स्वच्छ भारत मिशन - स्वच्छतेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण जनआंदोलनाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 9600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये अमृत आणि अमृत 2.0 अंतर्गत शहरी पाणी आणि सांडपाणी व्यवस्था वाढवण्याच्या उद्देशाने 6,800 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानांतर्गत गंगा नदीच्या खोऱ्यातील भागात पाण्याची गुणवत्ता आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारे 1550 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 10 प्रकल्प , गोबरधन योजनेअंतर्गत 1332 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे 15 कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प यांचा समावेश आहे.
स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात भारताच्या दशकभरातील स्वच्छताविषयक केलेली कामगिरी आणि नुकत्याच संपलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेतील यश दर्शवण्यात येईल. या राष्ट्रीय प्रयत्नाच्या पुढील टप्प्यासाठी देखील यावेळी तयारी केली जाईल. संपूर्ण स्वच्छता ही भावना भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल याची खात्री करून स्थानिक स्वराज्य संस्था, महिला गट, युवा संघटना आणि समाजातील नेत्यांचा देशव्यापी सहभागही यात समाविष्ट असेल.
स्वच्छता ही सेवा 2024 ची संकल्पना : ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ असून स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय शाश्वततेप्रति वचनबद्धतेमध्ये राष्ट्राला पुन्हा एकदा एकत्र केले आहे. स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत, 17 कोटींहून अधिक जणांच्या लोकसहभागातून 19.70 लाखांहून अधिक कार्यक्रम पूर्ण झाले आहेत. सुमारे 6.5 लाख स्वच्छता लक्ष्य युनिट्सचे परिवर्तन साध्य करण्यात आले आहे. जवळपास 1 लाख सफाईमित्र सुरक्षा शिबिरांचेही आयोजन करण्यात आले असून, 30 लाखांहून अधिक सफाई मित्रांना याचा लाभ होत आहे. याशिवाय, ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेअंतर्गत 45 लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत.