QuoteAccording to a recent survey, on an average, 70% of listen to #MannKiBaat regularly and say the programme have enhanced sentiment of positivity in the society: PM Modi
QuoteWhen I had begun #MannKiBaat, I had decided that there should be no politics in it; neither should it be about praising the government's steps nor about Modi: PM
Quote#MannKiBaat is not about government but about our society and an aspirational India: PM Modi
QuoteFor the bright future of India, the talent of the masses should be encouraged; it is a collective responsibility of us all and #MannKiBaat is a humble and small effort in this direction: PM Modi
QuoteWhenever I read a letter or suggestion for #MannKiBaat, I can easily gauge the sentiments and expectations of people: PM Modi
QuoteInitiatives like cleanliness, drugs free India, selfie with daughter have been very covered in an innovative manner and furthered by the media: PM Modi during #MannKiBaat
Quote‘Accept’ rather than ‘except’, ‘discuss’ rather than ‘dismiss’, then only communication will be effective: PM Modi during #MannKiBaat
QuoteMy endeavour is to constantly communicate with the youth through different programmes or social media. I always try to learn from them: PM Modi during #MannKiBaat
QuoteIf we give our youth an opportunity, give them an open atmosphere to express themselves then they can bring a positive change in the country: PM during #MannKiBaat
QuoteThe special thing about our Constitution is detailed explanation of our Rights and Duties. The combination of these two will take the country ahead: PM during #MannKiBaat
QuoteTo complete the historic task of drafting the Constitution, the Constituent Assembly took just 2 years, 11 months and 17 days: PM Modi during #MannKiBaat
QuoteLet us all move ahead with the values enshrined in our Constitution and ensure Peace, Progression and Prosperity in our country: PM Modi during #MannKiBaat
QuoteNo one can forget Dr. Baba Saheb Ambedkar’s invaluable contribution towards our Constitution: PM Modi during #MannKiBaat
QuoteDemocracy was an intangible part of Baba Saheb’s life: PM Modi during #MannKiBaat
QuoteIndia First was always the core principle of Dr. Ambedkar: PM Modi during #MannKiBaat
QuoteGuru Nanak Dev Ji always showed the path of truth, duty, service, compassion and harmony towards society: PM Modi during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! दिनांक 3 ऑक्टोबर, 2014 रोजी, विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर ‘मन की बात’ या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे एका प्रवासाला प्रारंभ केला होता. या ‘मन की बात’च्या प्रवासाचे आज 50 भाग पूर्ण होत आहेत. याचाच अर्थ आजचा हा भाग म्हणजे ‘सुवर्ण महोत्सवी भाग’ आहे म्हणजेच सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा भाग आहे. विशेष म्हणजे यावेळी आपल्याकडून जी काही पत्रं आली आहेत, दूरध्वनीव्दारे संदेश आले आहेत, ते बहुतांश 50 व्या भागासंदर्भातच आहेत. ‘माय गव्ह’वर देखील दिल्लीचे अंशु कुमार, अमर कुमार आणि पाटण्याचे विकास यादव यांनी, त्याचबरोबर ‘नरेंद्रमोदीअॅप’वर दिल्लीच्या मोनिका जैन, पश्चिम बंगालमधल्या बर्दवान इथले रहिवासी प्रसेनजीत सरकार, नागपूरच्या संगीता शास्त्री या सर्व लोकांनी जवळपास एकाच प्रकारचा प्रश्न विचारला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, साधारणपणे सगळे लोक अत्याधुनिक तंत्रज्ञान, समाज  माध्यमं आणि मोबाईल अॅपस् यांच्या माध्यमातून एकमेकांशी  जोडले जातात. परंतु आपण लोकांशी संपर्क साधण्यासाठी ‘रेडिओ’ हे माध्यम का निवडले? आपल्या सर्वांना याविषयी वाटणारी उत्सुकता अगदी स्वाभाविक आहे. आजच्या काळामध्ये, रेडिओ या माध्यमाचा  जवळपास सगळ्यानांच जणू विसर पडला आहे. अशावेळी मोदी रेडिओ घेवून का बरं आले? मी आपल्याला एक घटना सांगू इच्छितो. ही 1998 ची गोष्ट आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये संघटना कार्यकर्ता म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये काम करत होतो. मे महिना होता आणि संध्याकाळच्या वेळी मी प्रवास करून एके ठिकाणी जात होतो. हिमाचल प्रदेशसारख्या पर्वतीय भागामध्ये संध्याकाळच्या वेळीही हवेमध्ये गारठा जाणवू लागतो. त्यामुळं रस्त्यामध्ये एका ढाब्यावर चहा घेण्यासाठी म्हणून मी थांबलो होतो. चहाची ऑर्डरही दिली. हा ढाबा खूप लहान होता. एकच माणूस म्हणजे तो ढाबाचालक होता. तो स्वतःच चहा बनवत होता आणि विकत होता. ढाब्यावर आडोशासाठी कापड असं काहीही नव्हतं. रस्त्याच्या कडेला त्यानं अगदी छोट्या टपरीसारखा ठेला तयार केला होता. त्यानं आपल्याजवळच्या एका काचेच्या भांड्यात लाडू ठेवले होते. त्यानं एक लाडू काढला आणि मला म्हणाला, ‘‘ साहेब, चहा घेतल्यानंतर, हा लाडू खा आणि तोंड गोड करा.’’