माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’चा हा या वर्षामधला शेवटचा कार्यक्रम आहे आणि योगायोग पहा, आज 2017 या वर्षाचाही शेवटचा दिवस आहे. या संपूर्ण वर्षभरामध्ये आपण मिळून अनेक गोष्टींवर बोललो आणि भरपूर गोष्टी ‘शेअर’ही केल्या. ‘मन की बात’साठी आपल्याकडून येणारी असंख्य पत्रं, प्रतिक्रिया, त्यामधून विचारांचं होणारं आदान-प्रदान, हे सगळं काही माझ्यासाठी नेहमीच नवीन ऊर्जा देणारं असतं. आता अवघ्या काही तासांनी हे वर्ष बदलणार आहे. परंतु आपल्या या गोष्टी, बोलणं, आपला संवाद यांची मालिका अशीच सुरू राहणार आहे. आगामी वर्षामध्येही आपण आणखी नवनव्या विषयांवर संवाद साधणार आहोत, नवे अनुभव ‘शेअर’ करणार आहोत. आपल्या सर्वांना 2018 साठी अनेक-अनेक सदिच्छा. आत्ताच, काही दिवसांपूर्वी 25 डिसेंबरला संपूर्ण विश्वभरामध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. भारतामध्येही लोकांनी भरपूर उत्साहात हा सण साजरा केला. ख्रिसमसच्या काळात आपण सगळे ईसा मसीहच्या महान शिकवणुकीचे स्मरण करतो आणि ईसा मसीहने सर्वात जास्त भर कोणत्या गोष्टीवर दिला असेल तर, तो म्हणजे – ‘‘सेवा-भाव’’ या गोष्टीवर आहे. बायबलमध्येही सेवेच्या भावनेचे सार आपल्याला दिसून येते.
द सन ऑफ मॅन हॅज कम, नॉट टू बी सर्व्हड् ,
बट टू सर्व्ह ,
अॅंड टू गिव्ह हिज लाईफ, अॅज ब्लेसिंग
टू ऑल ह्युमनकाइंड.
या वाक्यांमध्ये सेवेचं नेमकं महत्व, महात्म्य काय आहे, हे दिसून येते. या विश्वामध्ये असलेली कोणतीही जात असेल, धर्म असेल, परंपरा असेल, वर्ण असेल परंतु मानवतेच्या अमूल्य रूपाचा परिचय हा ‘सेवाभाव’यामधून होत असतो. आपल्या देशामध्ये ‘निष्काम कर्म’ याविषयी बोललं जातं. निष्काम कर्म म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता, सेवा करणे. आपल्याकडे तर ‘‘सेवा परमो धर्माः’’ असंही म्हटलं जातं. ‘जीव-सेवा हीच शिव-सेवा’ आणि गुरूदेव रामकृष्ण परमहंस यांनी तर म्हटलं आहे की, ‘शिव-भावनेने जीव-सेवा’ करावी. याचाच अर्थ संपूर्ण विश्वामध्ये अशी एकसारखीच मानवतेची मूल्ये सांगितली आहेत. चला तर, आपण या महापुरूषांचे स्मरण करून, त्याचबरोबर पावन दिवसांचं स्मरण करून आपल्या या महान मूल्य परंपरेला एक नवं चैतन्य देऊ या आणि आपणही या मूल्यानुसार जगण्याचा प्रयत्न करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, हे वर्ष गुरूगोविंद सिंहजींचे 350 वे प्रकाश पर्व वर्ष होते. गुरूगोविंद सिंहजींचे शौर्य आणि त्याग यांनी भरलेले असामान्य आयुष्य आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. गुरूगोविंद सिंहजींनी महान जीवनमूल्यांचा उपदेश दिला आणि त्याच मूल्यांच्या आधारे ते स्वतःही जगले. एक गुरू, कवी, दार्शनिक-तत्ववेत्ता, महान योद्धा, अशा सर्व भूमिकांमधून गुरूगोविंद सिंहजी यांनी लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं. अत्याचार आणि अन्याय यांच्याविरूद्ध ते लढले. जाती आणि धर्माची बंधनं झुगारून देण्याची शिकवण त्यांनी लोकांना दिली. या सर्व प्रयत्नांमध्ये त्यांना वैयक्तिक पातळीवर खूप काही सोसावं लागलं. परंतु त्यांनी मनामध्ये व्देषभावनेला कधीच थारा दिला नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणी ते प्रेम, त्याग आणि शांतीचा संदेश देत राहिले. त्यांचं व्यक्तिमत्व किती महान आणि वैशिष्ट्यपूर्ण होतं, हे यावरून दिसून येतं. गुरूगोविंद सिंहजींच्या 350 व्या जयंती वर्षानिमित्त पटनासाहिब इथं आयोजित केलेल्या प्रकाश उत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य मानतो. चला तर मग, आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. गुरूगोविंद सिंहजी यांची महान शिकवण आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनानुसार आचरण करण्याचा आपणही प्रयत्न करूया.
