पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली.
युक्रेनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. या परिस्थितीशी संबंधित देशांनी शत्रुत्व सोडून द्यावे आणि चर्चा तसेच राजकीय मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारावा या भारताने सतत लावून धरलेल्या मागणीचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय कायद्याविषयी भारताला असलेला आदर आणि सर्व देशांची प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्व हाच समकालीन जागतिक व्यवस्थेचा पाया आहे यावर असलेल्या विश्वासाचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय हिताच्या मुद्यांबाबत चर्चा केली आणि व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसेच दोन्ही देशांतील जनतेचे परस्पर संबंध यांच्यासह अनेक विषयांबाबत सहकार्य अधिक दृढ करण्यास वाव आहे यावर त्यांच्यात सहमती झाली. द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराबाबत सध्या सुरु असलेल्या वाटाघाटींना आलेल्या सकारात्मक वेगाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या वर्षी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या शिखर परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या ‘भारत-युके मार्गदर्शक आराखडा 2030’ च्या अंमलबजावणीत होत असलेल्या प्रगतीची देखील त्यांनी प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांच्या सोयीची वेळ ठरवून, पंतप्रधान जॉन्सन यांचे शक्य तितक्या लवकर भारतात स्वागत करण्याची इच्छा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.