Blessed to have prayed at the Janaki Temple: PM Modi
India-Nepal ties date back to the ‘Treta Yuga’: PM Modi
Nepal teaches us how women are respected: PM Modi
India and Nepal have stood the test of times: PM Modi in Janakpur
Glad that Nepal now has a democratically elected government: PM Modi in Janakpur
We are now giving impetus to Tradition, Trade, Transport, Tourism and Trade between both countries: PM Modi in Nepal
Our vision for India is ‘Sabka Saath, Sabka Vikas’, we are moving towards building a ‘New India’ by 2022: PM Modi

उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येने येथे आलेल्या जनकपुरच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो-

जय सियारा, जय सियाराम

जय सियाराम, जय सियाराम,

जय सियाराम, जय सियाराम.

पंतप्रधान म्हणून ऑगस्ट २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी नेपाळला आलो होतो तेव्हा संविधान सभेतच मी सांगितले होते की, मी लवकरच जनकपुरला येईन. सर्वात आधी मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो कारण मी लगेच इथे येऊ शकलो नाही, मला येथे यायला फारच उशीर झाला त्यामुळे सर्वात आधी मी तुमची माफी मागतो. परंतु असे वाटते की, कदाचित माता सितेनेच आजचा हा भद्रकाली एकादशीचा दिवस मला दर्शन देण्यासाठी निश्चित केला होता. जनक राजाची राजधानी आणि जगत माता सीतेच्या पवित्र भूमीत येऊन इथे वंदन करण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आज जानकी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माझी अनेक वर्षांपासूनची मनोकामना पूर्ण झाली आहे त्यामुळे मला खूप धन्य वाटत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारत आणि नेपाळे हे दोन देश आहेत, परंतु आपली मैत्री ही त्रेता युगापासून आहे. जनक राजा आणि दशरथ राजाने केवळ जनकपुर आणि अयोध्येलाच नाही तर भारत आणि नेपाळला देखील मैत्री आणि भागीदारीच्या बंधनात बांधले होते. हे बंधन आहे राम-सीतेचे, हे बंधन आहे बुद्धाचे देखील आणि महावीरांचेही आणि याच बंधनामुळे रामेश्वरमध्ये राहणारे लोकं ओढीने पशुपतीनाथाच्या दर्शनाला येतात. हेच बंधन लुम्बिनी मध्ये राहणाऱ्या लोकांना बोध गयेला घेऊन जाते आणि हेच बंधन, हीच आस्था, हेच स्नेह आज मला जनकपुरला घेऊन आले आहे.

रामायण काळात जनकपुरचे, महाभारत काळात विराटनगरचे, त्यानंतर सिमरॉन गंजचे, बुद्ध काळात लुम्बिनीचे; हे संबंध युगांपासून सुरु आहेत. भारत-नेपाळ संबंध कोणत्याही व्याख्येने जोडलेले नाहीत, हे संबध आहेत विश्वासाचे, हे संबंध आहेत आपलेपणाचे, हे संबंध आहे रोटी-बेटीचे. हे माता जानकीचे धाम आहे, ज्याशिवाय अयोध्या अपुरी आहे.

आपली माता देखील एक- आपला विश्वास देखील एक, आपला निसर्ग देखील एक- आपली संस्कृती देखील एक; आपला मार्ग देखील एक आणि आपली प्रार्थना देखील एक. आपल्या मेहनतीचा सुंगंध देखील आहे आणि आपल्या पराक्रमाचा प्रतिध्वनी देखील आहे. आपली दृष्टी देखील समान आहे आणि आपली सृष्टी देखील समान आहे. आपले सुख देखील समान आहे, आपली आव्हाने देखील समान आहेत. आपल्या आशा देखील समान आहेत, आपल्या आकांक्षा देखील समान आहेत. आपली इच्छा एकच आहे आणि आपला मार्ग देखील समान आहे……..आपले मन, आपली मनस्थिती आणि आपले इच्छित स्थळ देखील एकच आहे. ही अशा कर्मवीरांची भूमी आहे ज्यांच्या योगदानामुळे भारताच्या विकास गाथेला अधिक गती प्राप्त होते. नेपाळच्या सोबतीशिवाय भारताचा विश्वास अपूर्ण आहे, इतिहास अपूर्ण आहे, नेपाळ शिवाय आपले धाम अपूर्ण, नेपाळ शिवाय आपले राम अपूर्ण आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

तुमची धर्म-निष्ठा समुद्राहून खोल आहे आणि तुमचा स्वाभिमान सागरमाथ्याहून उंच आहे. ज्याप्रमाणे मिथिलेची तुळस भारताच्या अंगणात पवित्रता, शुद्धता आणि मर्यादेचा सुंगंध आणते, त्याचप्रमाणे नेपाळशी असलेली भारताची आत्मीयता या संपूर्ण क्षेत्रात शांती, सुरक्षा आणि संस्कारांच्या त्रिवेणीने जोपासली जाते.

