माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!

कोविड-19 च्या विरोधात लढण्यासाठी देशानं आपली संपूर्ण ताकद कशा प्रकारे लावली आहे, हे आपण पहात आहोत. गेल्या शंभर वर्षामधली ही सर्वात मोठी महामारी आहे आणि या महामारीच्या काळातच भारतानं अनेक नैसर्गिक संकटांचाही दृढतेनं सामना केलाय. या काळात अम्फान चक्रीवादळ आलं, निसर्ग नावाचं चक्रीवादळ येवून गेलं. अनेक राज्यांमध्ये महापूर आले, लहान-मोठे अनेक भूकंप आले, भूस्खलन झालं. अगदी अलिकडंच गेल्या दहा दिवासांच्या काळात देशानं पुन्हा एकदा दोन मोठ्या चक्रीवादळांचा सामना केला. पश्चिमी किनारपट्टीवर ‘तौ-ते’ आणि पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ चक्रीवादळं येवून गेली. या दोन्ही चक्रीवादळांनी  अनेक राज्यांवर परिणाम केला आहे. देश आणि देशाची जनता  संपूर्ण ताकदीनिशी या संकटाशी झुंजला  आणि कमीतकमी जीवितहानी  सुनिश्चित केली. काही वर्षांपूर्वी अशा नैसर्गिक संकटांमध्ये होणा-या जीवितहानीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवले जावू शकतात, याचा अनुभव आपण सगळे घेत आहोत. संकटाच्या या कठिण आणि अवघड परिस्थितीमध्ये चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यांच्या लोकांनी ज्या प्रकारे मोठे धाडस दाखवले, या विपदेच्या काळात अतिशय धैर्यानं, आपत्तीला तोंड दिलं  त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं  अगदी आदरपूर्वक आणि अगदी हृदयपूर्वक कौतुक करू इच्छितो. जे लोक पुढाकार घेऊन मदत आणि बचाव कार्यामध्ये सहभागी झाले, त्या सर्व लोकांचं जितकं कौतुक करावं, तितकं कमीच आहे. या सर्व लोकांना  मी सलाम करतो. केंद्र आणि राज्य सरकारांनी आणि स्थानिक प्रशासनाचे सर्वजण, एकत्रित येऊन या संकटाचा सामना करण्यासाठी कार्यरत आहेत.या वादळी संकटामध्ये ज्यांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावं लागलं, त्यांच्याविषयी मी आपल्या सहसंवेदना व्यक्त करतो. या संकटामध्ये ज्यांना नुकसान सोसावं लागतंय, त्या सर्वांच्याबरोबर आम्ही सर्वजण अगदी ठाम उभे आहोत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आव्हान कितीही मोठं  असो, भारतानं केलेला विजयाचा संकल्पही नेहमी तितकाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्याकडे असलेली सेवा भावना, यांच्यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला आहे. अलिकडेच्या दिवसातूच आपण पाहिलं की, आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आघाडीच्या फळीवर कार्यरत असलेले योद्धे, यांची स्वतःची चिंता न करता, रात्रंदिवस काम केलं आणि आजही ही मंडळी काम करीत आहेत. या सर्वांमध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये लढा देताना खूप मोठी भूमिका बजावणारेही काही लोक आहेत. या योद्ध्यांविषयी ‘मन की बात’ मध्ये चर्चा करावी, असा आग्रह मला ‘नमोअॅप’वर आणि पत्राच्या माध्यमातून केला गेलाय.

मित्रांनो, ज्यावेळी दुसरी लाट आली, त्यावेळी अचानक ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली त्यामुळे खूप मोठे आव्हान निर्माण झाले. वैद्यकीय प्राणवायू देशाच्या अगदी लहान लहान गावांतल्या भागांपर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान होते. ऑक्सिजन वाहून नेणा-या टँकरचा वेग थोडा वाढला, अगदी लहानशी चूक झाली, तर त्या टँकरचा स्फोट होण्याचा धोका असतो. औद्योगिक ऑक्सिजनचं उत्पादन करणारे अनेक प्रकल्प देशाच्या पूर्व भागात आहे. तिथून दुस-या राज्यांमध्ये ऑक्सिजन पोहोचवायलाही काही दिवसांचा अवधी लागतो. देशासमोर आलेल्या आव्हानामध्ये देशाला मदत केली ती, क्रायोजेनिक टँकर चालविणा-या चालकांनी, ऑक्सिजन एक्सप्रेसने, हवाई दलाच्या वैमानिकांनी. अशा अनेक लोकांनी युद्धपातळीवर काम करून हजारो-लाखों लोकांचे प्राण वाचवले. आजच्या ‘मन की बात’ मध्ये आपल्याबरोबर असेच एक सहकारी जोडले जात आहेत. उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्ये वास्तव्य करणारे श्रीमान दिनेश उपाध्याय जी.

मोदी जी- दिनेश जी, नमस्कार!

दिनेश उपाध्याय जी- सर जी, प्रणाम!

मोदी जी- सर्वात आधी तुम्ही स्वतःविषयी काही माहिती जरूर द्यावी, असं मला वाटतं.

दिनेश उपाध्याय जी – सर, माझं नाव दिनेश बाबूलनाथ उपाध्याय आहे. मी जौनपूर जिल्ह्यातल्या जमुआ भागातल्या हसनपूर या गावात वास्तव्य करतो.

मोदी जी- उत्तर प्रदेशातले आहात का?

दिनेश – हो! होय! सर!

मोदी जी- बरं.

दिनेश – आणि सर मला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. घरी पत्नी आणि माता-पिता आहेत.

मोदी जी- आणि, तुम्ही काम काय करता?

दिनेश – सर, मी ऑक्सिजनचा टँकर चालवतो… लिक्विड ऑक्सिजनचा.

मोदी जी- मुलांचं शिक्षण व्यवस्थित सुरू आहे ना?

दिनेश- हो सर! मुलं शिकताहेत. दोन्ही मुलीही शिकतात आणि माझा मुलगाही अभ्यास करतो सर.

मोदी जी- आता त्यांचं ऑनलाइन शिक्षणही व्यवस्थित सुरू आहे ना?

दिनेश – हो सर, अगदी चांगल्या पद्धतीनं शिक्षण सुरू आहे. आत्ताही माझ्या मुली अभ्यास करताहेत.

