1. बांग्लादेशच्या पंतप्रधान महामहीम श्रीमती शेख हसीना यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 आणि 27 मार्च 2021 हे दोन दिवस, बांग्लादेशाच्या दौऱ्यावर होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित तसेच बांग्लादेशचे राष्ट्रपिता आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि भारत-बांगलादेशच्या मैत्रीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. दोन राष्ट्रप्रमुखांची ही भेट म्हणजे भारत-बांग्लादेशादरम्यानचे संबंध अधिक दृढ, परिपक्व आणि विकसित झाल्याचे प्रतीक असून संपूर्ण आशियाई प्रदेशासाठी आदर्श द्विपक्षीय संबंधांचे उदाहरण ठरेल.

2. या दौऱ्यादरम्यान, भारताच्या पंतप्रधानांनी बांगलादेशचे राष्ट्रपती महामहीम मोहम्मद अब्दुल हमीद यांची 27 मार्च 2021 रोजी भेट घेतली. 26 मार्च 2021 रोजी बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनाच्या तसेच राष्ट्रीय परेड ग्राउंड येथे झालेल्या मुजिब बर्शो या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ ए.के. अब्दुल मोमेन यांनीही 26 मार्च 2021 रोजी पंतप्रधानांची भेट घेतली.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावर येथे राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट देऊन बांग्लादेशच्या स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य आणि वीरतेला अभिवादन केले. तसेच, गोपालगंज येथील तुंगीपारा येथे, जाऊन वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांनाही श्रद्धांजली वाहिली.

भारत-बांग्लादेश भागीदारी

4. दोन्ही पंतप्रधानांदरम्यान 27 मार्च 2021 चर्चा झाली,त्यापाठोपाठ शिष्टमंडळ स्तरीय बैठकही झाली. दोन्ही बैठका अत्यंत सौहार्दपूर्ण आणि उत्तम वातावरणात झाल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी, भारत-बांगलादेश यांच्यातील द्वीपक्षीय संबंधांबद्दल समाधान व्यक्त केले. ऐतिहासिक आणि नैसर्गिक बंधांतून निर्माण झालेले हे संबंध, समानता, विश्वास आणि सामंजस्याच्या आधारावर निर्माण झालेली द्विपक्षीय , तसेच राजनैतिक भागीदारी दर्शवणारे आहेत.

5. कोविड महामारीच्या काळातही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपला पहिला परराष्ट्र दौरा करत, बांग्लादेशला भेट दिल्याबद्दल पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचे आभार मानले. बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या काळात, भारत सरकार आणि भारतातील जनतेने दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दलही शेख हसीना यांनी आभार व्यक्त केले. हा महान मुक्तीयुद्धाचा वारसा जतन करण्याची गरज असल्याचे मत, यावेळी दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी व्यक्त केले. 1971 च्या या बांगलादेश मुक्तीसंग्रामात भारतीय लष्करातील जवानांनी गाजवलेला पराक्रम आणि शौर्याला अभिवादन करण्यासाठी आशुगंज येथे युध्दस्मारक बांधण्याच्या बंगलादेशच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले.

6. मुजिब बर्शो, शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगलादेशातील जनतेचे अभिनंदन केले.मानवी विकास, दारिद्र्य निर्मूलन,दहशतवाद विरोध आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांग्लादेशाने केलेल्या आर्थिक प्रगतीचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. विविध क्षेत्रात, भारताकडून सातत्याने मिळत असलेल्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल पंतप्रधान शेख हसीना यांनी आभार व्यक्त केले.

7. पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑक्टोबर 2019 मधील भारत भेटीदरम्यान तसेच, 17 डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या आभासी शिखर परिषदेदरम्यान घेण्यात आलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीतील प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. त्याशिवाय, संयुक्त सल्लागार आयोगाच्या सप्टेंबर 2020 मध्ये झालेल्या सहाव्या बैठकीचा आणि 4 मार्च 2021रोजी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ढाक्याला दिलेल्या भेटीचा उल्लेखही या बैठकीत करण्यात आला.

8. दोन्ही देशांदरम्यान सहकार्याच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी, सातत्याने सुरु असलेल्या उच्चस्तरीय बैठकांबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, द्विपक्षीय संबंधांची गती कायम ठेवण्यासाठी क्षेत्रीय संस्थात्मक यंत्रणांच्या सातत्याने होत असलेल्या, विशेषत: कोविडच्या काळातही झालेल्या बैठकांविषयी देखील दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

ऐतिहासिक दुव्यांचे संयुक्त उत्सव

9. आधुनिक इतिहासातील महान नेत्यांपैकी एक मानले जाणारे, वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान, त्यांचे धैर्य आणि बंगलादेशाला एक सार्वभौम राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी दिलेल्या अद्वितीय योगदानासाठी त्यांचे कायम स्मरण केले जाईल, असे पंतप्रद्धन नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. या प्रदेशाची शांतता, सुरक्षितता आणि विकाससाठी बंगबंधूंनी दिलेल्या योगदानाचेही त्यांनी स्मरण केले.वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांना वर्ष 2020 चा गांधी शांतता पुरस्कार मरणोत्तर दिल्याबद्दल, पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे आभार मानले. गांधीजींची अहिंसेची शिकवण आणि आदर्शांनुसार बंगलादेशात सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिवर्तन आणण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारताने त्यांचा या पुरस्काराने गौरव केला आहे.