मिथिलेची संस्कृती आणि साहित्य, मिथिलेची लोक कला, मिथिलेचे आदरातिथ्य; सर्वकाही अद्भुत आहे; आणि आज मी हे सगळे अनुभवत आहे, तुमच्या प्रेमाचा अनुभव मला येत आहे, तुमच्या आशीर्वादांची जाणीव होत आहे. संपूर्ण जगात मिथिला संस्कृतीचे स्थान सर्वोच्च आहे. कवी विद्यापतींच्या रचना भारत आणि नेपाळमध्ये आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या शब्दांचा गोडवा आजही भारत आणि नेपाळ दोघांच्या साहित्यात आहे.

जनकपुरला येऊन, तुमच्या लोकांचा आपलेपणा बघून असे मुळीच वाटत नाही की, मी कोणत्यातरी दुसऱ्या जागी आलो आहे, सर्वकाही आपल्यासारखे, सर्वजण आपले, आपलेपणा, हे सर्व आपलेच आहेत. मित्रांनो, नेपाळ हे अध्यात्मवाद आणि तत्त्वज्ञान केंद्र आहे. हा तो पवित्र देश आहे – जेथे लुंबिनी आहे, लुंबिनी, जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला. मित्रांनो, ही भूमी माता सीतेची, त्या मानवी मुल्यांची, त्या तत्वांची आणि त्या परंपाराची प्रतिक आहे जे आपल्या उभय देशांना एकमेकांशी जोडतात. जनक नगरी सीतामातेमुळे स्त्री-चेतनेची गंगोत्री झाली आहे. सीतामाता म्हणजे बलिदान, तपस्या, समर्पण आणि संघर्षाची मूर्ती. काठमांडूपासून कन्याकुमारीपर्यंत आपण सर्व माता सीतेच्या परंपरेचे वाहक आहोत. त्यांच्या महिमेविषयी बोलायचे झाले तर त्यांचे भक्त सर्व जगभरात आहेत.

मुलीचा आदर कसा केला जातो ही दाखवणारी ही भूमी आहे. मुलींच्या सन्मानाची ही शिकवण आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. मित्रांनो, आपला इतिहास आणि परंपरांचे जतन करण्यामध्ये नारी शक्तीची भूमिका खूप मोठी आहे. आता इथल्या मिथिला चित्रकलेचेच बघा, ही परंपरा पुढे नेण्यामध्ये सर्वाधिक योगदान आपल्या माता, भगिनी, महिलांनी दिले आहे. आणि मिथिलेची ही कला आज जगप्रसिद्ध आहे. या कलेतही, प्रत्येक क्षणाला आपल्याला निसर्गाचे, पर्यावरणाचे दर्शन होते. आज महिला सक्षमीकरण आणि हवामान बदला संदर्भातील चर्चांमध्ये मिथिलाचा जगाला हा एक मोठा संदेश आहे. जनक राजाच्या दरबारात गार्गी सारखा विदुषक आणि अष्टावक्रा सारखा विद्वान एकाचवेळी असणे हे सिद्ध करतात की, प्रशासनासोबतच विद्वत्ता आणि अध्यात्माचेदेखील महत्व दिले जायचे.