मला खूप नवल वाटलं , आश्चर्यानं मी त्याला विचारलं, ‘‘ घरात काही विशेष आनंदाचा प्रसंग आहे का, कुणाचं लग्न वगैर आहे का?‘‘ त्यावर तो चहावाला उत्तरला, ‘‘ नाही, असं काही नाही साहेब, तुम्हाला काही माहिती नाही का?’’ अगदी खूप चांगली गोष्ट घडली आणि ती आपण कुणाला तरी सांगतोय, याचा आनंद त्याच्या चेहऱ्‍यावरून जणू ओसंडून वाहत होता. त्याचा उत्साह पाहून मी नेमकं काय झालंय असं त्याला विचारलं. त्यावर त्यानं उत्तर दिलं, ‘‘ अरे भाई, आज भारतानं बॉम्ब फोडलाय.’’ त्याचं बोलणं मला काही समजलं नाही. म्हणून मी म्हणालो,‘‘ भारतानं बॉम्ब फोडलाय म्हणजे, मला काही समजलं नाही.’’ यावर तो  म्हणाला, ‘‘ हे ऐका साहेब, रेडिओ तरी ऐका’’. त्यावेळी रेडिओवर त्याविषयीच चर्चा सुरू होती. त्यादिवशीच आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या देशाने अणूचाचणी यशस्वी केल्याची घोषणा प्रसार माध्यमासमोर केली होती. पंतप्रधानांची ती घोषणा, या चहावाल्यानं  रेडिओवरून ऐकली होती. त्याचा त्याला इतका आनंद झाला होता. आता मला या सगळ्या गोष्टीचं खूपच नवल वाटत होतं. या इतक्या निर्जन क्षेत्रामध्ये, जंगलामध्ये, अशा या बर्फाळ-डोंगराळ भागामध्ये एक सामान्य माणूस चहाचा ठेला चालवण्याचं काम करतोय आणि ते करताना तो दिवसभर नक्कीच रेडिओ ऐकत असणार. त्या रेडिओवरून प्रसारित होत असलेल्या बातम्यांचा त्याच्या मनावर किती मोठा प्रभाव पडत असणार. या घटनेमुळे माझ्या मनामध्ये एका  गोष्टीने अगदी कायमचं घर केलं. ती गोष्ट म्हणजे, रेडिओ अगदी जनांच्या मनामध्ये रूजला आहे आणि या माध्यमाची-रेडिओची खूप मोठी ताकद आहे. संपर्क माध्यमाचा पोहोचण्याचा आवाका, त्याची व्याप्ती याचा विचार केला, तर कदाचित रेडिओची बरोबरी कोणी करू शकत नाही, असं त्यावेळी माझ्या मनावर ठसलं गेलं आणि त्यावेळी रेडिओच्या अमर्याद क्षमतेचा अंदाज लावत मी विचार करत होतो. मग ज्यावेळी पंतप्रधान बनलो, त्यावेळी सर्वात जास्त ताकदीचे, क्षमतेचे माध्यम म्हणून रेडिओकडे माझं लक्ष जाणं अगदीच स्वाभाविक होतं. ज्यावेळी मी मे 2014 मध्ये देशाचा ‘प्रधान-सेवक’ म्हणून कार्यभार स्वीकारला, त्यावेळी माझ्या मनामध्ये इच्छा होती की, देशाची एकता, आपला महान इतिहास, देशाच्या शौर्याची गाथा, भारताची विविधता, आपली सांस्कृतिक विविधता, आपल्या समाजाच्या नसां-नसांमध्ये भरलेला चांगुलपणा, लोकांचा पुरुषार्थ, समर्पण, त्याग, तपस्या अशा सर्व गोष्टी, भारताच्या या कथा जना-जनांमध्ये पोहोचल्या पाहिजेत. देशाच्या अगदी दुर्गम भागामध्ये, अगदी टोकाच्या गावापासून ते मेट्रो शहरांपर्यंत, शेतकरी बांधवांपासून ते युवा व्यावसायिकांपर्यंत, अगदी सगळ्यांपर्यंत हे  पोहोचले पाहिजे. आणि यातूनच या ‘मन की बात’च्या प्रवासाला प्रारंभ झाला. दरमहिन्याला लाखोंच्या संख्येनं येत असलेल्या पत्रांचं वाचन करणं, आलेले फोन कॉल्स ऐकणं, अॅप आणि ‘मायगव्ह’वर येणाऱ्‍या टिप्पणी पाहणं आणि या सगळ्यांना एका सूत्रामध्ये गुंफून, छोट्या-मोठ्या गोष्टीं करता करता 50 भागांचा हा प्रवास, आपण सर्वांनी मिळून केला आहे. अलिकडेच आकाशवाणीने ‘मन की बात’विषयी एक सर्वेक्षणही केलं आहे. त्या सर्वेक्षणामधून मिळालेले अभिप्राय मी पाहिले, काही अभिप्राय अगदी वेगळे, लक्षवेधक आहेत. ज्या लोकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे, त्यापैकी सरासरी 70 टक्के  नियमितपणे ‘मन की बात’ ऐकणारे लोक आहेत. बहुतांश लोकांना समाजामध्ये सकारात्मक भावना वाढीस लावण्यामध्ये ‘मन की बात’चं मोठं योगदान आहे, असं वाटतं. ‘मन की बात’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जन आंदोलनं उभी राहण्यासाठी खूप चांगलं प्रोत्साहन मिळालं आहे. ‘‘#indiapositive’’ याविषयी खूप व्यापक चर्चाही झाली आहे. ही आपल्या देशवासियांच्या मनामध्ये वास्तव्य करत असलेल्या सकारात्मक भावनेची झलक आहे. ‘मन की बात’मुळे ‘व्हॉलंटेरिझम’ म्हणजेच स्वेच्छेनं, पुढं होवून काही करण्याची भावना वाढीस लागली आहे, असे आपले अनुभवही अनेक लोकांनी कळवले आहेत. समाजसेवेसाठी लोक आता मोठ्या उत्साहानं, स्वतःहून पुढं येत आहेत, असे परिवर्तन घडून आलं आहे. ‘मन की बात’मुळे रेडिओची आता आणखी लोकप्रियता वाढत आहे, हे पाहून मला खूप आनंद होतोय. परंतु या प्रवासामध्ये केवळ रेडिओ हे एकच माध्यम आता राहिलेलं नाही. लोक टी.व्ही., मोबाईल, इंटरनेट, फेसबुक लाइव्ह आणि पेरिस्कोपच्या बरोबरच ‘नरेंद्रमोदीअॅप’च्या माध्यमातूनही ‘मन की बात’ मध्ये सहभागी होत आहेत.