10. दोन्ही पंतप्रधानांच्या हस्ते संयुक्तपणे ढाका येथे बंगबंधू-बापू डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या दोन्ही महान नेत्यांचे आयुष्य आणि वारशाचे दर्शन या प्रदर्शनातून आपल्याला घडते. या दोन्ही नेत्यांचा वारसा आणि आदर्श जगभरातील लोकांना, विशेषतः युवकांना अन्याय आणि दडपशाहीविरुध्द लढण्यास, प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास, दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी यावेळी व्यक्त केला.

11. भारत-बांगलादेश मैत्रीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित दोन्ही देशांनी एक विशेष टपाल तिकीट जारी केले. 6 डिसेंबर हा दोन्ही देशांसाठीचा मैत्री दिवस असेल, असे निश्चित करण्यात आले. याच दिवशी 1971 साली भारताने बांगलादेशाला ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून मान्यता दिली होती. दिल्ली विद्यापीठात वंगबंधूंच्या नावाने एक अध्यासन स्थापन केले जाईल, अशी घोषणा यावेळी भारताने केली. बांग्लादेशाच्या स्वातन्त्र्याचा सुवर्णमहोत्सव तसेच दोन्ही देशांमधील संबंधांची 50 वर्षे यानिमित्त जगातील निवडक 19 देशांमध्ये या विशेष कालखंडाशी संबंधित संयुक्त कार्यक्रम करण्यावरही यावेळी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

12. वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्यावरील चरित्रात्मक चित्रपट तयार करण्याचे काम नामवंत ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली सुरु झाले असून नियोजित वेळेनुसार हा चित्रपट पूर्ण होईल, याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. त्याशिवाय, मुक्ती युद्धावरील विशेष माहितीपटाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज, दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली.

13. भारताच्या 2020 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बांगलादेशच्या तिन्ही सैन्यदलांची 122 जवानांची विशेष तुकडी सहभागी झाल्याबद्दल, दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला.

14. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबधांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान शेख हसीना यांना 2022 मध्ये भारतात येण्याचे आमंत्रण दिले.

15. बांगलादेशाच्या निमंत्रणानुसार, या विशेष कालखंडाचे औचित्य साधत, भारतीय नौदलाची जहाजे, सुमेधा आणि कुलिश यांनी 8 मार्च 2021 रोजी बांगलादेशातील मोंगला बंदराला भेट दिली, या घटनेचे दोन्ही देशांनी स्वागत केले. भारतीय नौदलाच्या जहाजांची मोंगला बंदराला दिलेली हि पहिलीच भेट आहे. या संयुक्त महोत्सवाचा भाग म्हणून, बांगलादेश नौदलाची जहाजेही विशाखापट्टणमला भेट देणार आहेत.

16. भारतात शिक्षण/अभ्यासक्रम करण्यास इच्छुक असललेल्या बांग्लादेशातील युवा विद्यार्थ्यांसाठी 1000 सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती देण्याच्या भारताच्या घोषणेचे बांगलादेशने स्वागत केले.

17. बांगलादेश मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या, बांगलादेश-भारत सीमेवरील मुजिब नगर ते नादिया दरम्यानच्या ऐतिहासिक मार्गाला ‘शाधीनोता शोरक’(स्वाधीनता सडक) असे नाव देण्याचा बांगलादेशाचा प्रस्ताव मान्य केल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले. या संयुक्त समारंभाचा भाग म्हणून या रस्त्याचे लवकरच उद्घाटन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

जलस्त्रोत सहकार्य

18. या संदर्भात आधी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तिस्ता नदी जलवाटपाबाबतचा अंतरिम करार पूर्ण करण्याच्या बांगलादेश प्रलंबित विनंतीचा पुनरुच्चार या बैठकीत केला. तिस्ता नदी खोऱ्यावर ज्यांचे जीवनमान अवलंबून आहे, अशा लाखो लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि सुखकर करण्यासाठी, बांगलादेशला तिस्ता नदीचा योग्य वाटा मिळणे आवश्यक असून त्यावर दोन्ही सरकारांनी जानेवारी 2011 सालीच सहमती दर्शवली होती, हा मुद्दा शेख हसीना यांनी यावेळी अधोरेखित केला. हा करार पूर्ण करण्यासाठी भारत कटिबद्ध असून विविध हितसंबंधी घटकांशी सातत्याने सल्लामसलत करून कराराचा मसुदा पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा पुनरुच्चार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला. त्याचवेळी बांग्लादेशाकडे प्रलंबित असलेल्या फेनी नदीच्या जलवाटपाच्या कराराला अंतिम स्वरूप देण्याची विनंतीही भारताने यावेळी केली. या करारावर देखील 2011 साली दोन्ही बाजूनी सहमती व्यक्त करण्यात आली होती.