जनक राजाच्या दरबारामध्ये लोककल्याणकारी धोरणांवर विद्वानांमध्ये चर्चा व्हायची. जनक राजा स्वतः त्यात सहभागी व्हायचे; आणि त्या मंथनातून जी फलप्राप्ती व्हायची ती जनतेच्या हितासाठी आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि देशातील हितसंबंधांकरिता लागू केली जायची. जनक राजासाठी त्याची प्रजा त्याचे सर्वस्व होते. त्यांना त्यांचे कुटुंब, नाती हे फार महत्वाचे नव्हते. त्यांना दिवस रात्र आपल्या प्रजेची चिंता असायची, हाच त्यांच्यासाठी राजधर्म होता. म्हणूनच राजा जनकला विदेही म्हंटले जायचे. विदेही म्हणजे ज्याला आपला देह, आपले शरीर याच्याशी काही देणेघेणे नाही आणि ज्याने स्वतःला जनहितासाठी समर्पित केले आहे, स्वतःला लोककल्याणासाठी समर्पित केले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आज नेपाळ आणि भारत, जनक राजा आणि लोककल्याणाचा हा संदेश घेऊनच मार्गक्रमण करत आहेत. नेपाळ आणि भारताचे संबंध राजकारण, कूटनीति, सामाजिक धोरण आणि त्याहूनही पुढे जाऊन देवनितीशी जोडले आहेत. व्यक्ती आणि सरकारं येत-जात राहतील पण आपले हे संबंध अजरामर आहेत. ही वेळ संस्कार, शिक्षण, शांती, सुरक्षा आणि समृद्धी यांसारख्या पंचवटीचे संरक्षण करण्याची आहे. आमचा असा विश्वास आहे की नेपाळचा विकास हा संबंधित क्षेत्रीय विकासाचा एकमेव स्त्रोत आहे. भारत आणि नेपाळची मैत्री कशी आहे, हे आपण रामचरितमानस मधील श्लोकांमधून समजू शकतो.

जे न मित्र दु:ख होहिं दुखारी।

तिन्हहि बिलोकत पातक भारी॥

¬¬
निज दु:ख गिरि सम रज करि जाना।

मित्रक दु:ख रज मेरु समाना॥

याचा अर्थ असा की, जे लोकं आपल्या मित्राच्या दु:खाने दु:खी होत नाहीत त्यांच्या केवळ दर्शनाने देखील पाप लागू शकते आणि म्हणूनच, जर तुमचे
दु:ख डोंगराएवढे विराट असेल, तर त्याला जास्त महत्त्व देऊ नका, परंतु जर मित्राचे दुःख धुळीच्या कणा इतकेच असेल तर तुम्ही ते पर्वताप्रमाणे मानून त्याला शक्य ती सर्व मदत करा.

मित्रांनो,

इतिहास साक्षीदार आहे की, जेव्हा जेव्हा एकमेकांवर संकटे आली तेव्हा भारत आणि नेपाळ दोन्ही एकत्र आले आहेत. आम्ही प्रत्येक कठीण काळामध्ये एकमेकांचे सहकार्य केले आहे. भारत अनेक वर्षांपासून नेपाळचा कायमचा विकासातील भागीदार आहे. आमच्या ‘शेजारधर्म सर्वप्रथम’ या धोरणामध्ये नेपाळ नेहमीच अग्रस्थानी आहे.

आज भारत, जगातली तिसरी सर्वात मोठी, सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना नेपाळ देखील जलद गतीने विकासाच्या उंची गाठत आहे. या भागीदारीला नवीन ऊर्जा देण्यासाठी नेपाळला येण्याची संधी आज मला मिळाली आहे.

बंधू आणि भगिनींनो,

विकासाची पहिली अट आहे लोकशाही. तुम्ही लोकशाही व्यवस्थेला बळकट करत आहात याचा मला आनंद आहे. अलीकडेच तुमच्याकडे निवडणुका झाल्या. तुम्ही नवीन सरकार निवडले आहे. तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जनादेश दिला आहे. एका वर्षाच्या आत तीन स्तरांवर निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. नेपाळच्या इतिहासात प्रथमच नेपाळमधील सर्व सात प्रांतांमध्ये प्रांतीय सरकारे अस्तित्वात आहेत. हे केवळ नेपाळसाठीच अभिमानाची बाब नाही, तर भारत आणि या संपूर्ण प्रदेशासाठी अभिमानास्पद बाब आहे. नेपाळ सामाजिक-आर्थिक बदलासाठी एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे, जो सुशासन आणि समावेशक विकासावर आधारित आहे.

या वर्षी, दहा वर्षांपूर्वी, नेपाळच्या युवकांनी गोळीचा मार्ग सोडून मतदानाचा मार्ग निवडला. युद्ध ते बुद्धां पर्यंतचे हे अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी देखील मी नेपाळच्या लोकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. लोकशाही मूल्य हा आणखी एक दुवा आहे जो भारत आणि नेपाळ मधील प्राचीन संबंधांना प्रोत्साहन देतो. लोकशाही ही अशी शक्ती आहे जी सर्वसामान्य लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी आणि हक्क देते. भारताला या शक्तीची जाणीव झाली आहे आणि आज भारताचा प्रत्येक नागरिक आपली स्वप्ने पूर्ण करत आहे. तुम्हाला देखील तुमच्या नेपाळला त्याच मार्गावर मार्गक्रमण करताना पहायचे आहे हे मला तुमच्या सर्वांच्या नजरेत दिसत आहे. मी तुम्हा सर्वांच्या डोळ्यात नेपाळसाठी तिचं स्वप्ने पाहत आहे.

मित्रांनो,

अलीकडेच मला दिल्लीत नेपाळचे पंतप्रधान ओली जी, यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. नेपाळसाठी त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल जाणून घेण्याची संधी मला मिळाली. ओलीजी यांनी समृद्ध नेपाळ, सुखी नेपाळची स्वप्ने पाहीली आहेत. भारत नेहमीच नेपाळच्या समृद्धी आणि भरभराटीची कामना करत आला आहे आणि नेहमीच करत राहील. पंतप्रधान ओलीजी यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सव्वाशे कोटी भारतीय आणि भारत सरकारतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझे जे भारतासाठी विचार आहेत तसेच त्यांचे देखील नेपाळसाठी आहेत.

भारतामध्ये आमचे सरकार सबका साथ सबका विकास हा मूलभूत मंत्र घेऊन पुढे जात आहे. समाजातील एकही घटक, देशातील एकही भाग विकासधारेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही निरंतर प्रयत्न करत आहोत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण प्रत्येक दिशेला विकासाचा रथ धावत आहे. जिथे अजूनपर्यंत विकास पोहोचला नाही, विशेषतः अशा ठिकाणी सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये पूर्वोत्तर म्हणजेच भारताच्या पूर्वेकडील जो भाग नेपाळच्या सीमेजवळ आहे त्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. उत्तरप्रदेश पासून बिहार पर्यंत, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल पासून ओदिशा पर्यंत, या संपूर्ण क्षेत्राला उर्वरित भारतासोबत आणण्याचा संकल्प आम्ही केला आहे. या भागात जे काही विकासकार्य होत आहे त्याचा फायदा शेजारी देश म्हणून नेपाळला नक्कीच होईल.

बंधू आणि भगिनींनो,

जेव्हा मी ‘सबका साथ सबका विकासा’ बद्दल बोलतो, तेव्हा केवळ भारतासाठीच नाही तर शेजारच्या देशासाठी देखील माझी हीच इच्छा आहे; आणि आता, जेव्हा नेपाळमध्ये “समृद्ध नेपाळ-सुखी नेपाळी” बोलले जाते, तेव्हा माझे मन अधिक आनंदी होते. सव्वाशे कोटी भारतीय देखील आनंदित होतात. जनकपूरच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही भारतात एक संकल्प आहे, हा संकल्प आहे नव भारताच्या निर्मितीचा.

2022 ला भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तोपर्यंत सव्वाशे कोटी भारतीयांनी नव भारताच्या निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे ठरविले आहे. आम्ही एक नवीन भारत निर्माण करीत आहोत जेथे गरीबातील गरीब व्यक्तीला देखील प्रगतीची समान संधी मिळेल. जिथे भेदभाव, गरीब श्रीमंत याला थारा नसेल, सर्वांचा आदर केला जाईल. जिथे मुलांना शिक्षण, तरुणांना रोजगार आणि वृद्धांना औषधोपचार उपलब्ध होतील. जीवन सुलभ असावे, सर्वसामान्यांना व्यवस्थेशी झगडावे लागणार नाही. समाज आणि व्यवस्था भ्रष्टाचार मुक्त असतील, अशा नव भारताच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करत आहोत.

आम्ही भारत आणि प्रशासनामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. प्रणाली सुलभ केली आहे आणि यासाठी आम्ही ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. आम्ही राष्ट्र उभारणी आणि लोकसहभागाचा संबंध अधिक दृढ करत आहेत. आज मी तुम्हाला विश्वास देवू इच्छितो की, नेपाळच्या सामान्य जनतेचे जीवन समृद्ध करण्यासाठी सव्वाशे कोटी भारतीयांना योगदान देताना खूप आनंद होईल.

