









पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' (पीपीसी) कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. संवादात्मक उपक्रमाचा हा 8 वा भाग होता. देशभरातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पारंपरिकपणे दिल्या जाणाऱ्या तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे वाटप त्यांनी केले.
निरामयतेसाठी पोषक आहार
संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे आणि भारताच्या प्रस्तावावर जगभरात त्याचा प्रचार केला आहे असे पोषक आहाराबाबत बोलताना मोदी यांनी नमूद केले. योग्य पोषणाद्वारे अनेक आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते म्हणून पोषणाबाबत जागरूकता निर्माण करावी, असा आग्रह भारताने धरला. भारतात भरडधान्यांना सुपरफूड (परिपूर्ण आहार) म्हणून ओळखले जाते यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. त्यांनी असेही सांगितले की भारतात पिके, फळे यासारख्या बहुतेक गोष्टी आपल्या वारशाशी जोडल्या गेल्या आहेत आणि प्रत्येक नवीन पीक किंवा ऋतू देवाला समर्पित केला जातो आणि भारतातील बहुतेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात असे उदाहरण दिले. देवाला अर्पण केलेले प्रसाद म्हणून वाटले जाते असेही त्यांनी सांगितले. मोदींनी मुलांना मोसमी फळे खाण्याचे आवाहन केले. त्यांनी मुलांना जंक फूड, तेलकट अन्न आणि मैद्यापासून बनवलेले अन्नपदार्थ टाळण्यास प्रोत्साहित केले. अन्न योग्यरित्या कसे खावे याचे महत्त्व सांगताना, पंतप्रधानांनी मुलांना अन्न गिळण्यापूर्वी किमान 32 वेळा चावून खाण्यास उत्तेजन दिले. कधीही पाणी पिताना चवीचवीने घोट घोट पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी मुलांना दिला. योग्य वेळी योग्य अन्न खाण्याच्या विषयावर, मोदींनी शेतकऱ्यांचे उदाहरण देत सांगितले की ते सकाळी शेतात जाण्यापूर्वी भरपेट नाश्ता करतात आणि सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण ग्रहण करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना अशाच निरोगी सवयींचे पालन करण्यास प्रोत्साहित केले.
पोषण आणि निरामयता
निरोगीपणावर चर्चा करताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की आजार नसणे म्हणजे व्यक्ती निरोगी आहे असे नाही आणि त्यांनी मुलांना निरोगीपणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात झोप महत्त्वाची आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मानवी आरोग्यामध्ये झोपेच्या महत्त्वावर अनेक संशोधन प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. मानवी शरीरासाठी सूर्यप्रकाशाचे महत्त्व अधोरेखित करताना, मोदींनी मुलांना दररोज काही मिनिटे सकाळच्या कोवळी उन्हे अंगावर घेण्याची सवय लावण्यास प्रोत्साहित केले. सूर्योदयानंतर लगेच झाडाखाली उभे राहून दीर्घ श्वास घेण्यासही त्यांनी सांगितले. निरामयतेच्या मुद्द्याचा समारोप करताना जीवनात प्रगती करण्यासाठी, काय, कधी, कसे आणि का खावे यात पोषणाचे सार दडले आहे असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणले.
तणाव व्यवस्थापनात निपुणता
तणाव व्यवस्थापनात निपुणता या विषयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या समाजात दुर्दैवाने अशी कल्पना रुजली आहे की, 10वी किंवा 12वी सारख्या शालेय परीक्षांमध्ये उच्च गुण न मिळणे म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त. यामुळे मुलांवर दडपण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. क्रिकेट सामन्यात फलंदाज ज्याप्रमाणे केवळ चेंडूवर लक्ष केंद्रित करतो तेव्हाच्या एकाग्रतेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी मुलांना फलंदाजाप्रमाणे बाहेरील दबाव टाळत स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास आणि केवळ त्यांच्या अभ्यासाबाबत विचार करण्यास प्रोत्साहित केले, जेणेकरुन विद्यार्थी दबावावर मात करू शकतील.
