पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने माझ्या प्रिय देशवासियांना अभिवादन. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! आपला तिरंगा केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर आपल्या देशावर अपार प्रेम करणाऱ्या जगभरातील भारतीयांकडून अभिमानाने, सन्मानाने आणि गौरवाने फडकवला जाताना पाहून आनंद होतो.
- सर्व देशवासीय पूज्य बापू, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांचे ऋणी आहेत. या थोरांनी आपले सर्वस्व राष्ट्रासाठी कर्तव्याच्या पथावर झोकून दिले. कर्तव्याचा मार्ग हा त्यांचा एकमेव जीवन मार्ग आहे.
- मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल आणि ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवून टाकणाऱ्या असंख्य क्रांतिकारकांचा हा देश ऋणी आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई, दुर्गा भाभी, राणी गैदिनलिऊ, राणी चेन्नम्मा, बेगम हजरत महल, वेलू नचियार आदींनी भारताच्या स्त्रीशक्तीचा साक्षात्कार घडवला. त्या शूर महिलांचे हे राष्ट्र कृतज्ञ आहे.
- देशासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्यानंतर देशाची उभारणी केली अशा डॉ. राजेंद्र प्रसादजी, नेहरूजी, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, लाल बहादूर शास्त्री, दीनदयाल उपाध्याय, जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे, नानाजी देशमुख, सुब्रमण्यम भारती यांसारख्या अगणित महापुरुषांना आदरांजली वाहण्याची आज संधी आहे.
- आपण स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलतो तेव्हा जंगलात राहणाऱ्या आपल्या आदिवासी समाजाचा अभिमान बाळगण्यास विसरूच शकत नाही. भगवान बिरसा मुंडा, सिद्धू-कान्हू, अल्लुरी सीताराम राजू, गोविंद गुरू अशी असंख्य नावे आहेत, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बुलंद केला. माझ्या आदिवासी बांधव-भगिनी, माता आणि तरुणांना मातृभूमीसाठी जगण्याची आणि प्राणाची बाजी लावण्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यलढ्याला अनेक पैलू लाभले हे देशाचे भाग्य आहे.
- गेल्या वर्षभरापासून देश कशाप्रकारे ‘अमृत महोत्सव’ साजरा करत आहे, याचे आपण साक्षीदार आहोत. याची सुरुवात 2021 मध्ये दांडी यात्रेने झाली. स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’च्या उद्दिष्टांची व्याप्ती वाढवण्यासाठी लोकांनी प्रत्येक जिल्ह्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम घेतले. एकाच उद्देशाने एवढा मोठा आणि सर्वसमावेशक उत्सव साजरा होण्याची ही इतिहासात कदाचित पहिलीच वेळ होती.
- ज्या महापुरुषांचा काही कारणास्तव इतिहासात उल्लेख सापडत नाही किंवा जे विस्मृतीत गेले आहेत, अशा सर्व महापुरुषांचे स्मरण करण्याचा प्रयत्न भारताच्या कानाकोपऱ्यात झाला. साऱ्या देशाने आज देशाच्या कानाकोपऱ्यातून असे सर्व वीर आणि महापुरुष शोधून काढले आणि त्यांच्या बलिदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहिली. या सर्व महापुरुषांना ‘अमृत महोत्सवा’त आदरांजली वाहण्याची ही संधी होती.
- आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, गेल्या 75 वर्षात ज्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पण केले, ज्यांनी देशाचे रक्षण केले आणि देशाचे संकल्प पूर्ण केले त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्याची संधी आहे; मग ते लष्कराचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नोकरशहा, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासक, राज्य प्रशासन किंवा केंद्र प्रशासन असोत. आपण आज देशातील कोट्यवधी नागरिकांनी दिलेल्या योगदानाचेही स्मरण केले पाहिजे ज्यांनी 75 वर्षांत विविध आव्हाने असतानाही देशाला पुढे नेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
- 75 वर्षांचा हा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. चांगल्या आणि वाईट काळात आपल्या देशवासीयांनी विविध प्रकारची कामगिरी केली आहे; त्यांनी प्रयत्न केले आणि हार मानली नाही. त्यांनी संकल्प ढळू दिले नाहीत.