‘मन की बात’चा एक परिवार तयार झाला आहे. आणि या परिवाराचे आपण सर्वजण सदस्य आहात. या परिवाराचे भाग बनल्याबद्दल आणि सर्व सदस्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांना अगदी अंतःकरणापासून धन्यवाद देतो.

(फोन कॉल- 1)

‘‘आदरणीय पंतप्रधान जी, नमस्कार! माझं नाव शालिनी आहे आणि मी हैदराबाद इथून बोलतेय. ‘‘मन की बात’’ जनतेमध्ये खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं होतं की, हा कार्यक्रम म्हणजे एक राजकीय व्यासपीठ बनणार आणि हा कार्यक्रम एक टीकेचा विषयही बनला होता. परंतु जसं जसं  हा कार्यक्रम पुढे पुढे आम्ही ऐकत गेलो, त्यावेळी लक्षात आले की, यामध्ये राजकारण नाही, तर या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू सामाजिक समस्या आणि समाजापुढे असलेली आव्हाने असा आहे. त्यामुळेच माझ्यासारखे कोट्यवधी सामान्य लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले. हळू-हळू टीकेचा सूरही मावळत गेला. तर माझा प्रश्न असा आहे की, आपण या कार्यक्रमाला राजकारणापासून दूर ठेवण्यात यश कसं मिळवलं? या कार्यक्रमाचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यावा, किंवा या व्यासपीठाचा वापर करून आपल्या सरकारनं केलेल्या कामाची गणती  लोकांसमोर करावी,असे आपल्या मनात कधी आलं नाही का? धन्यवाद!’’

(फोन कॉल समाप्त)

आपण फोन केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद! आपण जी शंका उपस्थित केली आहे, ती अगदी बरोबर आहे. खरंतर एखाद्या नेत्याला जर बोलायला ‘माईक’ दिला गेला आणि त्याला ऐकण्यासाठी लाखो-कोट्यवधी श्रोते असतील तर मग आणखी काय हवंय? काही तरूण मित्रांनी ‘मन की बात’ मध्ये आलेल्या सर्व विषयांवर एक अभ्यास केला आहे. त्यांनी सर्व भागांचे विश्लेषण केलं आहे. त्यामध्ये त्यांनी कोणते शब्द कितीवेळा वापरले गेले, याचा अभ्यास केला. कोणते शब्द वारंवार वापरले गेले, याचा अभ्यास केला. हा अभ्यास करणाऱ्‍यांनी निष्कर्ष काढला आहे की, हा कार्यक्रम राजकारणाशी संबंधित नाही, ज्यावेळी मी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला, त्याचवेळी मी निश्चित केलं होतं की, यामध्ये राजकारण नको, यामध्ये सरकारची पाठथोपटणं नको, तसंच यामध्ये कुठं मोदी नकोत. माझ्या या संकल्पाला सिद्धीस नेण्याचं मोठ्ठ काम तुम्ही केलंत,तुमच्याकडूनच तर मला ही सर्व प्रेरणा मिळाली. ‘मन की बात’च्या प्रत्येक भागाच्या आधी आलेल्या पत्रांमध्ये, ऑनलाईन टिप्पणींमध्ये, आलेल्या दूरध्वनींवरून श्रोत्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, हे स्पष्ट होते. मोदी तर काय येतील आणि जातील. परंतु हा देश अढळ राहणार आहे, आपली संस्कृती अमर राहणार आहे. 130 कोटी देशवासियांच्या या छोट्या-छोट्या गोष्टी निरंतर जीवित राहणार आहेत. या देशाला नवीन प्रेरणा देत, नव्या उत्साहानं एका नव्या उंचीवर घेवून जातील. ज्या ज्यावेळी मी मागं वळून पाहतो, त्यावेळी मला खूप मोठं आश्चर्य वाटत असतं. देशातल्या दूरवरच्या, एका कोपऱ्‍यातल्या ठिकाणाहून कोणी तरी पत्र लिहून मला सांगत असतो, की आमच्यासारख्या छोट्या दुकानदारांशी, ऑटो रिक्षा चालवणाऱ्‍यांशी, भाजीपाला विकणाऱ्‍यांशी लोकांनी खूप जास्त मोल-भाव करू नये. मी अशी पत्रे वाचतो. अशाच काहीशा भावना दुसऱ्‍या एखाद्या पत्रामधून व्यक्त होत असतात,  या सर्वांचा मेळ मी घालतो. त्याच्या जोडीला मला आलेल्या अनुभवांच्या दोन गोष्टीही आपल्याला सांगतो. शेअर करतो. या  सगळ्या  गोष्टी आता सर्व घरांघरांमध्ये, कुटुंबामध्ये पोहोचतात. समाज माध्यमं आणि ‘व्हॉटस् अप’वरूनही फिरतात आणि त्यातूनच परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल होते. आपण पाठवलेल्या स्वच्छतेच्या कथा, अनुभव, सामान्य लोकांची असंख्य उदाहरणे यामुळे घरांघरांमधून स्वच्छतेचे छोटे ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणजे ‘सदिच्छा दूत’ कधी निर्माण झाले हे लक्षातच आलं  नाही. आता हेच स्वच्छतेचे छोटे सदिच्छा दूत घरातल्या मोठ्या लोकांना रोखताहेत. इतकंच नाही तर कधी-कधी तर फोन कॉल करून पंतप्रधानांनाही आदेश देत आहेत. आता ‘सेल्फी विथ डॉटर’सारखी मोहीम हरियाणा राज्यातल्या एका लहानशा गावात सुरू होवून संपूर्ण देशातच नाही तर परदेशातही पसरू शकते. अशी प्रचंड ताकद  कोणत्या सरकारची असणार आहे.  समाजाच्या विचारांमध्ये परिवर्तनाची एक नवी आधुनिक भाषा आहे. ही भाषा आजच्या पिढीला समजते. त्यामुळे याच माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाशी, प्रत्येक वर्गाशी, सेलेब्रिटींशी जोडलं गेल्यामुळे नवीन पिढीमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. कधी कधी ‘मन की बात’विषयी टिंगलही केली जाते. परंतु माझ्या मनामध्ये नेहमीच 130 कोटी देशवासी वास्तव्य करत असतात. त्यांचं मन, हेच माझं मन आहे. ‘मन की बात’ काही सरकारी ‘बात’ नाही. ही समाजाची गोष्ट, समाजाची चर्चा आहे. ‘मन की बात’ ही अॅस्परेशनल इंडिया म्हणजेच महत्वाकांक्षी भारताची गोष्ट आहे. भारताचा मूळ-प्राण काही राजकारण नाही, भारताचे मूळ-प्राण राजशक्तीसुद्धा नाही. भारताचा मूळ-प्राण हे समाजकारण आहे आणि समाज-शक्ती आहे. समाज जीवनाचे हजारो पैलू असतात. त्यामध्येच एक पैलू राजकारण हाही आहे. सगळं काही राजकारणच झालं तर ते समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने काही चांगलं लक्षण, चांगली व्यवस्था असणार नाही. कधी कधी राजकीय घटना आणि राजकारणातले लोक, इतके वरचढ ठरतात की, समाजातले इतर प्रतिभावंत त्यापुढे दबून जातात. भारतासारख्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जन-सामान्यांच्या प्रतिभेला सुयोग्य स्थान मिळाले पाहिजे. ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. आणि ‘मन की बात’ म्हणजे या दिशेने केलेला एक नम्र आणि छोटासा प्रयत्न आहे.

