QuoteGreetings on the occasion of Chhath Puja: PM Modi
QuoteChhath Puja is an example of Ek Bharat Shreshtha Bharat: PM Modi
QuoteToday we are one of the largest solar power generating countries: PM Modi
QuoteOur country is doing wonders in the solar as well as the space sector. The whole world, today, is astonished to see the achievements of India: PM Modi
QuoteUrge more and more Start-ups and innovators to take full advantage of the huge opportunities being created in India in the space sector: PM Modi
QuoteStudent power is the basis of making India strong. It is the youth of today who would lead India in the journey till 2047: PM Modi
QuoteIn India, Mission LiFE has been launched. The simple principle of Mission LiFE is - Promote a lifestyle which does not harm the environment: PM Modi

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

नमस्कार. आज देशाच्या अनेक भागात सूर्य उपासनेचा 'छठ' हा सण साजरा केला जातो आहे. या 'छठ' उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आपापल्या गावी, आपापल्या घरी, आपल्या कुटुंबाकडे पोहोचले आहेत. छठ मातेने सर्वांना समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी करतो.

मित्रहो,

सूर्यपूजेची ही परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीची आणि श्रद्धेची नाळ निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे, याचा पुरावा आहे. या पूजेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात सूर्यप्रकाशाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, चढउतार हा जगण्याचा अविभाज्य भाग असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत चित्त स्थिर ठेवले पाहिजे. छठ मातेच्या पूजेमध्ये वेगवेगळी फळे आणि ठेकुआचा नैवेद्य अर्पण केला जातो. हे व्रत एखाद्या कठीण साधनेसारखेच आहे. छठ पूजेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या वस्तू समाजातील वेगवेगळ्या लोकांनी मिळून तयार केलेल्या असतात. पूजेसाठी बांबूपासून बनवलेली टोपली किंवा सुपली वापरली जाते. मातीच्या दिव्यांचेही महत्त्व आहेच. या सणाच्या माध्यमातून हरभरा पिकवणारे शेतकरी आणि बत्तासे तयार करणारे लहान उद्योजक यांचे महत्त्व समाजात रुजवण्यात आलेआहे. त्यांच्या सहकार्याशिवाय छठ पूजा पूर्ण होऊ शकत नाही. हा सण आपल्या आयुष्यातील स्वच्छतेच्या महत्त्वावरसुद्धा भर देतो. या उत्सवाचे आगमन होताच रस्ते, नद्या, घाट, पाण्याचे विविध स्त्रोत या सर्वांची सामुदायिकरित्या स्वच्छता केली जाते. छठ हा सण हा'एक भारत- श्रेष्ठ भारत' चे सुद्धा उदाहरण आहे. आज बिहार आणि पूर्वांचलमधील लोक, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी छठ मोठ्या थाटामाटात साजरी करत आहेत. दिल्ली तसेचमुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि गुजरातमधील अनेक भागांमध्ये सुद्धा छठपुजेचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते आहे. मला आठवते की पूर्वी गुजरातमध्ये छठपूजा होत नसे. पण बदलत्या काळानुसार आज गुजरातमध्ये जवळपास सर्वत्रच छठपूजेचे रंग दिसू लागले आहेत. हे पाहून मलाही मनापासून आनंद होतो. परदेशात सुद्धा छठपूजेची किती भव्य चित्रे येतात, हे आपण पाहतो. म्हणजेच भारताचा हा समृद्ध वारसा, आपली श्रद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख वाढवते आहे. या महान उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला माझ्यातर्फे अनेकानेक शुभेच्छा.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय  आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.

तामिळनाडूमध्ये कांचीपुरम येथे एक शेतकरी आहेत, थिरू के. एझिलन. त्यांनी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेतला आणि त्यांच्या शेतात दहा अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप संच बसवला. आता त्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या विजेसाठी काहीही खर्च करावा लागत नाही. आता ते शेतात सिंचन करण्यासाठी सरकारकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यावरही अवलंबून नाहीत. त्याचप्रमाणे, राजस्थानमधील भरतपूर येथील कमलजी मीणा हे पीएम कुसुम योजनेचे आणखी एक लाभार्थी शेतकरी आहेत. कमलजींनी शेतात सौर पंप बसवला, त्यामुळे त्यांचाही खर्च कमी झाला आहे. खर्च कमी झाला, त्यामुळे उत्पन्नही वाढले. कमलजी इतर अनेक लघु उद्योगांसाठीही सौर उर्जेचा वापर करत आहेत. त्यांच्या भागात लाकूडकाम केले जाते, गायीच्या शेणापासून उत्पादने तयार केली जातात, त्यासाठीही सौरऊर्जेचा वापर केला जातो आहे. त्याचबरोबरते 10-12 जणांना रोजगारही देत आहेत. म्हणजेच कमलजींनी कुसुम योजनेतून जी सुरूवात केली, त्याचा सुगंध आता अनेक लोकांपर्यंत पोहोचू लागला आहे.

