#MannKiBaat is like a mirror to the nation and society. It highlights that people of our country have no dearth of the inner strength and talent: PM
For #MannKiBaat, I receive so many letters and telephone-calls but there are hardly any elements of complain: PM Modi
During the Emergency, democratic rights were snatched: PM #MannKiBaat
If there is anything beyond laws closer to the people of this country, it is our democratic culture: PM during #MannKiBaat
The number of voters who voted in 2019 Lok Sabha elections is almost double the population of America and more than the population of entire Europe: PM #MannKiBaat
The 2019 Lok Sabha elections was the biggest such exercise in the world: PM Modi #MannKiBaat
Big and positive changes can be achieved by collective endeavour: PM Modi during #MannKiBaat
When we come together and work hard, then most difficult tasks can be accomplished successfully. Jan Jan Judega, Jal Bachega: PM Modi #MannKiBaat
Like Swachhata, let us make water conservation a Jan Andolan: PM Modi #MannKiBaat
#MannKiBaat: PM Modi urges film industry, sportspersons, media, social and cultural organizations to spread awareness on water conservation through innovative campaigns
On 21st June, Yoga Day was marked with great enthusiasm: PM Modi during #MannKiBaat
Healthy people help build a healthy society and yoga ensures the same: PM Modi during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!! मधल्या दीर्घ काळानंतर आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये ‘मन की बात’, जन की बात, जन-जन की बात, जन-मन की बात करण्यासाठी प्रारंभ केला जात आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये, कार्यक्रमांमध्ये मी खूप व्यस्त तर होतोच, परंतु ‘मन की बात’ची मजा काही वेगळीच आहे आणि ती या व्यस्ततेमध्ये गायब होती. काही तरी कमी आहे, असं मला सारखं जाणवत होतं. आपल्या माणसांमध्ये बसून, अगदी हलक्या-फुलक्या वातावरणामध्ये, 130 कोटी देशवासियांच्या परिवारामधल्या एका स्वजनाच्या रूपामध्ये, अनेक गोष्टी आपण ऐकत होतो, काही गोष्टी पुन्हा एकदा बोलत होतो. काही-काही वेळेस तर तुमच्याच  गोष्टी, आपल्या लोकांसाठी प्रेरणा बनत होत्या. हा मधला सुट्टीचा कालखंड कसा गेला असेल, आपण कल्पना करू. शकता. रविवार, महिन्यातला शेवटचा रविवार – सकाळी 11 वाजता, आपली भेट ठरलेली! मलाही काही ना काहीतरी सुटल्यासारखं, राहून गेल्यासारखं, चुकल्यासारखं वाटत होतं. तुम्हालाही वाटत होतं ना? नक्कीच वाटत असणार. हा काही निर्जीव कार्यक्रम नव्हता. या कार्यक्रमामध्ये जिवंतपणा होता, आपलेपणा होता, त्यामध्ये मन लावलं होतं, अगदी हृदयानं जोडलेला होता, आणि म्हणूनच हा जो मधला काळ गेला, तो फारच कठिण होता, असं मला जाणवलं. मी काही तरी ‘मिस’ करतोय, असं मला प्रत्येक क्षणाला वाटत होतं. आणि ज्यावेळी मी ‘मन की बात’ करतो त्यावेळी भलेही मी एकटाच बोलत असेन, आणि ते शब्द कदाचित माझे असतील, आवाज माझा असेल, परंतु ती कथा तुमची असते, पुरुषार्थ तुमचा असतो, पराक्रम तुमचा असतो. मी तर फक्त, माझे शब्द आणि माझी वाणी यांचा वापर करत होतो. आणि या कारणामुळेच मी, या कार्यक्रमाला नाही,  तर तुम्हा सर्वांना ‘मिस’ करत होतो. मनामध्ये एकदम रिक्ततेची भावना निर्माण झाली होती. एकदा तर मनात आलं, आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळं लगेचच आपल्यामध्ये येवून चार गोष्टी बोलाव्यात. परंतु नंतर विचार केला की, नाही!! आपला तो रविवारवाला कार्यक्रम आहे आणि तो  असाच सुरू राहिला पाहिजे. परंतु या रविवारनं  मात्र खूपच प्रतीक्षा करायला लावली. चला, अखेर संधी मिळालीच. एका कौटुंबिक वातावरणामध्ये ‘मन की बात’ करायची आहे. लहान-लहान, अगदी साध्या-सुध्या, हलक्या-फुलक्या गोष्टीही समाजामध्ये, जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. हा एक प्रकारे त्याचाच भाग असून, हा क्रम एका नवीन ऊर्जेला, शुद्ध चैतन्याला जन्म देतो आणि एका अर्थाने नवभारताच्या चैतन्याला, ऊर्जेला सामर्थ्‍य  देत, हा क्रम असाच सुरू ठेवून पुढे वाटचाल करायची आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संदेश आले आहेत. त्यामध्ये असंख्य लोकांनी ‘मन की बात’ ‘मिस’ करत असल्याचं म्हटलंय. हे संदेश मी ज्यावेळी वाचतो, ऐकतो त्यावेळी मला खरंच छान वाटतं. आपलेपणाची भावना मनाला जाणवते. कधी-कधी तर मला वाटतं की, हा माझा ‘स्व’पासून सुरू झालेला ‘समष्टी’पर्यंतचा प्रवास आहे. ही माझी ‘अहम्’ ते ‘वयम्’ अशी यात्रा आहे. माझ्यासाठी तुमच्याबरोबर केलेला हा ‘मौन संवाद’ म्हणजे एकप्रकारे माझ्या ‘अध्यात्मिक यात्रेच्या अनुभूतीचाही एक अंश होता. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मी केदारनाथला का गेलो, याविषयी अनेक लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले आहेत. असे प्रश्न विचारण्याचा  तुमचा अधिकार आहे. आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची जिज्ञासाही असणार, हे मी समजू शकतो. मलाही माझ्या या भावना तुमच्यापर्यंत कधी एकदा पोहोचवाव्यात असं झालंय. परंतु आज त्या विषयावर बोलण्याचं ठरवलं तर कदाचित ‘मन की बात’चं स्वरूप बदलून जाण्याची शक्यता जास्त आहे. निवडणुकीची धामधूम सुरू होती, जय-पराजयाचे अंदाज बांधले जात होते, काही ठिकाणी अजून मतदान होणार होतं आणि मी केदारनाथला निघालो. अनेक लोकांनी तर यातून राजकीय अर्थ ध्वनीत केले. माझ्यासाठी म्हणाल तर, केदारनाथची भेट म्हणजे ‘माझ्यातल्या ‘स्व’ला भेटणं होतं. आता यापेक्षा आणखी जास्त काही मी आज सांगणार नाही. एक मात्र सांगतो की, ‘मन की बात’ला दिलेल्या अल्पविरामामुळं माझ्या मनामध्ये थोडी रिक्ततेची भावना निर्माण झाली होती. केदारच्या दरी-डोंगरांमध्ये, त्या एकांत गुहेमध्ये कदाचित ही पोकळी भरून काढण्याची संधी मनाला नक्कीच मिळाली असावी, असं मला वाटतंय. आता राहिला, आपली जिज्ञासा शांत करण्याचा विषय, कधी ना कधी त्याच्यावरही चर्चा करता येईल, असा विचार मी केलाय. हां, मात्र  आता ही चर्चा मी कधी करेन, हे आत्ताच सांगता येणार नाही. परंतु नक्की करेन, कारण तुम्हा सर्वांचा माझ्यावर अधिकार आहे. ज्याप्रमाणे केदार भेटीविषयी जाणून घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे, तसंच एका सकारात्मक गोष्टीला बळ देण्याचा तुमचा प्रयत्न, तुमच्या बोलण्यावरून मला सातत्यानं  जाणवतो. ‘मन की बात’साठी जी पत्रं येतात, जे ‘इनपूट’ मिळतं, ती रूटीन, म्हणजे दैनंदिन सरकारी कामकाजापेक्षा अगदी वेगळी असतात. कधी कधी तुम्ही पाठवलेलं पत्रही माझ्यासाठी एक प्रकारे प्रेरणा देण्याचं कारण बनतं. काहीवेळेस तर माझ्या विचार प्रक्रियेला धार देण्याचं काम तुमचे काही शब्द करतात. देश आणि समाज यांच्यासमोर असलेली आव्हाने लोकांकडून मला समजतात. त्याचबरोबर या समस्यांवर नेमके उत्तर काय आहे, हेही लोक सांगत असतात. पत्रांमध्ये लोक आपल्या समस्या मांडतात, त्याचबरोबर त्याला काय उत्तर आहे, हेही लिहितात, असं मला दिसून आलंय. प्रश्नांच्या जोडीला त्याची उत्तरं, कोणत्या- ना- कोणत्या नवीन कल्पना, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रगट करतात. जर कोणी एखादा स्वच्छतेविषयी लिहीत असेल तर अस्वच्छतेविषयी तो आपली नाराजी शब्दातून व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी चोहोबाजूंनी जो प्रयत्न सुरू आहे, त्याचं कौतुकही करतो. कोणी एखादा पर्यावरणाच्या विषयावर चर्चा करतो आणि निसर्गाच्या ऱ्हासाविषयी होत असलेली  पीडा व्यक्त करतो. त्याच्याच जोडीला त्यानं पर्यावरण संरक्षणासाठी स्वतः कोणते प्रयोग केले, हेही पत्रात नमूद करतो. त्यानं इतरत्र केलेले काही प्रयोग जर पाहिले, अनुभवले असतील तर त्यांची माहिती देतो. आणि त्याच्या मनातल्या कल्पनाही तो मांडतो. याचाच अर्थ एकप्रकारे समस्यांचे समाजव्यापी निराकरण कशा पद्धतीने करणं शक्य आहे, याची झलक तुम्हा सर्वांच्या पत्रांतल्या गोष्टींमुळे वाचायला मिळते, हे मला जाणवत असतं. ‘मन की बात’ देश आणि समाज यांच्यासाठी एका आरशाप्रमाणे आहे. या आरशातलं प्रतिबिंब आपल्याला सांगतं की, देशवासियांमध्ये किती ताकद, बळकटी आहे. तसंच त्यांच्यामध्ये प्रतिभेची, उपजत कौशल्याची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही, हेही या प्रतिबिंबावरून स्पष्ट होतं.  आता फक्त गरज आहे ती, असलेल्या प्रचंड क्षमतेला आणि प्रतिभेला समाविष्ट करून नवीन संधी निर्माण करण्याची. त्यांच्याकडं जे काही आहे, ते कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. 130 कोटी देशवासीय मजबुतीनं आणि सक्रियतेनं देशाच्या प्रगती कार्यामध्ये सहभागी होवू इच्छितात, हे सुद्धा ‘मन की बात’ मधून दिसून येतं. आणखी एक गोष्ट मी जरूर सांगू इच्छितो की,   ‘मन की बात’ साठी मला इतकी पत्रं येतात, असंख्य फोन कॉल येतात, प्रचंड संख्येनं संदेश मिळत असतात. परंतु त्यामध्ये तक्रारीचा सूर खूपच कमी असतो. त्याचबरोबर कोणी काही मागणी केलीय, स्वतःसाठी काही द्यावं अशी विनंती केलीय, असं एखादंही पत्र गेल्या पाच वर्षात पाहिल्याचं मला आठवत नाही. तुम्ही कल्पना करू शकता, देशाच्या पंतप्रधानाला कोणी एखादा पत्र लिहितोय, मात्र तो स्वतःसाठी काहीही मागत नाही. यावरून आपल्या देशाच्या कोट्यवधी लोकांची  भावना किती उच्च कोटीची असेल, हे लक्षात येतं. मी ज्यावेळी या अशा सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करतो, त्यावेळी माझ्या मनाला किती आनंद होतो, मला किती प्रचंड ऊर्जा मिळते, तुम्ही लोक मला चालायला लावता, तुम्हीच मला धावायला मदत करता, अगदी क्षणा-क्षणाला ऊर्जावान बनवण्याचं काम तुम्हीच करता, याची कल्पनाही तुम्हाला नसेल. आणि आपलं हेच नातं, हेच  जोडले गेलेले ऋणानुबंध मी खूप ‘मिस’ करत होतो.  आज माझं मन अगदी आनंदानं भरून गेलंय. मागच्यावेळी मी शेवटी म्हणालो होतो की, आता आपण तीन-चार महिन्यांनी भेटूया, त्याचाही काही लोकांनी राजकीय अर्थ काढला होता. लोक म्हणाले, अरे मोदीजींना किती आत्मविश्वास आहे, त्यांना केवढा भरवसा आहे. हा आत्मविश्वास काही मोदींचा नव्हता. तर हा विश्वास, तुमच्या विश्वासाचा पाया होता. तुम्ही सर्वांनीच तर विश्वासाचं रूप घेतलं होतं. आणि म्हणूनच अतिशय सहजपणानं मी अखेरच्या ‘मन की बात’ मध्ये म्हणालो होतो की, आता काही महिन्यांनंतर तुमच्याशी बोलायला येईन. वास्तविक, मी आलेलो नाही. तर तुम्ही लोकांनी मला आणलं आहे. तुम्हीच तर मला इथं बसवलंय. आणि तुम्हीच तर मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली आहे. या भावनेनेच चला तर मग ‘मन की बात’ चा क्रम पहिल्यासारखाच पुढं सुरू ठेवूया.