स्वतःलाच आव्हान द्या
विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देत अभ्यासात चांगली तयारी करावी, असे पंतप्रधान म्हणाले. बरेच लोक स्वतः विरूद्ध स्वतः अशी लढाई लढण्याची हिमंत करत नाहीत, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी आत्म-चिंतनाच्या महत्त्वावर भाष्य केले, सर्वांनी आपण काय बनू शकतो, काय साध्य करू शकतो आणि कोणत्या कृतींमुळे आपल्याला समाधान मिळेल हे वारंवार स्वतःलाच विचारावे असे आवाहनही त्यांनी केले. वृत्तपत्रे किंवा दूरचित्रवाणी यांसारख्या दैनंदिन बाह्य प्रभाव घटकांमुळे प्रभावीत होऊन एखाद्याने आपले लक्ष्य निर्धारित करुन नये, तर ते लक्ष्य बऱ्याच काळापर्यंत जोपासलेल्या स्थिर विचारातून निश्चित करावे, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. बरेच लोक आपल्या मनाला दिशाहीन विहार करु देतात, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी कोणताही निर्णय घेताना गांभीर्याने विचार करावा, तसेच, आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होईल अशा एखाद्या गोष्टीवर शांतपणे विचार करावा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
नेतृत्वाची कला
बाह्य स्वरुपावरून नेत्याची व्याख्या करता येत नाही तर नेता तो असतो जो इतरांसमोर उदाहरण ठरेल असे नेतृत्व करतो, असे पंतप्रधानांनी एका विद्यार्थ्याने प्रभावी नेतृत्वाबद्दल टिप्सबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. हे साध्य करण्यासाठी, व्यक्तींनी स्वतःत बदल घडवले पाहिजेत, आणि त्यांच्या वागण्यातला हा बदल इतरांच्या दृष्टीस पडला पाहिजे, असेही ते म्हणाले. "नेतृत्व लादले जाऊ शकत नाही, तर त्या व्यक्तीचे नेतृत्व त्याच्या सभोवतालच्या लोकांनी आपसूक स्वीकारलेले असले पाहिजे", असे पंतप्रधान म्हणाले. केवळ इतरांना उपदेश केल्याने नेतृत्वाला स्वीकृती मिळेल असे नाही, तर एखाद्याचे वर्तन स्वीकारले जाणे म्हणजे नेतृत्वाचा स्विकार असल्याचे ते म्हणाले. स्वच्छतेवर नुसतेच भाषण दिले मात्र ती आचरणात आणली नाही तर, ती व्यक्ती नेता होऊ शकत नाहीत, असे उदाहरण त्यांनी दिले. नेतृत्वासाठी संघकार्य आणि संयम आवश्यक आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. नेता म्हणून गटामध्ये कार्ये विभाजन करताना संघातील सदस्यांसमोरील आव्हाने समजून घेतली आणि त्यांना येणाऱ्या अडचणींमध्ये मदत केल्याने संघाचा आत्मविश्वास आणि नेतृत्वावरील विश्वास दोन्ही वाढतील, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी एका जत्रेत आई-वडिलांचा हात धरून फिरणाऱ्या मुलाची गोष्ट सांगून आपला मुद्दा स्पष्ट केला. या उदाहरणात त्यांनी गोष्टीतल्या मुलाने सुरक्षा आणि विश्वासाच्या भावनेपोटी पालकांचा हात धरण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले. विश्वास हाच नेतृत्वाची महत्त्वपूर्ण ताकद आहे, यावर त्यांनी भर दिला.