एक जानेवारी, 2018. म्हणजे उद्या, माझ्या मते हा दिवस एक विशेष दिवस, अगदी खास आहे. आपल्यालाही आश्चर्य वाटेल, नवीन वर्ष तर येत असतंच. एक जानेवारीही प्रत्येक वर्षी येतेच. परंतु ज्यावेळी ‘विशेष’ असं मी म्हणतो, त्यावेळी खरोखरीच ती गोष्ट खास असते. जे लोक सन 2000 या वर्षी किंवा त्यानंतर जन्मलेले आहेत, म्हणजेच 21व्या शतकामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे, ती मुले एक जानेवारी, 2018 पासून ‘पात्र मतदार’ बनण्यास प्रारंभ होणार आहे. भारतीय लोकशाहीचे 21व्या शतकातले मतदार हे ‘नव भारताचे मतदार’ असणार आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. या नवीन, युवपिढीला मी शुभेच्छा देतो. आणि सर्वांना आग्रह करतो की, आपण सर्वांनी मतदार म्हणून आपली नावं नोंदवावीत. संपूर्ण हिंदुस्तान आपले 21 व्या शतकातले मतदार म्हणून स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. 21 व्या शतकातले मतदार बनताना, आपणही एखादा सन्मान मिळत असल्याचा अनुभव करत असणार. आपले मत हे ‘नव भारता’चा आधार असणार आहे. लोकशाहीमध्ये मताची ताकद, ही सर्वात मोठी शक्ती आहे. लाखो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘मत’ हे सर्वात प्रभावी साधन आहे. आपल्याला फक्त मत देण्याचा अधिकार मिळतो, असं नाही. तर आपण 21 व्या शतकामध्ये भारत कसा असावा? 21 व्या शतकातल्या भारतामध्ये आपली स्वप्नं कोणती असावीत? आपण सुद्धा 21व्या शतकातील भारताचे निर्माता बनू शकणार आहात आणि त्याचाच प्रारंभ एक जानेवारीपासून विशेषत्वाने होणार आहे. आणि आज आपल्या या ‘मन की बात’ मध्ये विविध संकल्प करत असलेल्या आणि ज्यांची ऊर्जा ओसंडून वाहत आहे, अशा 18 ते 25 वर्षे वयोगटातल्या यशस्वी युवावर्गाशी मी बोलू इच्छित आहे. माझ्या मते हेच खरे ‘नव भारत युवा ’ आहेत. ‘नव भारत युवा’ याचा अर्थ आहे की- आनंद, उत्साह आणि ऊर्जा. या ऊर्जावान युवावर्गाकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर आपले ‘नव भारता’चे स्वप्न साकार होणार आहे, असा माझा विश्वास आहे. ज्यावेळी आपण नव भारताविषयी बोलतो, त्यावेळी हा नवा भारत जातीवाद, संप्रदायांमधील वाद, दहशतवाद, भ्रष्टाचार यांसारख्या विषवल्लींपासून तो मुक्त असला पाहिजे. अस्वच्छता आणि गरीबी यांच्यापासून तो मुक्त असला पाहिजे. ‘नव भारता’मध्ये सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत. आणि तिथं सर्वांच्या आशा- आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. नव भारतामध्ये शांती, एकता आणि सद्भावना आमच्या मार्गदर्शक शक्ती असल्या पाहिजेत. नव भारतातील युवकांनी पुढं यावं आणि नवा भारत कसा असावा, यावर विचारमंथन करावं. त्यांनीही आपल्यासाठी एक मार्ग निश्चित करावा. जे याच्याशी जोडले गेले आहेत, त्यांचा एक असाच मोठा समूह होत जाईल. आपणही पुढे मार्गक्रमण करीत रहावं, त्यामुळं देशही असाच पुढे जाईल. आत्ता आपल्याशी संवाद साधत असतानाच माझ्या मनात एक विचार आला की, आपण भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक ‘मॉक पार्लमेंट’ म्हणजे ‘प्रतिरूप संसद’ आयोजित करू शकतो का? या उपक्रमामध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातल्या युवकांनी एकत्रित येवून ‘नव भारत’ याविषयावर विचार मंथन करून, विविध मार्ग शोधून, त्याप्रमाणे योजना, हे युवक बनवू शकतील का? सन 2022च्या आधीच आपण आपले संकल्प कशा पद्धतीने सिद्धीस नेवू शकणार आहे? आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी पाहिलेल्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो? महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीला एका जन आंदोलनाचं स्वरूप दिलं होतं. माझ्या नवयुवा सहकाऱ्यांनो, आज काळाची गरज आहे की, आपणही 21व्या शतकामध्ये भव्य -दिव्य भारतासाठी एक जन-आंदोलन उभं केलं पाहिजे. विकासाचं जन-आंदोलन. प्रगतीचं जन-आंदोलन. सामर्थ्यवान, शक्तीशाली भारत निर्माण करण्यासाठी जन-आंदोलन. मला असं वाटतं की, 15 ऑगस्टच्या जवळपास दिल्लीमध्ये एका ‘मॉक पार्लमेंट’चं, म्हणजेच ‘प्रतिरूप संसदेचं’ आयोजन करण्यात यावं. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एका युवकाला निवडून सहभागी करून घेतलं जावं. युवकांच्या या संसदेमध्ये आगामी पाच वर्षांमध्ये एका नवीन भारताचे निर्माण करण्यासाठी नेमकं काय आणि कसं केलं पाहिजे, यावर चर्चा घडवून आणली जावी, असंही मला वाटतं.आगामी पाच वर्षांमध्ये एका नवीन भारताचे निर्माण कसे केले जावू शकते ? संकल्प कशापद्धतीने सिद्धीस नेला जावू शकतो ? आज युवावर्गासाठी असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. कौशल्य विकसनापासून ते नवसंकल्पनांपर्यंत आणि उद्योजकतेमध्ये आमचे युवक पुढे येत आहेत आणि यशस्वीही होत आहेत. मला वाटतं की, या सर्व योजनांची माहिती या ‘नव भारता’तील युवावर्गाला एकाच स्थानी कशा पद्धतीनं मिळू शकेल, याचा विचार करून एक स्वतंत्र मजबूत व्यवस्था निर्माण केली जावी. त्यामुळे 18 वर्षे होताच युवावर्गाला या नवनवीन व्यवसायाच्या विश्वाची माहिती अगदी सहजपणानं मिळू शकेल आणि आवश्यकता भासेल त्यावेळी तो एकत्रित माहितीचा लाभही घेवू शकेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्यावेळी ‘मन की बात’ मध्ये मी आपल्याला ‘सकारात्मक’तेचं महत्व किती आहे, याविषयी सांगितलं होतं. संस्कृतमधल्या एका श्लोकाचं स्मरण आज मला झालं आहे.
उत्साहो बलवानार्य, नास्त्युत्साहात्परं बलम् ।
सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम् ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, ज्या व्यक्तीकडे उदंड उत्साह आहे, ती व्यक्ती अत्यंत बलशाली असते. कारण उत्साह असल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. सकारात्मकता आणि उत्साह ज्या व्यक्तींकडे आहे, त्यांच्या दृष्टीने कोणतेही काम सहज साध्य, शक्य असते. इंग्लिशमध्ये लोक असं म्हणतात की, –
‘पेसिमिझम लिडस् टू वीकनेस, ऑप्टीमिझम टू पॉवर’
मागच्या वेळच्या ‘मन की बात’ मध्ये मी देशवासियांना आवाहन केलं होतं की, 2017 या वर्षामध्ये आपण जे सकारात्मक क्षण अनुभवले, त्यांची माहिती ‘शेअर’ करावी आणि 2018चं स्वागत अशाच सकारात्मक वातावरणामध्ये करावं. लोकांनी समाज माध्यमांच्या व्दारे, ‘माय गव्ह’ आणि ‘नरेंद्र मोदी अॅप’ वर खूप मोठ्या संख्येनं अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपले अनुभव ‘शेअर’ केले आहेत. माझ्या आवाहनाला दिलेला हा चांगला प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला. ‘‘पॉझिटिव्ह इंडिया हॅशटॅग’’ वर लाखो व्टिटस् आल्या आहेत. त्या जवळपास दीडशे कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे एकप्रकारे सकारात्मतेचे वातावरण भारतात निर्माण झालं आहे, आणि आता त्याचा प्रसार संपूर्ण विश्वामध्ये होत आहे. व्टिटस् आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर सगळं काही खरोखरीच खूप उत्साहवर्धक आहे. तोही एक सुखद अनुभव मिळाला आहे. काही देशवासियांनी यावर्षातल्या ज्या घटनेने त्यांच्या मनाचा ठाव घेतला, अशा विशेष परिणामकारी घटनांचा अनुभवही कथित केला आहे. काही लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात काही विशेष कामगिरी केली, त्याची माहितीही ‘शेअर’ केली आहे.