मित्रांनो, जेव्हा आपण एक दुसऱ्याच्या घरी जातो तेव्हा बंधुभाव अधिक वृद्धिंगत होतो. मला आनंद झाला आहे की नेपाळच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीनंतर लगेचच मला आज येथे भेट देण्याची संधी मिळाली आहे. ज्याप्रमाणे मी येथे वारंवार येतो, त्याचप्रमाणे दोन्ही देशांतील लोक देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकले पाहिजेत. आपण हिमालयाने जोडले गेले आहोत, शेतीने जोडले आहोत, असंख्य कच्या पक्या रस्त्यांनी जोडले आहोत. छोट्या मोठ्या अनेक नद्यांनी जोडले आहोत आणि आम्ही आमच्या खुल्या सीमेने देखील जोडलेले आहोत. परंतु आजच्या युगात एवढेच पुरेसे नाही. मुख्यमंत्र्यांनी येथे जेवढे विषय मांडले, मी ते थोडक्यत पूर्ण करतो. आपल्याला महामार्गाने जोडणे गरजेचे, आपल्याला माहितीच्या मार्गाने म्हणजेच आय-वे ने जोडले पाहिजे, आपल्याला ट्रान्स वेज म्हणजेच विजेच्या तारांनी देखील जोडले पाहिजे, आपल्याला रेल्वेने जोडायचे आहे, आपल्याला जकात नाक्यांनी देखील जोडले पाहिजे, आपल्याला विमान सेवेचा देखील विस्तार केला पाहिजे. आपल्याला आंतरिक जलमार्गाने, जलमार्गांनी देखील जोडले पाहिजे. जल असो, भूमी असो, आकाश असो की अंतराळ असो आपल्याला एकत्र यायचे आहे. उभय देशांमधील नागरिकांचे संबध अधिक मजबूत होण्यासाठी कनेक्टीव्हिटी महत्वाची आहे. याच कारणास्तव भारत आणि नेपाळ दरम्यानच्या कनेक्टीव्हिटीला प्राधान्य देण्यात येत आहे.

आजच पंतप्रधान ओलीजी यांच्यासोबत मी जनकपूर ते अयोध्या या बस सेवेचे उद्घाटन केले. मागील महिन्यातच पंतप्रधान ओलजी आणि मी बिरगंजमध्ये पहिल्या एकीकृत चेक पोस्टचे उद्घाटन केले होते. जेव्हा हे चेकपोस्ट पूर्णतः कार्यान्वित होईल तेव्हा सीमेपार व्यापार आणि प्रवास अधिक सुलभ होईल. जयनगर-जनकपुर रेल्वे मार्गाचे काम देखील जोरात सुरु आहे.

बंधू आणि भगिनींनो,

या वर्ष अखेरीपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जेव्हा या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होईल, तेव्हा नेपाळ-भारताच्या विशाल नेटवर्कमध्ये रेल्वेचे नेटवर्क देखील जोडले जाईल. आता आम्ही बिहारच्या रक्सौला मार्गे काठमांडूला भारताशी जोडण्याच्या दिशेने अधिक प्रयत्न करत आहोत. एवढेच नाही तर आम्ही जलमार्गाने देखील भारत आणि नेपाळला जोडण्याचे प्रयत्न करीत आहोत. नेपाळ, भारतासोबत जलमार्गाने देखील जोडला जाईल. या जलमार्गांमुळे नेपाळमध्ये तयार झालेले सामान जगातील इतर देशांना सहज उपलब्ध होईल. यामुळे नेपाळमध्ये उद्योगांना चालना मिळेल, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हे प्रकल्प केवळ नेपाळमधील सामाजिक-आर्थिक बदलासाठीच महत्त्वाचे नाहीत तर व्यवसायाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचे आहेत.

आज भारत आणि नेपाळ दरम्यान मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. व्यापारासाठी लोकं प्रवास करतात. गेल्या महिन्यात आम्ही कृषी क्षेत्रात एका नवीन भागीदारीची घोषणा केली. मुख्यमंत्री आपल्याला सांगत होते, आम्ही एक नवीन भागीदारीची घोषणा केली आहे आणि या भागीदारीमुळे शेतीक्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. उभय देशांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवले जाईल यावर लक्ष दिले जाईल. शेतीक्षेत्रात, आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सहकार्य वाढवू.