पुस्तकांच्या पलीकडे - 360 अंशात होणारी प्रगती
अभ्यासासोबत छंदांचा समतोल साधण्यासंदर्भात, शैक्षणिक अभ्यासक्रम हाच यशाचा एकमेव मार्ग आहे असा सर्वसाधारण समज असला तरीही, विद्यार्थी रोबोट नाहीत त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके वाचून पुढील वर्गात जाणे नव्हे तर शिक्षण सर्वसमावेशक वैयक्तिक वाढीसाठी आवश्यक आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गत काळाचा दाखला देत शाळेच्या सुरवातीच्या काळात , बागकामासारख्या कलेचे मिळालेले धडे जे आज कदाचित अप्रासंगिक वाटत असतील, परंतु ते सर्वांगीण विकासास हातभार लावणारे होते यावर त्यांनी प्रकाश टाकला. पालक आणि शिक्षकांनी मुलांना कठोर शैक्षणिक अभ्यासक्रमाशी बांधून ठेवू नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. असे केल्याने मुलांची वाढ खुंटते, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मुलांना मोकळे वातावरण आणि त्यांना आनंद मिळेल अशा उपक्रमांची गरज असते, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडते, असे ते म्हणाले. जीवनात परीक्षा म्हणजेच सर्वस्व असे नाही, यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांनी परिक्षेबाबतची ही मानसिकता अंगीकारली तर त्यांना ते कुटुंब आणि शिक्षकांना पटवून देणे सोपे जाईल, असे ते म्हणाले. आपण पुस्तके वाचण्याच्या विरोधात नसल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले; त्याऐवजी, प्रत्येकाने शक्य तितके ज्ञान मिळविण्याच्या महत्त्वावर त्यांनी जोर दिला. परीक्षा म्हणजे सर्वकाही नसून ज्ञान आणि परीक्षा या दोन भिन्न गोष्टी आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
सकारात्मकता शोधणे
पंतप्रधानांनी उल्लेख केला की लोक अनेकदा त्यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल विचार करतात—तो सल्ला का दिला गेला आणि तो त्यांच्या काही दोषांकडे निर्देश करतो का. ही मानसिकता इतरांना मदत करण्याच्या आपल्या क्षमतेस अडथळा आणते. त्याऐवजी, त्यांनी इतरांमधील चांगल्या गुणांची ओळख पटवण्याचा सल्ला दिला, जसे की एखाद्याला उत्कृष्ट गाणे येते किंवा एखादा नेहमी स्वच्छ व नीटनेटका पेहराव करतो. अशा सकारात्मक गुणांबद्दल चर्चा करावी, कारण हा दृष्टिकोन खरा रस दाखवतो आणि सुसंवाद निर्माण करतो.त्यांनी पुढे सुचवले की इतरांना मदत करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यांना एकत्र अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करणे.पंतप्रधानांनी लेखनाची सवय विकसित करण्याच्या महत्त्वावरही भर दिला. त्यांनी नमूद केले की ज्यांना लेखनाची सवय असते, ते आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडू शकतात.