- जगाला हे ठाऊक नव्हते की भारतामध्ये सशक्त संस्कृती आणि मूल्यांची अंतर्निहित क्षमता आहे, विचारांचे बंधन, मन आणि आत्म्यामध्ये खोलवर रुजलेले आहे; ते म्हणजे - भारत ही सर्व लोकशाहीची जननी आहे. ज्यांच्या मनात लोकशाहीची धडपड आहे ते जेव्हा दृढनिश्चयाने मार्गक्रमण करतात तेव्हा ते जगातील सर्वात शक्तिशाली राजवटींसाठीही आव्हान म्हणून उभे ठाकतात. या लोकशाहीच्या जन्मदात्रीने, आपल्या भारताने आपल्यात हे अमूल्य सामर्थ्य असल्याचे सिद्ध केले आहे.
- 75 वर्षांच्या प्रवासात, आशा, आकांक्षा, चढ-उतार या सर्वांच्याच प्रयत्नाने आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. 2014 मध्ये माझ्या देशवासियांनी मला ही जबाबदारी दिली, तेव्हा मी स्वतंत्र भारतात जन्मलेला पहिला भारतीय होतो, ज्याला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माझ्या प्रिय देशवासियांच्या गौरवाचे गुणगान गाण्याचा बहुमान मिळाला.
- भारताच्या पूर्व किंवा पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण, समुद्रतट किंवा हिमालयाच्या शिखरांच्या सर्वात दूरच्या अक्षांश आणि रेखांशांमधून, मी कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी आणि महात्मा गांधींजींचा समावेशक दृष्टीकोन पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. शेवटच्या पायरीवर बसलेल्या व्यक्तीला सशक्त बनवण्याच्या आणि त्याच्या उत्थानासाठी मी स्वतःला वचनबद्ध केले आहे.
- आपण आज अमृत महोत्सवाच्या 75 व्या गौरवशाली वर्षाची सुरुवात करत आहोत. 76 व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी, अशा अफाट संपन्न राष्ट्राला पाहून मला अभिमान वाटतो.
- देशातील प्रत्येक नागरिकाला परिस्थिती बदलायची आहे, परिस्थिती बदललेली पाहायची आहे, आता वाट बघायला तो तयार नाही. या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर व्हाव्यात असे त्याला वाटते आणि ते आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून त्याला करायचे आहे. माझा विश्वास आहे की ते केंद्र सरकार असो, राज्य सरकारे असोत, स्थानिक स्वराज्य संस्था असोत, कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था असो, प्रत्येकाने या महत्वाकांक्षी समाजाला उत्तरदायी असले पाहिजे. त्यांच्या आकांक्षांसाठी आपण जास्त वेळ थांबू शकत नाही.
- आपल्या आकांक्षित समाजाने दीर्घकाळ वाट पाहिली आहे. आता ते आपल्या भावी पिढ्यांना प्रतिक्षेत जगायला भाग पाडायला तयार नाहीत. म्हणूनच या ‘अमृत काल’ची पहिली पहाट आपल्यासाठी त्या आकांक्षित समाजाच्या आकांक्षा पूर्ण करण्याची एक मोठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे.
- अलीकडे, आपण अशा एक-दोन शक्ती पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत आणि त्या म्हणजे भारतातील सामूहिक चेतना पुनर्जागरण. मला वाटते की हे चेतनेचे जागरण, हे नवजागरण, ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. 10 ऑगस्टपर्यंत देशातील सामर्थ्याची जाणीव लोकांनाही नव्हती. पण गेल्या तीन दिवसांपासून देशाने ज्या पद्धतीने तिरंग्याची यात्रा साजरी केली आहे, तिरंग्याने दाखवलेल्या माझ्या देशातील शक्तीची कल्पना समाजशास्त्रातील आघाडीच्या तज्ञांनाही करता येणार नाही.
- जग भारताकडे अभिमानाने आणि अपेक्षेने पाहत आहे. भारताच्या भूमीत जग समस्यांवर उपाय शोधत आहे. जगात झालेला हा बदल, जगाच्या विचारसरणीत झालेला हा बदल, आपल्या 75 वर्षांच्या अनुभवी प्रवासाचा परिणाम आहे.
- अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद प्रत्यक्षात कुठे आहे हे जगाला उमजू लागले आहे. मी याकडे त्रिशक्ती म्हणून पाहतो. मी तिला तिहेरी शक्ती किंवा त्रि-शक्ती, म्हणजे आकांक्षा, पुनर्जागरण आणि जगाच्या अपेक्षा म्हणून पाहतो. त्याची पूर्तता करण्यासाठी आज भारतावर जगाचा असलेला विश्वास जागृत करण्यात माझ्या देशवासीयांचा मोठा वाटा आहे, याची आम्हाला जाणीव आहे.
- 130 कोटी देशवासीयांनी अनेक दशकांच्या अनुभवानंतर जगाला स्थिर सरकारचे महत्त्व, राजकीय स्थिरतेची ताकद, धोरणे आणि धोरणांवर विश्वास कसा निर्माण होतो हे दाखवून दिले आहे. जगालाही आता ते समजू लागले आहे. आता जेव्हा राजकीय स्थैर्य, धोरणांमध्ये गतिमानता, निर्णयप्रक्रियेत गती, सर्वव्यापकता आणि सार्वत्रिक विश्वास आहे, तेव्हा सर्वजण विकासाचे भागीदार बनायला आतूर आहेत.
- सबका साथ, सबका विकास या मंत्राने आम्ही आमचा प्रवास सुरू केला होता, पण हळूहळू देशवासीयांनी सबका विश्वास आणि सबका प्रयासने त्यात आणखी रंग भरले आहेत. यातून आपण आपली सामूहिक शक्ती आणि सामूहिक क्षमता पाहिली आहे.
- आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बांधण्याच्या मोहिमेद्वारे, साजरा केला जातो आहे. प्रत्येक खेड्यातील लोक या मोहिमेत सहभाग घेत आहेत आणि सेवा देत आहेत. आपल्या प्रयत्नांतून हे लोक आपापल्या खेड्यांत जल संवर्धनाची एक मोठी मोहीम राबवत आहेत.
- आज मी 130 कोटी देशबांधवांच्या शक्ती विषयी बोलतो आहे. लाल किल्ल्याच्या बुरुजावरून त्यांच्या स्वप्नांचा साक्षीदार बनतो आहे आणि त्यांचा निश्चय अनुभवू शकतो आहे, तेव्हा मला असं वाटतं की आपण आपलं लक्ष येत्या 25 वर्षांच्या ‘पंच प्रण’ म्हणजेच पाच संकल्पावर केंद्रित करायला हवं. आपण आपला निश्चय आणि शक्तीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे पंच प्रण आत्मसात करून आपण सर्व स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्न 2047 पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल.
- अमृत काळाचे पंच प्रण - विकसित भारताचे घ्येय, वसाहतवादी विचार पूर्णपणे काढून टाकणे, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे, नागरिकांमध्ये एकता आणि कर्तव्याची भावना निर्माण करणे.
- स्पर्धात्मक संघराज्य रचना ही काळाची गरज आहे. विविध क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी राज्या-राज्यांत निकोप स्पर्धा असायला हवी.
- जेव्हा मी माझ्या पहिल्या भाषणात स्वच्छते विषयी बोललो, तेव्हा संपूर्ण देशाने त्याचा स्वीकार केला. प्रत्येकाने आपापल्या परीने स्वच्छतेकडे वाटचाल केली आणि आता अस्वच्छतेविषयी सर्वांच्या मनात रतिटकारा निर्माण झाला आहे. हा एक देश ज्याने हे केले आणि, करत आहे आणि भविष्यातही करत राहील. उघड्यावर शौच करण्यापासून मुक्तता भारतात आज शक्य झाली आहे.
- जेव्हा संपूर्ण जग द्विधा मनःस्थितीत होते, हा एक असा देश आहे ज्याने कालबद्ध पद्धतीने लसींच्या 200 कोटी मात्रांचे लक्ष्य पूर्ण केले आणि आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले.
- आपण अखाती देशांवर इंधनासाठी अवलंबून आहोत. आता आपण जैव - तेलाचा वापर करण्याचे ठरविले आहे. दहा टक्के इथेनॉल मिश्रण हे एका मोठ्या स्वपानासारखे वाटत होते. जुने अनुभव बघता, हे केवळ अशक्य आहे असे वाटत होते, मात्र, देशाने 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे स्वप्न वेळेच्या आधीच पूर्ण केले आहे.