 

मित्रहो,

तुम्ही महिनाभर वीज वापराल आणि त्या विजेचे बिल येण्याऐवजी तुम्हाला विजेचे पैसे मिळतील, अशी कल्पना तुम्ही करू शकता का? सौरऊर्जेनेहे करूनदाखवले आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही गुजरातमधील मोढेरा, या देशातील पहिल्या सौर गावाबद्दल बरेच काही ऐकले असेल. मोढेरा यासौर गावातील बहुतांश घरांमध्ये सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. आता तिथल्या अनेक घरांमध्ये महिन्याच्या शेवटी विजेचे बिल येत नाही, उलट विजेच्या उत्पन्नाचे धनादेश येत आहेत. हे घडताना पाहून आता देशातील अनेक गावांमधले लोक मला पत्र लिहून, त्यांचे गाव सौर ग्राम व्हावे, अशी विनंती करत आहेत. भारतात लवकरच सौरगावांची उभारणी ही फार मोठी लोकचळवळ होईल, असे दिसते आहे. तो दिवस निश्चितच दूर नाही आणि मोढेरा गावातील लोकांनी त्याची सुरुवात केली आहे.

या, 'मन की बात'च्या श्रोत्यांना मोढेरा गावातील लोकांची ओळख करून देऊया. श्री विपिनभाई पटेल हे सध्या आमच्यासोबत फोनवर बोलत आहेत.

पंतप्रधान -  विपिन भाई नमस्कार. बघा, आता मोढेरा गाव हे संपूर्ण देशासाठी आदर्श म्हणून समोर आले आहे. पण जेव्हा तुमचे नातेवाईक, ओळखीचे लोक तुम्हाला याबद्दल विचारतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगता, काय उपयोग झाला?

विपिन जी -  सर, लोक आम्हाला विचारतात, तेव्हा आम्ही सांगतो की आम्हाला पूर्वी जे वीज बिल यायचे ते आता शून्य येते आणि कधी तरी 70 रुपये येते, पण आमच्या संपूर्ण गावाची आर्थिक परिस्थिती आता सुधारते आहे.

पंतप्रधान – म्हणजे आधी वीज बिलाची काळजी वाटायची, ती आता संपली आहे.

विपिन जी - हो सर, हे अगदी खरे आहे. सध्या संपूर्ण गावात काळजीचे वातावरण नाही. सगळे म्हणतात की सरांनी जे काही केले, ते खूप चांगले केले आहे. ते खुश आहेत सर. प्रत्येकजण आनंदात आहे.

पंतप्रधान - आता स्वत:च्याच घरात स्वत:च वीज कारखान्याचे मालक झालात. तुमच्याच घराच्या छतावर वीजनिर्मिती होते आहे.

विपिन जी -  हो सर, खरे आहे सर.

पंतप्रधान - मग या बदलामुळे गावातील लोकांवर काय परिणाम झाला आहे?

विपिन जी - सर, गावातले सगळे लोक शेती करत आहेत, विजेबाबतच्या त्रासातून आमची सुटका झाली आहे. वीजेचे बिल भरायचे नाही, त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो आहोत सर.

पंतप्रधान - म्हणजे वीजेचे बिलही गेले आणि सोयही वाढली.

विपिन जी –सगळी कटकटच संपली सर. तुम्ही इथे आला होता आणि इथे थ्रीडी शोचे उद्घाटन झाले होते, त्यानंतर मोढेरा गावाचे चित्रच बदलून गेले आहे सर. आणि सेक्रेटरी सुद्धा आले होते सर...

पंतप्रधान - हां, हां...

विपिन जी – आमचे गाव तर चांगलेच प्रसिद्ध झाले सर...

पंतप्रधान – हो ना. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस.. ही त्यांचीच इच्छा होती. त्यांनी मला अगदीच गळ घातली की भाई, हे एवढं मोठं काम केलं आहे, मला तिथे जाऊन बघायचे आहे. चला विपिन भाऊ, तुम्हाला आणि तुमच्या गावातील सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा. अवघ्या जगाने तुमच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि ही सौर ऊर्जा मोहीम घरोघरी जावी.

विपिन जी -  ठीक आहे सर. आम्ही सुद्धा सर्व लोकांना सांगू कीसौर यंत्रणा लावा, स्वत:चे पैसे खर्चून सुद्धा लावा, त्यात खूप फायदा आहे.

पंतप्रधान – हो, लोकांना नक्की समजावून सांगा. चला, अनेकानेक आभार. धन्यवाद भाऊ.

विपिन जी :- धन्यवाद सर. तुमच्याशी बोलून माझे आयुष्य धन्य झाले.

पंतप्रधान:-विपिन भाईंचे मनापासून आभार.

या, आता आपण मोढेरा गावातील वर्षा ताईंशीही बोलूया.

वर्षाबेन – हॅलो, नमस्कार सर.