त्या ऑनलाईलच शिक्षण घेत आहेत. सर, 15 ते 17 वर्ष झाली, मी ऑक्सिजनचा टँकर चालवतोय.

मोदी जी- बरं! तुम्ही या 15-17 वर्षात केवळ ऑक्सिजन वाहून नेत आहात. याचा अर्थ काही तुम्ही फक्त मालमोटार चालकच आहे असे नाही. एका प्रकारे तुम्ही लाखो जणांचे प्राण वाचविण्याचं काम करीत आहात.

दिनेश- सर, माझं तर हे ऑक्सिजन टँकर चालवण्याचं काम आहे. आमची आयनॉक्स कंपनीही आम्हा लोकांची खूप काळजी घेते. आणि आम्ही कुठल्याही एखाद्या ठिकाणी ज्यावेळी ऑक्सिजनचा टँकर  रिकामा करून देतो, त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतो.

मोदी जी – परंतु सध्या कोरोनाच्या काळात तुम्हा सर्वांची जबाबदारी खूप वाढली आहे ना?

दिनेश – हो सर, खूप वाढली आहे.

मोदी जी – ज्यावेळी तुम्ही टँकरचा चालक म्हणून त्या जागेवर बसता, त्यावेळी तुमच्या मनात नेमक्या काय भावना निर्माण होतात? आधीच्या तुलनेत काही वेगळा अनुभव येतो का? खूप तणाव येत असेल ना? मानसिक ताणही येत असेल? कुटुंबाची काळजी, कोरोनाचं वातावरण, लोकांकडून येत असलेलं दडपण, वाढती मागणी, काय काय होत असेल?

दिनेश – सर, आम्हाला काही चिंता नसते. एकमात्र मनात असतं की, आपलं जे कर्तव्य आहे, ते नीट केलं म्हणजे जर आपण वाहून नेत असलेल्या ऑक्सिजनमुळं जर कोणाला जीवन मिळणार आहे, तर ती आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट असते.

मोदी जी – तुम्ही आपल्या भावना खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त करीत आहात. आता जर सांगा- आज ज्यावेळी या महामारीच्या काळात लोकांना तुमच्या कामाचं महत्व जाणत आहेत, कदाचित या कामाचं महत्व यापूर्वी इतकं कुणाला जाणवलं नसेल. आता मात्र समजत आहे. त्यामुळे तुमच्याकडे आणि तुम्ही करत असलेल्या कामाविषयी त्यांच्या दृष्टीनं परिवर्तन आलं आहे?

दिनेश- हो सर जी! आधी आम्ही ऑक्सिजनचे चालक, कुठंही वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकून पडायचो. आता मात्र प्रशासनही आम्हा लोकांना खूप मदत करत आहेत. आणि आपण किती लवकर पोहोचतोय आणि किती लोकांचे प्राण वाचवू शकतो, हे पाहण्याची आता आमच्या मनातही एकप्रकारची जिज्ञासा असते. अशा वेळी मग, वाटेत काही खायला मिळेल- किंवा नाही मिळेल, कोणतीही अडचण येवो, तरीही आम्ही रूग्णालयात शक्य तितक्या लवकर पोहोचतोच. ज्यावेळी टँकर घेऊन जातो, त्यावेळी रूग्णालयातले लोक, तिथं उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचे नातलग, कुटुंबिय लोक सगळेजण आम्हाला हातांनी ‘व्ही’ असा इशारा करतात.

मोदी जी- अच्छा, हे लोक व्हिक्टरीचा ‘व्ही’ म्हणून असा इशारा करतात का?

दिनेश – हो सर, हातांनी ‘व्ही’ दाखवतात, काहीजण अंगठा दाखवतात. अशावेळी आम्हाला खूप बरं वाटतं. आयुष्यात मी काहीतरी चांगलं काम नक्कीच केलंय, त्यामुळंच आत्ताच्या संकटात मला अशा प्रकारे सेवा करण्याची संधी मिळतेय.

मोदी जी – टँकर चालवून आलेला थकवा दूर होत असेल?

दिनेश – हो सर ! हो सर!

मोदी जी – मग घरी आल्यानंतर मुलांबरोबर, याविषयी तुम्हा सर्वांच्या  गप्पा होतात का?

दिनेश – नाही सर! माझी मुलं तर गावी राहतात. मी इथं आयनॉक्स एअर प्रॉडक्टमध्ये टँकर चालक म्हणून काम करतोय. आठ-नऊ महिन्यांनी घरी जात असतो.

मोदी जी – मग कधी फोनवर, मुलांबरोबर बोलत असणार ना?

दिनेश- हो सर! नेहमी बोलत असतो.

मोदी जी – मग त्यांच्या मनात येत असणार, बाबांनी, या काळात जरा संभाळून राहिलं पाहिजे.

दिनेश – हो सर,  मुलं, घरची मंडळी सांगतात, बाबा, काम करा परंतु स्वतःला सांभाळून करा. आणि आम्हीही सुरक्षा लक्षात घेवूनच काम करतोय. आमचा मानगाव इथं प्रकल्पही आहे. आयनॉक्स आम्हा लोकांची खूप मदत करते.

मोदी जी- चला तर, दिनेश जी, तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं. तुमचं बोलणं ऐकून देशाच्या लक्षात येईल की, या कोरोनाच्या लढ्यात कोण-कोणते लोक कशा प्रकारे कार्यरत आहेत. केवळ लोकांचे जीव वाचले पाहिजेत, यासाठी तुम्ही नऊ नऊ महिने आपल्या मुलांना भेटलेले नाहीत. परिवाराची गाठ-भेट घेतलेली नाही. ज्यावेळी ही गोष्ट देश ऐकेल, त्यावेळी देशाला तुमचा अभिमान वाटेल. कोरोनाच्या विरोधातली लढाई आपण जिंकणारच आहोत, कारण दिनेश उपाध्याय यांच्यासारखे लाखों लाखो लोक जीवाची  पर्वा न करता काम करीत आहेत.

दिनेश – सर जी, आपण सर्वजण कोरोनाला एके दिवशी नक्कीच हरवणार आहोत सर!

मोदी जी – दिनेश जी, तुमची भावना हीच तर देशाची ताकद आहे. खूप-खूप धन्यवाद दिनेश जी! आणि तुमच्या मुलांना माझे आशीर्वाद सांगावेत.