 

( फोन कॉल -2 )

‘‘नमस्कार पंतप्रधान जी! मी मुंबईवरून प्रोमिता मुखर्जी बोलतेय. सर ‘मन की बात’ चा प्रत्येक भाग हा सखोल अंतर्दृष्टी दर्शवणारा, खूप माहितीपूर्ण, सकारात्मक कथांचा आणि सर्व सामान्य लोकांच्या चांगल्या कामांची दखल घेणारा असतो. त्यामुळे मी आपल्याला विचारू इच्छिते की, प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी, आपण किती तयारी करीत असता?’’

(फोन कॉल समाप्त)

या फोन कॉलसाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रश्नामध्ये एक प्रकारचा आपलेपणा जाणवतो. मला असं वाटतं की, ‘मन की बात’च्या 50 भागांचं सर्वात मोठं यश हेच आहे की, आपण पंतप्रधानांना नाही तर, जणू काही आपल्या एखाद्या निकटवर्तीयाला प्रश्न विचारत आहोत, अशी आपलेपणाची भावना त्यातून जाणवते. हीच तर खरी लोकशाही आहे. आपण जो प्रश्न विचारला आहे, त्याला अगदी साध्या शब्दामध्ये सरळ उत्तर द्यायचं झालं तर सांगतो- काहीही तयारी करीत नाही. वास्तविक ‘मन की बात’ माझ्यासाठी खूप सोप्पं काम आहे. कारण प्रत्येकवेळी ‘मन की बात’च्या आधी मला लोकांकडून पत्रं येतात. ‘मायगव्ह’ आणि ‘नरेंद्रमोदीअॅप’वर लोक आपले विचार ‘शेअर’ करीत असतात. एक टोल फ्री नंबर सुद्धा आहे – 1800 11 7800. या नंबरवर कॉल करून लोक आपला संदेश आपल्या आवाजामध्ये रेकॉर्डही करतात. ‘मन की बात’च्या प्रत्येक भागाच्या आधी जास्तीत जास्त पत्रं आणि टिप्पणी आपण स्वतः वाचण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याचबरोबर मी भरपूर फोन कॉल्सही ऐकतो. ‘मन की बात’च्या प्रसारणाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसा मी प्रवासाच्या काळात, आपल्याकडून पाठवलेल्या कल्पना, आपले ‘इनपुटस्’ यांचं मी अगदी बारकाईनं, काळजीपूर्वक वाचन करतो.

