महामहीम,
सर्वप्रथम, माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो . महामहीम , काही महिन्यांपूर्वी आपल्याला दूरध्वनीवर सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि तुम्ही खूपच आत्मीयतेने आणि सहजतेने बोललात, ते माझ्या नेहमी लक्षात राहील आणि यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. खूप धन्यवाद. महामहीम, तुम्हाला जर आठवत असेल, तो खूप कठीण काळ होता. भारताला कोविड -19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला होता, आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. त्यावेळी एखाद्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही आपुलकीने मदतीचा हात पुढे केला. जेव्हा तुम्ही माझ्याशी बोललात , तेव्हा तुम्ही जे शब्द वापरले, ते माझ्या नेहमीच लक्षात राहतील आणि मी मनापासून तुमचे आभार मानतो. महामहिम, एका खऱ्या मित्राप्रमाणे, तुम्ही संवेदनशीलतेने सहकार्याचा संदेश दिला होता आणि त्यानंतर लगेच अमेरिका सरकार, अमेरिकेचे कॉर्पोरेट क्षेत्र आणि भारतीय समुदाय, सर्वजण भारताला मदत करण्यासाठी एकत्र आले होते.
महामहीम,
राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि तुम्ही, तुम्ही अत्यंत आव्हानात्मक वातावरणात आणि आव्हानात्मक काळात अमेरिकेचे नेतृत्व सांभाळले आणि अगदी अल्पावधीत तुम्ही अनेक आघाड्यांवर यशस्वी कामगिरी केली. मग ते कोविड असेल, हवामान संबंधी असेल किंवा क्वाड या सर्व मुद्द्यांवर अमेरिकेने खूप महत्वाची भूमिका बजावली आहे.
महामहीम,
भारत ही जगातील सर्वात मोठी आणि अमेरिका ही सर्वात जुनी लोकशाही या नात्याने आपण खरेच नैसर्गिक भागीदार आहोत. आपली मूल्ये समान आहेत, समान भौगोलिक आणि राजकीय हित आहे आणि आपले समन्वय आणि सहकार्य सातत्याने वाढत आहे. पुरवठा साखळी अधिक बळकट करणे, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि अंतराळ ही तुमची विशेष आवडीची क्षेत्रे आहेत, ही क्षेत्रे माझ्याही विशेष आवडीची आहेत आणि त्यांना विशेष प्राधान्य असून या क्षेत्रांमध्ये आपले सहकार्य खूप महत्वाचे आहे.
भारत आणि अमेरिकामधील जनतेत अतिशय चैतन्यदायी मजबूत परस्पर संबंध आहेत, हे तुम्ही जाणताच . भारतीय वंशाचे ४० लाखांहून अधिक लोक, हा भारतीय समुदाय आपल्या दोन देशांमधील एक दुवा आहे, मैत्रीचा पूल आहे आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आणि समाजांमध्ये त्यांचे योगदान खरोखरच प्रशंसनीय आहे.
महामहीम,
अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून तुमचे निवडून येणे ही एक महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहात. मला पूर्ण विश्वास आहे की अध्यक्ष बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आपले द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील.
महामहीम,
अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून तुमचे निवडून येणे ही एक महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहात. मला पूर्ण विश्वास आहे की अध्यक्ष बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आपले द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील.
महामहीम,
विजयाचा हा प्रवास असाच कायम राखत, भारतातही तो चालू रहावा अशी भारतीयांची इच्छा आहे आणि म्हणूनच ते तुमचे स्वागत करण्याची प्रतीक्षा करत आहेत आणि म्हणून, मी तुम्हाला भारत भेटीचे खास आमंत्रण देतो. महामहीम, पुन्हा एकदा, मी तुमचे आभार मानतो आणि आत्मीयतेने केलेल्या या स्वागताबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.