दिनेश – ठीक आहे सर, नमस्कार!

मोदीजी – धन्यवाद!

दिनेश – प्रणाम प्रणाम!

मोदी जी- धन्यवाद!

         मित्रांनो, दिनेश जी सांगत होते, त्याप्रमाणं ज्यावेळी एक टँकर चालक ऑक्सिजन घेऊन रूग्णालयामध्ये पोहोचतो, त्यावेळी तो ईश्वरानं पाठवलेला दूतच वाटतो. हे काम किती जोखमीचं आहे, आणि ते करताना किती मानसिक दडपण येत असणार हे आपण नक्कीच समजू शकतो.

मित्रांनो, आव्हानाच्या या काळामध्ये, ऑक्सिजनची  वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेनं पुढाकार घेतला. ऑक्सिजन एक्सप्रेस, ऑक्सिजन रेल्वेमुळे रस्ते मार्गावरून जाणा-या ऑक्सिजन टँकरपेक्षा कितीतरी जास्त मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देशाच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचवला आहे. एक ऑक्सिजन एक्सप्रेस संपूर्णपणे महिला चालवित आहेत, हे जाणून माता-भगिनींना अभिमान वाटेल. देशाच्या प्रत्येक महिलेला या गोष्टीचा अभिमान वाटेल. इतकंच नाही, तर  प्रत्येक हिंदुस्तानीला महिलेच्या या कार्याचा अभिमान वाटेल.

ऑक्सिजन एक्सप्रेस चालविणा-या लोको- पायलट शिरीषा गजनी जी यांना  ‘मन की बात’मध्ये मी आमंत्रित केलं आहे.

मोदी जी – शिरीषा जी नमस्ते !

शिरीषा – नमस्ते सर! कसे आहात सर?

मोदी जी –  मी ठीक आहे. शिरीषा जी, मी ऐकलं की, तुम्ही रेल्वे पायलट म्हणून काम करीत आहात. आणि तुम्ही सर्वजणी म्हणजे जणू महिला मंडळ मिळूनच  ऑक्सिजन एक्सप्रेस चालवत आहात, असं मला सांगण्यात आलंय. शिरीषा जी, तुम्ही खूप शानदार काम करीत आहात. कोरोना काळामध्ये तुमच्याप्रमाणे अनेक महिलांनी पुढाकार घेऊन कोरोनाशी दोन हात करताना देशाला ताकद  दिली आहे. तुम्ही म्हणजे स्त्री-शक्तीचं एक प्रमुख उदाहरण आहे. हे कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते? याची जाणून घेण्याची देशाची आणि माझीही इच्छा आहे.

शिरीषा – सर, मला या कामासाठी माझ्या आई-वडिलांकडून प्रेरणा मिळते… सर, माझे वडील सरकारी कर्मचारी आहेत. खरंतर, मला आणखी दोन मोठ्या बहिणी आहेत. आम्ही घरामध्ये तिघी आहोत. तरीही माझे वडील कामासाठी प्रोत्साहन देत असतात. माझी मोठी बहीण सरकारी बँकेत नोकरी करते आणि मी रेल्वेमध्ये आहे. माझे पालकच मला कामासाठी प्रोत्साहन देतात.

मोदी जी- अरे वा, शिरीषा जी, तुम्ही सर्वसामान्य काळातही रेल्वेमध्ये नोकरी केली आहे. गाडी नेहमीप्रमाणे चालवली आहे. परंतु ज्यावेळी एकीकडे ऑक्सिजनची मागणी इतकी प्रचंड आहे. अशावेळी तुम्ही ऑक्सिजन घेऊन जाणारी गाडी चालवणं, म्हणजे थोडं जास्त जबाबदारीच काम असणार? सामान्य काळात माल, सामान वाहून नेणं वेगळी गोष्ट आहे. आणि ऑक्सिजनची वाहतूक करणं तसं खूपच नाजूक काम आहे, अशावेळी काय अनुभव आला होता?

शिरीषा – हे काम केल्यामुळं माझ्या मनाला फार आनंद वाटला. ऑक्सिजन स्पेशल गाडी चालवताना, सगळं काही पहावं लागतं. सुरक्षेचा विषय असो की फाॅर्मेशन असो अगदी कुठं गळती तर नाही ना, याचीही सारखी काळजी घ्यावी लागते. दुसरं म्हणजे भारतीय रेल्वेकडूनही खूप चांगली  मदत, पाठिंबा मिळतो सर! ही ऑक्सिजन गाडी चालवण्यासाठी मला हरित मार्गिका दिली होती. या गाडीने आम्ही 125 किलोमीटरचं अंतर दीड तासात कापलं. इतक्या वेगानं ही गाडी धावली पाहिजे, यासाठी रेल्वेनंही खूप मोठी जबाबदारी घेतली होती. सर, म्हणून मीही ही जबाबदारी पेलायला तयार झाले.

मोदी जी – व्वा! व्वा! शिरीषाजी तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्या माता-पित्यांना विशेष रूपानं प्रणाम करतो. ज्यांनी आपल्या तिनही मुलींना इतकं छान प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी खूप पुढं जावं म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं धैर्य दिलं आहे, याबद्दल त्यांचं कौतुक आहे.  मला वाटतं की, अशा माता-पित्यांनाही नमस्कार केला पाहिजे. तुम्हा सर्व भगिनींनाही नमस्कार. शिरीषा जी, तुम्ही वेगळे धाडस दाखवून, एक प्रकारे देशाची सेवा करीत आहात, खूप- खूप धन्यवाद शिरीषा जी!

शिरीषा – धन्यवाद सर! सर आभार! सर तुमचे मला आशीर्वाद हवेत.

मोदी जी – बस, परमात्म्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळत रहावा. तुमच्या माता-पित्यांचा आशीर्वाद मिळत रहावा. धन्यवाद !!

शिरीषा – धन्यवाद सर!