19. त्याशिवाय, दोन्ही देशांमधील सहा सामाईक नद्या- मनु,मुहुरी,खोवई, गोमती, धारला आणि दुधकुमार यांच्या जलवाटपाविषयीच्या अंतरिम कराराचा मसुदा लवकरात लवकर पूर्ण करावा, असे निर्देश यावेळी दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या जलसंपदा मंत्र्यांना दिले.

20. बांगलादेशातील खुशियारा नदीवर असलेल्या अप्पर सुरमा खुशियारा प्रकल्पाअंतर्गत, खुशियारा नदीचे पाणी सिंचनासाठी वापरण्याच्या दृष्टीने इथे असलेल्या रहीमपूर खाल मध्ये खोदकाम करण्याची परवानगी भारताने लवकरात लवकर द्यावी, असा पुनरुच्चार यावेळी बांग्लादेशाने केला. हा प्रश्न बांगलादेशाच्या अन्नसुरक्षेशी संबंधित असल्याने, त्याकडे त्वरित लक्ष दिले जावे अशी विनंती बांग्लादेशाने केली. या संदर्भात, भारताने याआधीच्या चर्चेत, खुशियारा नदीचे पाणी काढण्याबाबत दोन्ही बाजूंनी झालेल्या सहमतीनंतरही अनेक वर्षे पूर्ण न झालेल्या सामंजस्य कराराला अंतीम स्वरुप देण्याची विनंती यावेळी भारताने केली.

21. फेनी नदीतून 1.82 क्युसेक्स पाणी भारताला काढता येण्याची परवानगी देणाऱ्या सामंजस्य करारावर ऑगस्ट 2019 साली पंतप्रधान सेख हसीना यांनी स्वाक्षऱ्या केल्या असल्याची आठवण करत, भारताने बांगलादेशला या कराराची जलद अंमलबजावणी करण्याची विनंती केली.

22. दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी, या उद्देशासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त तांत्रिक समितीला, गंगा जल वाटप करार-1996, नुसार बांगलादेशाला मिळत असलेल्या गंगा नदीच्या पाण्याचा अधिकाधिक वापर आणि गंगा-पद्मा बैरेज बांधाचे अध्ययन तसेच बांगलादेशतील इतर पर्यायी साधनांचा वापर करण्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले.

23. संयुक्त नदी आयोगाच्या सकारात्मक योगदानाबद्दल दोन्ही नेत्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तसेच दोन्ही देशातील जलसंपदा मंत्रालयातील अलीकडेच झालेल्या सचिव स्तरीय चर्चेविषयी दोघांनीही समाधान व्यक्त केले.

विकासासाठी व्यापार

24. दोन्ही देशांतील व्यापारात वृद्धी व्हावी, यासाठी व्यापार मार्गातील न-शुल्क अडथळे (non-tariff barriers) काढण्याची गरज असल्याचे दोन्ही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. बांग्लादेशाने जारी केलेल्या परवाना प्रमाणपत्रांवर भारताच्या सीमाशुल्क विभागाने पुन्हा निश्चितीसाठी पडताळणी करण्याचे धोरण भारताने रद्द करावे, अशी विनंती बांग्लादेशाने केली. त्यावर, नव्या सीमाशुल्क नियमांनुसार, जर, या नियमांमधील तरतुदी आणि मूळ व्यापार करारातील तरतुदी, यात संघर्ष निर्माण झाल्यास, मूळ करारातील तरतुदी कायम ठेवण्याची तजवीज करण्यात आली आहे, अशी माहिती भारताने दिली. त्याशिवाय, द्विपक्षीय करार वाढण्यासाठी, दोन्ही नेत्यांनी व्यापारी धोरण, नियम आणि प्रक्रिया याबाबत निश्चितता असण्यावर भर दिला.

25. दोन्ही देशांमधील व्यापार, सुव्यवस्थित व्हावा, यासाठी, भारत-बांगलादेश व्यापार सीमा शुल्क केंद्रे (LCSs) आणि लैंड पोर्ट वरील पायाभूत सुविधा तातडीने अद्यायावर करण्याची गरज असल्याचे दोन्ही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.