प्रत्येक क्षणी माझे देशवासी, माझ्या मनातच घर करून राहिलेले असतात आणि त्यामुळेच ज्यावेळी मी एखादं पत्र वाचतो, त्यावेळी त्या पत्रलेखकाची परिस्थिती, त्याच्या मनातले भाव, हे माझ्या विचारांचा एक भाग बनून जातात. अशावेळी मग ते पत्र काही केवळ कागदाचा एक तुकडा राहत नाही. जवळपास 40-45 वर्षे मी अखंडपणे एक ‘परिव्राजक’ म्हणूनच जीवन जगलो आहे. या काळामध्ये देशातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मी गेलो आहे. देशातल्या दुर्गम-अतिदुर्गम जिल्ह्यांमध्येही मी खूप काळ व्यतीत केला आहे. आणि यामुळेच ज्यावेळी मी पत्र वाचतो, त्यावेळी ते स्थान आणि त्याचे संदर्भ यांच्याशी अगदी सहजपणे जोडले जातो. मग मी काही वास्तविक गोष्टी, म्हणजे जसं की त्या गावाचे नाव, पत्रलेखकाचं नाव, यांच्या नोंदी करून ठेवतो. खरं सांगायचं झालं तर ‘मन की बात’ मध्ये हा आवाज माझा आहे. परंतु सर्व उदाहरणे, भावना आणि प्रेरणा तर माझ्या देशवासियांचीच आहे. ‘मन की बात’मध्ये योगदान देणाऱ्‍या प्रत्येक व्यक्तीला मी धन्यवाद देवू इच्छितो. ‘मन की बात’मध्ये आजपर्यंत ज्यांचं नाव मी घेवू शकलो नाही, असे लाखो लोक आहेत. परंतु हे लोक नाराज न होता, आपली पत्रे पाठवतात. टिप्पणी पाठवतात. माझ्या दृष्टीने आपल्या विचारांना, आपल्या भावनांना खूप महत्व आहे. पहिल्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त संख्येने आपल्या सगळ्यांची मते, प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळेच ‘मन की बात’ अधिकाधिक रोचक, प्रभावी आणि उपयुक्त बनेल. ज्या पत्रांना ‘मन की बात’मध्ये स्थान मिळू शकत नाही, त्या सर्व पत्रांना आणि त्यातील सल्ल्यांविषयी संबंधित विभागांनी लक्ष द्यावं,यासाठीही प्रयत्न केला जातो. आकाशवाणी, एफ.एम. रेडिओ, दूरदर्शन, इतर दूरचित्रवाणी वाहिन्या, समाज माध्यमांचे माझे सहकारी यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्या परिश्रमामुळेच तर ‘मन की बात’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतेय. आकाशवाणीची एक टीम प्रत्येक भाग वेगवेगळ्या अनेक भाषांमध्ये प्रसारणासाठी तयार करते. काही लोक तर अगदी मोदींच्या आवाजाशी मिळता-जुळता आवाज काढून आणि तशाच ‘शैली’मध्ये बोललेल्या प्रादेशिक भाषांमध्ये ‘मन की बात’ ऐकतात. एका त-हेने ते त्या 30 मिनिटांसाठी नरेंद्र मोदीच बनतात. या लोकांकडे असलेल्या त्यांच्या हुशारीसाठी आणि ते दाखवत असलेल्या कौशल्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम आपल्या स्थानिक भाषेतही अवश्य ऐकावा, असा माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे. ज्या वाहिन्यांवर  ‘मन की बात’चे अगदी नियमित प्रसारण केले जाते, त्या सर्व वाहिन्यांना, प्रसार माध्यमातल्या माझ्या या सर्व सहकारी मंडळींना अगदी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही राजकीय व्यक्ती प्रसार माध्यमांविषयी कधीच आनंदी असत नाही. आपल्याला खूप कमी प्रसिद्धी दिली जाते,  असं त्या राजकीय नेत्याला वाटत असतं. इतकंच नाही तर, आपल्याविषयी जे काही प्रसिद्ध केलं जातं, प्रसारित केलं जातं, ते नकारात्मक आहे, असंही वाटत असतं. परंतु ‘मन की बात’ मध्ये ज्या विषयांची चर्चा करण्यात आली त्यापैकी अनेक विषय प्रसार माध्यमांनीही उचलून धरले. स्वच्छता, रस्ते सुरक्षा, अंमली पदार्थमुक्त भारत, सेल्फी विथ डॉटर, यासारखे अनेक विषय आहेत, त्या विषयांवर प्रसार माध्यमांनी नवनवीन संकल्पना तयार करून त्याला एखाद्या अभियानाचे स्वरूप दिले आणि त्या क्षेत्रात पुढे भरपूर काम केले. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या कार्यक्रमाला ‘मोस्ट वॉचड् रेडिओ प्रोग्रॅम’ बनवले. प्रसार माध्यमांचे मी अगदी हृदयापासून अभिनंदन करतो. आपल्या सहकार्याशिवाय ‘मन की बात’ चहा प्रवास अपूर्ण राहिला असता.

(फोन कॉल -3 )

‘‘नमस्कार मोदी जी! मी उत्तराखंडमधल्या मसुरी इथून निधी बहुगुणा बोलतेय. मी दोन युवा मुलांची आई आहे. सर्वसाधारणपणे युवा वयोगटातल्या मुलांनी नेमकं काय करावं, हे कोणी त्यांना सांगितलं तर ते पटत नाही आणि असं कोणी काही सांगणं त्यांना आवडतही नाही. आता सांगणाऱ्‍यांपैकी मग कोणी शिक्षक असतील किंवा त्यांचे माता-पिता असतील. परंतु ज्यावेळी आपण ‘मन की बात’ करता, आणि त्यामध्ये जर काही मुलांशी संबंधित आपण काही त्यामधून बोलता ती गोष्ट मात्र मुलांना अगदी छान समजते. तुम्ही बोलता तो विषय मुलांना मनापासून आवडतो, असाच विषय तुम्हीही मांडता. ज्याप्रमाणे आपण बोलता किंवा जो कोणताही विषय आपण मांडता, तो मुलांना चांगल्या पद्धतीने समजतो आणि ते त्या विचारांची अंमलबजावणीही करतात, हे विशेष आहे. मला वाटतं की, आपण यामागचं ‘सिक्रेट’सांगावं. हे गुपित आपण ‘शेअर’ करणार का? धन्यवाद!’’

