People are making new efforts for water conservation with full awareness and responsibility: PM Modi
PM Modi praises Pakaria village residents for innovative water recharge systems
The month of 'Sawan' has been very important from the spiritual as well as cultural point of view: PM Modi
Now more than 10 crore tourists are reaching Kashi every year. The number of devotees visiting pilgrimages like Ayodhya, Mathura, Ujjain is also increasing rapidly: PM
America has returned to us more than a hundred rare and ancient artefacts which are from 2500 to 250 years old: PM
The changes that have been made in the Haj Policy in the last few years are being highly appreciated: PM Modi
Increasing participation of youth in the campaign against drug abuse is very encouraging: PM Modi
'Meri Mati Mera Desh' campaign will be started to honour the martyred heroes: PM Modi

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे. 

मित्रांनो, पावसाळ्याचा हा काळ ‘वृक्षारोपण आणि ‘जलसंरक्षण’ यांच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’च्या दरम्यान निर्माण झालेले 60 हजारहून जास्त अमृत सरोवरांच्या परिसराची चमकदमक वाढली आहे. 50 हजाराहून अधिक अमृत सरोवरांच्या निर्मितीचे काम सुद्धा सुरु आहे. आपले देशवासीय संपूर्ण जागरुकता आणि जबाबदारीने जल संरक्षणा’साठी नवनवे प्रयत्न करत आहेत. तुमच्या लक्षात असेल, काही काळापूर्वी मी मध्यप्रदेशात शहडोल येथे गेलो होतो. तिथे माझी भेट पकरिया गावच्या आदिवासी बंधू- भगिनींशी झाली.तिथेच माझी त्यांच्याशी निसर्ग आणि पाणी वाचवण्याबद्दल देखील चर्चा झाली. मला आत्ताच समजले आहे की पकरिया गावच्या आदिवासी बंधू- भगिनींनी या संदर्भात काम सूरू देखील केले आहे. तेथे, प्रशासनाच्या मदतीने लोकांनी सुमारे शंभर विहिरींचे जल पुनर्भरण यंत्रणेत रुपांतर केले. पावसाचे पाणी आता या विहिरींमध्ये पडते, विहिरींतील पाणी जमिनीच्या आत शिरते. यामुळे त्याभागातील भूजल स्तर देखील हळूहळू सुधारत जाईल. आता सगळ्या गावकऱ्यांनी त्या भागातील सुमारे 800 विहिरींना पुनर्भरण करण्यासाठी वापरण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. अशीच एक उत्साहवर्धक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. काही दिवसांपूर्वी, उत्तर प्रदेशात, एका दिवसात 30 कोटी झाडे लावण्याचा विक्रम करण्यात आला. या अभियानाची सुरुवात राज्य सरकारने केली, आणि हे कार्य तेथील लोकांनी पूर्ण केले. असे उपक्रम म्हणजे लोकसहभागासह जनजागृतीची देखील उत्तम उदाहरणे आहेत.आपण सर्वांनीच झाडे लावण्याच्या आणि पाणी वाचवण्याच्या या प्रयत्नांचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या श्रावणाचा पवित्र महिना सुरु आहे. सदाशिव महादेवाच्या आराधनेसोबतच श्रावण महिना हिरवाई आणि आनंदाशी संबंधित असतो. म्हणूनच  श्रावणाच्या अध्यात्मिक दृष्टीकोनाबरोबरच सांस्कृतिक दृष्टीकोनाचे देखील महत्त्व मोठे आहे. श्रावणातील झोपाळे, श्रावणातील मेंदी, श्रावणाचे उत्सव – म्हणजेच श्रावणाचा अर्थच आनंद आणि उत्साह असा होतो.