26. बांग्लादेशाने, ईशान्य भारतातील (शक्य असेल तिथल्या) किमान एका भू-बंदरावरील निर्बंध कमी करावेत अथवा नकारात्मक निर्बंधांची यादी कमी करावी, या विनंतीचा पुनरुच्चार भारताने यावेळी केला. जेणेकरुन, आयसीपी आगरतला-अखौरा पासून बाजारात सहज प्रवेश मिळू शकेल.

27. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी प्रमाणित मानकांचे पालन आणि करार तसेच प्रमाणपत्रांचे परस्पर सौहार्दाने पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी म्हटले. दोन्ही देशांमधील व्यापार अधिकाधिक मुक्त करण्यासाठी, बांगलादेश मानके आणि तपासणी संस्था तसेच भारतातील भारतीय मानक विभाग, क्षमता बांधणी आणि चाचणी तसेच प्रयोगशाळा विकासासाठी एकत्रित काम करतील, यावर सहमती झाली.

28. एलसीडी दर्जात वाढ झाल्या बद्दल भारताने बांगलादेशचे अभिनंदन केले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये असलेल्या क्षमता लक्षात घेऊन, दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराचे (CEPA).सध्या सुरु असलेले संयुक्त अध्ययन लवकरात लवकर पूर्ण करण्यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला.

29. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत ताग क्षेत्राचे महत्व लक्षात घेता भारताने बांगलादेश मधील ताग कारखान्यात सरकारी खाजगी भागीदारी अंतर्गत गुंतवणूक करावी असे आव्हान बांगलादेशाने केले. मूल्यवर्धित आणि तागाच्या विविध वस्तूंच्या उत्पादनातून ताग क्षेत्राला पुनरुज्जीवित आणि आधुनिक करण्याच्या बांगलादेश सरकारच्या धोरणा अंतर्गत ही गुंतवणूक करावी असे बांगलादेशने म्हटले. याच संदर्भात ताग क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये अधिक अर्थपूर्ण सहकार्य व्हावे असा आग्रह धरत भारताने 2017 पासून तागाच्या वस्तूंवर लावलेले निर्यात शुल्क रद्द करावे अशी विनंती बांगलादेशने केली. ताग क्षेत्रातल्या सहकार्याच्या प्रस्तावाचे भारताने स्वागत केले तागावर लावलेल्या अँटी डंपिंग कराबद्दल विचार केला जाईल असे आश्वासन भारताने दिले.

30. बांगलादेश सरकार मधील विविध यंत्रणा तसेच विविध मंत्रालयांनी जारी केलेल्या निविदांमध्ये सहभागी होण्याबाबत भारतीय कंपन्यांवरचे निर्बंध हटवले जावे अशी विनंती भारताने केली. त्यावर स्पष्टीकरण देताना या प्रक्रियेत देश-विशिष्ट निर्बंध नसल्याचे बांगलादेशाने स्पष्ट केले.

31. दोन्ही देशांनी संमत केलेल्या स्थळांवर नवे सीमा बाजार सुरु झाल्याबद्दल दोन्ही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला दोन्ही देशांतल्या सीमावर्ती भागात दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक विकासासाठी हे पाउल उपयुक्त ठरेल असा विश्वास उभय नेत्यांनी व्यक्त केला.

 

वीज आणि उर्जा मध्ये विकास भागीदारी आणि सहकार्य

32. दोन्ही बाजूंकडून उच्चस्तरीय देखरेख समितीच्या पहिल्या बैठकीची दखल घेण्यात आली आणि कर्ज मर्यादा अंतर्गत प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी शिफारसी देण्याचे निर्देश समितीला दिले.

33. खासगी क्षेत्रांसह वीज आणि उर्जा क्षेत्रातील भक्कम सहकार्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. नेपाळ आणि भूतानसह उपप्रादेशिक सहकार्य मजबूत करण्याबाबत सहमती झाली आणि या संदर्भात उर्जा

 

क्षेत्रातील सहकार्य अधोरेखित केले गेले. विजेच्या सीमापार व्यापारासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित केल्यामुळे उप-प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत होईल यावर भारताकडून भर देण्यात आला. भारताने कटिहार - परबोटिपूर - बोरनगर सीमा पार वीज आंतरजोडणी कार्यान्वित करण्यासाठी कार्यपद्धतीला लवकर अंतिम स्वरूप देण्याची विनंती केली. या संदर्भात अभ्यास पथकाच्या स्थापनेचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले. भारत बांगलादेश फ्रेंडशिप पाइपलाइन आणि मैत्री सुपर औष्णिक उर्जा प्रकल्पाच्या युनिट -1 च्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा दोन्ही देशांनी आढावा घेतला आणि हे प्रकल्प लवकर सुरु होतील अशी आशा व्यक्त केली.