आपल्यातील वेगळेपणा ओळखा
अहमदाबादमधील एका घटनेचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी सांगितले की एका मुलाला अभ्यासात लक्ष देत नसल्याने शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला जात होता. मात्र, त्याने टिंकरिंग लॅबमध्ये उत्कृष्ट कौशल्य दाखवले आणि रोबोटिक्स स्पर्धा जिंकली, ज्यातून त्याच्या अनोख्या प्रतिभेची झलक दिसून आली.पंतप्रधानांनी यावर जोर दिला की मुलांमधील वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभा आणि क्षमता ओळखून त्यांना विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. मोदींनी आत्मपरीक्षण आणि नातेसंबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक प्रयोग सुचवला. त्यांनी बालपणीच्या 25-30 मित्रांची नावे तसेच त्यांच्या पालकांची संपूर्ण नावे लिहून पाहण्याचा सल्ला दिला.ही प्रक्रिया अनेकदा उघड करते की ज्यांना आपण जवळचे मित्र मानतो, त्यांच्याबद्दलही आपल्याला किती कमी माहिती असते. पंतप्रधानांनी लोकांमधील सकारात्मक गुण शोधण्यास आणि इतरांमध्ये सकारात्मकता पाहण्याची सवय लावण्यास प्रोत्साहन दिले. ही सवय वैयक्तिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
तुमच्या वेळेवर प्रभुत्व मिळवा, तुमच्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवा
एका विद्यार्थ्याने वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल विचारल्यावर, मोदींनी स्पष्ट केले की प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात, तरीही काही लोक खूप काही साध्य करतात, तर काहींना असे वाटते की त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी वेळेच्या व्यवस्थापनाच्या महत्त्वावर भर दिला आणि नमूद केले की अनेकांना आपला वेळ प्रभावीपणे कसा वापरायचा हे समजत नाही. पंतप्रधानांनी वेळेची जाणीव ठेवण्याचा, विशिष्ट कामे ठरवण्याचा आणि दररोज आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी हेही सांगितले की जे विषय आपल्याला कठीण वाटतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, त्यांना टाळण्याऐवजी त्यांचा सामना करावा. त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितले की जो विषय अवघड वाटतो, तो सर्वप्रथम घ्यावा आणि त्याला धैर्याने तोंड द्यावे. अशा आव्हानांचा निर्धाराने सामना करून, प्रत्येकजण अडथळे पार करू शकतो आणि यश मिळवू शकतो. परीक्षेच्या काळात विविध कल्पना, शक्यता आणि प्रश्नांमुळे होणाऱ्या विचलनांवर भाष्य करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की अनेकदा विद्यार्थ्यांना स्वतःबद्दलच योग्य माहिती नसते; ते मित्रांसोबत गप्पा मारण्यात गुंततात, आणि अभ्यास न करण्यासाठी सबबी शोधतात. सर्वसामान्य सबबींमध्ये खूप थकलो आहे किंवा अभ्यासाची इच्छा नाही अशा सबबींचा समावेश असतो. पंतप्रधानांनी हेही स्पष्ट केले की अशा विचलनांमुळे, विशेषतः फोनमुळे, लक्ष केंद्रित करणे आणि शैक्षणिक कामगिरी सुधारणे कठीण होते.
वर्तमानात जगा
पंतप्रधानांनी यावर भर दिला की सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आत्ताचा क्षण. तो एकदा निघून गेला की परत येत नाही, पण जर तो पूर्णतः जगला गेला तर तो आयुष्याचा एक भाग बनतो.
त्यांनी सजग राहण्याचे आणि प्रत्येक क्षणाची किंमत ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित केले, जसे की एखाद्या थंड आणि हळुवार झुळूक जाणवणे.
चिंता सामायिक केल्याने मिळणारे बळ
अभ्यास सांभाळताना चिंता आणि नैराश्याचा सामना कसा करावा या विषयावर बोलताना, मोदींनी सांगितले की नैराश्याची समस्या अनेकदा कुटुंबाशी असलेले नाते ढासळल्यामुळे सुरू होते आणि हळूहळू सामाजिक संपर्क कमी होतो. त्यांनी अंतर्गत दुविधा मोकळेपणाने व्यक्त करण्याच्या महत्त्वावर भर दिला, जेणेकरून त्या अधिक गंभीर होण्यापासून रोखता येतील.पंतप्रधानांनी पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले, जिथे कुटुंबातील सदस्यांशी खुलेपणाने संवाद साधल्यामुळे भावनिक दडपण कमी होण्यास मदत होते आणि मानसिक तणाव वाढत जात नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षकांनी हस्ताक्षर सुधारण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची आठवण सांगितली, जी त्यांना अतिशय भावली. यातून शिक्षकांची खरी काळजी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर किती सकारात्मक प्रभाव टाकू शकते, हे त्यांनी अधोरेखित केले.पंतप्रधानांनी नमूद केले की अशी काळजी आणि लक्ष विद्यार्थ्यांच्या कल्याणावर आणि शैक्षणिक कामगिरीवर मोठा प्रभाव टाकू शकते.