आजच्या काळात तंत्रज्ञानाशिवाय विकास शक्य नाही. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील पाच अव्वल देशांमध्ये भारताचे स्थान आहे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मी पहिल्यांदा नेपाळला आलो तेव्हा मी म्हटले होते की भारत-नेपाळसारख्या शेजारील देशासाठी एखादा उपग्रह प्रक्षेपित करेल. गेल्या वर्षी मी माझे वचन पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी प्रक्षेपित केलेला दक्षिण-आशियाच उपग्रह पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि नेपाळला त्याचा पूर्ण लाभ मिळत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारत आणि नेपाळच्या विकासासाठी आम्ही पाच टी (T) मार्गावर चालत आहोत. पहिला T आहे ट्रेडीशनचा, दुसरा T आहे ट्रेडचा, तिसरा T आहे टुरीजमाचा, चौथा T आहे टेक्नोलॉजीचा आणि पाचवा T आहे ट्रान्सपोर्टचा, म्हणजेच परंपरा, व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या माध्यमातून आम्ही नेपाळ आणि भारताला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ इच्छितो.

मित्रांनो, संस्कृतीशिवाय भारत आणि नेपाळ दरम्यान व्यापारिक संबंधांचा एक महत्वाचा दुवा देखील आहे. वीजनिर्मिती क्षेत्रात नेपाळ जलदगतीने विकास करत आहे. आज भारताकडून अंदाजे 450 मेगावॉट वीज पुरवठा नेपाळला केला जातो, यासाठी आम्ही नवीन ट्रान्समिशन लाईन टाकली आहे.

मित्रांनो, 2014 मध्ये नेपाळच्या संविधान सभेत, मी म्हणालो होतो की तेलाची वाहतूक ट्रकने का करायची, थेट पाइप लाइनने का नाही?. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आम्ही मोतीहारी-अमलेख गंज ऑईल पाईपलाईनचेही काम सुरु केले आहे.

भारतात आमचे सरकार ‘स्वदेश दर्शन’ नावाची योजना राबवत आहे. ज्या अंतर्गत आम्ही आमच्या ऐतिहासिक वारशाची आणि श्रद्धेची ठिकाणे एकमेकांना जोडत आहोत. रामायण सर्किटमध्ये आम्ही त्या सर्व स्थानांना जोडत आहोत जिथे प्रभू राम आणि माता जानकीचा चरण स्पर्श झाला आहे. आता आम्ही या शृंखलेमध्ये नेपाळला देखील जोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. येथे, जिथे जिथे रामायणाची चिन्ह आहेत, त्यांना उर्वरित भारताशी जोडून भक्तांना स्वस्त आणि आकर्षक प्रवासाचा आनंद मिळेल आणि ते येथे मोठ्या संख्येने, नेपाळला येवून, इथल्या पर्यटनाचा विकास होईल.

बंधू आणि भगिनींनो,

दरवर्षी विवाह पंचमीला भारतातील हजारो भाविक अवधहून जनकपूरला येतात. संपूर्ण वर्षभर भाविकांची मांदियाळी सुरु असते. मला हे जाहीर करताना आनंदी होत आहे की भक्तांनं कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आम्ही जनकपूर आणि जवळपासच्या परिसरातील विकासासाठी नेपाळ सरकारच्या योजनांना सहकार्य करू. या कामासाठी भारतातर्फे शंभर कोटी रुपये दिले जातील. यासाठी नेपाळ सरकार आणि प्रांतीय शासनासोबत मिळून प्रकल्पांची निवड केली जाईल. जनक राजाच्या काळापासून ही परंपरा सुरु आहे, जनकपुरने अयोध्येलाच नाही तर संपूर्ण समजाला काही ना काहीतरी दिले आहे. जनकपूरने दिले आहे, मी तर इथे केवळ माता जानकीचे दर्शन घ्यायला आलो होतो. भारताच्या सव्वाशे कोटी लोकांच्या वतीने, जनकापूरसाठीच्या या घोषणा मी माता जानकीच्या चरणी समर्पित करतो.

असेच अजून दोन कार्यक्रम आहेत. बौद्ध सर्किट आणि जैन सर्कीट ज्यामध्ये बुद्ध आणि महावीर जैन संबंधित भारतातील सर्व संस्था एकमेकांशी जोडण्याचे काम सुरु आहे. नेपाळमध्ये अनेक बौद्ध आणि जैन श्रद्धास्थान आहेत. हे देखील उभय देशातील भाविक आणि पर्यटकांच्या माध्यमातून आपले बंध अधिक दृढ करायला मदत करतील. यामुळे, नेपाळमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.