साऊंड बाईट्स
— माझं नाव मीनू भाटिया आहे. मी मयूर विहार, पॉकेट-वन, फेज वन, दिल्ली इथं राहते. माझ्या कन्येला एम.बी.ए. करण्याची इच्छा होती. तिच्यासाठी मला बँकेकडून कर्ज हवं होतं. हे कर्ज मला खूपच सहजतेनं मिळालं आणि माझ्या मुलीचं शिक्षण सुरू राहू शकलं.
— माझं नाव ज्योती राजेंद्र वाडे आहे. मी बोडल इथून बोलतेय. दरमहा एक रूपया भरून विमा काढण्यात येतो, त्या योजनेतून माझ्या पतीने विमा उतरवला होता. आणि त्यांचं अकस्मात अपघातामध्ये निधन झालं. आता आमच्यावर किती मोठं संकट कोसळलं, हे आमचं आम्हालाच ठाऊक आहे. परंतु अशा कठीण समयी सरकारच्या विम्याची मदत आम्हाला मिळाली आणि त्यामुळं परिस्थितीची दाहकता थोडी कमी झाली.
— माझं नाव संतोष जाधव आहे. आमच्या भिन्नर या गावातून 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम झालं आहे. त्यामुळे आमच्या इथं आता रस्ते खूप चांगले झाले आहेत आणि व्यवसाय तेजीत येतोय.
— माझं नाव दीपांशु आहुजा आहे. मी उत्तर प्रदेशमधल्या सहारणपूर जिल्ह्यातल्या मोहल्ला सादतगंज मध्ये वास्तव्य करतो. आपल्या भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाच्या दोन घटना मला फार प्रभावी वाटतात. एक- पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक. यामुळं दहशतवादासाठी वापरण्यात येणारे ‘लाँचिंग पॅडस्’ उद्ध्वस्त झाले आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय सैनिकांनी डोकलाममध्ये जो पराक्रम दाखवला तो अतुलनीय आहे.
— माझं नाव सतीश बेवानी आहे. आमच्या भागामध्ये पाण्याची खूप गंभीर समस्या होती. गेली 40 वर्षे आम्ही आर्मीच्या जलवाहिनीवर अवलंबून होतो. आता आमच्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी झाली आहे. स्वातंत्र्यानंतर आमचं हे सर्वात मोठं यश आहे, ते 2017मध्ये आम्हाला मिळालं.
असे अनेक लोक आहेत, जे आपआपल्या स्तरावर कार्यरत आहेत. आणि त्यामुळं अनेक लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर हाच खरा ‘नव भारत’ आहे. या नवीन भारताची निर्मिती आपण सगळे मिळून करीत आहोत. चला तर मग, अशाच लहान- लहान गोष्टींतून मिळत असलेल्या आनंदासह आपण नववर्षामध्ये प्रवेश करूया, नव-वर्षाच्या प्रारंभाला ‘सकारात्मक भारता’कडून ‘प्रगतिशील भारता’च्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी निर्धारपूर्वक, ठोस पावलं टाकूया. आता आपण सगळेच सकारात्मकतेविषयी चर्चा करत आहोत, म्हणून मलाही एक गोष्ट इथं सांगण्याचा मोह होत आहे. अलिकडेच मला काश्मीरमध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळवलेल्या अंजुम बशीर खान खट्टक याच्याविषयीची मिळालेली माहिती अतिशय प्रोत्साहन देणारी आहे. दहशतवाद आणि कमालीचा व्देष या वातावरणातून बाहेर पडून काश्मीर प्रशासकीय सेवा परीक्षेत त्यानं सर्वात प्रथम क्रमांक प्राप्त केला. 1990मध्ये दहशतवाद्यांनी त्याच्या वडिलांचं घर जाळून टाकलं होतं, हे समजल्यावर, तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. एका लहानग्या मुलासाठी चोहोबाजूला असलेलं हिंसाचाराचं वातावरण त्याच्या मनामध्ये कडवटपणा निर्माण करण्यासाठी पुरेसं होतं. अंजुम जिथं वास्तव्य करीत होता, त्या परिसरामध्ये दहशतवाद आणि हिंसक कारवाया इतक्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या की, त्याच्या कुटुंबियांना आपली वाड-वडिलांकडून मिळालेली जमीन सोडून बाहेर पडावं लागलं. आता एखाद्या लहान मुलाच्या सभोवती जर सातत्यानं हिंसाचार होत असेल तर त्याच्या मनात नकारात्मक विचार येणारच, त्याचबरोबर व्देषाचं कडवट बीजही रूजणार, अशी परिस्थिती होती. परंतु अंजुमने असं अजिबात होऊ दिलं नाही. त्यानं आशा कधीच सोडली नाही. त्यानं आपल्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला. जनतेची सेवा करण्याचा मार्ग निवडला. सगळ्या विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच प्रयत्न केले. यशस्वीतेची कथा त्यानं आपल्याच हातानं लिहिली. आज अंजुम केवळ जम्मू आणि काश्मीरच्याच नाही तर संपूर्ण देशातल्या युवा वर्गासाठी प्रेरणास्थान बनला आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी सकारात्मक कार्याच्या माध्यमातून निराशेचे मळभ, नाहीसे करता येतात, हे अंजुमनं सिद्ध करून दाखवलं आहे.