तुमची आवड जोपासा
एखादे विशिष्ट करिअर निवडण्याबाबत मुलांवर असलेल्या पालकांच्या दबावाला पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पालकांच्या आपल्या पाल्याप्रती असलेल्या अपेक्षा या बहुतेकवेळा इतर मुलांशी केलेल्या तुलनेमुळे उद्भवतात, ज्यामुळे त्यांच्या अहंभाव आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो. पालकांनी आपल्या मुलांना प्रत्येक ठिकाणी एक आदर्श म्हणून दाखवण्यापेक्षा त्यांच्यातील सामर्थ्यांवर प्रेम करा आणि स्वीकारा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. मागे एकदा शाळेतून निलंबित होण्याच्या मार्गावर असलेल्या मुलाने रोबोटिक्स मध्ये प्रावीण्य मिळवल्याचे सांगून प्रत्येक बालकामध्ये वेगवेगळे नैपुण्य असते याचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. त्यांनी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचेही उदाहरण दिले. आपल्या मुलाचा कल शैक्षणिकदृष्ट्या नसला तरी प्रत्येक पालकांनी त्यांच्यातील सामर्थ्य ओळखून ते वाढवले पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित केले आणि आपण पंतप्रधान नसतो तर नक्कीच कौशल्य विकास विभाग निवडला असता, असे सांगितले. आपल्या मुलांच्या क्षमतांवर भर देऊन पालक त्यांचा तणाव कमी करू शकतात आणि मुलांना आपले ध्येय गाठण्यासाठी मदत करून शकतात.
विराम द्या, प्रतिबिंबित करा, पुन्हा तयार व्हा
निरनिराळ्या ध्वनींना ओळखण्यावर लक्ष केंद्रित केल्याने कशाप्रकारे एकाग्रता वाढते याचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. प्राणायाम सारख्या श्वसनाच्या व्यायामांमुळे एका वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेची निर्मिती होते ज्यामुळे ताणाचे व्यवस्थापन होते. पंतप्रधानांनी दोन्ही नाकपुड्यानी श्वासोच्छवास संतुलित करण्यासाठीचे तंत्र विद्यार्थ्यांना सांगितले ज्यामुळे केवळ काही सेकंदात शरीरावर नियंत्रण येऊ शकते. ध्यानधारणेचा अभ्यास आणि श्वासावरील नियंत्रण यामुळे कशाप्रकारे ताणापासून मुक्ती मिळते आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जाते, ते पंतप्रधानांनी सांगितले.
तुमची क्षमता ओळखणे, ध्येय साध्य करणे
सकारात्मक रहाणे आणि छोट्या छोट्या यशामध्ये आनंद शोधणे याविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की अनेकदा लोक स्वतःच्याच विचारांमुळे किंवा दुसऱ्यांच्या प्रभावामुळे नकारात्मक बनतात. दहावीच्या परीक्षेत 95% मिळवण्याची अपेक्षा असलेल्या आणि 93% मिळाल्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्याला हे गुण म्हणजे प्राप्त केलेले मोठे यश असल्याचे सांगून उच्च लक्ष्य ठेवल्याबद्दल त्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. आपली उद्दिष्टे महत्वाकांक्षी असावीत मात्र ती वास्तविकतेला धरून असावीत, यावर त्यांनी भर दिला. यशाकडे बघताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, एखाद्याच्या सामर्थ्याचे आकलन करावे आणि त्या उद्दिष्टाच्या जवळ जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे, असे ते म्हणाले.