- इतक्या कमी वेळात 2.5 कोटी लोकांना वीज जोडण्या देणे हे काही सोपे काम नव्हते, पण देशाने ते करून दाखवले. आज देश वेगाने लाखो कुटुंबांच्या घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
- एकदा का आपण ठरवले तर आपण आपले ध्येय गाठू शकतो हे आपण अनुभवातून शिकलो आहोत. मग ते अक्षय उर्जेचे ध्येय असो, देशात नवी वैद्यकीय महाविद्यालये बांधणे असो किंवा डॉक्टरांची चमू तयार करणे असो, प्रत्येक क्षेत्रात वेग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
- बंधुंनो, किती काळ जग आपल्याला प्रमाणपत्र देत राहणार आहे? किती काळ आपण जगाच्या प्रमाणपात्रांवर जगणार आहोत? आपण आपली मानके बनवायला नकोत का? इतका मोठा 130 कोटींचा देश, आपले मापदंड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही का? कुठल्याही परिस्थितीत आपण दुसऱ्यासारखे होण्याचा प्रयत्न करता कामा नये. आपण आपल्या क्षमतेनुसार प्रगती करावी ही आपली मानसिकता असायला हवी. आपल्याला गुलामीपासून मुक्तता हवी आहे. अगदी साता समुद्राच्या खोली इतक्या अंतरावरही आपल्या मनात गुलामगीरी राहायला नाको.
- ज्या प्रकारे, गहन चर्चा करून, अनेक लोकांच्या कल्पनांचे आदानप्रदान करून देशाच्या शिक्षण धोरणात अमुलाग्र बदल घडवून आणणरे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे, त्याकडे मी अतिशय आशेने बघतो आहे. ज्या कौशल्यावर आपण भर देत आहोत ती अशी एक शक्ती आहे, जी आपल्याला गुलामगीरीतून मुक्त होण्याची शक्ती देईल.
- अनेकदा आपण बघतो की आपले कौशल्य अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून जाते. हा गुलाम मानसिकतेचा परिणाम आहे. आपल्याला देशातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान असायला पाहिजे. आपल्याला ती भाषा येत असो अथवा नसो, पण आपल्याला त्याचा अभिमान असायला पाहिजे, कारण ती आपल्या देशातली भाषा आहे आणि ती आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली आहे.
- आज आपण डिजिटल भारताची संरचना बघत आहोत. आपण स्टार्टअप्स बघत आहोत. हे लोक कोण आहेत? हे ते कुशल लोक आहेत जे श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांत राहतात, किंवा खेड्यात राहतात, गरीब कुटुंबातले आहेत. ही आपली नवी पिढी आहे जी नवीन संशोधन घेऊन जगापुढे येत आहे.
- आज जग सर्वंकष आरोग्य सेवा यावर चर्चा करत आहे. पण जेव्हा जगात सर्वंकष आरोग्य सेवा या विषयावर चर्चा केली जाते, तेव्हा भारताच्या योगाकडे, भारताच्या आयुर्वेदाकडे आणि भारताच्या सर्वंकष जीवनशैलीकडे बघितले जाते. हा आपला वारसा आहे, जो आपण जगाला देत आहोत.
- जगावर आज याचा प्रभाव पडतो आहे. आता आपल्या शक्तीकडे बघा. आपण ते लोक आहोत, ज्यांना निसर्गासोबत कसे जगायचे हे माहित आहे. धान आणि भरडधान्य हे आपल्या घराघरातले प्रकार आहेत. हा आपला वारसा आहे. आपल्या लहान शेतकऱ्यांच्या कष्टामुळे, लहान लहान शेतात धान पिकू लागले. आज जग अंतरराष्ट्रीय स्तरावर भरड धान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेत आहे. याचा अर्थ असा आहे की आज आपल्या परंपरेची जगभरात प्रशंसा होत आहे. आपण याचा अभिमान बाळगायला शिकले पहिजे. आपल्याकडे जगाला देण्यासारखे खूप काही आहे.