अलिकडे, गेल्याच आठवड्यात मला जम्मू- काश्मीरच्या काही कन्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्यामध्ये जी इच्छाशक्ती होती, जो उत्साह होता, त्यांची जी स्वप्ने होती यांची माहिती मी घेत होतो. आयुष्यात कोण कोणत्या क्षेत्रात त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे, हे त्या भरभरून सांगत होत्या. मनात प्रचंड आशा ठेवून जगणारी ही सगळी मंडळी होती. त्यांच्याशी बोलताना मला जाणवत होतं, यांच्यामध्ये निराशेचं तर नामोनिशाण नाही. त्यांच्यामध्ये उत्साह होता, आनंद, उल्हास होता, प्रचंड ऊर्जा होती, मोठी स्वप्ने होती, संकल्प होते. या काश्मीरी कन्यांबरोबर मी जितका वेळ घालवला, त्या काळात त्यांच्याकडून मलाही खूप प्रेरणा मिळाली. आणि मला वाटतं, हीच या देशाची खरी ताकद आहे. हाच तर माझा आजचा युवावर्ग आहे. हेच तर माझ्या देशाचं भविष्य आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशातल्याच नाही, तर संपूर्ण जगभरातल्या प्रसिद्ध धार्मिक स्थानांविषयी चर्चा होते, त्यावेळी केरळच्या सबरीमाला मंदिराविषयी बोललं जाणं स्वाभाविक आहे. या जगप्रसिद्ध मंदिरामध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी भाविक येत असतात. आता ज्याठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने भाविक येत असतात, आणि ज्या स्थानाचे इतके महात्म्य आहे, अशा ठिकाणी कायम स्वच्छता राखणे किती मोठे आव्हानात्मक कार्य होऊ शकते? विशेष म्हणजे असं महत्वाचं धार्मिक स्थान, उंच डोंगरावर आणि घनदाट अरण्यात असेल तर तिथं स्वच्छता राखण्याचं काम एक मोठे दिव्यच ठरते. परंतु या अवघड कामाचे संस्कारामध्ये परिवर्तन केले जाऊ शकते. या समस्येतून मार्ग कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो, आणि लोकांच्या सहभागाची शक्ती किती मोठी असते. याचे एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सबरीमाला मंदिर आहे, असं म्हणता येईल. पी.विजयन नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने ‘पुण्यम पुन्कवाणम’ असा एक कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ऐच्छिक मोहीम सुरू केली आहे. आणि एक परंपरा बनवली आहे. जो कोणी यात्रेकरू तिथं येतो, त्यानं त्याची यात्रा पूर्ण करण्यासाठी स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होऊन काही ना काही शारीरिक श्रम करण्याची पद्धत सुरू केली आहे. या अभियानामध्ये कोणीही मोठा नाही की, कोणी लहान नाही. प्रत्येक यात्रेकरू देवाच्या पूजेचाच एक भाग समजून, काही ना काही तरी स्वच्छतेचं काम करतात. अस्वच्छ जागा झाडून, साफ करण्याचं काम करतात. रोज सकाळी सफाई काम सुरू असताना फार वेगळं, अद्भूत दृष्य इथं दिसतं. गावात दर्शनासाठी आलेले सगळे यात्रेकरू स्वच्छतेचं काम करतात. आता यामध्ये कोणी कितीही मोठी सेलेब्रिटी असेल, कोणी कितीही मोठा धनिक असेल, किंवा मोठ्या पदावर कार्यरत अधिकारी असेल, प्रत्येकजण सामान्य यात्रेकरूप्रमाणे या ‘पुण्यम पुन्कवाणम’ कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. स्वच्छतेचं काम करूनच पुढे जातात. आपल्या देशवासियांसाठी अशी अनेक उदाहरणे आहेत. सबरीमालामध्ये स्वच्छतेचं अभियान खूप पुढं गेलं आहे. त्यामध्येही आता ‘पुण्यम पुन्कवाणम’मुळे प्रत्येक यात्रेकरू स्वच्छता अभियानाचा भाग बनत आहे. तिथं कठोर व्रत साधनेबरोबरच स्वच्छतेचा कठोर संकल्पही घेतला जातो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 ऑक्टोबर 2014 पूज्य बापूंच्या जयंती दिनी आपण सर्वांनी मिळून ‘स्वच्छ -भारत’, ‘अस्वच्छतेपासून मुक्त-भारत’ करण्याचा एक संकल्प केला आहे. आपण सर्वांनी मिळून निश्चित केलंय की, ज्यावेळी पूज्य बापू यांची 150वी जयंती असेल, त्यावेळेपर्यंत आपण त्यांच्या स्वप्नातला ‘स्वच्छ भारत’ साकार करण्यासाठी त्या दिशेने काही ना काही करायचं आहे. स्वच्छतेच्या