11 व्या ब्रिक्स संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांची ब्राझीलिया येथे 13 नोव्हेंबरला भेट घेतली. या नेत्यांची या वर्षातली ही चौथी भेट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्लादीवोस्तोकला भेटीनंतर द्विपक्षीय संबंधातल्या प्रगतीचा आढावा या नेत्यांनी यावेळी घेतला. संरक्षणमंत्री आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांच्या रशियाच्या यशस्वी भेटीचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.
2025 पर्यंत द्विपक्षीय व्यापारासाठीचे 25 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे उद्दिष्ट आधीच पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. प्रादेशिक स्तरावर व्यापारात येणारे अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने रशियातले प्रांत आणि भारतीय राज्ये या स्तरावर पहिला द्विपक्षीय प्रादेशिक मंच पुढच्या वर्षी आयोजित करण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला.
तेल आणि नैसर्गिक वायू आयातीतल्या स्थैर्य आणि प्रगतीची दखल उभय नेत्यांनी घेतली. पुतीन यांनी आर्कटिक प्रदेशातली नैसर्गिक वायू क्षमता अधोरेखित करत या भागात गुंतवणूक करण्यासाठी भारताला आमंत्रित केले.
दोन्ही नेत्यांनी पायाभूत क्षेत्रातल्या प्रगतीचा विशेषत: नागपूर-सिकंदराबाद रेल्वे क्षेत्रात गती वाढविण्यासंदर्भातल्या प्रगतीचा आढावा घेतला. संरक्षण क्षेत्र आणि नागरी अणू ऊर्जा क्षेत्रातल्या सहकार्याबाबत यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत दोन्ही देशांचे समान विचार असून भविष्यातही चर्चा सुरू ठेवण्यावर या नेत्यांचे एकमत झाले.
पुतीन यांनी येत्या वर्षात विजय दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले त्याचा पंतप्रधानांनी सहर्ष स्वीकार केला.