पंतप्रधान - नमस्कार - नमस्कार वर्षाबेन. तुम्ही कशा आहात ?

वर्षाबेन - आम्ही खुशाल आहोत सर, तुम्ही कसे आहात ?

पंतप्रधान – मी सुद्धा खुशाल आहे.

वर्षाबेन – तुमच्याशी बोलून अगदी धन्य वाटते आहे सर..

पंतप्रधान - अच्छा वर्षाबेन,

वर्षाबेन -  हो सर...

पंतप्रधान – तुम्ही मोढेरा गावातल्या आहात, लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातल्या आहात.

वर्षाबेन - मी लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातली आहे सर. मी माजी सैनिकाची  पत्नी आहे सर.

पंतप्रधान - मग यापूर्वी भारतात कुठेकुठे जाण्याची संधी मिळाली तुम्हाला?

वर्षाबेन - मी राजस्थानमध्ये गेले, गांधी नगर मध्ये गेले, जम्मू मध्ये कचरा कांझोर आहे, तिथे जाण्याची संधी मिळाली, सोबत राहता आले. तिथे अनेक सुविधा मिळत होत्या सर.

पंतप्रधान -  हा, सैन्यात असल्यामुळे तुम्ही छान हिंदी बोलत आहात.

वर्षाबेन - हो, हो,शिकले आहे सर.

पंतप्रधान -   मला सांगा,मोढेरामध्ये इतका मोठा बदल झाला आहे, तुम्ही हा सोलर रूफटॉप प्लांट बसवला. सुरुवातीला लोक बोलत असतील, तेव्हा तुमच्या मनात आलेच असेल, याचा काय उपयोग आहे? काय करत आहेत ? काय होईल ? अशी वीज मिळते का? असे अनेक विचार तुमच्या मनात आले असतील. आता तुमचा अनुभव काय आहे? याचा काय फायदा झाला आहे?

वर्षाबेन -खूपच फायदा झाला आहे सर. तुमच्यामुळे आमच्या गावात रोज दिवाळी साजरी होते. आम्हाला 24 तास वीज मिळते आहे, बिल तर येतच नाही. आमच्या घरात आम्ही सर्व इलेक्ट्रिक वस्तू आणल्या आहेत सर, त्या सर्व आम्ही वापरतो सर, फक्त तुमच्यामुळे. बिल येतच नाही, त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे सगळ्या वस्तू वापरू शकतो.

पंतप्रधान – हो, हे तर खरेच आहे. विजेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे तुम्ही ठरवले आहे तर.

वर्षाबेन – हो सर. आता आम्हाला कोणतीही अडचण नाही. या सर्व वस्तु आता आम्ही निर्धास्तपणे वापरू शकतो, वॉशिंग मशीन, एसी सगळे काही वापरू शकतोसर.

पंतप्रधान - आणि गावातले इतर लोकही यामुळे खुश आहेत का?

वर्षाबेन –खूपच खुश आहेत सर.

पंतप्रधान -  बरं. तुमचे पती तर सूर्य मंदिरात काम करतात ना? तिथे लाईट शो चा किती मोठा कार्यक्रम झाला आणि आता जगभरातून पाहुणे येत आहेत.

वर्षा बेन - जगाच्या कानाकोपऱ्यातून परदेशी लोक येत असतात सर,, पण तुम्ही आमचे गाव जगभरात प्रसिद्ध केले आहे.

पंतप्रधान –मग आता तुमच्या पतीचे काम वाढले असेल, इतके पाहुणे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत.

वर्षा बेन – काहीच हरकत नाही. कितीही काम वाढले तरी हरकत नाहीसर, माझ्या नवऱ्याचीही हरकत नाही, फक्त तुम्ही आमच्या गावाचा विकास करत राहा.

पंतप्रधान –आता आपल्याला सर्वांना मिळून गावाचा विकास करायचा आहे.

वर्षा बेन – हो, हो, सर, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.

पंतप्रधान - आणि मी मोढेरा गावातील लोकांचे अभिनंदन करू इच्छितो, कारण गावाने ही योजना स्वीकारली आणि आपण आपल्या घरात वीज बनवू शकतो, याची खात्री त्यांना वाटली.

वर्षा बेन  - 24 तास सर ! आमच्या घरात वीज येते आणि आम्ही खूप आनंदात आहोत.

पंतप्रधान – चला तर. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जे पैसे शिल्लक आहेत, ते मुलांच्या भल्यासाठी वापरा. त्या पैशाचा चांगला वापर करा म्हणजे तुम्हाला आयुष्यात फायदा होईल. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मोढेरावासीयांना माझा नमस्कार!