मित्रांनो, आपण आत्ताच शिरीषा जी यांचं बोलणं ऐकलं. त्यांचे अनुभव प्रेरणा देतात तसंच भावूकही करताहेत. वास्तवामध्ये ही लढाई इतकी मोठी आहे की, यामध्ये रेल्वेप्रमाणेच आपला देश, जल, थल, नभ अशा तीनही मार्गांनी कार्यरत आहे. एकीकडे रिकामे केलेले टँकर्स हवाई दलाच्या विमानांनी ऑक्सिजन प्रकल्पांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. तर दुसरीकडं नवीन ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्याचं कामही पूर्ण केलं जात आहे. त्याचबरोबर परदेशातून ऑक्सिजन, ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स आणि क्रायोजेनिक टँकर्सही देशात आणले जात आहेत. या कामामध्ये नाविकदल गुंतलं आहे. हवाईदलही हे कार्य करीत आहे. लष्करानंही काही जबाबदारी स्वीकारून काम करीत आहे. ‘डीआरडीओ’ सारख्या आपल्या संस्था कार्यरत आहेत. आपले कितीतरी संशोधक, औद्योगिक क्षेत्रातले तज्ज्ञ, आणि तंत्रज्ञही युद्धपातळीवर काम करीत आहेत. ही मंडळी करीत असलेल्या कामाची माहिती घेण्याची, त्यांच्या कामाचं स्वरूप जाणून घेण्याची जिज्ञासा सर्व देशवासियांच्या मनात आहे. म्हणूनच आज आपल्याबरोबर हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन पटनायक जी बोलणार आहेत.

मोदी जी- पटनायक जी, जय हिंद !

ग्रुप कॅप्टन – सर जय हिंद! सर मी, ग्रुप कॅप्टन पटनायक हवाई दलाच्या हिंडन तळावरून बोलतोय.

मोदी जी- पटनायक जी, कोरोनाविरोधातल्या लढाईमध्ये तुम्ही मंडळी खूप मोठी, महत्वाची जबाबदारी सांभाळत आहात. जगभरामध्ये जाऊन टँकर आणणं, टँकर इथं पोहोचवण्याचं काम करीत आहात. एक फौजी-लष्करी या नात्यानं वेगळ्याच प्रकारचं काम तुम्ही केलं आहे. लढताना हौतात्म्य पत्करणं किंवा समोरच्या शत्रूला मारायचं, यासाठी तुमची धावपळ असते. आज मात्र तुम्ही जीवन वाचवण्यासाठी धावपळ करीत आहात. हा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे, हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो.

ग्रुप कॅप्टन – सर, या संकटाच्या काळात आपल्या देशवासियांना आम्ही मदत करू शकतो, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि हे जे काही मिशन आम्हाला मिळालं आहे, ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहोत. आम्हाला दिलं गेलेलं प्रशिक्षण आणि मिळत असलेल्या पुरक सेवा यांच्या मदतीनं काम सुरू आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर, या मिशनमुळं काम केल्याचं समाधान मिळतंय, ही खूप मोठी अगदी उच्च स्तरावरची बाब आहे. आणि म्हणूनच आम्ही या मिशनचं काम निरंतर करू शकतोय.

मोदी जी- कॅप्टन, तुम्ही या दिवसांमध्ये जे जे काही प्रयत्न केले आहेत आणि तेही कमीत कमी वेळेत सर्वकाही कामे करावी लागली आहेत. त्याविषयी या दिवसातला तुमचा काय अनुभव आहे?

ग्रुप कॅप्टन – सर, गेल्या एक महिन्यापासून आम्ही सातत्यानं ऑक्सिजन टँकर्स आणि द्रवरूप ऑक्सिजन कंटेनर्स, देशातून आणि देशाबाहेरून अशा दोन्ही ठिकाणांहून उचलून आणत आहोत. जवळपास सोळाशे साॅर्टिज्पेक्षाही जास्त हवाई दलाने  वाहतूक केली आहे. आणि तीन हजार तासांपेक्षाही जास्त काळ उड्डाण केलं आहे. जवळपास 160 आंतरराष्ट्रीय मिशन पूर्ण केली आहेत. आधी आणि इतर देशांतर्गत कामासाठी टँकर्स आणत होतो, त्यावेळी दोन ते तीन दिवस लागत होते. मात्र सध्या ज्या कारणानं आम्ही प्रत्येक ठिकाणांवरून ऑक्सिजन टँकर्स आणतो, त्यासाठी आम्ही अवघ्या दोन ते तीन तासांमध्येच एका स्थानांवरून दुसरीकडे टँकर्स पोहोचवत आहोत. आणि आंतरराष्ट्रीय मिशन असेल तर अवघ्या 24 तासांमध्ये अगदी न थांबता, निरंतर कार्य सुरू ठेवून चोविस तासात हे काम फत्ते करतो. या मिशनसाठी संपूर्ण हवाई दल कार्यरत आहे. जितक्या लवकर आणि जितके जास्त टँकर्स आणता येतील तितके ते आणले जातात. देशाची शक्य तितकी जास्त मदत करायची, हाच विचार आमचा असतो, सर!

मोदी जी- कॅप्टन, आंतरराष्ट्रीय स्थानांवर तुम्हाला कुठं कुठं उड्डाणं करावी लागली?

ग्रुप कॅप्टन – सर, अगदी अल्पकालीन सूचनेनुसार आम्ही सिंगापूर, दुबई, बेल्जियम, जर्मनी आणि यू.के. या सर्व स्थानी वेगवेगळ्या तळांवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी उड्डाण केलं, सर! आयएल 76, सी-17 आणि इतर सर्व विमानं गेली होती. सी-130 नं तर अतिशय कमी वेळेत मिळालेल्या सूचनेनुसार मिशनचं नियोजन केलं. आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण आणि आमच्यामध्ये असलेला ‘जोश’ यामुळंच आम्ही अगदी वेळेत मिशन पूर्ण करू शकलो. सर!!

मोदी जी – लक्षात घ्या, देशाला तुमचा अभिमान आहे, जल असो, भूमी असो किंवा मग आकाश आमचे सर्व जवान ही कोरोना विरुद्धची लढाई लढत आहेत आणि कॅप्टन तुम्ही देखील तुमची जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे तुमचे देखील अभिनंदन.

Grp. Cpt.– सर, खूप खूप आभारी आहोत सर. आम्ही आमचे सर्वोत्तम द्यायचे प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नांमध्ये माझ्या सोबत माझी मुलगी अदिती देखील आहे.

मोदी जी- अरे वाह!

अदिती – नमस्कार मोदी जी

मोदी जी – नमस्कार , अदिती तू किती वर्षांची आहेस?