मित्रांनो, आपला हा विश्वास आणि या परंपरांची आणखी एक बाजू देखील आहे. आपले हे सण आणि परंपरा आपल्याला गतिमानता देतात. श्रावणात शंकराच्या आराधनेसाठी कितीतरी भक्त कावड यात्रेला जातात. ‘श्रावणा’मुळे या काळात 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक जात आहेत. वाराणसीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले हे ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. आता काशीला प्रत्येक वर्षी 10 कोटींहून अधिक पर्यटक पोहोचत आहेत. अयोध्या, मथुरा, उज्जैन यांसारख्या तीर्थक्षेत्री भेट देणाऱ्या भाविकांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. यातून लाखो गरीब लोकांना रोजगार मिळू लागला आहे, त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. हे सगळं, आपल्या सांस्कृतिक जन जागृतीचा परिणाम आहे.आपली तिर्थस्थळे पाहण्यासाठी आता संपूर्ण जगातून लोक भारतत येत आहे.मला अशाच दोन अमेरिकन मित्रांची माहिती मिळाली आहे. ते दोघे कॅलिफोर्नियाहून अमरनाथ यात्रा करण्यासाठी इथे आले होते. या विदेशी पाहुण्यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित स्वामी विवेकानंद यांच्या अनुभवांबद्दल काहीतरी ऐकले होते. त्यामुळे ते इतके प्रेरित झाले की स्वतःच अमरनाथ यात्रा करण्यासाठी भारतात आले. ते या सगळ्याला महादेवाचा आशीर्वाद मानतात. हीच तर भारताची खासियत आहे की हा देश सर्वांचा स्वीकार करतो, सर्वांना काहीनाकाही देतो.अशीच एक फ्रेंच वंशाची स्त्री आहे, शार्लोट शोपा.काही दिवसांपूर्वी मी जेव्हा फ्रान्सला गेलो होतो तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. शार्लोट शोपा एक योग अभ्यासक आहेत, योग शिक्षक आहेत आणि त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांनी शंभरी पार केली आहे.गेल्या 40 वर्षांपासून त्या योग्याभ्यास करत आहेत. स्वतःची तंदुरुस्ती आणि शंभर वर्षांच्या या वयाचे श्रेय त्या योगालाच देतात. त्या जगात भारताचे योग विज्ञान आणि त्याच्या सामर्थ्याचा एक प्रमुख चेहेरा झाल्या आहेत. प्रत्येकाने त्यांच्याकडे बघून शिकले पाहिजे. आपण आपल्या वारशाचा स्वीकार करायला हवा, इतकेच नव्हे तर जबाबदारीने हा वारसा जगासमोर मांडायला हवा. सध्या असाच एक प्रयत्न उज्जैनमध्ये सुरु आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे. तिथे देशभरातील 18 चित्रकार, पुराणांतील गोष्टींवर आधारित आकर्षक चित्रकथा तयार करत आहेत. ही चित्रे, बुंदी शैली, नाथद्वारा शैली, पहाडी शैली तसेच अपभ्रंश शैली अशा काही विशिष्ट शैलींच्या वापरासह तयार करण्यात येतील. या चित्रकथा उज्जैनच्या त्रिवेणी संग्रहालयात मांडणार आहेत. म्हणजेच काही काळानंतर जेव्हा कधी तुम्ही उज्जैनला जाल तेव्हा महाकाल महालोक भगवानासोबत आणखी एका दिव्य स्थानाचे दर्शन तुम्ही घेऊ शकाल.

मित्रांनो, उज्जैन येथे तयार होत असलेल्या या चित्रांबाबत बोलताना मला दुसरे एक अनोखे चित्र आठवले.  राजकोट येथील प्रभात सिंग मोडभाई या कलाकाराने हे चित्र तयार केले. ते चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारलेले होते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांची कुलदेवता ‘तुळजा माते’चे दर्शन घेण्यासाठी जात असताना आजूबाजूचे वातावरण कसे होते याचे चित्रण कलाकार प्रभात भाई यांनी त्यांच्या चित्रात केले होते. आपल्या परंपरा, आपला वारसा यांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना सजवावे लागते, त्यात जगावे लागते, पुढच्या पिढीला त्या शिकवाव्या लागतात.या दिशेने आज अनेक प्रयत्न होत आहेत हे पाहून मला आनंद होतो.

   माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेकदा जेव्हा आपण, इकोलॉजी, फ्लोरा,फौना,बायोडायव्हर्सिटी असे शब्द ऐकतो तेव्हा काही लोकांना असे वाटते की ते काही वेगळे विषय आहेत, यांच्याशी संबंधित तज्ञांचे विषय आहेत, मात्र असे नाही आहे. कारण आपण खरोखरीच निसर्गावर प्रेम करत असू तर आपण आपल्या लहान लहान प्रयत्नांतून सुद्धा खूप काही साध्य करू शकतो. तामिळनाडूमधील वाडावल्ली येथील एक स्नेही आहेत, सुरेश राघवनजी. राघवन यांना चित्रकलेचा छंद आहे. तुम्हाला तर माहित आहेच की चित्रकला कॅनव्हासशी संबंधित काम आहे.पण राघवनजी यांनी ठरवले की ते त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून झाडे-झुडुपे आणि जीवजंतूंच्या माहितीचे जतन करतील. ते विविध फ्लोरा आणि फौना यांची चित्रे काढून त्यांच्याशी संबंधित माहितीचे संकलन करुन ठेवतात.आतापर्यंत त्यांनी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अशा शेकडो पक्षी, प्राणी, ऑर्किड्स यांची चित्रे काढली आहेत. कलेच्या माध्यमातून निसर्गाची सेवा करण्याचे हे उदाहरण खरोखरीच अद्भुत आहे.

