जपानचे परराष्ट्र मंत्री योको कामिकावा आणि जपानचे संरक्षण मंत्री मिनोरू किहारा यांनी काल दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत आणि जपानमध्ये परराष्ट्र व्यवहार तसेच संरक्षण मंत्रिस्तरीय 2 + 2 बैठकीची तिसरी फेरी आयोजित करण्यासंदर्भातील नियोजनासाठी जपानचे परराष्ट्र मंत्री कामिकावा आणि संरक्षण मंत्री किहारा भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
पंतप्रधानांनी जपानच्या मंत्र्यांचे स्वागत केले.सद्यस्थितीत प्रादेशिक तसेच जागतिक राजकीय व्यवस्थेत वाढत चाललेल्या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि जपानमधील संबंध दृढ होणे, आणि त्यादृष्टीने दोन्ही देशांमध्ये 2 + 2 मंत्रिस्तरीय बैठक
होणे किती गरजेचे आहे, याचे महत्वही पंतप्रधानांनी या बैठकीत अधोरेखित केले.
भारत आणि जपान हे परस्परांचे विश्वासार्ह मित्र आहेत.यापुढे दोन्ही देशांमध्ये विशेषतः अत्यावश्यक खनिजे, सेमीकंडक्टर आणि संरक्षण उत्पादने यांसारख्या क्षेत्रांमध्ये अत्यंत घनिष्ठ सहकार्य प्रस्थापित होणे गरजेचे असल्याचा प्रस्ताव मांडत, त्याबद्दलचे आपले विचार आणि त्याबाबतची मतेही पंतप्रधानांनी या बैठकीत मांडले.
या बैठकीत मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासह, द्विपक्षीय सहकार्या अंतर्गत विविध क्षेत्रात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावाही पंतप्रधान आणि जपानच्या मंत्र्यांनी घेतला. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांवरील विचारांची देवाणघेवाणही केली.
भारत - प्रशांत क्षेत्रासह आसपासच्या क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी वाढण्याच्या प्रक्रियेत भारत आणि जपानमधील भागीदारी महत्वाची भूमिका बजावत असल्याचा मुद्दाही पंतप्रधानांनी या बैठकीत अधोरेखित केला.
भारत आणि जपानमधली परस्पर आर्थिक सहकार्य अधिक बळकट करणे आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध वृद्धींगत करणे महत्वाचे असल्याच्या मुद्यावरही पंतप्रधानांनी या चर्चेत भर दिला.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमधील आगामी शिखर परिषदेसाठी जपानच्या भेटीवर येण्याबद्दल तसेच आपली ही भेट अधिक अर्थपूर्ण आणि यशदायी होण्याबद्दल आपण आशावादी असल्याचेही पंतप्रधानांनी या बैठकीत आवर्जून नमूद केले.