ज्यावेळी देशामध्ये आणीबाणी लागू झाली, त्यावेळी त्याचा विरोध फक्त राजकीय परिघापर्यंत मर्यादित राहिला नव्हता. राजकीय नेत्यांपुरता सीमित नव्हता. कारागृहापर्यंत आंदोलन मर्यादित राहिलेलं नव्हतं. लोकांच्या मना-मनामध्ये, हृदयामध्ये आक्रोश होता. लोकशाही गमावल्यामुळं मनात एक प्रकारची तगमग जाणवत होती. ज्यावेळी वेळच्यावेळी भोजन मिळतं, त्यावेळी भूक म्हणजे काय हे समजत नसतं. अगदी त्याचप्रमाणे लोकशाहीतल्या अधिकारांचं महत्व ते कोणी हिसकावून घेतो, त्याचवेळी समजतं. आणीबाणीच्या काळात आपलं काहीतरी हिसकावून घेतलं गेलंय, असं देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत होतं. ज्या  गोष्टीचा आपण कधी वापर केला नाही अशी गोष्टसुद्धा जर  कोणी हिसकावून घेतली, तरीही त्याचं दुःख होतं, त्याच्या यातना होतात. भारताच्या घटनेमध्ये काही व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळं लोकशाही इथं रूजली आहे. समाज व्यवस्था चालवण्यासाठी घटनेचीही आवश्यकता असते. कायदे, नियम यांचीही गरज असते. अधिकार आणि कर्तव्य यांचीही चर्चा होत असते. परंतु भारत गर्वानं, अभिमानानं सांगू शकतो की, आमच्यासाठी कायदा, नियम यांच्यापेक्षाही मोठे आमच्यावर झालेले लोकशाहीचे संस्कार आहेत. लोकशाही आमची संस्कृती आहे. लोकशाही आमचा वारसा, आमची परंपरा आहे. आणि हा वारसा बरोबर घेवूनच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. आणि म्हणूनच लोकशाही नसेल तर तिचा अभाव देशवासियांना जाणवतो. आणीबाणीच्या काळात आम्ही हा अनुभव घेतला होता. म्हणूनच देशानं आपल्यासाठी नाही, आपल्या हितासाठी नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी एका संपूर्ण निवडणुकीची आहुती दिली होती. कदाचित, संपूर्ण जगामधल्या कोणत्याही देशामध्ये असं घडलं नसेल की, तिथल्या जनतेने, लोकशाहीसाठी, आपल्या इतर अधिकारांची, आवश्यकतांची पर्वा न करता केवळ लोकशाहीसाठी मतदान केलं. अशी एक निवडणूक या देशानं 1977 मध्ये पाहिली आहे. अलिकडेच लोकशाहीतलं महापर्व म्हणजे सर्वात मोठा निवडणूक कार्यक्रम आपल्या देशात पार पडला. श्रीमंतापासून गरीबापर्यंत सर्व लोक या निवडणूक पर्वामध्ये आनंदानं सहभागी झाले. ते आपल्या देशाच्या भविष्याचा निर्णय करण्यासाठी तत्पर होते.