 माझ्या प्रिय देशवासियांनो,मी आज तुम्हांला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी, समाज माध्यमांवर एक अद्भुत पद्धतदिसली. अमेरिकेने आपल्याला शंभरहून अधिक दुर्मिळ आणि प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. ही बातमी समजल्यानंतर समाज माध्यमांवर या कलाकृतींच्या बाबतीत खूप चर्चा झाली. तरुणांमध्ये आपल्या वारशाबाबत अभिमानाची भावना दिसून आली. भारतात परत आलेल्या या मुर्त्या अडीच हजारांपासून अडीचशे वर्ष जुन्या आहेत. या दुर्मिळ वस्तूंचे नाते देशाच्या विविध क्षेत्रांशी आहे. या वस्तू टेराकोटा, दगड, धातू आणि लाकूड यांच्यापासून बनवलेल्या आहेत. यापैकी काही वस्तू  अशा आहेत ज्या पाहून तुम्हांला आश्चर्य वाटेल. तुम्ही या वस्तू बघाल तर बघतच राहाल.यामध्ये 11 व्या शतकातील एक अत्यंत देखणी वालुकाश्म शिल्पकृती सुद्धा आहे. हे शिल्प म्हणजे नृत्य मुद्रेतील एक अप्सरा आहे आणि याचे नाते मध्य प्रदेशाशी आहे. यामध्ये चोल युगातील अनेक मुर्त्या देखील आहेत. देवी आणि भगवान मुरुगन यांच्या प्रतिमा तर 12 व्या शतकातील आहेत आणि त्या तामिळनाडूच्या वैभवशाली संस्कृतीशी संबंधित आहेत. गणपतीची सुमारे हजार वर्ष जुनी काशाची मूर्ती देखील भारताला परत करण्यात आली आहे.ललितासनात नंदीवर बसलेल्या उमा-महेश्वर यांची मूर्ती 11 व्या शतकातील आहे असे म्हणतात.दगडात कोरलेल्या जैन तीर्थंकरांच्या दोन मूर्ती देखील भारतात परत आल्या आहेत. सूर्य देवांच्या दोन मूर्ती तुमचे मन मोहून टाकतील. यातील एक मूर्ती वालुकाश्मापासून बनलेली आहे. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये लाकडापासून बनवलेला एक तक्ता आहे ज्यावर समुद्रमंथनाची कथा रेखाटली आहे. 16 -17 व्या शतकातील या वस्तूचा सबंध दक्षिण भारताशी आहे.

मित्रांनो, मी इथे अगदी कमीच नावे घेतली आहेत, तसे बघायला गेले तर ही यादी बरीच मोठी आहे. भारताचा अनमोल वारसा आपल्याला परत करणाऱ्या अमेरिकी सरकारचे मी आभार व्यक्त करु इच्छितो. 2016 आणि 2021 मध्ये जेव्हा मी अमेरिकेला भेट दिली तेव्हा देखील अनेक कलाकृती भारताला परत करण्यात आल्या होत्या. अशा प्रयत्नांमुळे, आपल्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तूंच्या चोरीसंदर्भात देशभरात जागरुकता निर्माण होईल. तसेच देशवासियांची आपल्या समृध्द वारशाप्रती ओढदेखील आणखी वाढेल.

     माझ्या प्रिय देशवासियांनो, देवभूमी उत्तराखंडमधील काही माता आणि भगिनींनी मला जी पत्रे लिहिलीं आहेत ती मनाला भावूक करणारी आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला, स्वतःच्या भावाला अनेकानेक आशीर्वाद दिले आहेत. त्या लिहितात- त्यांनी कधी असा विचार देखील केला नव्हता की आपला सांस्कृतिक वारसा असलेले ‘भोजपत्र’ त्यांच्या उपजीविकेचे साधन होऊ शकते. तुम्ही विचार करत असाल की हे संपूर्ण बाब आहे तरी काय?