अदिती – मी 12 वर्षाची आहे आणि मी इयत्ता 8 वी मध्ये आहे.

मोदी जी – तुमचे वडील नेहमी बाहेर जातात, युनिफॉर्म मध्ये (गणवेशात) असतात.

अदिती – हा! मला त्यांचा खूप अभिमान वाटतो, ते इतके महत्वपूर्ण काम करत आहेत. कोरोना पिडीत लोकांची मदत करत आहेत, आणि बाहेरील देशांमधून ऑक्सिजन टँकर आणि कंटेनर घेऊन येत आहेत.

मोदी जी – परंतु तू तुझ्या बाबांना खूप मिस करत असशील ना?

अदिती – हो, मी त्यांना खूप मिस करते. आजकाल ते खूप कमी वेळ घरी असतात. कोरोना बाधित लोकांना वेळेवर ऑक्सिजन मिळून त्यांचा जीव वाचवा यासाठी ते अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांद्वारे कंटेनर आणि  टँकर त्यांच्या प्रोडक्शन प्लांट पर्यंत पोहोचवत आहेत.

मोदी जी – तुझे बाबा, लोकांना वेळेवर ऑक्सिजन पोहोचवून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम करतात , ही गोष्ट आता सगळ्यांना माहित झाली असेल.

अदिती – हा

मोदी जी – तुझे वडील ऑक्सिजन सेवेत कार्यरत आहेत ही बाब जेव्हा तुझे मित्र-मंडळी, तुझ्या सोबत शिकणारे विद्यार्थी यांना कळली असेल तेव्हा त्या सगळ्यांना तुझ्या बद्दल देखील आदर वाटला असेल ना?

अदिती – हो, माझे मित्र-मैत्रिणी मला सांगतात की तुझे बाबा इतके महत्वाचे काम करतायत, त्याचा तुला देखील अभिमान वाटत असेल ना, हे ऐकल्यावर तर मला खूपच अभिमान वाटतो. आणि माझे सगळे कुटुंब आहे माझे दोन्ही आजी आजोबा सगळ्यांना माझ्या वडिलांचा खूप अभिमान वाटतो, माझी आई आणि बाकी सर्व देखील डॉक्टर आहेत, ते देखील दिवस-रात्र काम करत आहेत आणि सर्व सशस्त्र सेना, माझ्या वडिलांच्या स्क्वाड्रॉनचे सर्व काका आणि सर्व सैन्य अहोरात्र काम करीत आहे आणि मला खात्री आहे की सर्व प्रयत्नांनी आपण कोरोना विरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू.

मोदी जी – आपल्याकडे पूर्वापार असे बोलले जाते की, आपल्या मुलींच्या मुखात साक्षात सरस्वती विराजमान असते आणि आता अदिती बोलली आहे की आपण ही लढाई जिंकू म्हणजे ही एकप्रकारे देव वाणीच झाली आहे. अच्छा, अदिती, आता तर तू ऑनलाईन शिकत असशील.

अदिती – होय, आत्ता आमचे सर्व ऑनलाईन वर्ग चालू आहेत आणि आत्ता आम्ही घरी देखील  संपूर्ण खबरदारी घेत आहोत आणि जर बाहेर जायचे असेल तर डबल मास्क घालतो आणि सर्व खबरदारी घेतो आणि वैयक्तिक स्वच्छतेची आणि इतर गोष्टींची देखील खबरदारी घेतो.

मोदी जी – अच्छ, तुला कोणते छंद आहेत? तुला काय आवडते?

अदिती – मला पोहायला  आणि बास्केटबॉल खेळायला आवडते, परंतु आता हे सगळे बंद आहे आणि या लॉकडाउन आणि कोरोना कालावधी दरम्यान मला बेकिंग आणि स्वयंपाक करण्याची खूप आवड लागली आहे. आणि माझे बाबा जेव्हा कामावरून घरी येतात तेव्हा मी त्यांना त्यांच्यासाठी कुकीज आणि केक्स बनवते.

मोदी जी – वाह वाह वाह! चला, बर्‍याच दिवसानंतर तुला तुझ्या वडिलांसोबत  वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. खूप छान वाटले आणि कॅप्टन मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, परंतु जेव्हा मी कॅप्टनचे अभिनंदन करतो, तेव्हा ते केवळ त्या एकट्याचे नसते तर आपल्या सर्व सैन्याने, जल, भू, आकाश सगळीकडे कार्यरत असणाऱ्या सगळ्यांना माझा सलाम.  धन्यवाद.

Grp. Cpt. – धन्यवाद सर.

मित्रांनो, आमच्या या जवानांनी, या योद्धांनी केलेल्या कार्यासाठी देश त्यांना अभिवादन करतो. तसेच लाखो लोक रात्रंदिवस कार्यरत आहेत. ते करीत असलेले काम हे त्यांच्या दैनंदिन कामाचा भाग नाही. शंभर वर्षांनंतर जगावर अशी आपत्ती आली आहे, शतकानंतर इतके मोठे संकट! म्हणून, या प्रकारच्या कामाचा कोणालाही अनुभव नव्हता. यामागे केवळ देशसेवा आणि संकल्पशक्ती आहे आणि याच्याच जोरावर देशाने ते करून दाखविले जे यापूर्वी कधीच केले नव्हते.  आपण अंदाज लावू शकता की सामान्य दिवसात आपल्याकडे एका दिवसात 900 मेट्रिक टन द्रवरुपी वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती व्हायची.  आता हे दहा पटीहून अधिक वाढून सुमारे 9500 मेट्रिक टन प्रतिदिन उत्पादन होते. आमचे योद्धे हा ऑक्सिजन देशाच्या काना कोप-यात पोहोचवत आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी देशात इतके प्रयत्न केले गेले, इतके नागरिक या कामात जोडले गेले, एक नागरिक म्हणून ही  सर्व कामे खूपच प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाने एक संघ म्हणून आपले कर्तव्य बजावले आहे. मला बंगळुरू येथील उर्मिला जी यांनी सांगितले आहे की त्यांचे पती प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आहे आणि इतकी आव्हाने असताना देखील ते टेस्टिंगचे काम अविरत करत आहेत.