जर एखादी गोष्ट आपल्याजवळ असेल तर आपल्याला त्या गोष्टीचं फारसं महत्त्व वाटत नाही. तीचं मूल्यांकनही आपण कमीच करतो, इतकंच नाही तर त्या गोष्टीमध्ये काही आश्चर्यकारक, नवलाचे गुण आहेत, याकडंही आपण फारसं लक्ष देत नाही. आपल्याला जी बहुमूल्य लोकशाही मिळाली आहे, तिला आपण अगदी सहजतेनं ‘गृहीत’ धरलं आहे. आपली लोकशाही अतिशय महान आहे, आणि या लोकशाहीला आमच्या रक्तामध्ये स्थान मिळालं आहे. याची आपण स्वतःलाच वारंवार आठवण करून दिली पाहिजे. अनेक पिढ्यांनी केलेल्या साधनेमुळे, पिढ्यांपिढ्यांचे संस्कार घेवून एका विशाल, व्यापक मनाची अवस्था म्हणजे लोकशाही आहे. भारतामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत 61 कोटींपेक्षा जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. ‘सिक्स्टी वन करोड’ ही संख्या आपल्याला खूपच सामान्य, किरकोळ वाटू शकते. परंतु जर जगाचा हिशेब मांडायचा झाला तर मी सांगतो,  एक चीन सोडला तर इतर कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी भारतामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या मतदारांनी मतदान केले, ती संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे, जवळपास दुप्पट आहे. संपूर्ण युरोपची जितकी लोकसंख्या आहे, त्यापेक्षाही जास्त भारतामध्ये एकूण मतदार आहेत. यावरून आपल्या लोकशाहीच्या विशालतेचा आणि व्यापकतेचा परिचय होतो. 2019च्या निवडणुका म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक होती. ही निवडणूक पार पाडण्यासाठी किती मोठ्या स्तरावर साधने आणि मनुष्य बळाची आवश्यकता असेल, याची आपण कल्पना करू शकता. लाखो शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिवस-रात्र परिश्रम केल्यामुळे निवडणुका पार पडू शकल्या. लोकशाहीचा हा महायज्ञ यशस्वी करण्यासाठी अर्धसैनिक दलाच्या जवळपास तीन लाख सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांच्या 20 लाख पोलिस कर्मचाऱ्यांनीही परिश्रमाची पराकाष्ठा केली. या लोकांच्या अथक मेहनतीचे फळ म्हणजे यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त मतदान झाले. मतदानासाठी संपूर्ण देशामध्ये जवळपास 10 लाख मतदान केंद्र उघडण्यात आली होती. जवळपास 40 लाखांपेक्षा जास्त ‘ईव्हीएम’ यंत्रे, 17 लाखांपेक्षा जास्त व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात आली. एकूण निवडणुकीचा किती प्रचंड व्याप  होता, याची आपण कल्पना करू शकता. एकही मतदार आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये, सर्व पात्र मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी हा सगळा आटापिटा केला होता. अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम क्षेत्रामध्ये, अगदी एका महिला मतदारासाठी मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना त्या दुर्गम स्थानी पोहोचण्यासाठी दोन-दोन दिवस प्रवास करावा लागला होता, हे जाणून आपल्याला नवल वाटेल. हाच तर या लोकशाहीचा खरा सन्मान आहे. जगातील सर्वात उंच स्थानी मतदान केंद्र उघडण्याचं कामही भारतातचं झालं आहे. हे मतदान केंद्र हिमाचल प्रदेशातल्या लाहौल-स्फिती इथं आहे. हे ठिकाण 15 हजार फूट उंचावर आहे. याशिवाय या निवडणुकीत अभिमानानं सांगावी अशी एक गोष्ट घडली. यंदा महिलांनीही पुरूषांप्रमाणेच उत्साहानं आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या महिला आणि पुरूषांचे प्रमाण जवळ-जवळ सारखंच होतं. आणखी एक उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये 78 (अठ्ठ्याहत्तर) महिला,  खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. निवडणूक आयोगाला आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि भारतातल्या जागरूक मतदारांना नमन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही सर्वांनी माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं असेल की, ‘बुके नाही तर बुक’ असा माझा आग्रह असतो;आपण सर्वजण स्वागत-सत्कार करताना फुलांच्या ऐवजी पुस्तकं देवू शकतो. हे ऐकून आता अनेक ठिकाणी लोक पुस्तकं भेट देवून स्वागत करायला लागले आहेत. मला अलिकडेच कुणीतरी ‘प्रेमचंद की लोकप्रिय कहानियाँ’ या शीर्षकाचं पुस्तक भेट दिलंय. मला ही भेट खूप आवडली. खरंतर, मला खूप काही वेळ मिळू शकला नाही, तरीही  प्रवासातल्या काळात मला त्यांच्या काही कथा पुन्हा एकदा वाचण्याची संधी मिळाली. प्रेमचंद यांनी आपल्या कथांमध्ये समाजाचं यथार्थ चित्रण केलं आहे. ते वाचताना त्या काळाचं चित्रच आपल्या डोळ्यासमोर निर्माण व्हायला लागतं. त्यांनी लिहिलेला प्रत्येक तपशील, प्रत्येक गोष्ट जीवंत होत जाते. अतिशय सहज, सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेल्या कथा मानवी संवेदनांची अभिव्यक्ती करणाऱ्या असल्यामुळं मनाला स्पर्श करतात. त्यांच्या कथांमध्ये समग्र भारताची मनोभावना समाविष्ट झालेली जाणवते. त्यांनी लिहिलेली ‘नशा’ नावाची कथा वाचत असताना माझं मन आपोआपच समाजात असलेल्या आर्थिक विषमतेच्या प्रश्नामागे धावलं. मला माझ्या तरूणपणातला कालखंड आठवला. समाजातल्या आर्थिक विषमतेवर आम्हा युवकांचा रात्र-रात्रभर वादविवाद होत असे. जमीनदाराचा मुलगा ईश्वरी आणि गरीब कुटुंबातला बीर यांच्या या कथेतून खूप काही शिकायला मिळतं की जर आपण सावध राहिलो नाही,  तर वाईट संगतीचा परिणाम कधी आणि कसा होतो, हे लक्षातही येत नाही. दुसऱ्या कथेनं तर माझ्या मनाला अगदी खोलवर स्पर्श केला. ही कथा होती ‘ईदगाह’. यामध्ये एका बालकाची संवेदनशीलता, त्याच्या मनामध्ये आपल्या आजीविषयी असलेली अपार माया, इतक्या लहान वयामध्ये विचारांमध्ये असलेली परिपक्वता यांचं दर्शन या कथेतून होतं. 4-5 वर्षांचा हामिद ज्यावेळी जत्रेतून चिमटा घेवून आपल्या आजीकडे येतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने मानवी संवेदना अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचते. या कथेमधलं शेवटचं वाक्य वाचकाला अतिशय भावुक बनवणारं आहे. कारण त्यामध्ये जीवनातलं एक खूप मोठं सत्य सांगितलं आहे. हे वाक्य असं आहे, ‘‘बच्चे हामिदने बूढे़ हामिद का पार्ट खेला था – बुढ़िया अमीना, बालिका अमीना बन गई थी।’’