 

मित्रहो,

वर्षाबेन आणि विपीन भाई यांनी जे काही सांगितले ते संपूर्ण देशासाठी, गावांसाठी आणि शहरांसाठी प्रेरक आहे. मोढेराच्या या अनुभवाची देशभरात पुनरावृत्ती होऊ शकते. सूर्याच्या शक्तीमुळे आता पैशाची बचत होईल आणि उत्पन्नही वाढेल. मंजूर अहमद लर्हवाल हे जम्मू-काश्मीरमधीलश्रीनगर येथे राहणारे साथी आहेत. काश्मीरमध्ये थंड वातावरण असल्यामुळे विजेचा खर्च जास्त आहे. याच कारणामुळे मंजूर यांचे वीज बिल सुद्धा 4 हजार रुपयांपेक्षा जास्त येत असे. मात्र मंजूरजींनी त्यांच्या घरी सोलर रूफटॉप प्लांट लावला आणि त्यामुळे त्यांचा खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. त्याचप्रमाणे ओदीशातीलकुन्नी देउरी या मुलीने स्वत:बरोबरच इतर महिलांसाठी सुद्धा सौरउर्जेच्या माध्यमातून रोजगाराचे साधन प्राप्त केले आहे. कुन्नी ही ओदीशामधल्या केंदुझर जिल्ह्यातल्या करदापाल गावात राहते. ती आदिवासी महिलांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या रीलिंग मशीनवर रेशीम कातण्याचे प्रशिक्षण देते. सौर मशिनमुळे या आदिवासी महिलांना वीजबिलाचा भार सहन करावा लागत नाही, शिवाय त्यांना उत्पन्नही मिळते आहे. हे सूर्यदेवाच्या सौरऊर्जेचेच वरदान आहे. वरदान आणि प्रसादाचा लाभ जितक्या जास्त लोकांना मिळेल, तितके चांगले. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीही यात सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी करून घ्या.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आत्ताच मी तुमच्यासोबत सूर्याबद्दल बोलत होतो. आता माझे लक्ष अवकाशाकडे वळते आहे, कारण आपला देश सौरऊर्जा क्षेत्राबरोबरच अवकाश क्षेत्रातही चमत्कार करून दाखवतो आहे. आज अवघे जग भारताची कामगिरी पाहून आश्चर्यचकित झाले आहे. त्यामुळे 'मन की बात'च्या श्रोत्यांनाही त्याबद्दल सांगून त्यांनाही आनंदात सहभागी करून घ्यावे, असे मला वाटले.

तुम्ही पाहिले असेल की आत्ता, काही दिवसांपूर्वीच भारताने एकाचवेळी 36 उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण केले. दिवाळीच्या एक दिवस आधी मिळालेले हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या युवकांकडून देशाला मिळालेली ही विशेष दिवाळी भेट आहे. या प्रक्षेपणामुळे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा अशा संपूर्ण देशभरात डिजिटल संपर्क व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. आणि याच्या मदतीने अगदी दुर्गम आणि दूरवरचे भाग देखील देशाच्या उर्वरित भागांशी सुलभतेने जोडले जातील. देश जेव्हा आत्मनिर्भर होतो तेव्हा तो यशाच्या नव्या उंचीवर कसा पोहोचतो याचे देखीलहे एक उदाहरण आहे. तुमच्याशी बोलत असताना मला जुने दिवस आठवत आहेत, तेव्हा भारताला क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान द्यायला नकार देण्यात आला होता. पण, भारतातील वैज्ञानिकांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलेच आहे पण त्याच बरोबर या तंत्रज्ञानाच्या मदतीने आज भारत एकाच वेळी अनेक डझन उपग्रह अंतराळात पाठवत आहे. उपग्रहांच्या या प्रक्षेपणामुळे जागतिक वाणिज्य बाजारात भारताने स्वतःला अत्यंत सशक्तपणे उभे केले आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रात भारतासाठी नव्या संधींची दारे देखील उघडली आहेत.

 

मित्रांनो,

विकसित भारताच्या निर्धारासह मार्गक्रमण करणारा आपला देश सर्वांच्या प्रयत्नांनी आपली उद्दिष्ट्ये साध्य करू शकतो. पूर्वीच्या काळी, भारतात अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणांच्या कक्षेत मर्यादित झाले होते. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र, भारतातील युवकांसाठी, खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले तेव्हापासून या क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल होऊ लागले आहेत.भारतातील उद्योग आणि स्टार्ट अप उद्योग या क्षेत्रात अनेक नवनवी अभिनव संशोधने आणि नवनवी तंत्रज्ञाने आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेषतः ‘इन-स्पेस’च्या सहकार्याने या क्षेत्रात मोठे बदल घडून येणार आहेत.इन-स्पेसच्या माध्यमातून बिगर सरकारी कंपन्यांना देखील आपापले पे-लोड्स आणि उपग्रह यांचे प्रक्षेपण करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मी अधिकाधिक स्टार्ट अप उद्योजक आणि संशोधकांना सांगू इच्छितो की त्यांनी अंतराळ क्षेत्रात निर्माण होत असलेल्या या मोठ्या संधींचा लाभ घ्यावा.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

