- आम्ही,ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका देशांचे प्रमुख, 30 नोव्हेंबर 2018 रोजी अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स येथे जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स नेत्यांच्या वार्षिक अनौपचारिक बैठकीसाठी भेटलो. 2018 मध्ये जी 20 परिषदेचे अध्यक्षपद अर्जेंटिनाला मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन आणि समर्थन केले, आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
- आम्ही आंतरराष्ट्रीय राजकीय,सुरक्षा आणि जागतिक आर्थिक-वित्तीय समस्या तसेच शाश्वत विकासाच्या आव्हानांबाबत विचारांचे आदान-प्रदान केले आहे. आम्ही शांतता आणि स्थैर्य, संयुक्त राष्ट्राची मध्यवर्ती भूमिका, संयुक्त राष्ट्राच्या चार्टरमध्ये नमूद केलेली उद्दीष्टे आणि तत्त्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याप्रति आदर, लोकशाहीला प्रोत्साहन आणि कायद्याचे नियम याप्रति आमच्या कटिबध्दतेचा पुनरुच्चार करतो. बहुपक्षीयतेला बळकट करण्यासाठी आणि न्याय्य, न्यायसंगत, समान, लोकशाही आणि प्रातिनिधिक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.
- ब्रिक्स देशांविरोधातील तसेच एकूणच सतत चालू असलेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही अस्वीकार करतो. जिथे कुठे झाला असेल आणि ज्यांनी कुणी केला असेल अशा सर्व प्रकारच्या स्वरूपातील आणि अभिव्यक्तींमधील दहशतवादाचा आम्ही निषेध करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय ठोस कायद्याच्या आधारे संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांतर्गत, दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची विनंती करतो. जोहान्सबर्ग घोषणापत्र मध्ये नमूद केलेल्या सर्व घटकांसह आम्ही सर्व राष्ट्रांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एक व्यापक दृष्टीकोन स्वीकारण्याचे आवाहन करतो.
- पारदर्शक,भेदभावरहित, खुला आणि सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय व्यापार सुनिश्चित करण्यासाठी डब्ल्यूटीओमध्ये नमूद केल्यानुसार, आम्ही नियम-आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणालीला आमचे पूर्ण समर्थन असल्याचा पुनरुच्चार करतो. डब्ल्यूटीओची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी आम्ही इतर डब्ल्यूटीओ सदस्यांसह मोकळी आणि परिणामाभिमुख चर्चेत सहभागी होण्यासाठी आमची तयारी असल्याची इच्छा व्यक्त करतो.
- डब्ल्यूटीओचा आत्मा आणि नियम एकपक्षीय आणि संरक्षणवादी उपाययोजनांच्या विरोधात आहेत. आम्ही सर्व जी-20 सदस्यांना डब्ल्यूटीओच्या अशा विसंगत उपाययोजनांचा विरोध करण्यासाठी,डब्ल्यूटीओ मध्ये केलेल्या वचनबद्धतेनुसार आणि भेदभावपूर्ण आणि निर्बंधित स्वरूपाच्या उपाययोजना रद्द करण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याचे आवाहन करतो.
- सध्याच्या आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी,तिची प्रासंगिकता आणि परिणामकारकता ओळखून ती वाढविण्याच्या दृष्टीने डब्ल्यूटीओच्या सुधारणेसाठी काम करण्यास समर्थन देतो. या कामात जागतिक व्यापार संघटनेची मुळ मूल्ये आणि मूलभूत तत्त्वे यांचे जतन झाले पाहिजे आणि सर्व डब्ल्यूटीओ सदस्यांचे विशेषतः विकसनशील सदस्यांचे हित यात प्रतिबिंबित व्हायला हवे.
- डब्ल्यूटीओची तक्रार निवारण यंत्रणा त्याच्या योग्य कार्यान्वयनासाठी आवश्यक आहे. त्याचे प्रभावी कामकाज सदस्यांना, जागतिक व्यापार संघटनेच्या भविष्यातील वाटाघाटीमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास देईल. म्हणूनच आम्ही डब्ल्यूटीओ तक्रार निवारण व्यवस्थेच्या स्थिर आणि परिणामकारक कामकाजासाठी आवश्यक पूर्वअट म्हणून लवादामार्फत निवड प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी अशी विनंती करतो.
- आपला संवाद आणि सहकार्य वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आणि डब्ल्यूटीओला बदलत्या काळासह,आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्व देशांच्या सहभागास आणि सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जागतिक आर्थिक प्रशासनात अर्थपूर्ण भूमिका बजावण्यास सक्षम होण्यासाठी आणि इतर सदस्यांसह संयुक्तपणे आणि एकत्रितपणे काम करण्याचा आम्ही पुनरुच्चार करतो.
- योग्य आणि शाश्वत विकासासाठी सर्वसहमती तयार करण्याच्या तसेच कामाचे भवितव्य,विकासासाठी पायाभूत सुविधा आणि शाश्वत भविष्यासाठी अन्न सुरक्षा या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या, अर्जेंटिना येथे आयोजित जी-20 देशांच्या संकल्पनेचे आम्ही स्वागत करतो.
- स्रोतांचे एकत्रिकरण करत न्यू डेव्हलपमेंट बॅकेसह राष्ट्रीय आणि सामुहिक उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत आणि आपत्ती सक्षम अशा पायाभूत सुविधांची उभारणी करणे तसेच पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांमध्ये असलेल्या तफावती दूर करण्याचे महत्व आम्ही अधोरेखित करतो.