अशीच एक खूप मार्मिक कथा आहे, ‘पूस की रात’! या कथेमध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या जीवनाच्या  चित्तरकथेच अतिशय सजीव चित्रण वाचायला मिळतं. आपलं पिकं नष्ट झाल्यानंतरही हल्दू शेतकरी यासाठी आनंदी होतो की, आता त्याला शेताची राखण करण्यासाठी म्हणून कडाक्याच्या थंडीत शेतामध्ये झोपावं लागणार नाही. वास्तविक या सगळ्या कथा जवळपास शतकापूर्वीच्या काळातल्या आहेत. परंतु त्या आजच्या काळामध्येही लागू पडतात. या कथा वाचल्यानंतर मला एका वेगळ्याच प्रकारची अनुभूती आली.

आता वाचनाची चर्चा सुरू आहे, म्हणून सांगतो. मी कुठंतरी केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाविषयी वाचलं होतं. हे ग्रंथालय इडुक्कीच्या अगदी घनदाट जंगलामध्ये वसलेल्या एका गावामध्ये आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथले प्राथमिक शिक्षक पी.के. मुरलीधरन आणि एक छोटसं चहाचं दुकान चालवणारे  पी. व्ही. चिन्नाथम्पी या दोघांनी मिळून अथक परिश्रमानं हे ग्रंथालय सुरू केलं. एकेकाळी हे दोघेजण पुस्तकांचं गाठोडं बनवायचे आणि आपल्या पाठीवरून ओझं वहात जंगलातल्या आपल्या गावात पुस्तकं न्यायचे. आज हेच ग्रंथालय, इथल्या आदिवासी मुलांबरोबरच प्रत्येकाला एक नवीन दिशा दाखवण्याचं काम करत आहे.

गुजरातमध्ये ‘वांचे गुजरात’ ही मोहीम चांगली यशस्वी ठरली. या मोहिमेमध्ये सर्व वयोगटातले  लाखो जण सहभागी झाले आणि त्यांनी पुस्तकं वाचली. आजच्या डिजिटल युगामध्ये, गुगल गुरूच्या काळामध्ये माझा तुम्हाला आग्रह आहे की, आपल्या दैनंदिन कामामध्ये पुस्तकं वाचण्यासाठी थोडा वेळ जरूर राखून ठेवा. तुम्ही पुस्तक वाचनातून नक्कीच खूप आनंद मिळवाल. तुम्ही जे कोणतं पुस्तक वाचाल, त्याविषयी ‘नरेंद्रमोदी अॅप’वर जरूर अभिप्राय लिहून पाठवा. म्हणजे ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांनाही त्या पुस्तकाविषयी माहिती मिळू शकेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशातले लोक केवळ वर्तमान काळाचा विचार करत नाहीत, तर त्यांना भविष्यातल्या आव्हानांचाही विचार करावासा वाटतो, ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाची आहे. नरेंद्रमोदी अॅप आणि ‘मायगव्ह’ यांच्यावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया मी वाचत होतो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं, पाणी समस्येविषयी अनेक लोकांनी खूप काही लिहिलं आहे. बेलगावीच्या पवन गौराई, भुवनेश्वरचे सीतांशू मोहन परीदा यांच्याशिवाय यश शर्मा, शाहाब अल्ताफ आणि आणखी अनेक लोकांनी पाण्याशी संबंधित असलेल्या आव्हानांविषयी लिहिलं आहे. पाण्याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे. ऋग्वेदामधल्या ‘आपः सुक्तम्’मध्ये पाण्याविषयी नमूद केलं आहे की:-