जेव्हा विद्यार्थ्यांचा, युवा शक्तीचा, नेतृत्व शक्तीचा विषय निघतो तेव्हा, असे दिसते की त्यांच्याबद्दल आपल्या मनात अनेक जुन्या-पुराण्या समजुती घट्ट बसून राहिल्या आहेत. अनेकदा आपण पाहतो की, विद्यार्थी शक्तीबाबत चर्चा होते तेव्हा त्याचा संबंध विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीशी जोडून या शक्तीचा परीघ मर्यादित केला जातो. पण, विद्यार्थी शक्तीचा आवाका फार मोठा, अति प्रचंड आहे. विद्यार्थी शक्ती हा भारताला सामर्थ्यशाली करण्यासाठीचा आधारस्तंभ आहे. शेवटी, आज जे युवावस्थेत आहेत तेच सर्वजण भारताला 2047 कडे घेऊन जाणार आहेत. जेव्हा भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा युवा वर्गाची ही शक्ती,त्यांचे कष्ट, त्यांचे श्रम, त्यांची प्रतिभा भारताला त्या नव्या उंचीवर घेऊन जाईल जी उंची गाठण्याचा निर्धार आज देशाने केला आहे. आपले युवक सध्या ज्या पद्धतीने देशासाठी कार्य करत आहेत, देश उभारणीच्या कामात एकाग्र झाले आहेत ते पाहून माझे मन अत्यंत विश्वासाने भरून गेले आहे. ज्या पद्धतीने आपले युवक हॅकेथॉन्समध्ये प्रश्नांची उत्तरे शोधतात, त्यासाठी रात्र-रात्र जागून काम करतात, त्यातून मोठी प्रेरणा मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या एका हॅकेथॉनमध्ये देशातील लाखो युवकांनी एकत्र येऊन अनेक आव्हानांची उत्तरे शोधली आणि देशाला अनेक समस्यांची नवी उत्तरे शोधून दिली आहेत.

 

मित्रांनो,

तुमच्या लक्षात असेल की मी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘जय अनुसंधान’चे आव्हान केले होते. मी, या दशकात भारताला टेकेड बनविण्याविषयी देखील बोललो होतो. मला हे पाहून फार आनंद झाला की या संदर्भात आपल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. याच महिन्यात 14-15 ऑक्टोबरला देशातील सर्व 23 आयआयटी संस्था आपापली अभिनव संशोधने आणि संशोधन प्रकल्प यांचे सादरीकरण करण्यासाठी एका मंचावर एकत्र झाले.या कार्यक्रमात देशभरातील निवडक विद्यार्थी आणि संशोधकांनी 75 पेक्षा जास्त उत्तमोत्तम प्रकल्प सादर केले.हे प्रकल्प आरोग्यसेवा, कृषी, रोबोटिक्स,सेमी कंडक्टर्स, 5 जी संपर्क यंत्रणा अशा विविध संकल्पनांवर आधारित होते. तसे पाहायला गेले तर हे सर्वच प्रकल्प एकाहून एक उत्कृष्ट होते, पण मी त्यातील काही प्रकल्पांकडे तुमचे लक्ष वेधून इच्छितो. उदाहरणार्थ, आयआयटी भुवनेश्वर येथील विद्यार्थ्यांच्या एका पथकाने नवजात अर्भकांसाठी पोर्टेबल व्हेंटीलेटर विकसित केले आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाचा वापर दुर्गम क्षेत्रातील अर्भकांसाठी अत्यंत सुलभतेने करता येऊ शकेल. ज्या बाळांचा जन्म विहित वेळेआधी झाला आहे अशांचा जीव वाचविण्यासाठी हे साधन अत्यंत उपयुक्त ठरेल. आपले अनेक विद्यार्थी विजेच्या सहाय्याने प्रवास, ड्रोन तंत्रज्ञान, 5 जी यांच्याशी संबंधित नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी झटत आहेत. देशातील अनेक आयआयटी संस्था एकत्र येऊन एका बहुभाषिक प्रकल्पावर देखील काम करत आहेत. हा प्रकल्प, स्थानिक भाषा शिकण्यासाठी सोप्या पद्धती विकसित करण्यासंबंधी आहे. हा प्रकल्प, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देखील मदत करेल. आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूर या संस्थांनी एकत्र येऊन भारताचे स्वदेशी 5 जी टेस्ट बेड तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ही खरोखरच एक मोठी सुरुवात आहे. येत्या काळात अशा प्रकारचे आणखी अनेक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील अशी मला आशा आहे. आयआयटी संस्थांकडून प्रेरणा घेऊन इतर शिक्षण संस्था देखील त्यांची संशोधन आणि विकासाशी संबंधित कार्ये अधिक वेगाने करतील अशी अपेक्षा आहे.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आपल्या समाजाच्या कणाकणात भरलेली आहे आणि आपल्याला आपल्या आजूबाजूला ती जाणवते. पर्यावरण रक्षणासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींची आपल्या देशात कमतरता नाही.

