संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
त्यांनी अबुधाबीच्या युवराजांच्या सदिच्छा पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवल्या. पंतप्रधानांनी आपुलकीने शुभेच्छांचे आदानप्रदान केले.
दोन्ही नेत्यांच्या भेटीत व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, जनतेमधील संबंध अशा द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्यांवर चर्चा झाली. भारतात ऊर्जा, गृहनिर्माण, अन्नप्रक्रिया आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात युएईची वाढती उत्सुकता मंत्रिमहोदयांनी यावेळी व्यक्त केली. भारतात 60 एमएमटीपीए क्षमता असलेल्या तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स संकूल प्रकल्पासाठी 44 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या ‘ॲडनॉक’च्या निर्णयाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच यासंदर्भात आज झालेल्या कराराचे स्वागत केले.
यूएईच्या अर्थव्यवस्थेत आणि कल्याणात भारतीय समुदाय देत असलेल्या योगदानाचा उल्लेख मंत्रिमहोदयांनी केला.