34. हायड्रोकार्बन क्षेत्रातील सह्कार्यावरील सामंजस्य करारावर डिसेंबर 2020 मध्ये स्वाक्षरी झाल्याची आठवण करून देत उभय नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर संस्थात्मक व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले ज्यामुळे या महत्त्वपूर्ण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढेल.

समृद्धीसाठी कनेक्टिव्हिटी

35. उभय पंतप्रधानांनी प्रादेशिक आर्थिक एकीकरण सुलभ करण्यासाठी यात सामील असलेल्या सर्व पक्षांच्या फायद्यासाठी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या महत्वाचा पुनरुच्चार केला. 1965 पूर्वीच्या रेल्वे जोडणीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल तसेच रेल्वे, रस्ते आणि जलमार्गांद्वारे असंख्य संपर्क व्यवस्था उपक्रमांना बांगलादेशने सहकार्य केल्याबद्दल भारताने पंतप्रधान हसीना यांचे आभार मानले. त्याच अनुषंगाने बांगलादेशने भारत - म्यानमार - थायलंड त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्पात भागीदार होण्यासाठी उत्सुक असल्याचा पुनरुच्चार केला. दोन्ही देशांदरम्यान सुलभ प्रवासी आणि माल वाहतूकीसाठी आणि उत्तम संपर्क सुविधा पुरवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी बांगलादेश, भारत आणि नेपाळदरम्यान सामंजस्य करारावर लवकर स्वाक्षरी करून बीबीआयएन मोटार वाहन कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याबाबत सहमती दर्शवली. भूतानसाठी यात नंतर सामील होण्याची तरतूद आहे.

36. बांगलादेशने प्रस्तावित केलेल्या नवीन कनेक्टिव्हिटी मार्गांबाबत अनुकूल विचार करण्याची विनंती बांगलादेशकडून भारताला करण्यात आली. त्यानुसार भद्रपूर-बैरागी गलगलीया, बिराटनगर-जोगमणी आणि बीरगंज-रक्सौल या अतिरिक्त भू-बंदरांना पर्यायी मार्ग म्हणून बांगलाबंध-फुलबारी व बिरोल-राधिकापूरशी रस्तेमार्गे जोडण्यासाठी परवानगी देण्याचा समावेश आहे. बिरोल-राधिकापूर आणि रोहनपूर-सिंघाबाद रेल्वे-इंटरचेंजेसला विराटनगर-जोगमणिशी जोडण्याबाबत विचार करण्याची विनंतीही भारताला करण्यात आली , यामुळे बांगलादेशमधून नेपाळपर्यंत रेल्वेने अंतर कमी होण्यास आणि वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल. भूतानबरोबर रेल्वे कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यासाठी नव्याने उद्घाटन झालेल्या चिल्लाहाटी-हल्दीबारी मार्गावरुन भूतानशी रेल्वे संपर्क जोडण्याची मागणी बांगलादेशने केली. गुवाहाटी आणि चट्टोग्राम दरम्यान आणि मेघालयातील महेंद्रगंज ते पश्चिम बंगालमधील हिलि पर्यंत संपर्क व्यवस्था स्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती भारताने बांगलादेशला केली. या संदर्भात सविस्तर प्रस्ताव पाठवण्याची विनंती बांगलादेशने भारताला केली.

37. कनेक्टिव्हिटीचे फायदे आणि चट्टोग्राममार्गे कोलकाता ते अगरतला दरम्यान भारतीय वस्तूंच्या आंतरवाहतुकीची चाचणी अधोरेखित करत किफायतशीर आणि नियामक व्यवस्थेला अंतिम स्वरूप देण्यासह भारतातून मालवाहतुकीसाठी चट्टोग्राम आणि मोंगला बंदरांच्या वापरावरील करार लवकर कार्यान्वित करण्याची विनंती भारताच्या वतीने करण्यात आली.

38. आशुगंज कंटेनर टर्मिनल विकसित करण्याचा द्विपक्षीय प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अंतर्देशीय जल वाहतूक आणि व्यापाराच्या प्रोटोकॉलचा भाग म्हणून मुंशीगंज आणि पानगांव येथे ट्रान्सशीपमेंट व्यवस्था करण्याची विनंती भारतीय बाजूकडून केली गेली. बांगलादेशने या संदर्भातील पायाभूत सुविधांची मर्यादा आणि त्या सुविधांच्या उन्नतीसाठी काम करण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले.

39. पंतप्रधान मोदी यांनी फेनी नदीवरील मैत्री सेतूचे अलिकडेच उद्घाटन झाल्याची आठवण करुन दिली आणि या महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्प साकारण्यात बांगलादेशने केलेल्या सहकार्याचे कौतुक केले. बांगलादेशच्या पंतप्रधानांनी सांगितले की, फेनी पुलाचे उद्घाटन हे या प्रांतात विशेषतः भारताच्या ईशान्येकडील भागात कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक एकीकरण मजबूत करण्याच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या बांगलादेश सरकारच्या वचनबद्धतेचा एक पुरावा आहे. या नव्या पुलाचा योग्य प्रकारे वापर करता यावा यासाठी उर्वरित व्यापार आणि प्रवासासंबंधी पायाभूत सुविधा विकसित करायला दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली.

40. बांगलादेशच्या पंतप्रधानांनी ,ईशान्य भारतातील विशेषत: त्रिपुराच्या लोकांना चट्टोग्राम आणि सिल्हेट आंतरराष्ट्रीय विमानतळ वापरण्याची परवानगी दिली. या भागातील लोकांना वापर करता यावा यासाठी सैदपूर विमानतळ प्रादेशिक विमानतळ म्हणून विकसित करण्यात येत असल्याची माहिती बांगलादेशने दिली.

41. दोन्ही देशांमध्ये लसीकरण मोहीम पूर्ण भरात सुरु असल्यामुळे दोन्ही बाजूंनी नियमितपणे हवाई प्रवास सुरू करण्याबाबत आणि लवकरात लवकर भू बंदरांमधून वाहतुकीवरचे निर्बंध हटवणे तसेच दोन्ही देशांदरम्यान रेल्वे आणि बस सेवा कार्यान्वित करण्यावर सहमती दर्शवली. प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय कोविडच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असे सांगून भारताने पूर्ण क्षमतेने प्रवास लवकरच सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली.

42. शिक्षण क्षेत्रात उभय देशांमधील सुरू असलेल्या सहकार्याची दखल घेऊन दोन्ही पंतप्रधानांनी परस्पर फायद्यासाठी हे सहकार्य वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या संदर्भात, त्यांनी दोन्ही देशांची विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था यांच्यात विविध सहकार्यात्मक व्यवस्थेचे कौतुक केले. दोन्ही नेत्यांनी शैक्षणिक पात्रतेच्या परस्पर मान्यता संदर्भात सामंजस्य कराराच्या अंतिम निष्कर्षासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मत्स्योद्योग , शेती, आपत्ती व्यवस्थापन, एसएमई आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रातील इच्छुक भारतीय तरुणांसाठी अल्प मुदतीचे आदानप्रदान कार्यक्रम आयोजित करायला बांगलादेशने अनुमती दिली. संस्कृती, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, युवा व क्रीडा आणि मास मीडियाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमित देवाणघेवाण सुरू ठेवण्याच्या इच्छेचा दोन्ही बाजूंनी पुनरुच्चार केला.

 

सार्वजनिक आरोग्य सहकार्य

43. दोन्ही देशांनी आपापल्या देशांमधील सध्या सुरू असलेल्या कोविड --19 महामारीच्या सद्यस्थितीबद्दल मते व्यक्त केली आणि सध्याच्या या संकटादरम्यान दोन्ही देशांमध्ये ज्या प्रकारे सातत्यपूर्ण सहभाग सुरु आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले. बांगलादेशने भारतात निर्मित ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रा झेनेका कोविशिल्ड लसीचे 3.2 दशलक्ष डोस भेट दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले आणि या अंतर्गत 50 लाख डोसची पहिली तुकडी त्वरित पाठवल्याबद्दल कौतुक केले. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून बांगलादेशने खरेदी केलेल्या लसीच्या उर्वरित मात्रांचे नियमित वितरण सुलभ करण्याची विनंती बांगलादेशने भारताला केली. भारताने देशांतर्गत उद्दीष्ट आणि आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेनुसार सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

44. कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य क्षेत्र विशेषत: आरोग्य सेवा आणि संशोधन या क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान दृढ सहकार्याचे महत्त्व दोन्ही पंतप्रधानांनी मान्य केले. प्रशिक्षण, क्षमता निर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर अधिक भर देऊन परस्पर सहकार्य वाढवण्याची विनंती बांगलादेशने केली. कोविड 19 महामारीने दाखवून दिले आहे की सीमावर्ती व्यापाराचे परस्पर स्वरूप आणि दोन्ही देशांमधील जनतेतील संबंध लक्षात घेता अर्थपूर्ण जैव-सुरक्षा उपायांशिवाय आर्थिक समृद्धीला धोका पोहचतो. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, भारत आणि बांगलादेश वैद्यकीय संशोधन परिषद, बांग्लादेश यांच्यात वेगवेगळ्या यंत्रणेअंतर्गत सहकार्य आणि सक्रिय सहभागाचे दोन्ही पंतप्रधानांनी कौतुक केले.

सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा सहकार्य

45. शांत, स्थिर आणि गुन्हेगारी मुक्त सीमा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी सीमा व्यवस्थापनाच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांनी भर दिला. सीमेवर होणारा कोणताही मृत्यू हा चिंतेचा विषय असल्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले आणि सीमा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लोकाभिमुख उपाययोजना वाढवण्याचे आणि नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे निर्देश संबंधित सीमा सुरक्षा दलांना दिले. मानवतेच्या आधारे राजशाही जिल्ह्याजवळील पद्मा नदीवर 1.3 किमी मार्गिकेच्या विनंतीचा बांगलादेशने पुनरुच्चार केला. भारताने या विनंतीवर विचार करण्याचे आश्वासन दिले. त्रिपुरा (भारत) - बांगलादेश क्षेत्रापासून सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय सीमेवर सर्व प्रलंबित क्षेत्रांमध्ये कुंपण घालण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याची विनंती भारताने केली. बांगलादेशने या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

46. दोन्ही देशांमधील विद्यमान संरक्षण सहकार्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. या संदर्भात, दोन्ही पंतप्रधानांनी प्रशिक्षण व क्षमता निर्मितीत सहकार्य वाढवण्यावर आणि नियमित आदानप्रदान कार्यक्रमांवर भर दिला. संरक्षण विषयक कर्जाची सुविधा लवकर कार्यान्वित करण्याची विनंती भारताने केली.

47. दोन्ही देशांनी आपत्ती व्यवस्थापन, लवचिकता आणि प्रतिबंध यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरीचे स्वागत केले . यामुळे नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी संस्थात्मक सहकार्य वाढेल असे त्यांनी नमूद केले.

48. दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे ओळखून, दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचे निर्मूलन करण्याच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींनी बांगलादेशने सुरक्षेसंदर्भात केलेल्या सहकार्याबद्दल भारताच्या वतीने कौतुक केले.

सहकार्याची नवीन क्षेत्रे

49. बांगलादेशने 2017 मध्ये आपला पहिला उपग्रह, बंगबंधू उपग्रह (बीएस -1) प्रक्षेपित केल्याची आठवण करून देत पंतप्रधान हसीना शेख यांनी माहिती दिली की बांगलादेश लवकरच दुसरा उपग्रह प्रक्षेपित करेल. या संदर्भात, दोन्ही पंतप्रधानांनी अंतराळ आणि उपग्रह संशोधनात सहकार्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरण वाढवण्याबाबत सहमती दर्शवली.

50. दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्याने सहकाराच्या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्राच्या संभाव्यतेची दखल घेतली आणि विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा शांततापूर्ण वापर, बिग डेटा आणि आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान सक्षम सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांना दिले. दोन्ही देशांमधील तरुणांचे आदानप्रदान सुलभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील 50 तरुण उद्योजकांना भारतात येण्याचे आणि इथल्या उद्योजकांसमोर आपल्या कल्पना मांडण्याचे निमंत्रण दिले.

51. या भेटीचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 मार्च 2021 रोजी जशोरेश्वरी देवी मंदिर आणि गोपाळगंजमधील ओरकंडी मंदिराला भेट दिली. पंतप्रधानांनी धार्मिक सौहार्दाच्या प्रचलित परंपरेचे कौतुक केले.

म्यानमारच्या राखिन राज्यातून जबरदस्तीने विस्थापित केलेल्या व्यक्ती

52. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या राखिन प्रांतातून जबरदस्तीने विस्थापित झालेल्या 1.1 दशलक्ष लोकांना आश्रय आणि मानवीय सहायता पुरवल्याबद्दल बांगलादेशच्या उदारपणाचे कौतुक केले. दोन्ही पंतप्रधानांनी या प्रांताच्या अधिकाधिक सुरक्षेसाठी या विस्थापितांच्या त्यांच्या मायदेशी सुरक्षितपणे , जलद आणि कायमचे परतण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान शेख हसीना यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून भारताला विस्थापित रोहिंग्याना म्यानमारला परत पाठवण्यासाठी ठोस भूमिका बजावण्याची विनंती केली. यासंदर्भात भारताने निरंतर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

प्रदेश आणि जगातील भागीदार

53. दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुराष्ट्रीय मंचाच्या सामायिक उद्दीष्टांसाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.

54. दोन्ही नेत्यांनी भर दिला की सार्क आणि बिम्सटेक सारख्या प्रादेशिक संघटना विशेषत: कोविड -19 नंतरच्या परिस्थितीत महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. मार्च 2020 मध्ये सार्क नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित केल्याबद्दल आणि दक्षिण आशियाई प्रदेशात जागतिक महामारीच्या परिणामांना रोखण्यासाठी सार्क आपत्कालीन प्रतिसाद निधी स्थापन करण्याच्या प्रस्तावाबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधानांनी भारतीय पंतप्रधानांचे आभार मानले.