कर्नाटकात बेंगळूरू येथे राहणारे सुरेश कुमार यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणाची एक प्रबळ भावना त्यांच्यात दिसून येते. शहरातील सहकारनगर परिसरात असलेले जंगल पुन्हा हिरवेगार करण्याचा निश्चय त्यांनी 20 वर्षांपूर्वी केला. हे काम अत्यंत कठीण होते. पण, त्यांनी 20 वर्षांपूर्वी लावलेली रोपटी आज 40-40 फुटी विशालकाय वृक्ष झाले आहेत. त्यांच्या सौंदर्याने प्रत्येकाचे मन मोहित होते. यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना देखील फार अभिमान वाटतो. सुरेशकुमारजी आणखी एक अनोखे कार्य देखील करतात. त्यांनी कन्नड भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकारनगर मध्ये एक बस थांबा देखील तयार केला आहे. त्यांनी शेकडो लोकांना कन्नड भाषेतील वचने कोरलेल्या पितळेच्या ताटल्या भेटीदाखल दिल्या आहेत. पर्यावरण शास्त्र आणि संस्कृती दोन्हींची सोबतीने प्रगती व्हावी, संवर्धन व्हावे ही कल्पना किती महान आहे, तुम्हीच विचार करा.

 

मित्रांनो,

आजच्या काळात पर्यावरण-स्नेही निवास आणि पर्यावरण-स्नेही उत्पादने यांच्या बाबतीत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागरुकता निर्माण झाली आहे. तामिळनाडू येथे सुरु असलेल्या अशाच एका मनोरंजक उपक्रमाची माहिती मिळविण्याची संधी मला मिळाली.हा भव्य उपक्रम कोईम्बतूर येथील अनाईकट्टीमध्ये राहणाऱ्या आदिवासी महिलांच्या गटाने सुरु केला आहे. या महिलांनी निर्यातीसाठी टेराकोटा प्रकारच्या दहा हजार पर्यावरण-स्नेही चहाच्या कपांची निर्मिती केली. नवलाची गोष्ट अशी की हे टेराकोटा चहाचे कप बनविण्याची संपूर्ण जबाबदारी या महिलांनी स्वतःच निभावली. या महिलांनी मातीचे मिश्रण तयार करण्यापासून ते अखेरच्या पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक काम स्वतःच केले. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण देखील घेतले होते. या अद्भुत उपक्रमाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.

 

मित्रांनो,

त्रिपुरामधील काही गावांनी देखील फार चांगली शिकवण दिली आहे. तुम्ही जैव-गाव या संकल्पनेबद्दल नक्कीच ऐकले असेल, पण त्रिपुरामधील काही गावांनी जैव-गाव संकल्पनेचा दुसराटप्पा देखील पार केला आहे.नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान कसे कमी करता येईल यावर जैव-गाव संकल्पनेच्या दुसऱ्या टप्प्यात भर दिला आहे. यामध्ये, विविध उपायांच्या मदतीने लोकांचे जीवनमान सुधारण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येते. या टप्प्यात सौर उर्जा,बायोगॅस, मधुमक्षिका पालन आणि जैविक खतांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले जाते. समग्र दृष्टीकोनातून पाहिले तर जैव-गाव 2 हवामान बदलाच्या दुष्परिणामांविरुद्ध सुरु असलेल्या अभियानाला आणखी बळकटी देणार आहे. देशाच्या विविध भागांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात वाढता उत्साह पाहून मला फारच आनंद झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतात, पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मिशन लाईफ अर्थात जीवन अभियान सुरु करण्यात आले आहे. पर्यावरणाची हानी न करणाऱ्या, पर्यावरणाचे नुकसान न करणाऱ्या जीवनशैलीचा स्वीकार ही मिशन लाईफची साधी-सोपी संकल्पना आहे. तुम्ही सर्वांनी देखील या अभियानाची माहिती करून घ्या आणि अशी जीवन शैली स्वीकारण्याचा प्रयत्न करा असा माझा तुम्हाला आग्रह आहे.

 