दिशेने देशभरामध्ये व्यापक स्तरावर प्रयत्न होत आहेत. ग्रामीण तसंच शहरी क्षेत्रांमध्ये व्यापक पातळीवर लोकांच्या सहभागामुळेही आता परिवर्तन दिसून येत आहे. शहरी भागामध्ये स्वच्छतेचा स्तर किती आहे, स्वच्छता मोहिमेला किती यश मिळत आहे, याची पाहणी करण्यासाठी आगामी 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या काळामध्ये जगातील सर्वात मोठे ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ करण्यात येणार आहे. असे सर्वेक्षण देशातल्या चार हजार पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि जवळपास 40 कोटी लोकसंख्येमध्ये करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये पाहणी केली जाणारी क्षेत्रंही निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शहरांमध्ये उघड्यावर शौचापासून मुक्ती, त्याचबरोबर कचरा जमा करणे, कचरा घेऊन जाण्यासाठी असलेली वाहन व्यवस्था, शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन केले जाते की नाही, लोकांच्या सवयी बदलण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, या कामामध्ये लोकांचा सहभाग किती आहे, क्षमता निर्माण करण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी काही नवसंकल्पनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, हे तपासले जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या काळामध्ये वेगवेगळी पथके शहरांची तपासणी करणार आहेत. तसंच नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. ‘स्वच्छता अॅप’चा उपयोग कसा केला जातो. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सेवास्थानांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये आणखीही गोष्टींची पाहणी केली जाणार आहे. शहर स्वच्छ ठेवणे हा जनतेचा स्थायीभाव बनला पाहिजे, प्रत्येक नागरिकाने आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काही तरी केलं पाहिजे. स्वच्छता तिथल्या प्रत्येक शहरवासियाचा स्थायीभाव बनला पाहिजे, यासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था त्या शहरांनी बनवली आहे की नाही, हेही पाहिलं जाणार आहे. स्वच्छता ठेवणे हे काम फक्त सरकारचं आहे, असं अजिबात नाही. तर प्रत्येक नागरिक आणि नागरिक संघटनांचीसुद्धा स्वच्छता राखण्यात मोठी जबाबदारी आहे. आणि माझा प्रत्येक नागरिकाला आग्रह आहे की, सर्वांनी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. आणि आपलं शहर स्वच्छतेच्या बाबतीत मागं पडू नये, आपली गल्ली-रस्ता, आपली सोसायटी मागे पडू नये यासाठी संकल्प करा. घरामधला सुका कचरा, ओला कचरा यांचे वर्गीकरण करण्याची सवय आता एव्हाना तुम्हाला नक्कीच लागली असेल आणि कचरा टाकताना निळी आणि हिरवी अशा वेगळ्या कचरा टोपल्या तुम्ही वापरत असणार, असा मला विश्वास आहे. कचऱ्यासाठी ‘रिड्यूस, रियूज आणि रि-सायकल’ हा सिद्धांत अतिशय प्रभावी ठरतो. स्वच्छ शहरांची क्रमवारी या सर्वेक्षणाच्या आधारे करण्यात येणार आहे. जर आपल्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त असेल तर संपूर्ण देशाच्या क्रमवारीत आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर मग क्षे़त्रीय क्रमवारीमध्ये सर्वाधिक वरचा क्रमांक मिळवला पाहिजे, असे आपले स्वप्न असले पाहिजे. आणि तसे प्रयत्नही आपण केले पाहिजेत. 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या कालावधीत होत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये, स्वच्छतेच्या या आरोग्यदायी स्पर्धेमध्ये आपण मागे पडता कामा नये, असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. हा गावामध्ये, नगरामध्ये एक सार्वजनिक चर्चेचा विषय बनला पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांचे स्वप्न असले पाहिजे की, ‘‘आपले शहर- आपला प्रयत्न’’, ‘‘ आमची प्रगती-देशाची प्रगती’’.
