कुवैतमध्ये राहणारा अनिवासी भारतीय विद्यार्थी रिद्धिराज कुमार याने सैन्य दल कल्याण निधीसाठी 18 हजार रुपयांचा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला . त्याला एसीईआरकडून पारितोषिक म्हणून 80 कुवेती दिनार अर्थात 18 हजार रुपये मिळाले होते. रिद्धिराज कुमारने आज नवी दिल्ली येथे त्याच्या आईसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कुवैतमधल्या इंडियन एज्युकेशन स्कूल मधील रिद्धिराज कुमारला ऑस्ट्रेलियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अर्थात एसीईआर तर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिक्षेत पुरस्कार मिळाला होता. रिद्धिराजने गणित आणि विज्ञान परिक्षेत उत्तम यश मिळवल्याबद्दल त्याला एकूण 80 कुवेती दिनारचे पारितोषिक मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिद्धिराज याच्या दानशूरपणाबद्दल तसेच शैक्षणिक प्राविण्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. रिद्धिराजने अनेक विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पात काम केल्याची माहितीही पंतप्रधानांनी करुन घेतली.
रिद्धिराजची आई कृपा भट्ट यांनी “प्रत्येक मूल अलौकिक कार्यक्षम” या प्रकल्पावर काम करत असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. तसेच मुलांमधील प्रतिभा शोधण्यासाठी शिक्षकांकरता भारतात मोफत अभ्यासवर्ग घेत असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. नाविन्यपूर्ण शिक्षण प्रकल्पांबद्दल माहिती सर्वत्र पोहोचवण्यासाठी कृपा भट्ट यांच्या कटीबद्धतेबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.