( फोन कॉल समाप्त ) 

निधी जी, आपण फोन केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद! अगदी खरं सांगायचं तर माझ्याकडं असं कोणतंही सिक्रेट किंवा गुपित नाही. जे काही मी करतो, ते सगळ्या कुटुंबामध्येही होत असणारच. अगदी सोप्या, सरळ भाषेत सांगायचं झालं तर मी त्या युवकांच्या जागी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यामध्ये आपण आहोत, असं समजून विचार करतो. अशा वेळेस विचारांशी जुळवून घेत, सामंजस्य कसे राहील, याचा प्रयत्न करतो. आपल्या आयुष्यात भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचं ओझं आपण जर नेहमीच घेऊन जगत असू तर मात्र ती आपल्या आड येणार. म्हणून हा भार मधेमधे येणार नाही, हे आपण पाहिलं की, समोरच्या कुणालाही समजून घेणं खूप सोपं जातं. कधी-कधी आपले पूर्वग्रहसुद्धा संवाद साधण्यामध्ये खूप मोठ्या संकटासारखे उभे राहतात. स्वीकार-अस्वीकार आणि प्रतिक्रिया यांच्याशिवाय समोरच्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे, ते समजून घेण्याला मी प्राधान्य देत असतो. अशावेळी समोरची व्यक्तीसुद्धा आपलं मन वळवण्यासाठी अनेक तर्क मांडून दबाव निर्माण करण्याऐवजी सामंजस्याने आपली मनं जुळवण्याचा प्रयत्न करतो, असा माझा अनुभव आहे. यामुळेच मग ‘कम्युनिकेशन गॅप’ संपुष्टात येते आणि मग पुन्हा एकप्रकारे तो विशिष्ट विचार घेऊन आपण दोघेही सहप्रवासी बनतो. अशावेळी मग दोघांनाही लक्षात येत नाही की, आपण कसा काय आणि कधी आपला विचार मागे टाकला, सोडला आणि दुसऱ्‍याचा स्वीकार केला. समोरच्या व्यक्तीचा विचार कधी आपला झाला, हे त्याच्या लक्षातही येत नाही. आजच्या युवकांकडे एक गुण आहे, तो म्हणजे या तरूणांचा, स्वतःचा ज्या गोष्टीवर विश्वास नाही, ती गोष्ट,ते काम ही मुलं कधीच करणार नाहीत. आणि जर एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास असेल तर मग मात्र त्यासाठी सर्व काही सोडून, अगदी सर्व पणाला लावून त्याच गोष्टीच्या मागे लागतील. साधारणपणे कुटुंबामधली मोठी, वयस्क मंडळी आणि कुमार वयोगटातली मुलं, यांच्यामध्ये असलेल्या ‘कम्युनिकेशन गॅप’ याविषयी नेहमीच चर्चा होते. वास्तविक बहुतांश घरांमध्ये कुमारवयीन मुलांशी आणि मुलांविषयी चर्चा करण्याचे विषयही मर्यादित असतात. यामध्ये जास्त वेळ तर मुलांचा अभ्यास किंवा त्यांच्या सवयी तसंच त्यांचे आत्ताचे राहणीमान याविषयांवर चर्चा होते. ‘तू असं कर- असं करू नकोस’ असं बोलणं घरांमध्ये होतं. कोणत्याही अपेक्षा न ठेवता अगदी मोकळ्या मनाने घरामध्ये चर्चा होत नाही. हळू-हळू कुटुंबामध्येही असं मोकळं  बोलणं कमी होत चाललं आहे, हा सुद्धा आता चिंतेचा विषय बनला आहे.

एक्सपेक्ट ऐवजी एक्सेप्ट म्हणजे अपेक्षांऐवजी स्वीकार आणि डिसमिस करण्याऐवजी डिस्कस म्हणजे रद्द करण्याऐवजी चर्चा करणे, असे धोरण ठेवलं तर संवाद प्रभावी होऊ शकेल. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून तसेच समाज माध्यमातून युवावर्गाशी सातत्याने चर्चा करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो. ते जे काही करत आहेत किंवा कशा पद्धतीने ही मुलं विचार करतात, त्यांच्याकडून वेगळं, नवं काही शिकता येईल का, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. युवा पिढीकडे नेहमीच नवनवीन कल्पनांचे जणू भांडार असते. ही मुलं खूप उत्साही, नवकल्पना मांडणारी आणि विशेष म्हणजे अगदी ‘फोकस्ड’ असतात. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी युवकांच्या प्रयत्नांना, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींना, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. नेहमीच एक तक्रार केली जाते की, युवक खूप सारे प्रश्न विचारतात. मला मात्र हे नवयुवक जास्त प्रश्न विचारतात ते आवडतं. याचा अर्थ असा आहे की, समोर दिसणाऱ्‍या सर्व गोष्टीं अगदी मुळातून समजून घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, हे चांगलं आहे, असं मला वाटतं. काही लोकांना युवकांमध्ये धैर्य नाही, असं वाटतं. परंतु मला वाटतं की, आजच्या युवकांजवळ वाया घालवण्यासाठी वेळच नाही. आजच्या नवयुवकांमधील अधीरताच  अधिकाधिक नाविन्यपूर्ण कल्पनांना जन्म देतेय. कारण कोणतीही गोष्ट आजच्या मुलांना फार वेगानं करायची असते. आपल्याला वाटतं, आजचे युवक खूप, अति महत्वाकांक्षी आहेत आणि त्यांच्या डोक्यात खूप मोठमोठे विचार असतात. मला तर हे खूप छान वाटतं. मोठी स्वप्न त्यांनी पहावीत आणि खूप मोठे यश मिळवावे. अखेरीस हाच तर ‘नव भारत’ आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, युवा पिढीला एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची इच्छा असते. मी म्हणतो- यामध्ये वाईट काय आहे? ही मुलं ‘मल्टीटास्किंग’मध्ये पारंगत आहेत, त्यामुळेच  ती एकाचवेळी अनेक गोष्टी करू शकतात. आपण जर सभोवताली नजर टाकली तर दिसेल की सोशल एंट्राप्रिनरशिप असेल, स्टार्ट-अप्स असेल, स्पोर्टस् असेल किंवा इतर कोणतेही क्षेत्र घ्या. समाजामध्ये खूप मोठे परिवर्तन आणणारी ही युवा मंडळीच आहेत. याच युवकांनी प्रश्न विचारण्याचे आणि मोठमोठी स्वप्न पाहण्याचे धाडस दाखवले आहे, त्याच युवकांनी हे परिवर्तन घडवून आणले आहे. जर आपण युवकांच्या विचारांना प्रत्यक्षात आणलं  आणि त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी अगदी मोकळे वातावरण दिले तर हे युवक देशामध्ये सकारात्मक परिवर्तन आणू शकतात. आणि हे युवक असे बदल घडवून आणतही आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गुरुग्राम इथून विनीता जी यांनी ‘मायगव्ह’वर लिहिले आहे की, ‘मन की बात’ मध्ये उद्या म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी येणाऱ्‍या ‘संविधान दिन’ म्हणजे ‘राज्यघटना दिवसा’विषयी मी बोललं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की, हा दिवस खूप विशेष आहे. कारण आपण राज्यघटनेचा स्वीकार केला त्याला आता 69 वर्ष झाली असून, 70 व्या वर्षात प्रवेश करणार आहोत.

