पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
पंतप्रधान सुगा यांची जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या ध्येयांची पूर्तता करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
'भारत-जपान विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीने' गेल्या काही वर्षात मोठी मार्गक्रमणा केली असल्याबद्दल उभय नेत्यांची सहमती झाली. परस्पर विश्वास आणि एकसमान मूल्यांच्या पायावर उभे असलेले हे संबंध येत्या काळात आणखी भक्कम करण्याचा मनोदय उभय नेत्यांनी व्यक्त केला.
कोविड-19 सह जगासमोरील सर्व आव्हानांचा विचार करता, भारत-जपान भागीदारी आता अधिक महत्त्वपूर्ण आणि औचित्यपूर्ण झाल्याविषयी उभय नेत्यांचे एकमत झाले. लवचिक आणि मजबूत अशा पुरवठा शृंखला हाच खुल्या, मुक्त आणि सर्वसमावेशक अशा भारत-प्रशांत क्षेत्राच्या आर्थिक रचनेचा पाया असला पाहिजे, यावर यावेळी भर देण्यात आला. या संदर्भात भारत, जपान आणि अन्य समविचारी देशांमध्ये वाढत्या सहकार्याचे स्वागत करत असल्याची भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
उभय देशांमधील आर्थिक भागीदारीच्या प्रगतीची प्रशंसा करत दोन्ही नेत्यांनी या संदर्भात 'विशिष्ट कौशल्याने युक्त अशा कुशल कामगारांविषयीच्या कराराचा मसुदा पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
जागतिक कोविड-19 साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे निमंत्रण पंतप्रधानांनी यावेळी पंतप्रधान सुगा यांना दिले.