- आपण झाडांमध्ये देव शोधणारे लोक आहोत. आपण नदीला माता मानणारे लोक आहोत. आपण प्रत्येक दगडात शिव शोधणारे लोक आहोत. ही आपली शक्ती आहे. आपण प्रत्येक नदीला आईच्या रुपात बघतो. निसर्गाची ही भव्यता आपला अभिमान आहे! जेव्हा अशा वारशाचा आपल्याला अभिमान वाटेल, तेव्हा जगाला देखील त्याचा अभिमान वाटेल.
- आज जग एका अतिशय कठीण संकटाचा सामना करत आहे. वर्चस्वाच्या भावनेतून उद्भवलेल्या संकटाचा, जी सर्व समस्यांचे मूळ आहे. यावर तोडगा काढण्याचे ज्ञान आपल्याकडे आहे. आपले विचारवंत सांगून गेले आहेत, ‘एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति।’अर्थात, अंतिम सत्य एकच आहे मात्र ते विकसित होण्याचे मार्ग अनेक आहेत. हे आपले वैभव आहे.
- आपण ते लोक आहोत, जे जगाच्या कल्याणाचा विचार करतो, आपण केवळ आपल्या लोकांच्याच नाही तर जगातील सर्वांच्या सामाजिक कल्याणाच्या मार्गावर आहोत, कारण आपण ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः’ हे तत्व मानतो. सर्व लोक आनंदी राहावे आणि त्यांची भरभराट व्हावी, सर्व लोक आजारांपासून दूर राहावेत, जे जे पवित्र आहे ते सर्व लोकांनी बघावे आणि कुणालाच काही त्रास होऊ नये.
- याच प्रकारे, दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, एकता आणि एकजूट. आपल्या विशाल देशाचे वैविध्य आपण साजरे करायला हवे. अनेक परंपरा आणि पंथ इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यासाठी सर्व समान आहेत. कुणीच ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही. सर्व लोक आपले आहेत. ही भावना एकतेसाठी महत्वाची आहे.
- माझ्या बंधू आणि भगिनींनो, या लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन मला माझी एक व्यथा तुमच्यासमोर मांडायची आहे.मला आता जे तुम्हाला सांगायचे आहे, ते खरेतर फार त्रासदायक आहे. ते म्हणजे आपल्या दैनंदिन जगण्यात, वागण्यात एक विकृती आली आहे. आपण अतिशय निष्काळजीपणे असे काही शब्द वापरतो जे महिलांविषयी असभ्य टिप्पणी करणारे, अवमानकारक शब्द असतात. अशा व्यवहारापासून मुक्त होण्याची प्रतिज्ञा करु शकतो का? आपली संस्कृती आणि संस्कार यांच्या मदतीने आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातून महिलांबद्दलचे अपशब्द दूर करु शकतो का? भारताची स्वप्ने पूर्ण करण्यात महिलांची भूमिका अत्यन्त महत्वाची ठरणार आहे. त्यांची ही शक्ती मला दिसते आहे आणि म्हणूनच महिलांविषयक अपशब्द बोलणे टाळावे असा माझा आग्रह आहे.
- 24 तास वीज देण्यासाठी प्रयत्न करणे हे सरकारचे काम आहे, पण जास्तीत जास्त युनिट्स वाचवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक शेताला पाणी पुरवठा करणे ही सरकारची जबाबदारी आणि प्रयत्न आहे, पण माझ्या प्रत्येक शेतातून आवाज यायला हवा की 'पर ड्रॉप मोअर क्रॉप'वर लक्ष केंद्रित करून पाणी बचत करून पुढे जाऊ. रसायनमुक्त शेती, सेंद्रीय शेती आणि नैसर्गिक शेती करणे हे आपले कर्तव्य आहे.
- मित्रांनो, पोलीस असोत वा जनता, राज्यकर्ते असोत वा प्रशासक, या नागरी कर्तव्यापासून कोणीही दूर राहू शकत नाही. जर प्रत्येकाने नागरिकाची कर्तव्ये पार पाडली तर मला खात्री आहे की आपण वेळेपूर्वीच अपेक्षित उद्दिष्टे साध्य करू शकू.
- महर्षी अरबिंदो यांची आज जयंती आहे. मी त्या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक होत आहे. परंतु आपण ‘स्वदेशी ते स्वराज’ आणि ‘स्वराज ते सुराज’ अशी हाक देणाऱ्या या महापुरुषाचे स्मरण करायला हवे. हा त्यांचा मंत्र आहे. आणि म्हणूनच ‘आत्मनिर्भर भारत’ ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची आणि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी बनते. ‘आत्मनिर्भर भारत’ हा काही सरकारी कार्यक्रम किंवा सरकारी विषय नाही. हे एका समाजाचे जनआंदोलन आहे, जे आपल्याला पुढे न्यायचे आहे.
