तुम्हाला माहित आहे का , निवडणुकांच्या राजकारणात भाग घेण्यापूर्वी कितीतरी आधीपासून नरेंद्र मोदी भाजपा संघटनेचे काम वर्षानुवर्षे करत होते, तिथे ते त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून सर्वाना परिचित झाले. त्यांचे संघटन कौशल्य आणि सर्वात खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची हातोटी यामुळे ते संघटनेमध्ये लोकप्रिय झाले होते.
१९८७ साली नरेंद्र मोदी यांनी भाजपात प्रवेश केला, त्याचवर्षी त्यांना अहमदाबादच्या महापालिका निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी अतिशय जोमाने प्रचार करून भाजपाला विजय मिळवून दिला.
१९९० साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचाराची रणनीती ठरवणाऱ्या गाभा समितीत ते होते. या निवडणुकीच्या निकालानंतर गुजरातमध्ये दशकभरापासून असलेली कांग्रेसची सत्ता संपुष्टात आली. १९८० मध्ये १४१ आणि १९८५ मध्ये १४९ जागा जिंकलेल्या कॉंग्रेसला त्या वर्षी केवळ ३३ जागा जिंकता आल्या तर भाजपाला ६७ जागा मिळाल्या. भाजपाने चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये भाग घेतला. ही आघाडी फार काळ टिकली नसली तरी, भाजपा या निवडणुकीनंतर गुजरातमध्ये एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला.
१९९५ साली नरेंद्र मोदीनी पुन्हा एकदा भाजपाच्या निवडणूक प्रचारात भाग घेतला. यावेळी पहिल्यांदाच भाजपाने सर्व १८२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक भाजपासाठी ऐतिहासिक ठरली. भाजपाने १२१ जागा जिंकत सत्ता स्थापन केली.
१९९६ साली दिल्लीला गेले आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे उत्तर भारतातातील पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर अशा महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली. १९९८ साली भाजपाने पहिल्यांदाच हिमाचल प्रदेशात स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन केली. १९९६ साली हरयाणामध्ये तर १९९७ साली पंजाबमध्येही आघाडी सरकारच्या सत्तेत भाजपाला वाटा मिळाला. दिल्लीने दिलेल्या जबाबदारीमुळे नरेंद्र मोदी याना प्रकाश सिंग बादल, बन्सी लाल आणि फारुख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
मोदी यांच्यावर सरचिटणीस (संघटन) पदाची महत्वाची जबाबदारी पक्षाने विश्वासाने सोपवली होती. पक्षाचे मोठे नेते सुन्दर सिंग भंडारी, कुशाभाऊ ठाकरे यांनी आधी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. पक्षाचे सरचिटणीस म्हणून १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा प्रचारात त्यांची महत्वाची भूमिका होती. दोन्ही निवडणुकामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दिल्लीत पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली.
संघटनेमध्ये राहून नरेंद्र मोदी यांनी नवे नेतृत्व घडवले, युवा कार्यकर्त्याना प्रोत्साहन दिले आणि प्रचारात नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. या सर्वांमुळे एकेकाळी संसदेत दोन खासदार असलेला पक्ष १९९८ ते २००४ या काळात केंद्रात सत्तेवर राहण्यास निश्चितच मदत मिळाली.