    मित्रांनो, कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात देशात फक्त एक चाचणी प्रयोगशाळा होती, परंतु आज अडीच हजाराहून अधिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सुरुवातीला एका दिवसात शंभर-एक  चाचण्या घेण्यात आल्या, आता एका दिवसात २० लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत देशात 33 कोटींपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. या सगळ्या सहकाऱ्यांमुळेच हे इतके मोठे कार्य शक्य झाले. नमुने संकलनाच्या कामात अनेक आघाडीचे कामगार कार्यरत आहेत. संक्रमित रूग्णांमध्ये जायचे, त्यांचे नमुने घ्याचे ही खरच एक सेवा आहे. स्वत:चे रक्षण करण्यासाठी, या सहकाऱ्यांना एवढ्या उष्णतेमध्ये देखील सतत पीपीई किट घालावे लागते. त्यानंतर ते नमुने प्रयोगशाळेपर्यंत पोहोचतात. म्हणूनच जेव्हा मी तुमच्या सूचना आणि प्रश्न वाचत होतो, तेव्हा मी ठरविले की आमच्या या मित्रांसोबत देखील चर्चा केली पाहिजे. त्यांच्या अनुभवांमधून आपल्याला बरेच शिकायला मिळेल.  चला तर दिल्लीत लॅब टेक्नीशियन म्हणून कार्यरत असणारे आपले सहकारी प्रकाश कांडपाल जी यांच्याशी बोलूया.

मोदी जी – प्रकाश जी नमस्कार.

प्रकाश जी- नमस्कार माननीय पंतप्रधान जी.

मोदी जी – प्रकाश जी, सर्वप्रथम 'मन की बात' च्या आपल्या सर्व श्रोत्यांना तुमच्याबद्दल सांगा. आपण कधीपासून हे काम करत आहात आणि कोरोनाच्या काळातील तुमचा अनुभव काय आहे , कारण देशातील लोकांना या सगळ्या गोष्टी टीव्हीवर किंवा वृत्तपत्रात दिसत नाही. तुम्ही एका ऋषीप्रमाणे प्रयोगशाळेत काम करत आहात. तुम्ही जेव्हा तुमचे अनुभव सांगाल तेव्हा देशवासियांना देखील माहिती होईल की देशात कशाप्रकारे काम सुरु आहे.

प्रकाश जी – मी, दिल्ली सरकारची स्वायत्त संस्था असणाऱ्या Institute of Liver and Biliary Sciences नावाच्या रूग्णालयात मागील  10 वर्षांपासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षांचा अनुभव आहे. आयएलबीएस पूर्वीही मी अपोलो हॉस्पिटल, राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटल, दिल्लीमधील रोटरी ब्लड बँक यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केले आहे. या सगळ्या संस्थांमध्ये मी ब्लड बँक विभागात सेवा बजावली आहे, परंतु गेल्या वर्षी 1 एप्रिल 2020 पासून मी आयएलबीएसच्या विषाणूविज्ञान विभागांतर्गत कोविड टेस्टिंग लॅबमध्ये कार्यरत आहे. निःसंशयपणे, कोविड साथीच्या काळात, आरोग्य आणि आरोग्याशी संबंधित सर्व संसाधनांवर अतिरिक्त ताण आला आहे. परंतु वैयक्तिकरित्या या संघर्षाच्या कालावधीला मी एक संधी मानतो. जेव्हा राष्ट्र, मानवता, समाज आपल्याकडून अधिक जबाबदारी, सहकार्य आणि अधिक सामर्थ्य आणि आपल्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतात. आणि सर, जेव्हा आपण देशाच्या, माणुसकीच्या, समाजाच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जेव्हा अगदी छोट्याश्या दवबिंदू इतके देखील काम करतो तेव्हा मी गोष्ट खूपच अभिमानस्पद असते.  कधीकधी जेव्हा आमच्या कुटुंबातील सदस्य देखील थोडे साशंक असतात किंवा त्यांना देखील थोडी भीती वाटते अशावेळी मी त्यांना कठीण परिस्थितीमध्ये देशाचे संरक्षण करण्यासाठी सदैव आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या आपल्या देशातील सैनिकांची आठवण करून देतो. त्यांच्या तुलनेत तर आम्ही घेत असलेली जोखीम ही फारच कमी आहे.  त्यांना देखील गोष्ट पटते आणि ते देखील मला सहकार्य करतात आणि या आपत्तीत त्यांच्याकडून जे काही सहकार्य शक्य आहे ते करतात.

मोदी जी –  प्रकाश जी, या कोरोनाच्या काळात एकीकडे सरकार लोकांना शारीरिक अंतर ठेवण्यास सांगत आहे, एकमेकांपासून दूर रहाण्यास सांगत आहे. आणि आपल्याला मात्र कोरोना विषाणू मध्येच राहावे लागते. खरतर हे सगळे म्हणजे स्वतःचा जीव संकटात टाकण्यासारखे आहे अशावेळी कुटुंबाला तुमची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु तरीही, ही प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांची नोकरी ही सामान्य नोकरी आहे. आणि अशा साथीच्या परिस्थितीत अजून एक महत्वाची नोकरी आहे आणि आपण ती करत आहात. कामाचे तास देखील बरेच वाढले असतील? रात्रभर प्रयोगशाळेत थांबावे लागत असेल? कारण इतक्या कोट्यावधी लोकांची चाचणी घेतली जात आहे, तर मग ताणही वाढला असेल. परंतु तुम्ही तुमच्या सुरक्षेची खबरदारी घेता की नाही?

प्रकाश जी – हो सर नक्कीच घेतो. आमची आयएलबीएस प्रयोगशाळा डब्ल्यूएचओ द्वारे मान्यता प्राप्त आहे. सर्व प्रोटोकॉल आंतरराष्ट्रीय मानकांचे आहेत, आम्ही प्रयोगशाळेत जाताना त्रि-स्तरीय पोशाख  घालून जातो आणि तो घालूनच काम करतो.  आणि त्याचे विघटन करणे, लेबलिंग करणे आणि चाचणी या सर्व गोष्टी संपूर्ण प्रोटोकॉल नुसार केल्या जातात.  सर,माझे कुटुंब आणि माझे बहुतेक परिचित ज्यांना अजून संसर्ग झाला नाही  ही देवाची कृपा आहे.  एक गोष्ट आहे की, आपण सावधगिरी बाळगली आणि संयम ठेवल्यास, आपण हे संकट  थोडेसे टाळू शकता.