          मित्रांनो, मला हीपत्रे लिहिली आहेत, चमोली जिल्ह्यातील नीती-माणा भागातील महिलांनी. या त्याच महिला आहेत ज्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये मला भोजपत्रावर एक अनोखी कलाकृती काढून पाठवली होती. हा उपहार मिळाल्यावर मी खूप भारावून गेलो. कारण, आपल्याकडे प्राचीन काळापासून आपली शास्त्रे आणि ग्रंथ अशाच भोजपत्रांवर जतन करून ठेवली जात आहेत. महाभारत देखील अशाच भोजपत्रांवर लिहिण्यात आले होते. 

आज देवभूमीतील या महिला, भोजपत्रापासून अतिशय सुंदर सुंदर कलाकृती आणि स्मृतिचिन्हे तयार करत आहेत. माझ्या प्रवासात, माणा गावाला जेव्हा मी भेट दिली होती तेव्हा त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाचे मी कौतुक केले होते. मी देवभूमीला येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन केले होते की जास्तीत जास्त स्थानिक उत्पादने खरेदी करा. त्याचा तेथे खूप चांगला परिणाम झाला आहे. 

आज येथे येणाऱ्या प्रवाशांना भोजपत्राची उत्पादने खूप आवडत आहेत आणि ते ती चांगल्या किमतीला विकतही घेत आहेत. उत्तराखंडचा हा भोजपत्रांचा प्राचीन वारसा महिलांच्या आयुष्यात आनंदाचे नवनवे रंग भरतो आहे.मला हे जाणून आनंद झाला की राज्य सरकार भोजपत्रापासून नवीन उत्पादने बनवण्यासाठी महिलांना प्रशिक्षणही देत ​​आहे. भोजपत्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी देखील राज्य सरकारने एक मोहीम सुरु केली आहे. एकेकाळी देशाचे शेवटचे टोक मानले गेलेले क्षेत्र, आता देशातील पहिले गाव मानून, त्याचा विकास होत आहे. आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासोबतच ते आर्थिक प्रगतीचे साधनही बनत आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी 'मन की बात'मध्ये मला अनेक अशी पत्रेही मिळाली आहेत, जी मनाला खूप समाधान देतात.

नुकतीच हज यात्रा पूर्ण केलेल्या मुस्लिम महिलांनी ही पत्रे लिहिली आहेत.त्यांचा हा प्रवास अनेक अर्थाने विशेष आहे.या अशा महिला आहेत ज्यांनी कोणत्याही पुरुष सोबत्याशिवाय किंवा मेहरमशिवाय हजयात्रा केलीआणि ही संख्या पन्नास शंभर नाही तर 4 हजारांपेक्षाही जास्त आहे. हा एक मोठा बदल आहे. पूर्वी , मुस्लिम महिलांना मेहरमशिवाय 'हज' करण्याची परवानगी नव्हती. मी, 'मन की बात'च्या माध्यमातून सौदी अरेबियाच्या सरकारचेही मनःपूर्वक आभार मानतो. मेहरमशिवाय हजला जाणाऱ्या‍या महिलांसाठी, खास महिला समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती.

मित्रांनो, गेल्या काही वर्षात हज धोरणात जे बदल केले गेले आहेत, त्यांचे खूप कौतुक होत आहे. आमच्या मुस्लिम माता आणि भगिनींनी मला याबद्दल खूप लिहिले आहे. आता, अधिकाधिक लोकांना 'हज'ला जाण्याची संधी मिळत आहे. 'हज यात्रा' करून परदेशातून परत आलेल्या लोकांनी विशेषतः आमच्या माता-भगिनींनी पत्रे लिहून जे आशीर्वाद दिले आहेत, ते खूपच प्रेरणादायी आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, जम्मू-काश्मीरमधील संगीत संध्या असेल, उंच भागातील बाइक रॅली/ मोटारसायकल प्रवास असेल, चंदीगडमधील स्थानिक क्लब/ मंडळे असतील किंवा पंजाबमधील क्रीडाक्षेत्रातील अनेक गट असतील, ह्यांचा उल्लेख केला की वाटते ही करमणुकीची चर्चा आहे, साहसाची चर्चा चालू आहे. पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. ही सगळी आयोजने एका समान उद्दिष्टाने केली गेलेली आहेत. हे समान कारण आहे - ड्रग्ज विरुद्ध/ अंमली पदार्थांविरुद्धची जनजागृती मोहीम.