चला तर मग, असा संकल्प करून आपण पुन्हा एकदा पूज्य बापूंजींचे स्मरण करून स्वच्छ भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही गोष्टी अशा असतात की, त्या दिसायला खूप लहान वाटतात परंतु एक समाज म्हणून त्याकडे पाहिलं तर आमची ओळख बनतात. आणि त्याचा खूप मोठा प्रभावही पडत राहतो. आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याशी अशीच एक गोष्ट ‘शेअर’ करू इच्छितो. मला गोष्ट समजली की, जर एखादी मुस्लिम महिला हजऱ्यात्रेला जाऊ इच्छित असेल तर ती फक्त ‘महरम’ अथवा आपल्या ‘पुरूष पालकाविना जाऊ शकत नाही. ज्यावेळी याविषयी मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी मी विचार केला की, असं कसं असू शकतं? हा नियम कोणी बनवला असेल? आणि असा भेद का? आणि मग मी याविषयी सखोल माहिती मिळवली. मला जे काही समजलं त्यामुळं मला आश्चर्य वाटले. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतरही आपल्याकडे असे निर्बंध लावणारे आपणच लोक आहोत. मुस्लिम महिलांवर अशाप्रकारेही अनेक दशकांपासून अन्याय होत आहे. परंतु त्याची चर्चा, साधी वाच्यताही कोणी करत नाही. विशेष म्हणजे, अशी बंधने, नियम तर इस्लामी देशांमध्येही नाहीत. परंतु भारतात मात्र मुस्लिम महिलेला हा अधिकार मिळालेला नव्हता. आणि मला इथं नमूद करायला खूप आनंद होतो आहे, की आमच्या सरकारनं या गोष्टीमध्ये लक्ष घातलं. आमच्या अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने आवश्यक ती पावलं उचलून ही 70 वर्षे चालत आलेली परंपरा नष्ट केली. मुस्लिम महिलेवर हजऱ्यात्रेला जाण्यासाठी असलेले हे बंधने काढून टाकण्यात आले. आज मुस्लिम महिला ‘महरम’शिवाय हज यात्रेला जाऊ शकतात. मला आणखी एका गोष्टीचा आनंद वाटतो की, यावर्षी जवळपास तेराशे मुस्लिम महिलांनी ‘महरम’विना हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केले आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या अगदी केरळपासून ते उत्तरेपर्यंतच्या महिलांनी मोठ्या उत्साहाने हज यात्रा करण्याची इच्छा जाहीर केली आहे. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाला तर मी सल्ला दिला आहे की, ज्या महिला एकट्याने हज यात्रा करण्यास इच्छुक आहेत, आणि अर्ज करत आहेत, त्या सर्व महिलांना हजला जाण्याची परवानगी देण्यात यावी. सर्वसाधारणपणे हज यात्रेकरूंसाठी लॉटरी पद्धती आहे. परंतु माझी इच्छा आहे की, एकट्या हज यात्रा करू इच्छित असलेल्या महिलांना लॉटरी पद्धतीतून वगळावे आणि त्यांना विशेष श्रेणीमध्ये संधी द्यावी. माझा पूर्ण विश्वास आहे, आणि माझी दृढ मान्यता आहे की, भारताच्या विकासाचा प्रवास हा आमच्या स्त्री-शक्तीच्या बळावर, त्यांच्यामधील प्रतिभेच्या विश्वासावर पुढे जात राहणार आहे. आणि म्हणूनच आपल्या महिलांनाही पुरूषांच्या बरोबरीने समान अधिकार, समान संधी मिळाल्या पाहिजेत, यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू असले पाहिजेत आणि प्रगतीच्या मार्गावर महिला आणि पुरूष बरोबरीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी आपल्यासाठी एक ऐतिहासिक पर्व आहे. यावर्षी 26 जानेवारी 2018 हा दिवस विशेषत्वाने स्मरणात राहणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिन समारंभाला सर्व दहा आसियान देशांचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनाला एक नाही तर दहा मुख्य अतिथी असणार आहेत. असं भारताच्या इतिहासात याआधी कधीच घडलं नाही. पहिल्यांदाच दहा पाहुणे प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत. 2017 हे वर्ष ‘आसियान’चे देश आणि भारत , अशा दोघांच्या दृष्टीने विशेष ठरले. ‘आसियान’ने 2017मध्ये आपली 50 वर्षे पूर्ण केली. आणि 2017मध्येच आसियानबरोबर भारताने केलेल्या भागिदारीला 25 वर्षे पूर्ण झाली. 26 जानेवारीला जगातल्या 10 देशांच्या या महान नेत्यांबरोबर सहभागी होणे आपल्या सर्व भारतीयांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे.