- मित्रांनो, आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आपण हा आवाज ऐकला, ज्यासाठी आपले कान आसुसलेले होते. 75 वर्षांनंतर प्रथमच मेड इन इंडिया तोफेने लाल किल्ल्यावरून तिरंग्याला सलामी दिली आहे. असा कोणी भारतीय असेल का जो या आवाजाने प्रेरित होणार नाही?
- माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मला माझ्या देशाच्या सैन्य दलातील सैनिकांचे मनापासून अभिनंदन करायचे आहे. लष्करातल्या जवानांनी ज्या प्रकारे संघटित पद्धतीने आणि धैर्याने स्वावलंबनाची ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे, त्याला मी सलाम करतो. जेव्हा सशस्त्र दलांनी यादी बनवली आणि 300 संरक्षण उत्पादने आयात न करण्याचा निर्णय घेतला तो आपल्या देशाचा संकल्प लहान नाही.
- पीएलआय स्कीमबद्दल बोलायचे झाले तर जगभरातून लोक आपले नशीब आजमावण्यासाठी भारतात येत आहेत. सोबत नवनवीन तंत्रज्ञान आणत आहेत. त्यातून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. भारत एक उत्पादन केंद्र बनत आहे. ते स्वावलंबी भारताचा पाया तयार करत आहे.
- इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन असो किंवा मोबाईल फोन, आज देश अतिशय वेगाने प्रगती करत आहे. आपल्या ब्राह्मोसची जगाला निर्यात झाल्यावर कोणत्या भारतीयाला अभिमान वाटणार नाही? आज वंदे भारत ट्रेन आणि आमचे मेट्रोचे डबे जगासाठी आकर्षणाची वस्तू बनत आहेत.
- ऊर्जा क्षेत्रात आपल्याला स्वावलंबी व्हायचे आहे. उर्जेच्या क्षेत्रात आपण किती काळ इतरांवर अवलंबून राहणार आहोत? आपण सौरऊर्जा, पवन ऊर्जा, विविध नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या क्षेत्रात स्वावलंबी असले पाहिजे आणि मिशन हायड्रोजन, जैव इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत आघाडी घेतली पाहिजे.
- आज नैसर्गिक शेती हा देखील स्वावलंबी होण्याचा एक मार्ग आहे. आज नॅनो फर्टिलायझरच्या कारखान्यांनी देशात नवी आशा निर्माण केली आहे. मात्र नैसर्गिक शेती आणि रसायनमुक्त शेती स्वावलंबनाला चालना देऊ शकते. आज देशात हरित नोकऱ्यांच्या रूपात रोजगाराच्या नवीन संधी खूप वेगाने उपलब्ध होत आहेत.
- भारताने आपल्या धोरणांमुळे अनेक मार्ग खुले केले आहेत. ड्रोनबाबत भारताने जगातील सर्वात प्रगतीशील धोरण आणले आहे. देशातील तरुणांसाठी आम्ही संधींची नवीन दारे खुली केली आहेत.
- मी खाजगी क्षेत्रालाही पुढे येण्याचे आवाहन करतो. जगावर प्रभुत्व मिळवायचे आहे. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नांपैकी एक म्हणजे जगाच्या गरजा पूर्ण करण्यात भारत मागे राहू नये हे सुनिश्चित करणे. जरी ते एमएसएमईचे असले तरी, आम्हाला आमची उत्पादने झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्टसह जगासमोर न्यावी लागतील. स्वदेशीबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा.
- आजपर्यंत आपण आपल्या पूज्य लाल बहादूर शास्त्रीजींचे त्यांच्या जय जवान जय किसानच्या प्रेरणादायी आवाहनासाठी नेहमी स्मरण करतो, ज्याचा अर्थ “सैनिकांचा जय असो, शेतकर्यांचा जय असो. नंतर अटलबिहारी वाजपेयीजींनी जय विज्ञानाचा एक नवीन दुवा जोडला ज्याचा अर्थ " विज्ञानाचा विजय होवो " असा होतो आणि आम्ही त्याला अत्यंत महत्त्व दिले. पण अमृतकाळाच्या या नव्या टप्प्यात आता जय अनुसंधान जोडणे अत्यावश्यक आहे, जो “नवोन्मेषाचा जयजयकार” आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान.