मोदी जी – प्रकाश जी, आपल्यासारखे हजारो लोक गेल्या एक वर्षापासून प्रयोगशाळेत कार्यरत आहेत आणि बरेच त्रास सहन करीत आहात. इतक्या लोकांना वाचवण्याचे काम करत आहात. देशाला आज हे माहिती होत आहे.   प्रकाश जी, मी तुमच्या मार्फत तुमच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानतो. देशवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि आपण निरोगी रहा. तुमचे कुटुंब निरोगी राहुदे . मी तुम्हाला शुभेच्छा देतो.

प्रकाश जी – धन्यवाद, पंतप्रधानजी. तुम्ही मला ही संधी दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

मोदी जी – धन्यवाद.

मित्रांनो, मी एकप्रकारे संवाद तर प्रकाशजींशी साधला, पण त्यांच्या बोलण्यातून हजारो प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या सेवेचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचत आहे. या गोष्टींमधून  हजारो-लाखो लोकांचा सेवाभाव तर दिसून येतोच, आपल्या सर्वांना आपली जबाबदारी देखील कळते. प्रकाश जी यांच्यासारखे आपले अनेक साथीदार ज्या परिश्रम आणि समर्पण वृत्तीने काम करत आहेत त्याच निष्ठेने त्यांना सहकार्य केल्यास कोरोनाला पराभूत करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आता पण आपल्या कोरोना योध्यांबद्द्ल बोलत होतो. गेल्या दीड वर्षात आपण त्याचे समर्पण आणि परिश्रम पाहिले आहेत. पण या लढाईत देशातील इतर अनेक क्षेत्रातील अनेक योद्ध्यांचीही मोठी भूमिका आहे. तुम्ही विचार करा, आपल्या देशावर इतके मोठे संकट आले, त्याचा परिणाम देशातील प्रत्येक यंत्रणेवर झाला. कृषी-क्षेत्राने या हल्ल्यापासून बर्‍याच प्रमाणात स्वत: चे संरक्षण केले. केवळ सुरक्षितच  ठेवले नाही, तर प्रगती देखील केली, आणि विकास देखील केला! आपणास माहिती आहे का की या साथीच्या रोगातही आपल्या शेतकर्‍यांनी विक्रमी उत्पादन केले आहे.  शेतकर्‍यांनी विक्रमी उत्पादन केल्याने देशाने देखील  अन्नधान्याची विक्रमी  खरेदी केली आहे. यावेळी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना मोहरीसाठी एमएसपीपेक्षा जास्त भाव मिळाला आहे. अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनामुळे आपला देश प्रत्येक देशवासियाला देशाला आधार देण्यास सक्षम आहे. देशातील एकही गरीब कुटुंबात कोणीही कधीही उपाशी झोपू नये म्हणून आज या संकटकाळात 80 कोटी गरीब लोकांना मोफत शिधावाटप केले जात आहे.

मित्रांनो, आज आपल्या देशातील शेतकरी अनेक क्षेत्रातील  नवीन व्यवस्थेचा फायदा घेत आहेत. अगरतलातील शेतकऱ्यांचेच उदाहरण घ्या! हे शेतकरी उत्तम दर्जाच्या फणसाचे उत्पन्न घेतात. त्याला देशात आणि परदेशात देखील चांगली मागणी येऊ शकते, म्हणूनच  यावेळी आगरतळा येथील शेतकर्‍यांचे फणस  रेल्वेने गुवाहाटी येथे आणले.  हे फणस आता गुवाहाटीहून लंडनला पाठविण्यात येत आहेत. तसेच तुम्ही बिहारच्या 'शाही लीची' चे नाव देखील ऐकले असेलच. याची ओळख अधिक मजबूत होण्यासाठी आणि शेतकर्‍यांना अधिक फायदा होण्यासाठी  2018 मध्ये, सरकारने शाही लीचीला जीआय टॅग देखील दिला होता. यावेळी बिहारची ही 'शाही ​​लीची' देखील हवाईमार्गे लंडनला रवाना झाली आहे. आपला देश पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण अशा प्रकारच्या अद्वितीय स्वाद आणि उत्पादनांनी परिपूर्ण आहे. दक्षिण भारतात तुम्ही विजयनगरच्या आंब्याबद्दल ऐकले असेलच? आता हा आंबा कोणाला खायचा नसेल! त्यामुळे आता किसान रेल्वेतून शेकडो टन विजयनगरम आंबे दिल्लीला पोहोचत आहेत. दिल्ली आणि उत्तर भारतातील लोकांना विजयनगरमचा आंबा खायला मिळेल आणि विजयनगरमच्या शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळेल.किसान रेल्वेने आतापर्यंत सुमारे 2 लाख टन शेतमालाची वाहतूक केली आहे. आता शेतकरी देशाच्या इतर दुर्गम भागात फळ, भाज्या, धान्य फारच कमी किंमतीत पाठवू शकतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण 30 मे रोजी 'मन की बात' करत आहोत आणि योगायोगाने आजच सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहेत.  या वर्षांमध्ये देशाने 'सबका साथ, सबका-विकास, सबका-विश्वास' या मंत्राचा अवलंब केला आहे. देशसेवेसाठी प्रत्येकाने प्रत्येक क्षण समर्पण भावनेने काम केले आहे.  बर्‍याच सहका-यांनी मला पत्रे पाठवून सांगितले आहे की  'मन की बात' मध्ये मी आपल्या या 7 वर्षाच्या एकत्र प्रवासाबाबत देखील चर्चा केली पाहिजे. मित्रांनो, या 7 वर्षात जे काही साध्य झाले आहे ते देशाचे आहे, देशवासियांचे आहे. आम्ही या वर्षांमध्ये राष्ट्रीय अभिमानाचे अनेक क्षण अनुभवले आहेत. आता भारतावर इतर देशांचा वैचारिक दबाव नाही, भारत आता  स्वतःच्या संकल्पाने मार्गक्रमण करत आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप अभिमान वाटतो.  भारत आता आपल्याविरूद्ध कट रचणाऱ्याना सडेतोड उत्तर देत आहे हे बघताना  आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा भारत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांशी तडजोड करीत नाही, जेव्हा आपल्या सैन्यांची ताकद वाढते, तेव्हा आम्हाला वाटते की होय, आम्ही योग्य मार्गावर आहोत.