आपो हिष्ठा मयो भुवः स्था न ऊर्जे दधातन, महे रणाय चक्षसे,

यो वः शिवतमो रसः, तस्य भाजयतेह नः उषतीरिव मातरः ।

याच अर्थ असा आहे की, जल म्हणजे  जीवन दायिनी शक्ती, ऊर्जेचे स्त्रोत आहे.  पाणी मातेसमान असून, मातृवत आशीर्वाद मिळावेत. जलरूपी मातेची कृपा आपल्यावर कायम रहावी. पाण्याच्या कमतरतेमुळे देशाच्या अनेक भागामध्ये दरवर्षी दुष्काळ पडतो. वर्षभर जेवढा पाऊस आपल्याकडे पडतो, त्यापैकी केवळ आठ टक्के पावसाचे पाणी आपण वाचवतो, हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. फक्त आणि फक्त आठ टक्के पाण्याची बचत आपण करतो, म्हणूनच आता या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. आपण सर्वांनी इतर अनेक समस्यांवर ज्याप्रमाणे जनभागीदारीतून, जनशक्तीतून उत्तर शोधून काढले, त्याचप्रमाणे पाणी समस्येवर एकशे तीस कोटी देशवासिय सर्व सामर्थ्‍यानिशी, सर्वांच्या सहकार्याने आणि दृढ संकल्पाने उत्तर शोधून काढतील. पाण्याचं महत्व सर्वात जास्त आहे, हे लक्षात घेवून देशामध्ये आता नवीन जलशक्ती मंत्रालय बनवण्यात आलं आहे. यामुळे पाण्याशी संबंधित असलेल्या सर्व विषयांवर वेगानं निर्णय घेणं शक्य होईल. काही दिवसांपूर्वी मी थोडं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला. देशभरातल्या सरपंचांना, ग्राम प्रधानांना मी पत्र लिहिलं. पाणी वाचवण्यासाठी, पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी, पावसाचा थेंब न थेंब वाया जावू नये, पावसाच्या पाण्याची बचत करण्यासाठी गाव प्रमुखांनी ग्रामसभा, बैठका बोलावाव्यात. गावकऱ्यांबरोबर बसून चर्चा-विनिमय करावे, असं या पत्रात मी त्यांना लिहिलं आहे. या कामामध्ये सरपंच, गाव प्रमुखांनी अतिशय उत्साह दाखवला, याचा मला खूप आनंद आहे. या महिन्याच्या 22 तारखेला देशातल्या हजारो पंचायतीमंध्ये करोडो लोकांनी श्रमदान केलं. गावां-गावांमध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा आणि पावसाच्या पाण्याची बचत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  आजच्या या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये मी आपल्याला एका सरपंचाची गोष्ट ऐकवू इच्छितो. झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यातल्या कटकमसांडी ब्लॉकच्या लुपुंग पंचायतीच्या सरपंचांनी आपल्या सर्वांना काय संदेश दिला आहे, ते ऐका —

‘‘माझं नाव दिलीपकुमार रविदास आहे. पाणी बचतीविषयी ज्यावेळी पंतप्रधानांनी  पाठवलेले पत्र माझ्या हाती आलं, ते पाहून, आधी माझा विश्वासच बसला नाही. पंतप्रधानांनी आपल्याला पत्र लिहिलंय हे खरंच वाटत नव्हतं. आम्ही 22 तारखेला गावातल्या सर्व लोकांना एकत्रित करून पंतप्रधानांच्या पत्राचं जाहीर वाचन केलं, त्यावेळी गावातले सर्व लोक उत्साहित झाले. सर्वांनी मिळून पाणी बचतीसाठी तलावाची स्वच्छता केली आणि नवीन तलाव बनवण्यासाठी श्रमदान करण्यासाठी,  प्रत्येक गावकरी या कामामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाले. पावसाळा सुरू होण्याआधी हा उपाय केला तर आगामी काळात आम्हाला पाणी कमी पडणार नाही. आमच्या पंतप्रधानांनी  आम्हाला अतिशय योग्य वेळी पाणी बचतीची जाणीव करून दिली हे खूप चांगलं झालं.’’

बिरसा मुंडा यांची ही भूमी आहे. निसर्गाबरोबर समतोल साधून राहणं हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. तिथले लोक, पुन्हा एकदा जल संरक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावण्यासाठी सिद्ध झाले आहेत. पाणी वाचवण्यासाठी सर्व ग्राम प्रधानांनी, सर्व सरपंचांनी,  जी सक्रियता दाखवली, त्याबद्दल माझ्यावतीने या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा.  देशभरातल्या अनेक संरपंचांनी जल संरक्षणाचा असाच संकल्प केला आहे. एक प्रकारे ही संपूर्ण गावालाच कार्य करण्याची  संधी मिळाली आहे. त्यामुळं गावातले लोक आता आपआपल्या गावामध्ये जणू जलमंदिर बनवण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. सामूहिक प्रयत्न केले तर खूप चांगले सकारात्मक परिणाम मिळतात, हे मी याआधीच सांगितलं आहे. तेच चित्र आता दिसत आहे. संपूर्ण देशामध्ये जलसंकटावर मात करण्यासाठी एकच विशिष्ट ‘फॉम्र्युला’ असू शकत नाही. त्यासाठी देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. परंतु सर्वांच लक्ष्य एकच आहे. आणि ते म्हणजे पाणी बचत, जल संरक्षण!!