विनीता जी, आपण सूचित केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद!

खरंय, उद्या ‘संविधान दिवस’ आहे. ज्या महान लोकांनी आपली राज्यघटना तयार केली त्या महनीय व्यक्तींचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपल्या घटनेचा स्वीकार करण्यात आला. घटनेचा मसुदा करण्यासारखे ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी घटना समितीला दोन वर्ष, अकरा महिने आणि 17 दिवसांचा कालावधी लागला. कल्पना करा अवघ्या तीन वर्षांच्या आत या महान विभूतींनी आपली इतकी व्यापक आणि विस्तृत घटना तयार केली. या महान लोकांनी ज्याप्रकारे इतक्या वेगाने घटनेचा मसुदा तयार केला, हे कार्य म्हणजे आजही ‘वेळेचे व्यवस्थापन आणि उत्पादकता यांचे एक उत्‍तम उदाहरण आहे. त्यावरून आपण त्याला आपल्या जबाबदाऱ्‍या निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ‘राज्यघटना समिती’ म्हणजे आपल्या देशातल्या महान प्रतिभावंत व्यक्तींचा एक संगम होता. त्यामध्ये सहभागी असलेला प्रत्येकजण  भारतातले लोक सशक्त कसे बनतील, गरीबातला गरीब माणसू समर्थ कसा बनेल, याचाच विचार करून आपल्या देशासाठी घटना तयार करण्यासाठी कटिबद्ध होता.

आपल्या राज्यघटनेमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की, अधिकार आणि कर्तव्य म्हणजेच राईटस् आणि ड्युटीज्, यांच्याविषयी अगदी विस्तारपूर्वक वर्णन करण्यात आले आहे. नागरिकांच्या जीवनामध्ये या दोन्हींचा ताळमेळ देशाला पुढे घेऊन जाणार आहे. जर आपण दुसऱ्‍यांच्या अधिकारांचा आदर, सन्मान केला तर आपल्या अधिकारांचे रक्षण आपोआपच होणार आहे. आणि याचप्रमाणे जर आपण राज्यघटनेमध्ये दिलेल्या आपल्या कर्तव्यांचे पालन केले तरीही आपल्या अधिकारांचे रक्षण आपोआप होणार आहे. भारताच्या प्रजासत्ताकाला 60 वर्ष झाली होती, त्यावेळी 2010मध्ये आम्ही गुजरातमध्ये हत्तीवर राज्यघटना ठेवून एक शानदार शोभायात्रा काढली होती, हे मला अजूनही चांगलंच आठवतंय. युवावर्गामध्ये राज्यघटनेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना राज्यघटनेतील महत्वाच्या पैलूंची माहिती व्हावी, त्यांना राज्यघटनेविषयी जोडण्यासाठी आम्ही केलेला प्रयत्न संस्मरणीय ठरला. आता 2020 मध्ये एक स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून आपण 70 वर्ष पूर्ण करणार आहोत. आणि 2022 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होणार आहेत.

चला तर मग या, आपण सर्वजण आपल्या राज्यघटनेतल्या मूल्यांना पुढे घेऊन जाऊ या. आणि आपल्या देशामध्ये पीस, प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी म्हणजेच शांतता, प्रगतीआणि समृद्धी नांदेल हे सुनिश्चित करूया.

माझ्या प्रिय देशवासियांनो, राज्यघटना समिती याविषयी ज्यावेळी चर्चा केली जाते, त्यावेळी ज्या महापुरुषाचे योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. ही महनीय व्यक्ती राज्यघटना समितीच्या केंद्रस्थानी होती. हे महापुरूष होते, पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर. 6 डिसेंबरला त्यांचा महा-परिनिर्वाण दिवस आहे. मी सर्व देशवासियांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. ज्यांनी कोट्यवधी भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. लोकशाही डॉ. बाबासाहेब यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. आणि ते म्हणायचे की, भारतामध्ये लोकशाही मूल्ये काही बाहेरून आलेली नाहीत. प्रजासत्ताक काय असते आणि संसदीय व्यवस्था कशी असते, ही भारतासाठी काही नवीन गोष्ट नाही. राज्यघटना समितीमध्ये त्यांनी एक खूपच भावूक आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते, इतक्या संघर्षानंतर आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य अमूल्य आहे. त्याचं रक्षण आपण आपल्या रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत करायचे आहे. ते आणखी असंही म्हणत होते की, आपण भारतीय भले वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीतून आलेले आहोत, हे मान्य. तरीही  सर्वांनी  देशहित इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात वरचे, सर्वात महत्वाचे ठेवले पाहिजे. ‘इंडिया फर्स्ट ’हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र होता. पुन्हा एकदा पूज्य डॉ. बाबासाहेब यांना विनम्र श्रद्धांजली.

माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन दिवसांपूर्वीच, 23 नोव्हेंबरला आपण सर्वांनी श्री गुरूनानक देवजी यांची जयंती साजरी केली आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये आपण त्यांचे 550 वे  प्रकाश पर्व साजरे करणार आहोत. गुरूनानक देवजी यांनी नेहमीच संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा विचार केला. त्यांनी समाजाला नेहमीच सत्य, कर्म, सेवा, करूणा आणि सौहार्दाचा मार्ग दाखवला. देश पुढच्या वर्षी गुरूनानक देव जी यांचा 550 वा जयंती कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचे रंग फक्त आपल्या देशातच नाही, तर विदेशात, संपूर्ण दुनियेत रंगतील. सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांनाही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकारे गुरूनानक देव जी यांचे 550 वे प्रकाश पर्व विश्वभरातल्या सर्व देशांमध्ये साजरे करण्यात येईल. याचबरोबर गुरूनानक जी यांच्याशी संबंधित असलेल्या पवित्र स्थानांच्या मार्गावर एक रेल्वे गाडीही सोडण्यात येणार आहे. अलिकडेच या कामाशीसंबंधित घेण्यात आलेल्या बैठकीत मी सहभागी झालो होतो. त्यावेळी मला लखपत साहिब गुरूव्दाराची आठवण झाली. गुजरातमध्ये 2001मध्ये झालेल्या भूकंपाच्या काळात या गुरूव्दाराचे खूप मोठे नुकसान झाले होते. परंतु स्थानिक लोकांच्या सहकार्याने राज्य  सरकारने या गुरूव्दाराच्‍या  जीर्णेाद्धाराचे ज्याप्रकारे कार्य केले आहे, ते आजही एक आदर्श ठरणारे आहे.

करतारपूर कॉरिडॉर बनवण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यामुळे आमच्या देशातले यात्रेकरू अगदी सहजतेने पाकिस्तानमधल्या करतारपूर मध्ये गुरूनानक देव जी यांच्या त्या पवित्र स्थानाचे दर्शन करू शकतील.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 50 व्या भागानंतर आपण पुन्हा एकदा पुढच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. आणि मला विश्वास आहे की आजच्या ‘मन की बात’मध्ये या कार्यक्रमामागे कोणती भावना आहे, हे आपल्यासमोर सांगण्याची पहिल्यांदाच संधी मला मिळाली. कारण आपणच आज असे प्रश्न विचारले होते, त्यांच्या उत्तरादाखल हे मला सांगता आले. परंतु आपला हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. आपल्या सर्वाबरोबर जितके जास्त लोक जोडले जातील,तितका आपला प्रवास अधिक चांगला आणि प्रत्येकाला आनंद देणारा होणार आहे. कधी-कधी लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की, ‘मन की बात’मुळे मला काय मिळते? मी आज सांगू इच्छितो की, ‘मन की बात’ला जे  अभिप्राय मिळतात, त्यामध्ये एक गोष्ट माझ्या मनाला खूप स्पर्श करणारी असते. बहुतांश लोकांनी हे सांगितलं आहे की, ज्यावेळी आम्ही कुटुंबातले सर्व लोक एकत्रितपणे बसून ‘मन की बात’ ऐकतो, त्यावेळी असं वाटतं की, आमच्या परिवारामधला मोठा माणूस, आमचा कुटुंबप्रमुख आमच्यामध्ये बसून, तुमच्या-आमच्या गोष्टी आपल्याबरोबर ‘शेअर’ करतोय. ही भावना अगदी व्यापक आहे, असं ज्यावेळी मला समजलं, त्यावेळी मला खरोखरीच खूप आनंद झाला. मी आपणा  सर्वांचा आहे. आपल्यामधलाच आहे. आपल्यामध्ये आहे. आपण लोकांनीच मला मोठं बनवलं आहे. आणि एकाप्रकारे मी सुद्धा आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून ‘मन की बात’च्या माध्यमातून वरचेवर येत राहणार आहे. आपल्याशी जोडला जाणार आहे . आपली सुखं-दुःखं ही माझी सुखं-दुःखं आहेत. आपल्या आकांक्षा या माझ्या आकांक्षा आहेत. आपल्या महत्वाकांक्षा या माझ्या महत्वाकांक्षा आहेत.

या तर मग, हा प्रवास आपण असाच पुढे सुरू ठेवूया.

खूप-खूप धन्यवाद!!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Global aerospace firms turn to India amid Western supply chain crisis

Media Coverage

Global aerospace firms turn to India amid Western supply chain crisis
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Former UK PM, Mr. Rishi Sunak and his family meets Prime Minister, Shri Narendra Modi
February 18, 2025

Former UK PM, Mr. Rishi Sunak and his family meets Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

Both dignitaries had a wonderful conversation on many subjects.

Shri Modi said that Mr. Sunak is a great friend of India and is passionate about even stronger India-UK ties.

The Prime Minister posted on X;

“It was a delight to meet former UK PM, Mr. Rishi Sunak and his family! We had a wonderful conversation on many subjects.

Mr. Sunak is a great friend of India and is passionate about even stronger India-UK ties.

@RishiSunak @SmtSudhaMurty”