मित्रांनो,

उद्या 31 ऑक्टोबरला, राष्ट्रीय एकता दिवस, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा दिवस आहे. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. हा उपक्रम, देशातील एकतेचे बंध मजबूत करतो, आपल्या युवकांना प्रोत्साहित करतो. काही दिवसांपूर्वीच आपल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या काळात देखील अशीच भावना सर्वत्र पाहायला मिळाली.’जुडेगा इंडिया तो जितेगा इंडिया’ या संकल्पनेसह राष्ट्रीय क्रीडास्पर्धांनी एकतेचा सशक्त संदेश तर दिलाच पण त्याचबरोबर भारताच्या क्रीडा संस्कृतीला देखील प्रोत्साहन देण्याचे काम केले.भारतात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा होत्या हे ऐकल्यावर तुम्हांला देखील आनंद होईल. या स्पर्धांमध्ये 36 क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले आणि त्यात 7 नव्या तसेच योगासने आणि मल्लखांब या दोन स्वदेशी क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला. सुवर्णपदकांच्या कमाईत सर्विसेसचे पथक आणि महाराष्ट्र तसेच हरियाणा यांची पथके असे तीन संघ आघाडीवर होते. या स्पर्धांमध्ये सहा राष्ट्रीय विक्रम आणि सुमारे साठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील विक्रम नव्याने प्रस्थापित झाले. या स्पर्धांतील पदक विजेत्या, नवे विक्रम स्थापित करणाऱ्या तसेच या खेळांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन करतो. तसेच या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो.मित्रांनो, गुजरातमध्ये झालेल्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचे मी मनापासून कौतुक करतो.तुम्ही पाहिले असेल की गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात या स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धांच्या आयोजनापूर्वी एकदा माझ्या मनात असाही विचार आला की या काळात संपूर्ण गुजरात राज्य उत्सवांमध्ये मशगुल असते. अशा वेळी तेथील जनता या खेळांचा आनंद कसा घेऊ शकेल? एकीकडे स्पर्धांसाठी एवढी मोठी व्यवस्था करणे आणि दुसरीकडे नवरात्रीचा गरबा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन. ही सगळी जबाबदारी गुजरात एकाचवेळी कशी पार पाडेल? पण गुजरातच्या जनतेने त्यांच्या आदरातिथ्याने सर्व पाहुण्यांना खुश केले. अहमदाबादमध्ये राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या कालावधीत ज्या प्रकारे या भागात कला, क्रीडा आणि संस्कृती यांचा संगम झाला त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. खेळाडू देखील दिवसभर क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेत तर संध्याकाळी गरबा आणि दांडिया यांच्या रंगात रंगून जात.त्यांनी गुजराती पद्धतीचे जेवण आणि नवरात्रीची अनेक छायाचित्रे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सामायिक केली.हे पाहणे अत्यंत आनंददायी होते. शेवटी अशा प्रकारच्या खेळांमुळे, भारताच्या विविध संस्कृतींची माहिती मिळत असते. हे खेळ ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेला देखील आणखी सशक्त करतात.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला आपला देश आदिवासी गौरव दिन साजरा करणार आहे. गेल्या वर्षीपासून आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी आदिवासी वारसा आणि गौरव साजरा करण्याचीसुरुवात केली होती हे तुमच्या लक्षात असेलच. भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या लहानशा आयुष्यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लाखो लोकांची एकजूट करण्यात यश मिळविले. भारताचे स्वातंत्र्य आणि आदिवासी संस्कृतीच्या रक्षणाकरिता त्यांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले. धरती आबा बिरसा मुंडा यांच्याकडून शिकण्यासारखे असे बरेच काही आहे. मित्रांनो, जेव्हा धरती आबा बिरसा मुंडा यांचा विषय निघतो, त्यांच्या लहानशा जीवनकालावधीकडे आपण पाहतो तेव्हा असे दिसते की आज देखील आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे आणि धरती आबा तर म्हणाले होते की – हीआपली भूमी आहे, आपण हिचे रक्षणकर्ते आहोत. त्यांच्या या वाक्यात मातृभूमीप्रती कर्तव्य भावना देखील आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव देखील आहे. आपल्याला आपल्या आदिवासी संस्कृतीचा विसर पडता कामा नये, आपण या संस्कृतीपासून दूर जाता कामा नये या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच भर दिला. आजच्या काळात देखील आपण आपल्या देशातील आदिवासी समाजांकडून निसर्ग आणि अपर्यावरण यांच्या बाबतीत खूप काही शिकू शकतो.

 

मित्रांनो, 

गेल्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी मला रांची येथील भगवान बिरसा मुंडा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. देशातील सर्व युवकांना माझा आग्रह आहे की त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी. मी तुम्हांला सांगू इच्छितो की परवा एक नोव्हेंबरला मी गुजरात-राजस्थान सीमेवरील मानगड या ठिकाणी असेन. भारताचे स्वातंत्र्य युध्द आणि आपल्या समृध्द आदिवासी वारशाच्या संदर्भात मानगडया ठिकाणाला विशिष्ट महत्त्व आहे. या ठिकाणी नोव्हेंबर 1913 मध्ये भयानक नरसंहार झाला होता आणि त्यावेळी इंग्रजांनी स्थानिक आदिवासींची निर्दयपणे हत्या केली होती. असे सांगितले जाते की या  नरसंहारात एक हजारहून अधिक आदिवासींचे प्राण घेण्यात आले. या आदिवासी आंदोलनाचे नेतृत्व प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या गोविंद गुरुजींनी केले होते. आज मी त्या सर्व आदिवासी हुतात्म्यांना आणि गोविंद गुरुजींच्या अतुलनीय धाडसाला तसेच शौर्याला नमन करतो. या अमृत काळात भगवान बिरसा मुंडा, गोविंद गुरु आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्शांचे जितक्या निष्ठेने पालन करू तितका आपला देश नव्या उंचीवर जाईल.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

