्यापीठांच्या स्वायत्ततेला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाचा यावेळी पंतप्रधानांनी उल्लेख केला.
देशातील सर्वसामान्य माणसाला सहजपणे जीवन जगता यावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी राज्यपालांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यातील वैविध्यपूर्ण अनुभवांच्या आधारे नागरी संस्था आणि शासकीय विभागांना प्रेरणा द्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
केंद्र सरकारच्या आयुषमान भारत या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनेबाबतही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली.
2019 साली महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आहे तर 2022 साली देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन्ही वर्षांमध्ये गाठण्याजोगी ध्येये निश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रहिताशी संबंधित ध्येयांना प्रोत्साहन देण्यासाठी आगामी कुंभमेळ्यातही अनेक उपक्रम राबवता येतील, असे पंतप्रधान म्हणाले.