पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपिअन काउन्सिल म्हणजे युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला..
युक्रेनमधील ढासळती स्थिती आणि मानवी संकट याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. 'हिंसाचार थांबवून संवाद व वाटाघाटींच्या मार्गाचा अवलंब करावा' असे आवाहन भारत सातत्याने करत असल्याचा पुनरुच्चारही पंतप्रधान मोदी यांनी केला.
'आंतरराष्ट्रीय कायदे, संयुक्त राष्ट्रांची सनद आणि सर्व राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडतेचा व सार्वभौमत्वाचा आदर यांवरच विद्यमान जागतिक व्यवस्था आधारलेली आहे', हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
उभय पक्षांमधील संवादाचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले. सर्व लोकांपर्यंत मुक्त आणि अडथळाविरहित पोहोचणे शक्य असावे आणि सर्वांची सुरळीत ये-जा सुनिश्चित करण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला.
युक्रेनमधील प्रभावित भागांत मदतीसाठी तातडीने औषधांसह अन्य वस्तू पुरवण्याचे भारताच्या प्रयत्नांबाबत पंतप्रधानांनी मोदी यावेळी माहिती दिली.