येत्या 8 नोव्हेंबरला गुरुपर्व आहे. गुरु नानक जी यांचे प्रकाश पर्व आपल्या श्रद्धेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळते. गुरु नानकजी यांनी आपले संपूर्ण जीवनभर मानवतेचा प्रकाश पसरविण्यासाठी व्यतीत केले. गेल्या काही वर्षांमध्ये देशाने गुरूंची शिकवण जनतेत पोहोचविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आपल्याला गुरु नानकदेवजी यांचे 550वे प्रकाश पर्व देश-विदेशात व्यापक पातळीवर साजरे करण्याचे भाग्य लाभले होते. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर कर्तारपूर साहिब कॉरिडॉरची निर्मिती होणे देखील तितकेच आनंददायी आहे. काही दिवसांपूर्वी मला हेमकुंड साहिब स्थानासाठी निर्माण होणाऱ्या रोपवे ची कोनशीला रचण्याची संधी प्राप्त झाली. आपल्याला आपल्या गुरूंच्या विचारांतून सतत शिकायचे आहे, त्यांच्याप्रती समर्पित राहायचे आहे. याच दिवशी कार्तिक पौर्णिमा देखील आहे. या दिवशी आपण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, नदीत स्नान करतो, गरिबांची सेवा करतो, त्यांना दान देतो. येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्ये त्यांचा राज्य दिन साजरा करणार आहेत.आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करेल, केरळ पिरावी साजरा होईल. कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाईल. याच प्रकारे, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा ही राज्ये देखील त्यांचे स्थापना दिवस साजरे करतील. मी या सर्व राज्यांतील नागरिकांना शुभेच्छा देतो.आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये परस्परांकडून शिकण्याची, सहयोगाने वाटचाल करण्याची आणि एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा जितकी सशक्त होईल तितकाच आपला देश प्रगती करेल. आपण या भावनेसह पुढील वाटचाल करू असा विश्वास मला वाटतो. तुम्ही सर्वांनी आपापली काळजी घ्या, निरोगी रहा. ‘मन की बात’मधील पुढच्या भेटीपर्यंत मला रजा द्या. नमस्कार, धन्यवाद.

 

 

 

 

  • DASARI SAISIMHA February 27, 2025

    🚩🪷
  • Priya Satheesh January 01, 2025

    🐯
  • Chhedilal Mishra November 26, 2024

    Jai shrikrishna
  • Malek Sufyan November 16, 2024

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
  • Srikanta kumar panigrahi November 14, 2024

    indiaaaaaaa
  • கார்த்திக் October 28, 2024

    🪷ஜெய் ஸ்ரீ ராம்🪷जय श्री राम🪷જય શ્રી રામ🪷 🪷ಜೈ ಶ್ರೀ ರಾಮ್🪷ଜୟ ଶ୍ରୀ ରାମ🪷Jai Shri Ram🪷🪷 🪷জয় শ্ৰী ৰাম 🪷ജയ് ശ്രീറാം 🪷జై శ్రీ రామ్ 🪷🪷
  • Vivek Kumar Gupta October 20, 2024

    नमो ..🙏🙏🙏🙏🙏
  • Vivek Kumar Gupta October 20, 2024

    नमो ........…....🙏🙏🙏🙏🙏
  • கார்த்திக் October 18, 2024

    🪷ஜெய் ஸ்ரீ ராம்🌸जय श्री राम🌹જય શ્રી રામ🪷 🪷ಜೈ ಶ್ರೀ ರಾಮ್🌺జై శ్రీ రామ్🌺JaiShriRam🌺🙏🌸 🪷জয় শ্ৰী ৰাম🌺ജയ് ശ്രീറാം🌺ଜୟ ଶ୍ରୀ ରାମ🌺🌺
  • Devendra Kunwar September 29, 2024

    BJP
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Insurance sector sees record deals worth over Rs 38,000 crore in two weeks

Media Coverage

Insurance sector sees record deals worth over Rs 38,000 crore in two weeks
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM speaks with HM King Philippe of Belgium
March 27, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi spoke with HM King Philippe of Belgium today. Shri Modi appreciated the recent Belgian Economic Mission to India led by HRH Princess Astrid. Both leaders discussed deepening the strong bilateral ties, boosting trade & investment, and advancing collaboration in innovation & sustainability.

In a post on X, he said:

“It was a pleasure to speak with HM King Philippe of Belgium. Appreciated the recent Belgian Economic Mission to India led by HRH Princess Astrid. We discussed deepening our strong bilateral ties, boosting trade & investment, and advancing collaboration in innovation & sustainability.

@MonarchieBe”