पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांनी आज जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस अदनोम गेब्रीऐसेस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
कोविड-19 महामारीचा सामना करतांना समन्वयीत जागतिक प्रतिसादासाठी जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या प्रयत्नांबद्दल मोदी यांनी टेड्रोस आणि संघटनेचे कौतुक केले. अशा परिस्थितीतही इतर आजारांशी सुरु असलेल्या लढ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे नमूद करत विकसनशील देशात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्वपूर्ण पाठबळाचे देखील त्यांनी कौतुक केले.
जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये दृढ आणि नियमित समन्वय असायला हवा, यावर महासंचालकांनी भर दिला. आरोग्य क्षेत्रात भारताने सुरु केलेले उपक्रम, आयुष्मान भारत योजना आणि क्षयरोगाविरुध्दची भारताची मोहीम यांचे डॉ टेड्रोस यांनी कौतुक केले. जागतिक आरोग्यविषयक प्रश्नांबाबत भारत महत्वाची भूमिका पार पाडू शकतो, असेही ते म्हणाले.
पारंपारिक वैद्यकीय चिकित्सापद्धतीच्या महत्वाबद्दल, विशेषतः जागतिक लोकसंख्येची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि त्यांना सुदृढ बनवण्यात या चिकित्सा पद्धतींच्या उपयुक्ततेबद्दल पंतप्रधान आणि महासंचालकांमध्ये फलदायी चर्चा झाली. पारंपारिक वैद्यक चिकित्सा आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांना एकत्र करुन सर्वसमावेशक प्रोटोकॉल निश्चित करत, त्या आधारे उपचार करणे,काळाची गरज असल्याबद्दल त्यांच्यात सहमती झाली.पारंपरिक औषधे आणि चिकित्साशास्त्रे यांची आज काळजीपूर्वक वैज्ञानिक पडताळणी करण्याची गरज असल्याचा विचारही या चर्चेत व्यक्त झाला.
पारंपारिक वैद्यकशास्त्रांच्या संपूर्ण क्षमतेची आजही जगाला पुरेशी कल्पना नसून या शास्त्रांतील उत्तमोत्तम चिकित्सा पद्धतींचे संशोधन, प्रशिक्षण आणि उत्तम पद्धतींचे आदानप्रदान यासाठी जागतिक आरोग्य संघटना सातत्याने काम करत आहे, असेही महासंचालक म्हणाले. या प्रयत्नांचे पंतप्रधांनी कौतुक केले आणि येत्या 13 तारखेला आयुर्वेद दिवस साजरा केला जाणार असून त्याची संकल्पना ‘कोविड-19 साठी आयुर्वेद’ अशी असल्याची माहिती दिली.
पंतप्रधान आणि महासंचालकांमध्ये या वेळी कोविड-19 चा सामना करण्या साठी सुरु असलेल्या एकत्रित जागतिक लढ्याविषयी चर्चा झली. या संदर्भात एक लस उत्पादक देश म्हणून भारताच्या क्षमतांचा आणि औषध निर्माण क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा लाभ मानवतेला करून देण्या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या कटीबद्धातेचे डॉ. टेडरोस यांनी कौतुक केले.