पंजाबमध्ये ड्रेनेज लाईन्स सुधारण्याचं काम केलं जात आहे. या कामांमुळे पाणी तुंबण्याची समस्या सुटणार आहे. तेलंगणामधल्या थिमाईपल्ली इथं पाण्याच्या टाक्या तयार करण्यात येत असल्यामुळे गावातल्या लोकांचे आयुष्य बदलत आहे. राजस्थानमध्ये कबीरधाम इथं शेतांमध्ये बनवण्यात आलेल्या लहान लहान तलावांमुळे मोठे परिवर्तन घडून आले आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोर इथं करण्यात आलेल्या सामूहिक प्रयत्नांविषयी मी वाचलं होतं की, तिथं नाग नदी पुनर्जीवित करण्यासाठी 20 हजार महिला एकत्रित आल्या. गढवालमधल्या महिला आपआपसात मिळून एकत्रितपणे ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करीत आहेत, असंही माझ्या वाचनात आलं. अशा प्रकारे अनेक प्रयत्न केले जात आहेत. माझा विश्वास आहे की, ज्यावेळी आपण सगळे एकजूट होवून, मजबूतपणे प्रयत्न करतो, त्यावेळी अशक्य ते शक्य होते. ज्यावेळी प्रत्येकजण या जल संरक्षणाच्या कार्यात सहभागी होईल, त्याचवेळी पाणी वाचणार आहे. आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी देशवासियांकडे तीन गोष्टींचा आग्रह धरणार आहे.

माझा पहिला आग्रह असणार आहे – तो म्हणजे ज्याप्रमाणे देशवासियांनी स्वच्छता मोहिमेला आंदोलनाचं रूप दिलं, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठीही एका जनआंदोलनाला प्रारंभ करावा. आपण सगळे मिळून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करूया. आणि माझा तर विश्वास आहे की, पाणी परमेश्वरानं दिलेला प्रसाद आहे. पाणी परीसाचं  रूप आहे. पूर्वी म्हणायचे की,  परीसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं बनतं. मी म्हणतो की, पाणी परीस आहे, आणि परीसाच्या म्हणजेच पाण्याच्या स्पर्शानं नवजीवनाची निर्मिती होते. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी एका जागरूकता अभियानाची सुरूवात केली जावी. यामध्ये पाण्याशी संबंधित समस्यांविषयी बोललं जावं, त्याच बरोबर पाणी बचतीच्या पद्धतींचा प्रचार-प्रसार केला जावा. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवी, मान्यवर, व्यक्तींनी पाणी बचतीच्या मोहिमेचे नेतृत्व करावं. प्रसिद्ध, लोकप्रिय व्यक्तींच्या मार्फत जल संरक्षणाविषयी नवीन प्रभावी जाहिरात केली जावी, असा आग्रह मी करतो. चित्रपट क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रसार माध्यमातले आमचे सहकारी असो, कथा-कीर्तनकार असो, प्रत्येकानं आपआपल्या पद्धतीनं या आंदोलनाचं नेतृत्व करावं. समाजाला जागरूक करून, समाजाला जोडण्याचं काम करावं. असा सर्व समाजाचा सहभाग या आंदोलनामध्ये असेल तर तुमच्या डोळ्यादेखत  परिवर्तन होईल.

देशवासियांना माझा दुसरा आग्रह पाण्याविषयीचाच आहे. आपल्या देशामध्ये पाणी संरक्षणासाठी अनेक पारंपरिक पद्धतींचा वापर अनेक शतकांपासून केला जातो. आपण सर्वांनी जलसंरक्षणाच्या त्या पारंपरिक पद्धतींची माहिती शेअर करावी, असा आग्रह मी करतो. आपल्यापैकी कोणाला जर पूज्य बापूजींच्या  जन्मस्थानी- पोरबंदर इथं जाण्याची संधी मिळाली असेल तर त्यांनी हे स्थान पाहिलं असेल. पूज्य बापूजींच्या घराच्या मागच्या बाजूलाच आणखी एक दुसरे घर आहे. तिथं 200 वर्षांपूर्वीची एक पाण्याची साठवण टाकी आहे. विशेष म्हणजे या टाकीमध्ये आजही पाणी आहे. पडणाऱ्या पावसाचे पाणी या टाकीत रोखण्याची व्यवस्था आहे. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो, जर कोणी कीर्ती मंदिरमध्ये जाणार असेल तर, त्यानं ही पाण्याची साठवण टाकी जरूर पहावी. अशा प्रकारे विविध प्रयोगांनी अनेक ठिकाणी पूर्वापार पाणी साठवण्याच्या जागा असतील. तसेच विविध पद्धतीनं पाणी साठवलं जात असेल. ती माहिती शेअर करावी.

