पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस महामहिम गुयेन फु ट्रोंग यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही नेत्यांनी एकमेकांची प्रशंसा केली. 2016 मध्ये पंतप्रधानांच्या व्हिएतनाम भेटीदरम्यान स्थापन झालेल्या भारत-व्हिएतनाम यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत सहकार्याच्या वेगवान गतीबद्दल दोन्ही नेत्यांनी संतोष व्यक्त केला.
पंतप्रधानांनी भारताचे ऍक्ट ईस्ट धोरण आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून व्हिएतनामच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि द्विपक्षीय संबंधांची व्याप्ती वाढवण्यासाठी, तसेच विद्यमान उपक्रमांवर जलदगतीने प्रगतीसाठी कार्य करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
व्हिएतनाममध्ये भारतातील औषधे आणि कृषी उत्पादनांसाठी बाजारपेठेतील प्रवेश अधिक सुलभ करण्याची विनंतीही पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित केले आणि व्हिएतनाममधील चाम स्मारकांच्या जीर्णोद्धारात भारताने घेतलेल्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला.
दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारी वाढविण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
युक्रेनमधील सध्या सुरू असलेले युध्दसंकट आणि दक्षिण चीन सागरातील परिस्थितीसह सामायिक हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही त्यांनी यावेळी विचार विनिमय केला.