- केंद्रस्थानी,सक्षम अशा जागतिक वित्तीय सुरक्षा जाळ्यासाठी कोटा पद्धतीवर आधारित, पुरेशा स्रोतांनी सुसज्ज अशा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे आम्ही आग्रही समर्थन करतो. या अनुषंगाने 2019 साली वसंत ऋतूतील बैठकीपर्यंत आणि 2019 सालच्या वार्षिक बैठकीपूर्वी, कमी विकसित देशांच्या हिताचे रक्षण करतानाच जागतिक अर्थकारणात योगदान देणाऱ्या, वेगाने उदयाला येणाऱ्या आणि विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना अधिक वाव देण्यासाठी कोट्याच्या नव्या रचनेसह, आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या कोट्याच्या १५ व्या आढाव्याच्या निष्कर्षांप्रति आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरूच्चार करतो.
- 2030सालापर्यंत दारिद्र्य निर्मूलनाचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने संतुलित आणि एकात्मिक पद्धतीने आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक अशा तिन्ही पैलुंच्या समान, समावेशक, खुल्या, परिपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत विकासासाठीच्या 2030 धोरणाच्या अंमलबजावणीप्रती वचनबद्धतेचा आम्ही ठामपणे पुनरूच्चार करतो. विकसित देशांनी आपल्या अधिकृत विकास सहाय्य (ओडीए) वचन बद्धतेचे पूर्णपणे, कालबद्धरित्या पालन करावे आणि अदीस अबाबा कृती धोरणाच्या अनुषंगाने विकसनशील देशांना अतिरिक्त विकासाचे स्रोत पुरवावेत, अशी विनंती आम्ही करतो.
- जागतिक आर्थिक विकासाचा विस्तार होत आहे,मात्र तो कमी संतुलित असून त्यातील जोखीम वाढली आहे. अलिकडच्या काळात काही मोठ्या अर्थव्यवस्थांच्या धोरण नियमितीकरणाच्या नकारात्मक प्रभावामुळे नव्याने उदयाला येणाऱ्या काही अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम दिसून आले, याची आम्हाला कल्पना आहे. जी-20 सोबत भागिदारीच्या प्रेरणेसह सर्व अर्थव्यवस्थांनी आपला धोरणात्मक संवाद आणि समन्वय अधिक सक्षम करावा आणि जोखीम वाढण्यास प्रतिबंध करावा, असे आवाहन आम्ही करतो.
- पर्यावरणातील बदलांच्या संदर्भात, UNFCCCच्या तत्वांतर्गत तसेच सामाईक परंतु विविधतापूर्ण जबाबदाऱ्या आणि संबंधित क्षमतांच्या तत्वांसह स्वीकारलेल्या पॅरीस कराराच्या संपूर्ण अंमलबजावणीप्रती आम्ही वचनबद्धता व्यक्त करतो आणि विकसनशील देशांना त्यांच्या परिवर्तन आणि अनुकुलनाची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी तसेच वित्तीय, तंत्रज्ञानविषयक आणि क्षमता उभारणीसाठी विकसित देशांनी सहाय्य प्रदान करावे, असे आम्ही आवाहन करतो. COP-24 दरम्यान सर्व देशांनी पॅरीस कराराच्या परिचालन आणि अंमलबजावणीसाठी पॅरीस करार कृती कार्यक्रमांतर्गत, संतुलित परिणाम साध्य करावेत, असे आवाहन आम्ही करतो. हरित हवामान निधीची यशस्वी आणि महत्वाकांक्षी अशी पहिली पुनर्भरण प्रक्रिया राबविण्याच्या महत्वावर आणि आवश्यकतेवर आम्ही भर देतो.
- 25-27जुलै 2018 या अवधीत जोहान्सबर्ग येथे आयोजित दहाव्या ब्रिक्स परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल दक्षिण आफ्रिकेची आम्ही पुन्हा एकदा भरभरून वाखाणणी करतो तसेच आमच्या नागरिकांच्या हितासाठी आपली धोरणात्मक भागिदारी अधिक सक्षम करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार करतो. नवीन औद्योगिक क्रांतीबाबत ब्रिक्सची भागिदारी (PartNIR), ब्रिक्स लसीकरण संशोधन आणि विकास केंद्र, ब्रिक्स उर्जा संशोधन सहकार्य मंच आणि साओ पाओलो येथे न्यू डेव्हलपमेंट बॅकेचे अमेरिकेच्या प्रादेशिक कार्यालयाच्या स्थापनेबरोबरच दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली अर्थकारण, शांतता, सुरक्षा आणि नागरिकांमधील परस्पर देवाणघेवाण या क्षेत्रांत ब्रिक्स सहकार्याने प्राप्त केलेल्या यशाबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. जोहान्सबर्ग परिषद तसेच त्यापूर्वीच्या परिषदांच्या फलिताच्या संपूर्ण अंमलबजावणीप्रति आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरूच्चार करतो.
- 2019साली ब्राझील येथे होणाऱ्या 11 व्या परिषदेबाबत आम्ही उत्सुक आहोत आणि आगामी ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझिलच्या अध्यक्षतेला आम्ही संपूर्ण पाठिंबा दर्शवितो.