- आज आपण 5G युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहोत. जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रत्येक गावात शेवटच्या मैलापर्यंत ऑप्टिकल फायबर पोहोचेल याची आम्ही खात्री करत आहोत. ग्रामीण भारताच्या माध्यमातून डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होईल याची मला पूर्ण माहिती आहे. आज मला आनंद होत आहे की भारतातील चार लाख सामायिक सेवा केंद्र गावांमध्ये विकसित होत आहेत, ज्यांचे व्यवस्थापन त्या गावातील तरुण करत आहेत.
- सेमीकंडक्टर विकसित करणे, 5G युगात प्रवेश करणे, ऑप्टिकल फायबर्सचे जाळे पसरवणे अशी ही डिजिटल इंडिया चळवळ केवळ स्वतःला आधुनिक आणि विकसित म्हणून स्थापित करण्यासाठी नाही तर तीन आंतरिक मोहिमांमुळे हे शक्य झाले आहे. शैक्षणिक संस्थांचे संपूर्ण परिवर्तन, आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती आणि नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा हे डिजिटलायझेशनमुळेच शक्य होणार आहे.
- मित्रांनो, मानवतेसाठी तंत्रज्ञान युग म्हणून ओळखल्या जाणार्या या दशकात भारत अभूतपूर्वपणे पुढे जाईल याची मी पूर्वकल्पना करू शकतो. हे तंत्रज्ञानाचे दशक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर गणला जाणारा शक्ती बनला आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात योगदान देण्यासाठी आमच्याकडे क्षमता आहेत.
- आपली अटल इनोव्हेशन मिशन, आपले इनक्युबेशन सेंटर्स, आपले स्टार्टअप संपूर्ण नवीन क्षेत्र विकसित करत आहेत, तरुण पिढीसाठी नवीन संधी उघडत आहेत. अंतराळ मोहिमेचा विषय असो, आपल्या खोल महासागर मोहिमेचा असो, आपल्याला समुद्रात खोलवर जायचे असेल किंवा आपल्याला आकाशाला स्पर्श करायचा असेल, ही नवीन क्षेत्रे आहेत, ज्याद्वारे आपण पुढे जात आहोत.
- आपण आपले छोटे शेतकरी, उद्योजक, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग, कुटीर उद्योग, सूक्ष्म उद्योग, रस्त्यावरील विक्रेते, घरगुती मजूर, रोजंदारी मजूर, ऑटो रिक्षा चालक, बस सेवा पुरवठादार इत्यादींची क्षमता ओळखून त्यांना बळकट केले पाहिजे. ही सर्वात मोठी लोकसंख्या आहे जिला सक्षम करणे आवश्यक आहे.
- गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून मला काही सांगायचे आहे. न्यायपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या न्यायालयांमध्ये ‘नारी शक्ती’ची ताकद तुम्ही पाहिली असेलच. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकडे बघा. आपली ‘नारी शक्ती’ आपल्या गावातील समस्या सोडवण्यात निष्ठेने गुंतलेली आहे. ज्ञान किंवा विज्ञानाच्या क्षेत्राकडे बघा, आपल्या देशाची ‘नारी शक्ती’ तिथेही दिसते. इतकेच नव्हे तर पोलीस दलातही आपली ‘नारी शक्ती’ जनतेच्या रक्षणाची जबाबदारी घेत आहे.
- जीवनाच्या प्रत्येक वाटचालीत, मग ते क्रीडांगण असो किंवा रणांगण, भारताची ‘नारी शक्ती’ एका नव्या ताकदीने आणि नव्या विश्वासाने पुढे येत आहे. भारताच्या 75 वर्षांच्या वाटचालीतील योगदानाच्या तुलनेत 'नारी शक्ती'चे, माझ्या माता, बहिणी आणि मुलींचे पुढील 25 वर्षांत अनेक पटींनी योगदान मला दिसते आहे. आपण या पैलूकडे जितके लक्ष देऊ आणि आपल्या मुलींना जितक्या अधिक संधी आणि सुविधा देऊ, त्या आपल्याला त्यापेक्षा कितीतरी जास्त परत करतील. त्या देशाला एका नव्या उंचीवर नेतील.