प्रत्येक मूल वेगळे असते
परीक्षांच्या काळात मुलांची तब्येत उत्तम राहावी या विषयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की प्राथमिक समस्या विद्यार्थ्यांमध्ये कमी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये जास्त आहे. अनेक पालक मुलांना कलेसारख्या क्षेत्रात आवड असूनही अभियांत्रिकी किंवा वैद्यक यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात करिअर करण्यासाठी दबाव आणतात, असे पंतप्रधान म्हणाले. या सततच्या दबावामुळे मुलांचे आयुष्य तणावपूर्ण बनत जाते. पालकांनी आपल्या मुलांना समजून घ्यावे, मुलांची आवड आणि क्षमता ओळखाव्यात, त्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करावे आणि त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. उदाहरणार्थ जर मुलाला खेळांमध्ये रुची असेल तर पालकांनी त्यांना क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी घेऊन जायला हवे आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षकांनी देखील केवळ अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन इतरांना दुर्लक्षित करत असल्याचे वातावरण निर्माण करणे टाळावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये तुलना न करता प्रत्येक विद्यार्थ्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण क्षमतेला प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे मात्र जीवनात शैक्षणिक यश म्हणजे सर्व काही नाही हे देखील त्यांनी ओळखले पाहिजे, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.
स्वयंप्रेरणा
स्वयंप्रेरणा या विषयावर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की मुलांनी कधीही स्वतःला एकटे वाटून घेऊ नये, एकांतात राहू नये ,विचारांची देवाणघेवाण करावी तसेच आपले कुटुंबीय आणि वरिष्ठांकडून प्रेरणा घेण्याच्या महत्त्वावर त्यांनी जोर दिला. आपण छोटी उद्दिष्टे समोर ठेवून स्वतःला आव्हान द्यावे, उदाहरणार्थ 10 किलोमीटर सायकल चालवणे ज्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो आणि ध्येयपूर्तीचा आनंद मिळतो, असे पंतप्रधान म्हणाले. स्वत:सोबतचे हे छोटे प्रयोग वैयक्तिक मर्यादांवर मात करून वर्तमानात जगण्यास मदत करतात आणि भूतकाळ भूतकाळातच राहू देतात यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. आपल्याला 140 कोटी भारतीयांकडून प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले.
"परीक्षा पे चर्चा" लिहिताना अजय सारखे लोक त्यांच्या खेड्यांमध्ये त्याचे कवितेमध्ये रूपांतर करत आहेत, असे त्यांनी सांगितले. यामुळे हे कार्य निरंतर चालू ठेवण्याची प्रेरणा आपल्याला मिळते कारण आपल्या आजूबाजूला असे अनेक प्रेरणा स्त्रोत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. काही गोष्टी आत्मसात करण्याबाबत विचारले असता, पंतप्रधान म्हणाले की प्रत्यक्षात लवकर उठण्यासारख्या सल्ल्याचा विचार करणे हे अंमलबजावणी शिवाय पुरेसे नाही.
शिकलेली तत्त्वे प्रत्यक्ष जगण्यात अंमलात आणणे आणि स्वतःवर प्रयोग करत आपल्यातील नको असलेल्या गोष्टी दूर काढून टाकण्याच्या मूल्यावर पंतप्रधानांनी या संवादात भर दिला. आपण जर का स्वत:ला प्रयोगशाळा बनवले आणि या तत्त्वांची चाचणी घेतली तर ही तत्वे अर्थाने खऱ्या आत्मसात करता येतात आणि त्याचा लाभही घेता येतो, ही बाब पंतप्रधानांनी सांगितली. बहुतेक लोक स्वत:ऐवजी इतरांशी स्पर्धा करतात, अनेकदा ते स्वत:ची तुलना कमी क्षमतेच्या लोकांशी करतात, आणि यामुळे हाती निराशा येते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. स्वतःसोबतच स्पर्धा केल्याने अढळ आत्मविश्वास निर्माण होतो, तर स्वत:ची इतरांशी तुलना केल्याने हाती निराशा येऊ शकते, यावर त्यांनी या संवादात भर दिला.