जम्मू-काश्मीरच्या तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न केले गेले आहेत. तिथे संगीत संध्या ( म्युझिकल नाईट), मोटारसायकल प्रवास (बाईक रॅलीज) ह्या सारखे कार्यक्रम होत आहेत. चंदीगडमध्ये हा संदेश पोचवण्यासाठी स्थानिक क्लब्सना/ मंडळांना त्याच्याशी जोडण्यात आले आहे. ते ह्याला VADA (वादा) क्लब/ मंडळ म्हणतात. VADA म्हणजे Victory Against Drugs Abuse.अंमली पदार्थांच्या गैरवापरावर विजय. पंजाब मध्ये असे अनेक क्रीडा गट देखील तयार केले गेले आहेत, जे फिटनेसवर/ तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. नशेविरुद्धच्या ह्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग खूप उत्साहजनक आहे. या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहीमेला बळकटी मिळणार आहे.

आम्हांला देशाच्या भावी पिढ्यांना वाचवायचे असेल तर त्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. याच विचाराने 15 ऑगस्ट 2020 रोजी 'नशा मुक्त भारत अभियान' सुरू झाले. ह्या मोहीमेमध्ये 11 कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत.  दोन आठवड्यांपूर्वी भारताने अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांचा सुमारे दीड लाख किलोचा साठा जप्त करून नष्टही करण्यात आला. भारताने 10 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे. या औषधांची किंमत 12,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती. मी त्या सर्वांचे कौतुक करू इच्छितो जे व्यसनमुक्तीच्या या उदात्त मोहिमेला हातभार लावत आहेत. अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठीच मोठी समस्या आहे. त्यामुळेच अशा परिस्थितीत, हा धोका कायमचा संपवण्यासाठी, आपण सर्वांनी संघटित होऊन या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण अंमली पदार्थ आणि तरुणाईच्या विषयी बोलत आहोत तर मला तुम्हाला मध्य प्रदेशमधील एका प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगायचे आहे. हा प्रेरणादायी प्रवास आहे मिनी ब्राझीलचा. आता तुम्ही विचार करत असाल की मध्य प्रदेशात मिनी ब्राझील कुठून आले? हीच तर गंमत आहे. मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यामध्ये बिचारपूर नावाचे एक गाव आहे. बिचरपूरलाच मिनी ब्राझील म्हणतात. मिनी ब्राझील म्हणायचे कारण म्हणजे आज हे गाव फुटबॉलच्या उगवत्या ताऱ्यांचा बालेकिल्ला बनले आहे. काही आठवड्यांपूर्वी मी शहडोलला गेलो होतो, तेव्हा असे अनेक फुटबॉल खेळाडू मला भेटले. मी विचार केला की देशवासीयांना आणि विशेषत: तरुण मित्रांना ह्या सर्व फुटबॉलपटूंच्या विषयी कळायला हवे.

मित्रांनो, साधारण दोन अडीच दशकांपूर्वी बिचारपूर गावाचा मिनी ब्राझील होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्या काळात बिचारपूर गाव अवैध दारूचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध होते, नशेच्या आहारी गेले होते. ह्या वातावरणामुळे सर्वात जास्त नुकसान येथील तरुणांचे होत होते. माजी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक रईस अहमद यांनी या तरुणांची प्रतिभा ओळखली. रईसजींच्याकडे फारशी संसाधने नव्हती, परंतु त्यांनी संपूर्ण समर्पण वृत्तीने तरुणांना फुटबॉल शिकवायला सुरुवात केली. काही वर्षांतच इथे फुटबॉल इतके लोकप्रिय झाले की तीच बिचारपूर गावाची ओळख बनली. आता येथे फुटबॉल क्रांती नावाचा एक उपक्रमही चालू आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम इतका यशस्वी झाला आहे की बिचारपूरमधून 40 राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही फुटबॉल क्रांती आता हळूहळू आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशात पसरत आहे.

शहडोल आणि त्याच्या आजूबाजूचा मोठ्या परिसरात 1200 हून अधिक फुटबॉल क्लब तयार झाले आहेत. येथून बरेच असे खेळाडू उदयास येत आहेत जे आता राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. अनेक माजी फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक, आज, येथे, तरुणांना प्रशिक्षण देत आहेत. जरा विचार करा, जे आदिवासी क्षेत्र बेकायदेशीर दारूसाठी कुप्रसिद्ध होते, व्यसनांसाठी कुप्रसिद्ध होते तेच आता देशाची फुटबॉल नर्सरी बनले आहे. म्हणूनच म्हणतात - जिथे इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच. आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही. आवश्यकता आहे ती अशा प्रतिभावान मुलांना  शोधण्याची आणि आकार देण्याची. मग नंतर हेच युवक देशाचे नाव मोठे करतात आणि देशाच्या विकासाला दिशा देतात.

माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने  आपण सर्वजण ‘अमृत महोत्सव’ पूर्ण उत्साहात साजरा करत आहोत. 'अमृतमहोत्सवा'च्या निमित्ताने देशभरात सुमारे दोन लाख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम अनेक रंगानी सजले होते, वैविध्यपूर्ण होते. यामध्ये विक्रमी संख्येने तरुण सहभागी झाले होते हे देखील या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य होते, सौंदर्य होते. ह्या कार्यक्रमांच्या दरम्यान तरुणांना देशातील महान व्यक्तिमत्त्वांबद्दल खूप काही जाणून घेता आले. गेल्या काही महिन्यांबद्दलच बोलायचे झाले तर लोकसहभागातून साजरे झालेले अनेक चांगले कार्यक्रम बघायला मिळाले. असाच एक कार्यक्रम होता दिव्यांग लेखकांसाठी 'लेखक मेळाव्या'चे आयोजन. ह्या कार्यक्रमात  विक्रमी संख्येने लोक सहभागी झाले होते. तर आंध्र प्रदेशात तिरुपती येथे 'राष्ट्रीय संस्कृत परिषद' आयोजित करण्यात आली होती. आपल्या इतिहासात किल्ल्यांचे किती महत्त्व होते  ते तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. याचेच चित्रण करणारी एक मोहीम होती 'किल्ले आणि कथा' म्हणजे किल्ल्यांशी संबंधित कथा, ती लोकांना खूप आवडली.

मित्रांनो, आज जेव्हा देशभरात सगळीकडे'अमृत महोत्सव' साजरा होत आहे. उत्साहाचे वातावरण आहे. 15 ऑगस्ट अगदी जवळ आला आहे, तेव्हा देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे. हुतात्मा झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी ‘मेरी माती मेरा देश’ - ‘माझी माती माझा देश’ अभियान सुरू होणार आहे. ह्या अभियानाअंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. ह्या विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित केले जातील. या अभियानात देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ही काढण्यात येणार आहे. देशातील कानाकोपऱ्यातून, गावागावांतून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ही 'अमृत कलश' यात्रा देशाच्या राजधानी दिल्लीत पोहोचेल. ही यात्रा आपल्या सोबत देशाच्या विविध भागातून रोपेही आणेल.  7500 कलशातून आलेली माती आणि ही रोपे मिळून, नंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ 'अमृत वाटिका' निर्माण करण्यात येणार आहे. ही 'अमृत वाटिका', म्हणजे 'एक भारत श्रेष्ठ भारत’ ह्या अभियानाचे भव्य प्रतीक बनेल. मी मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुढील 25 वर्षांसाठी, अमृतकालसाठी 'पंच प्रणांबद्दल बोललो होतो. 'मेरी माती मेरा देश' मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे ‘पंच प्राण’ पूर्ण करण्याची शपथही घेणार आहोत. आपण सगळे, देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घेतानाचे सेल्फी काढा आणि yuva.gov.in वर अवश्य अपलोड करा. 

गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी, 'हर घर तिरंगा अभियाना' च्या निमित्ताने जणू संपूर्ण देश एकत्र आला होता, त्याच पद्धतीने यावेळीही प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा आहे आणि ही परंपरा पुढे निरंतर चालवायची आहे. या प्रयत्नांमुळे आम्हाला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिल्या गेलेल्या असंख्य बलिदानांची जाणीव होईल आणि स्वातंत्र्याचे मूल्य कळेल. त्यामुळे प्रत्येक देशवासीयाने या प्रयत्नात अवश्य सहभागी झाले पाहिजे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 'मन की बात'मध्ये इतकेच.

आता थोड्याच दिवसांनी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या महान पर्वात सामील होणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण सदैव स्मरणात ठेवायचे आहे, त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस कठोर परिश्रम करायचे आहेत आणि 'मन की बात' हे देशवासियांच्या या मेहनतीला, त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना समोर आणण्यासाठीचेच एक माध्यम आहे.

भेटू या पुढच्या वेळी, काही नवीन विषयांसह. खूप खूप आभार, नमस्कार!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage