अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 22-23 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या हवामान विषयावरील नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधान 22 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान होणाऱ्या पहिल्या सत्रात “Our Collective Sprint to 2030” यावर आपले विचार मांडतील.
या शिखर परिषदेत जगातील सुमारे 40 अन्य नेते सहभागी होत आहेत. मेजर इकॉनॉमीज फोरमचे सदस्य असलेल्या देशांचे आणि हवामान बदलाचा धोका असलेल्या देशांचे ते प्रतिनिधित्व करतील (भारत याचा सदस्य आहे). हवामानातील बदल, हवामानसंबंधी उपाययोजनांत वाढ, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अर्थसहाय्य जमवणे, निसर्ग आधारित उपाय, हवामान सुरक्षा तसेच स्वच्छ उर्जेसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यावर नेते आपली मते व्यक्त करतील.
राष्ट्रीय परिस्थिती आणि शाश्वत विकासाच्या प्राथमिकतांचा आदर करतांना सर्वसमावेशक आणि लवचिक आर्थिक विकासाशी हवामान कृतीची जग कशी सांगड घालू शकेल यावरही नेते चर्चा करतील.
नोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सीओपी 26 च्या अनुषंगाने हवामानविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या जागतिक बैठकांच्या मालिकेचा ही शिखर परिषद एक भाग आहे.
सर्व सत्रे थेट प्रक्षेपित केली जातील आणि माध्यमे व लोकांसाठी खुली असतील.