प्रिय देशवासियांनो, सध्या सण-उत्सवांचे दिवस सुरू आहेत. तसं पाहिलं तर आपला देश एकप्रकारे उत्सवांचा देश आहे. कदाचित असा एखादाही दिवस सांगता येणार नाही की, त्या दिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही. आत्ताच आपण सर्वांनी ख्रिसमसचा सण साजरा केला. आणि आता नवं वर्ष येणार आहे. येणारे नवे वर्ष आपल्या सगळ्यांना खूप खूप आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन यावे. आपण सगळे नव्या जोशात, नव्या उत्साहात, नव्या आनंदात आणि नव्या संकल्पासह पुढे जाऊया. आणि देशालाही असेच पुढे नेऊया. जानेवारी महिन्यात सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होणार आहे. या महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. हा सण निसर्गाशी जोडला आहे. तसं पाहिलं गेलं तर आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाच्या या अद्भूत घटनांना वेग-वेगळ्या रूपांमध्ये साजरे करण्याची प्रथा आहे. पंजाब आणि उत्तर भारतामध्ये लोहडीचा आनंद साजरा केला जातो. तर उत्तर प्रदेश-बिहारमध्ये खिचडी आणि तिळ-संक्रांतीची प्रतीक्षा सुरू असते. राजस्थानमध्ये संक्रांत म्हणतात, तर आसाममध्ये माघ-बिहू, तर तामिळनाडूमध्ये पोंगल आहे. या सर्व सणांचे आप- आपले असे विशेष महत्व आहे. हे सगळे सण साधारणपणे 13ते 17 जानेवारी या काळात साजरे केले जातात. या सर्व सणांची नावे वेगवेगळी आहेत. परंतु यांचे मूळ तत्व एकच आहे. ते म्हणजे निसर्ग आणि कृषी यांच्याशी जोडले जाणे.
सर्व देशवासियांना या सण-उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना नव-वर्ष 2018 च्या अनेक-अनेक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, प्रिय देशवासियांनो. आता आपण 2018 मध्ये पुन्हा असेच बोलणार आहे.
धन्यवाद!
PM @narendramodi conveys Christmas greetings, talks about the commitment of Lord Christ to service. #MannKiBaat pic.twitter.com/lo4HRy5QEx
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
Service is a part of India's culture. #MannKiBaat pic.twitter.com/FiIO8goQr5
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
PM @narendramodi pays tributes to Guru Gobind Singh Ji. #MannKiBaat https://t.co/Y1Thhl6aLy pic.twitter.com/psqV1w1KIh
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
Tomorrow, 1st January is special. We welcome those born in the 21st century to the democratic system as they will become eligible voters. #MannKiBaat pic.twitter.com/zNGozfpaTT
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
A vote is the biggest power in a democracy. It can transform our nation. #MannKiBaat pic.twitter.com/EF6xuo1gAG
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
PM @narendramodi addresses the 'New India Youth' during today's #MannKiBaat pic.twitter.com/lbUtT6c6d8
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
The New India Youth will transform our nation. #MannKiBaat pic.twitter.com/KScr1V5dRL
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
We can have mock Parliaments in our districts, where we discuss how to make development a mass movement and transform India. The New India Youth must take a lead in this. #MannKiBaat pic.twitter.com/b7ysbh4XYT
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
There are several opportunities for our youth today. #MannKiBaat pic.twitter.com/9XAiCXKqzm
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
During #MannKiBaat last month, I had spoken about #PositiveIndia. I am happy that so many people shared their Positive India moments through social media: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
Let us enter 2018 with a spirit of positivity. #MannKiBaat pic.twitter.com/2LYZs4k8Yt
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
While talking about positivity, I want to talk about Anjum Bashir Khan Khattak, who excelled in the KAS exam. He overcame adversities and distinguished himself: PM @narendramodi during #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
PM @narendramodi appreciates the Punyam Poonkavanam initiative at the Sabarimala Temple in Kerala. #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
Towards a Swachh Bharat. #MannKiBaat pic.twitter.com/rYGmIwxjyX
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
Swachh Survekshan begins in January. We will once again have a look at the strides we are making in cleanliness and areas in which we can improve: PM @narendramodi #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
A step that will benefit Muslim women. #MannKiBaat pic.twitter.com/tkjfILvB7o
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017
India looks forward to welcoming ASEAN leaders for Republic Day 2018 celebrations. This is the first time so many leaders will grace the celebrations as the Chief Guests. #MannKiBaat pic.twitter.com/EF91d1oGMl
— PMO India (@PMOIndia) December 31, 2017