तुम्हा सर्वांना माझा तिसरा आग्रह आहे की, जल संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आपण शेअर करावी. अशी माहिती संकलित झाली तर पाण्यासाठी समर्पित, पाण्यासाठी   सक्रिय असलेल्या संघटना, व्यक्ती, यांची सर्व माहिती संकलित होईल. पाण्यासाठी काम करणाऱ्यांचा एक ‘डाटाबेस’ तयार होईल. चला, तर मग; आपण जल संरक्षणाशी संबंधित जास्तीत जास्त पद्धतींची एक सूची बनवून लोकांना जलसंरक्षणासाठी प्रोत्साहन देवू या. आपण सर्वजण‘‘#जनशक्तीफॉरजलशक्ती’ (#JanshaktiForJalshakti) याचा उपयोग करून आपली माहिती यामध्ये ‘शेअर’ करू शकता.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आणखी एका गोष्टीसाठी मला आपले आभार व्यक्त करायचे आहेत. त्याचबरोबर दुनियेतल्या लोकांचेही आभार व्यक्त करायचे आहेत. दिनांक 21 जून रोजी पुन्हा एकदा योग दिवस सक्रियतेनं, उत्साहानं, साजरा करण्यात आला, त्यासाठी हे आभार आहेत. काही ठिकाणी तर एकाच परिवारामधल्या तीन-तीन, चार-चार पिढ्यांनी एकत्रित योग दिवस साजरा केला. ‘होलिस्टिक हेल्थ केअर’ विषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस  योगदिवसाचे महात्म्य वाढतच चालले आहे. जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात योग दिवस साजरा केला गेला. त्यादिवशी उगवत्या सूर्याचं स्वागत योगप्रेमींनी केलं. अगदी दिवसभर आणि सूर्य मावळेपर्यंत या दिवशी योगविषयक अनेक कार्यक्रम झाले. योगासनाशी जोडला गेला नाही, अशी व्यक्ती सापडणं आता अवघड आहे. माणूस आणि योग एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळंच कदाचित ‘योग’ने इतकं मोठं, व्यापक रूप धारण केलंय. भारतामध्ये हिमालयापासून ते हिंद महासागरापर्यंत, सियाचिनपासून ते पाणीबुडीपर्यंत, हवाई दलापासून ते एअर क्राफ्टकॅरियरपर्यंत, एसी जिमपासून ते राजस्थानातल्या  तापलेल्या वाळवंटापर्यंत, गांवांपासून ते शहरांपर्यंत, जिथं, जिथं शक्य होते, तिथं तिथं, प्रत्येक ठिकाणी फक्त योग केला, असं नाही. तर योग दिवस सामूहिक स्वरूपात जोरदार साजरा केला गेला.

जगभरातल्या अनेक देशांच्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी, मान्यवर व्यक्तींनी, सामान्य नागरिकांनी आपआपल्या देशात कशा प्रकारे योग दिवस साजरा केला, त्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मला दिली. त्या दिवशी हे संपूर्ण जग एखाद्या आनंदी, सुखी परिवारासारखं वाटत होतं.

स्वस्थ समाज निर्माणासाठी स्वस्थ आणि संवेदनशील व्यक्तींची आवश्यकता असते, हे आपण सर्वजण जाणून आहोत. आणि योग स्वस्थ समाज खात्रीनं निर्माण करू शकतो. म्हणूनच योगाचा प्रचार- प्रसार म्हणजे समाज सेवेचे एक महान कार्य आहे. मग अशी सेवा करणाऱ्यांना मान्यता देवून त्यांचा सत्कार करायला नको का? वर्ष 2019 मध्ये योगाला प्रोत्साहन देवून आणि विकासाच्या कामात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान पुरस्काराची घोषणा यंदा करण्यात आली. ही घोषणा करणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. हा पुरस्कार दुनियेतल्या अशा संघटनांना दिला जात आहे की, तुम्हाला त्या संघटनेविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती असण्याची शक्यता खूप कमी आहे. या संघटनेने योगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. उदाहरणार्थ, ‘जपान योग निकेतन’. या संस्थेनं योग पूर्ण जपानमध्ये लोकप्रिय बनवला आहे. ‘जपान योग निकेतन’ तिथं अनेक इन्स्टिट्यूट चालवते आणि ट्रेनिंग कोर्सेस घेते. तसंच इटलीच्या श्रीमती अँटोनिट्टा रोझी यांचं नाव घ्या. यांनी ‘सर्व योग इंटरनॅशनल’ ची सुरवात केली आणि पूर्ण यूरोपमध्ये त्यांनीच योगाचा प्रचार आणि प्रसार केला. ही गोष्ट प्रेरक आहे. आता योग हाच विषय सुरू आहे, तर या या क्षेत्रात भारतीय काही पिछाडीवर नाहीत. बिहार योग विद्यालय, मुंगेर यांनाही सन्मानित करण्यात आले. या संस्था गेल्या काही दशकांपासून योगप्रचारासाठी  समर्पित आहेत. याच प्रकारे स्वामी राजर्षि मुनी यांचाही सत्कार करण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी आपलं आयुष्य योग प्रसारासाठी वाहून घेतलंय. त्यांनी लाईफ मिशन आणि लकुलिश योग युनिव्हर्सिटीची स्थापना केली. योगचे व्यापक ‘सेलिब्रेशन’ आणि योगचा संदेश घराघरामध्ये पोहोचवणाऱ्या सर्वांचा सन्मान केला जात आहे. योगचा संदेश घराघरामध्ये पोचवणाऱ्यांचाही  सन्मान केला पाहिजे. या सन्मानांमुळेच यंदाचा योगदिवस चांगला संस्मरणीय ठरला.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या या यात्रेला आज आरंभ होत आहे. नवीन भाव, नवीन अनुभूती, नवा संकल्प, नवे सामर्थ्‍य, परंतु मी आपल्या सल्ल्यांची प्रतीक्षा करत राहणार. आपल्या विचारांशी जोडलं जाणं माझ्यासाठी एक मोठी आणि महत्वपूर्ण बाब आहे. ‘मन की बात’ तर एक निमित्तमात्र आहे. चला तर मग, आपण भेटत राहू, बोलतं राहू. मी तुमच्या भावना ऐकतो, मनात जपून ठेवतो. कधी-कधी तर त्या भावना जगण्याचा प्रयत्न करतो. आपले आशीर्वाद असेच मिळत रहावेत. तुम्ही माझी प्रेरणा आहात, तुम्हीच माझी ऊर्जा आहात. या, आपण सगळे मिळून एकत्रित बसू या, ‘मन की बात’चा आनंद घेवूया. त्याचबरोबर आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडूया. पुन्हा एकदा पुढच्या महिन्याच्या ‘ मन की बात’ च्या वेळी भेटूया. आपणा सर्वांना माझे खूप-खूप धन्यवाद!

नमस्कार!!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.