- आपल्या देशात अशी अनेक राज्ये आहेत, ज्यांनी देशाला पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, अनेक क्षेत्रात नेतृत्व करत उदाहरण म्हणून पाहिले जाईल असे काम केले आहे. यामुळे आपल्या संघराज्यवादाला बळ मिळते. पण आज काळाची गरज आहे की आपल्याला सहकारी संघराज्याबरोबरच सहकारी स्पर्धात्मक संघराज्याचीही गरज आहे. आपल्याला विकासासाठी स्पर्धेची गरज आहे.
- मला प्रत्येक गोष्टीवर चर्चा करायची नाही पण दोन मुद्द्यांवर नक्कीच लक्ष केंद्रित करायचे आहे. एक म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरा घराणेशाही. आपल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढायचे आहे. गेल्या आठ वर्षात थेट लाभ हस्तांतरण , आधार आणि मोबाईल अशा सर्व आधुनिक प्रणालींचा वापर करून चुकीच्या हातात गेलेले दोन लाख कोटी रुपये वाचवून देशाच्या भल्यासाठी काम करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
- मागील सरकारच्या कार्यकाळात बँका लुटून जे देश सोडून पळाले, त्यांची मालमत्ता आम्ही जप्त केली असून त्यांना परत देशात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काही जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ज्यांनी देशाची लूट केली त्यांनी देशात परत यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- बंधू-भगिनींनो, हे भ्रष्टाचारी देशाला वाळवीप्रमाणे खात आहेत. मला त्याविरुद्ध लढायचे आहे, लढा अधिक तीव्र करायचा आहे आणि निर्णायक टप्प्यावर घेऊन जायचे आहे. तेव्हा, माझ्या 130 कोटी देशवासियांनो, मला आशीर्वाद द्या आणि मला साथ द्या! ही लढाई मला लढता यावी यासाठी आज मी तुमचा पाठिंबा आणि सहकार्य मागण्यासाठी आलो आहे. मला आशा आहे की या युद्धात देशाचा विजय होईल.
- भ्रष्टाचाराच्या खटल्यांमध्ये कोर्टात शिक्षा होऊनही किंवा अशा प्रकरणामध्ये तुरुंगवास भोगलेल्यांचेही काही जण गोडवे गातात. ही खरोखरच खेदजनक स्थिती आहे. त्यामुळे जोपर्यंत समाजात भ्रष्टाचार्यांविरुद्ध द्वेषाची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत ही मानसिकता संपणार नाही.
- दुसरीकडे, मला घराणेशाहीबद्दल चर्चा करायची आहे आणि जेव्हा मी घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटते की, मी फक्त राजकारणातील घराणेशाही वादावर बोलतो आहे, परंतु वास्तव हे आहे की ही अस्वस्थता देशातील सर्व संस्थांमध्ये पसरली आहे, ज्याचा प्रतिभा आणि संधीवर विपरित परिणाम होतो. म्हणून मी लाल किल्ल्याच्या प्राचिरवरून देशातील जनतेला आवाहन करतो की, भारतीय राज्यघटनेच्या खर्या भावनेने, भारताचे राजकारण आणि देशाच्या सर्व संस्थांचे अंतर्मन शुद्ध करणासाठी तिरंग्याखाली प्रतिज्ञा घ्यावी.
- मी देशवासियांना आवाहन करतो की, नव्या संधी जाणून घेऊन नवे संकल्प ओळखून आणि आत्मविश्वासाने पुढे जात आजच ‘अमृत काल’ ची सुरुवात करा. स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ ‘अमृत काल’ च्या दिशेने वाटचाल करत आहे आणि म्हणूनच या ‘अमृत काल’मध्ये ‘सबका प्रयास’ (प्रत्येकाचे प्रयत्न) आवश्यक आहेत. टीम इंडियाचा उत्साह देशाला पुढे घेऊन जाणार आहे. 130 कोटी देशवासीयांची ही टीम इंडिया एक संघ होऊन अग्रेसर होत देशाची सर्व स्वप्ने साकार करेल.