मित्रांनो, मला देशातील कानाकोपऱ्यातून अनेक देशवासींचे संदेश, त्यांची पत्रे येतात. बरेच लोक देशाचे आभार मानतात की 70 वर्षांनंतर त्यांच्या गावात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे, त्यांची मुले प्रकाशात पंख्याखाली  बसून अभ्यास करत आहेत. कित्येक लोकं सांगतात की, त्यांचे गावही आता चांगल्या रस्त्याने शहराशी जोडले गेले आहे. मला आठवते की आदिवासी भागातील काही लोकांनी मला हा पत्र पाठवून सांगितले होते की रस्ता तयार झाल्यानंतर प्रथमच त्यांना उर्वरित जगाचा भाग असल्याचे वाटत आहे. त्याच प्रकारे, कोणी बँक खाते उघडण्याचा आनंद सामायिक करतो, तर कोणी वेगवेगळ्या योजनांच्या मदतीने नवीन रोजगार सुरु करण्याच्या आनंदात मला सहभागी होण्यासाठी  आमंत्रित करतो. 'प्रधानमंत्री आवास योजना' अंतर्गत घर मिळाल्यानंतर गृहप्रवेश कार्यक्रमात सहभागी होण्याची अशी अनेक आमंत्रणे सतत मला आमच्या देशवासियांकडून येत आहेत. या 7 वर्षात मी तुमच्या सर्वांच्या  अशा करोडो आनंदांमध्ये सहभागी झालो आहे. काही दिवसांपूर्वीच गावातील एका कुटूंबाने मला 'जल जीवन अभियान' अंतर्गत घरात बसविलेल्या पाण्याच्या नळाचा फोटो पाठविला. त्या फोटोचे कॅप्शन त्यांनी लिहिले होते – 'माझ्या गावाची जीवनधारा'. अशी बरीच कुटुंबे आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या 7 दशकांत आपल्या देशातील फक्त साडे तीन कोटी ग्रामीण कुटुंबांना पाण्याचे कनेक्शन दिले होते. परंतु गेल्या 21 महिन्यांतच  केवळ साडेचार कोटी घरांना शुद्ध पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे. त्यापैकी 15 महिने तर कोरोना कालावधीचे होते. देशात असाच विश्वास ‘आयुष्मान योजने’ च्या माध्यमातून देखील आला आहे. जेव्हा एखादा गरीब मोफत उपचार घेऊन  बरा होऊन घरी येतो तेव्हा त्याला असे वाटते की त्याला एक नवीन जीवन मिळाले आहे. त्याला विश्वास आहे की देश त्याच्या पाठीशी आहे. अशा अनेक कुटुंबांच्या आशीर्वादाने, कोट्यावधी मातांच्या आशीर्वादाने आपला देश सामर्थ्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मित्रांनो, या 7 वर्षात भारताने 'डिजिटल व्यवहार' मध्ये जगाला एक नवीन दिशा प्रदान केली आहे. आज आपण कोणत्याही ठिकाणी अगदी  सहजपणे डिजिटल पेमेंट करतो, या कोरोनाच्या काळातही हे फार उपयुक्त ठरत आहे. आज देशवासी स्वच्छतेप्रती अधिक जागरूक आणि दक्ष होत आहेत.  आम्ही मोठ्या प्रमाणात उपग्रह देखील प्रक्षेपित करत आहोत आणि विक्रमी स्तरावर रस्ते देखील बनवत आहोत. या 7 वर्षात देशातील अनेक जुने वादही संपूर्ण शांतता व सामंजस्याने मिटविण्यात आले आहेत. ईशान्य ते काश्मीर पर्यंत शांतता व विकासाचा नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.  मित्रांनो, तुम्ही विचार केला आहे का की अनेक दशकांपासून ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या सर्व  गोष्टी या 7 वर्षात कशा झाल्या? हे सर्व शक्य झाले कारण या 7 वर्षात आम्ही सरकार आणि लोकांहून अधिक एक देश म्हणून काम केले, एक टीम  म्हणून काम केले, 'टीम इंडिया' म्हणून काम केले. प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी काही पावले उचलण्याचा प्रयत्न केला आहे. होय! जिथे यश असते तिथे परीक्षा देखील असतात. या 7 वर्षात आम्ही एकत्रित बर्‍याच कठीण परीक्षा दिल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्यातून यशस्वीरीत्या बाहेर आलो आहोत.  कोरोना साथीच्या स्वरूपात, इतकी मोठी परीक्षा तर सुरूच आहे. हे एक असे संकट आहे ज्याने संपूर्ण जगाला त्रास दिला आहे, अनेक लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. मोठमोठे देशदेखील त्याच्या तडाख्यातून वाचलेले नाहीत. या जागतिक साथीच्या काळात भारत 'सेवा आणि सहकार्याचा' संकल्प घेऊन मार्गक्रमण करत आहे. आम्ही पहिल्या लाटेत देखील जोमाने संघर्ष केला, यावेळी देखील विषाणू विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत भारत विजयी होईल. 'सहा फुटाचे अंतर’ मास्कशी संबधित नियम किंवा मग लस संबंधीचे नियम असू देत आम्हाला निष्काळजीपणा करून चालणार नाही. हाच आपला विजयाचा मार्ग आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण 'मन की बात' मध्ये भेटू, तेव्हा आपण देशवासियांच्या बर्‍याच प्रेरणादायक उदाहरणांबद्दल आणि नवीन विषयांवर चर्चा करू. तुम्ही तुमच्या सूचना मला अशाच पाठवत रहा. तुम्ही सर्व जण निरोगी रहा, अशीच देशाची प्रगती करत रहा. खूप-खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi visits the Indian Arrival Monument
November 21, 2024

Prime Minister visited the Indian Arrival monument at Monument Gardens in Georgetown today. He was accompanied by PM of Guyana Brig (Retd) Mark Phillips. An ensemble of Tassa Drums welcomed Prime Minister as he paid floral tribute at the Arrival Monument. Paying homage at the monument, Prime Minister recalled the struggle and sacrifices of Indian diaspora and their pivotal contribution to preserving and promoting Indian culture and tradition in Guyana. He planted a Bel Patra sapling at the monument.

The monument is a replica of the first ship which arrived in Guyana in 1838 bringing indentured migrants from India. It was gifted by India to the people of Guyana in 1991.