पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक (पीजीआयआय) आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) साठी भागीदारी या विषयावरील विशेष कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद भूषविले.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिकाधिक गुंतवणुकीला चालना देणे आणि भारत, मध्य पूर्व आणि युरोप यांच्यातील विविध आयामांमध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट होते.
युरोपीय संघ, फ्रान्स, जर्मनी, इटली, मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया तसेच जागतिक बँकेचे नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पीजीआयआय हा विकसनशील देशांमधील पायाभूत सुविधांमधील दरी कमी करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर शाश्वत विकास लक्ष्यांच्या प्रगतीला गती देण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एक विकासात्मक उपक्रम आहे.
आयएमईसीमध्ये भारताला आखाती प्रदेशाशी जोडणारा ईस्टर्न कॉरिडॉर आणि आखाती प्रदेशाला युरोपशी जोडणारा नॉर्दर्न कॉरिडॉर यांचा समावेश आहे. यात रेल्वे आणि जहाज-रेल्वे वाहतूक नेटवर्क आणि रस्ते वाहतूक मार्गांचा समावेश असेल.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भौतिक, डिजिटल आणि वित्तीय कनेक्टिव्हिटीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, आयएमईसी भारत आणि युरोप दरम्यान आर्थिक एकात्मतेला चालना देण्यास मदत करेल.
आयएमईसीबाबत भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, युरोपियन युनियन, इटली, फ्रान्स आणि जर्मनी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.