पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील सद्यस्थितीबाबत चर्चा केली आणि तेथील मानवतावादी स्थिती कायम राहण्याविषयी चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी तेथील संघर्षाची परिस्थिती नियंत्रणात आणून चर्चा आणि वाटाघाटींच्या मार्गाने दोन्ही बाजूंमध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भारतातर्फे सतत विनंती करत असल्याचा पुनरुच्चार केला. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या वाटाघाटींचे मोदी यांनी स्वागत केले आणि या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली.
युक्रेनमधील संघर्षग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरु असलेल्या कार्याच्या तसेच या संकटाची झळ लागलेल्या स्थानिक नागरिकांना औषधांसह इतर मदत सामग्रीच्या भारतातर्फे होत असलेल्या पुरवठ्याच्या प्रगतीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान रूट यांना माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान रूट यांच्याशी एप्रिल 2021 मध्ये झालेल्या आभासी शिखर परिषदेचे स्मरण केले आणि पंतप्रधान रूट यांचे शक्य तितक्या लवकर भारतात स्वागत करता यावे अशी इच्छा व्यक्त केली.