अपयश हे एकप्रकारचे इंधनच आहे
यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अपयशावर कशी मात करावी या विषयावर देखील मार्गदर्शन केले. 30 ते 40 टक्के विद्यार्थी दहावी किंवा बारावीत अनुत्तीर्ण झाले म्हणजे आयुष्य संपले असे नव्हे. आयुष्यात यशस्वी व्हायचे की केवळ शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी व्हायचे हे ठरवणे खूप महत्त्वाचे असते असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अपयशाला शिक्षक बनवायला हवे असा सल्लाही त्यांनी दिला. याबद्दल समाजावून सांगतांना त्यांनी क्रिकेट या खेळातील उदाहरणही विद्यार्थ्यांसमोर मांडले. क्रिकेटमध्ये खेळाडू आपल्या चुकांचा आढावा घेतात आणि मग सुधारणांसाठी प्रयत्न करतात असे त्यांनी सांगितले. जीवनाकडे केवळ परीक्षेच्या चष्म्यातून पाहू नये तर जगण्याशी संबंधित सर्व पैलूंतून त्याकडे पाहीले पाहीजे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. दिव्यांग व्यक्तींमध्ये अनेकदा अचंबित करायला लावणाऱ्या क्षमता असतात, अशाच तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीकडेही काही ना काही विलक्षण क्षमता असतातच ही बाबही त्यांनी अधोरेखीत केली. आपण केवळ शैक्षणिक कामगिरीवरच भर न देता, आपल्या अशा क्षमतांवरही काम करायला हवे असे त्यांनी सांगितले. आपल्या दीर्घकाळाच्या जीवनात केवळ शैक्षणिक गुणांमधूनच आपल्या यश मिळत नाही, तर त्या त्या व्यक्तीचे जीवन आणि त्यांच्यातील क्षमतांच्या आधारे यश मिळते असेही त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणे
आपण सगळेजण विशेषत: तंत्रज्ञानाने व्यापलेल्या आणि तंत्रज्ञानाचाच प्रभाव असलेल्या युगात जगत आहोत, आणि त्यामुळेच आपण सर्वजण भाग्यवान असल्याच्या वास्तवाची जाणिवही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना करून दिली. अशा काळात आपल्याला तंत्रज्ञानाला घाबरून त्यापासून दूर जाण्याची गरज नाही, तर त्याऐवजी प्रत्येक व्यक्तीने, आपण आपला वेळ अनुत्पादक कामांवर खर्च करतो की आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करतो हे ठरवले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपण जर का असे करू शकलो, तर त्यामुळे तंत्रज्ञान ही आपला आत्मविश्वास ढासळवणारी गोष्ट नसेल तर त्याऐवजी ती आपले बलस्थान बनू शकेल असे त्यांनी सांगितले. संशोधक आणि नवोन्मेषक हे समाजाच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान विकसित करत असतातत ही बाबही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. अशावेळी आपण सगळ्यांनी तंत्रज्ञान समजून घेतले पाहीजे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहीजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना कोणतेही काम करताना त्यासाठी नेमके आपल्या पूर्ण क्षमतेने काम करत सर्वोत्तम कामगिरी कशी करायची याबद्दलचा प्रश्न विचारला. त्यावरही पंतप्रधानांनी उत्तर दिले. या उत्तरातून त्यांनी असे काम करताना स्वतःमध्ये सातत्यपूर्ण रितीने सुधारणा घडवून आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्याला जर आपल्याला सर्वोत्तम कामगिरी नोंदवायची असेल तर त्यासाठी आपण आज कालपेक्षाही चांगले होण्याचा प्रयत्न करत राहणे ही पहिली अट आहे असे त्यांनी सांगितले.
एखादी बाब आपल्या आई - वडिलांना कशी पटवून द्यायची?
यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना कुंटुबाचा सल्ला किंवा आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी यांपैकी कोणत्या एकाची निवड करावी, अशा द्विधा मनस्थितीसारख्या परिस्थितीविषयी देखील मार्गदर्शन केले. आपण आपल्या कुटुंबाने दिलेल्या सल्लाची कायमच दखल घ्यायला हवी, आणि त्यानंतर आपण त्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांचे सहकार्य मिळवून कशारितीने वाटचाल करू शकू याबद्दल त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्यांचे मन वळवायला हवे असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपण जर का त्यांच्या सल्ल्याप्रती प्रामाणिक रस दाखवला आणि त्यांच्यासोबत आदराने इतर पर्यायांबाबत सल्लामसलत विचार विनिमय केला, तर त्यामुळे हळूहळू आपले कुटुंबही आपल्या आवडी समजू शकेल आणि प्रत्यक्षात आपल्या आकांक्षा समजून घेत त्याला पाठबळही देऊ शकतील असे त्यांनी सांगितले.
परीक्षेचे दडपण हाताळणे
यावेळी पंतप्रधानांनी परीक्षेच्या वेळी दिलेल्या वेळेत संपूर्ण पेपर पूर्ण करता न येणे, परीक्षेचा ताण वाटणे - दडपण येणे अशा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवरही विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना संक्षिप्त उत्तरे कशी लिहावी आणि वेळेचे प्रभावी व्यवस्थापन कसे करावे हे समजून घेण्यासाठी, या आधी झालेल्या परीक्षांच्या पेपरचा दीर्घ सराव करण्याचा सल्ला दिला. ज्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याकरता आपल्याला जरा जास्त प्रयत्न करण्याची गरज वाटते अशा प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असते, आणि त्याचवेळी जे प्रश्न कठीण वाटतात किंवा आपल्याला समजलेले नसतात अशा प्रश्नांवर जास्त वेळ खर्च करता कामा नये याचेही महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नियमित सरावामुळे प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यात खूपच चांगली मदत होते ही बाबही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
निसर्गाची जोपासना
आपल्या या संवादात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी हवामान बदलाच्या विषयावर देखील चर्चा केली. युवा पिढीने हवामान बदलाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. जगभरातील बहुतांश विकास कामांमुळे शोषणाची संस्कृती उदयाला आली झाली आहे, या संस्कृतीशी जोडलेले लोक पर्यावरण रक्षणापेक्षा वैयक्तिक लाभालाच सर्वोच्च प्राधान्य देतात असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मिशन लाइफ (लाइफस्टाइल फॉर एन्व्हायरमेंट) या अभियानाबद्दलही सांगितले.हे अभियान निसर्गाचे रक्षण - जतन आणि संवर्धन करणाऱ्या जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे अभियान आहे असे ते म्हणाले. धरणीमातेप्रती कृतज्ञता तसेच झाडांची आणि नद्यांची पूजा करणे या आणि यांसारख्या, निसर्गाबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या, भारताच्या सांस्कृतिक प्रथांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना 'एक पेड मां के नाम’ या मोहिमेविषयी देखील माहिती दिली. आपल्या आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करावे यासाठी त्यांनी सर्वांना प्रोत्साहितही केले. या उपक्रमामुळे आपुलकीची आणि वैयक्तिक दायित्वाची भावना वाढीला लागते, यातूनच निसर्ग रक्षणाचा मार्गही प्रशस्त होतो असे पंतप्रधान म्हणाले.
स्वतःचे हरित नंदनवन विकसित करणे
आपल्या या संवादातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ची झाडे लावण्यासाठीही प्रोत्साहित केले. आपण लावलेल्या झाडांना कशारितीने पाणी द्यावे याबद्दलचे व्यावहारिक उपायही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. झाडाशेजारी पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवून महिन्यातून एकदा ते पुन्हा भरावे असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. झाडांना पाणी देण्यासाठी अशा पद्धतींचा वापर केल्याने पाण्याचा कमीत कमी वापर करून देखील, झाडाची वेगाने वाढ व्हायला मदत होते असे त्यांनी सांगितले. आपल्या संवादाच्या समारोपावेळी पंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच प्रत्येकाच्या सहभागाबद्दल धन्यवाद दिले.