बंधू आणि भगिनींनो,

आपली खाद्यसंस्कृती आणि व्यवहारात बरेच साम्य आहे. भारत आणि नेपाळमध्ये मैथिली भाषिकांची संख्या समान आहे. जागतिक स्तरावर मैथिली कला, संस्कृती आणि सभ्यतेची चर्चा केली जात आहे. जेव्हा दोन्ही देश संयुक्तपणे मैथिलीच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करतात, तेव्हा या भाषेचा विकास अधिक सहजपणे शक्य होऊ शकेल. मला कळले आहे की, काही मैथिली चित्रपट निर्माते आता नेपाळ-भारतासह कतार आणि दुबईमध्ये देखील एकाचवेळी नवीन मैथिली चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. हे एक स्वागतार्ह पाउल आहे याला प्रोत्साहन दिले पाहिजे. जसे इथे मोठ्या संख्येने मैथिली भाषिक लोकं आहेत तसेच भारतात मोठ्या संख्यने नेपाळी भाषिक आहेत. नेपाळी भाषेतील साहित्याच्या अनुवादाला देखील प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की, भारतीय घटनेने मान्यता दिलेल्या भाषांमध्ये नेपाळी भाषेचा देखील समावेश आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आणखी एक क्षेत्र आहे जेथे आपली भागीदारी पुढे प्रगती करू शकते. भारतातील जनतेने स्वच्छतेचे खूप मोठे अभियान सुरु केले आहे. बिहार आणि आसपासच्या दुसऱ्या राज्यांमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जात असाल, तेव्हा तुम्ही पहिले असेल आणि ऐकले असेल- केवळ तीन-चार वर्षांमध्ये भरतातील 80 टक्क्यांहून अधिक गावं हगणदारीमुक्त झाली आहेत. भारतातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी वेगळे शौचालय बांधण्यात आले आहे. मला हे ऐकून फार आनंद झाला की, स्वच्छ भारत आणि स्वच्छ गंगा अभियानाप्रमाणेच तुम्ही लोकांनी देखील जनकपुरमधील ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेचे अभियान सुरु केले आहे. यासाठी मी महापौरांचे अभिनंदन करतो.

मी विशेषतः इथल्या महापौरांचे अभिनंदन करू इच्छितो, त्यांच्या साथीदारांचे अभिनंदन करू इच्छितो, इथल्या तरुणांचे अभिनंदन करू इच्छितो, इथल्या आमदारांचे, खासदारांचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी स्वच्छ जनकपुर अभियान सुरु केले आहे. बंधू आणि भगिनींनो आज मी माता जानकीचे दर्शन घेतले. उद्या मुक्तीनाथ धाम आणि नंतर पशुपातीनाथाचा आशीर्वाद घेण्याची देखील संधी मिळणार आहे. मला विश्वास आहे की देवाचा आशीर्वाद आणि तुम्हा जनता जनार्दनच्या आशीर्वादाने जे काही करार होतील ते समृद्ध नेपाळ आणि वैभवशाली भारताचा संकल्प साकारण्यामध्ये सहाय्य करतील.

मी पुन्हा एकदा नेपाळचे पंतप्रधान आदरणीय ओलीजी, राज्य सरकार आणि इथल्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो.

जय सियाराम। जय सियाराम।

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Waqf Law Has No Place In The Constitution, Says PM Modi

Media Coverage

Waqf Law Has No Place In The Constitution, Says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to participate in ‘Odisha Parba 2024’ on 24 November
November 24, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will participate in the ‘Odisha Parba 2024’ programme on 24 November at around 5:30 PM at Jawaharlal Nehru Stadium, New Delhi. He will also address the gathering on the occasion.

Odisha Parba is a flagship event conducted by Odia Samaj, a trust in New Delhi. Through it, they have been engaged in providing valuable support towards preservation and promotion of Odia heritage. Continuing with the tradition, this year Odisha Parba is being organised from 22nd to 24th November. It will showcase the rich heritage of Odisha displaying colourful cultural forms and will exhibit the vibrant social, cultural and political ethos of the State. A National Seminar or Conclave led by prominent experts and distinguished professionals across various domains will also be conducted.