55. प्राधान्य आधारावर प्रादेशिक आणि उपप्रादेशिक व्यासपीठावर सहकार्य वृद्धिंगत करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. या उद्दिष्टाच्या दिशेने सर्व सदस्य देशांच्या सामूहिक समृद्धीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी बिमस्टेकला आंतर-प्रादेशिक सहकार्यासाठी आणखी प्रभावी माध्यम बनवण्यास त्यांनी सहमती दर्शविली.

56. बांगलादेशने स्पष्ट केले की ऑक्टोबर 2021 मध्ये प्रथमच देश आयओआरएचे अध्यक्षपद स्वीकारेल आणि हिंद महासागर प्रदेशात अधिक सागरी सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी भारताने पाठिंबा देण्याची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशचे अभिनंदन केले आणि या संदर्भात भारताच्या सहकार्याचे आश्वासन दिले.

57. बांगलादेशने 2023 मध्ये डब्ल्यूएचओच्या दक्षिण पूर्व आशियाई प्रादेशिक कार्यालयातील संचालक पदासाठी बांगलादेशाच्या उमेदवाराच्या बाजूने पाठिंबा दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले.

58. बांगलादेश आपत्ती निवारण पायाभूत सुविधा आघाडीत (सीडीआरआय) सामील होईल, अशी आशा भारताने व्यक्त केली . यामुळे बांग्लादेश पायाभूत सुविधा जोखीम व्यवस्थापन, मानके, वित्तपुरवठा आणि सुधारणा यंत्रणेतील आपल्या अनुभवाची अन्य सदस्य देशांबरोबर देवाणघेवाण करू शकेल.

59. न्यू डेव्हलपमेंट बँकेत सहभागी होण्याच्या बांगलादेशच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले.

 

द्विपक्षीय कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या आणि प्रकल्पांचे उद्घाटन

60. या दौऱ्यात पुढील द्विपक्षीय कागदपत्रांवर स्वाक्षरी आणि देवाणघेवाण झाली.

आपत्ती व्यवस्थापन, लवचिकता आणि प्रतिबंध यावरील सहकार्याबाबत सामंजस्य करार;
बांग्लादेश नॅशनल कॅडेट कोर्प्स (बीएनसीसी) आणि नॅशनल कॅडेट कॉर्प ऑफ इंडिया (आयएनसीसी) यांच्यात सामंजस्य करार;
बांग्लादेश आणि भारत दरम्यान व्यापार उपाययोजनांच्या क्षेत्रामध्ये सहकार्याच्या चौकटीची स्थापना करण्याबाबत सामंजस्य करार;
आयसीटी उपकरणे, अभ्यासक्रमातील पुस्तके आणि संदर्भ पुस्तकांचा पुरवठा आणि बांग्लादेश-भारत डिजिटल सेवा प्रशिक्षण आणि रोजगार प्रशिक्षण (बीडीएसईटी) केंद्र या विषयावर त्रिपक्षीय सामंजस्य करार;
राजशाही महविद्यालय आणि आसपासच्या परिसरात क्रीडा सुविधांच्या स्थापनेसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार.

61. पंतप्रधान कार्यालयात एका समारंभात , दोन्ही पंतप्रधानांनी खालील घोषणा / अनावरण / उद्घाटन केले:

द्विपक्षीय राजनैतिक संबंध स्थापनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत-बांगलादेश मैत्री तिकिटाचे प्रकाशन
आशुगंज, ब्राह्मणबारीया येथे 1971 मध्ये झालेल्या मुक्ती संग्रामावेळी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शहीदांच्या सन्मानार्थ स्मारकासाठी शिलान्यास सोहळा.
पाच पॅकेजेसच्या (अमीन बाजार - कलियाकोअर, रूपपूर - ढाका, रूपपूर - गोपाळगंज, रूपपूर - धामराई, रूपपूर - बोगरा) रूपपूर पॉवर इव्हॅक्युएशन प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ.
सीमा भागात 3 हाटचे उद्घाटन - नालिकाता (भारत) - सयदाबाद (बांगलादेश); रिंग्कू (भारत) - बागान बारी (बांगलादेश) आणि भोलागंज (भारत) - भोलागंज (बांगलादेश)
कुतीबारीमध्ये रवींद्र भवन सुविधांचे उद्घाटन
‘मिताली एक्स्प्रेस’ चे उद्घाटन - चिल्लाहाटी-हल्दीबारी रेल्वेजोडणीद्वारे ढाका-न्यू जलपाईगुडी-ढाका मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा;
मुजीबनगर ते नादिया दरम्यान ऐतिहासिक रस्ता जोडण्याची व त्याचे शाधिनोता शोरोक असे नामकरण करण्याची घोषणा

62. बांगलादेश दौऱ्यादरम्यान अगत्यपूर्वक स्वागत केल्याबद्दल आणि आपले व आपल्या प्रतिनिधीमंडळातील सदस्यांच्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे आभार मानले.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.