पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात रशियामध्ये सोची येथे 21 मे 2018 रोजी पहिला अनौपचारिक संवाद झाला. या भेटीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांना परस्परांशी मैत्रीचे बंध दृढ करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्यांबाबतच्या मतांची देवाण घेवाण करण्याची संधी प्राप्त झाली.
भारत आणि रशिया यांच्यातील विशेष धोरणात्मक भागिदारी हा जागतिक शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. जागतिक स्तरावर खुल्या विचारसरणीचे आणि समान संधीचे वातावरण निर्माण करण्यात भारत आणि रशियाची भूमिका महत्वाची असल्याबाबतही दोन्ही नेत्यांनी आपआपल्या विचारांचे आदान प्रदान केले. जागतिक शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने समान जबाबदाऱ्या निभावण्यासाठी आपल्या भूमिकेबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
अनेक महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत दोन्ही नेत्यांनी सखोल चर्चा केली. इंडो पॅसिफीक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात सल्लामसलत आणि समन्वयन अधिक वाढवण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. संयुक्त राष्ट्रसंघ, एस.सी.ओ., ब्रिक्स आणि जी-ट्वेंटी अशा आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
दहशतवादाचा विनाश करण्याबरोबरच सर्व प्रकारचा दहशतवाद आणि तत्सम शक्तींविरोधात लढा देण्याचा दृढ निश्चय दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानमध्ये दहशतवादापासून भयमुक्त करणारे वातावरण निर्माण करण्याबरोबरच तिथे शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या कामी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.
राष्ट्रीय विकासाचे आराखडे आणि प्राधान्यक्रम या विषयी दोन्ही नेत्यांनी आपल्या विचारांचे आदान प्रदान केले. सखोल विश्वास परस्परांबद्दल आदर आणि चांगल्या विचारांसह भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जून 2007 मध्ये सेंट पिटर्स बर्ग येथे झालेल्या द्विपक्षीय संमेलनात चर्चिल्या गेलेल्या मुद्यांना उजाळा देत, आपल्या अधिकाऱ्यांना भारतात पुढच्या वर्षी आयोजित संमेलनासाठी आवश्यक ती पूर्व तयारी करावी असे निर्देश दोन्ही नेत्यांनी दिले.
भारताचा नीति आयोग आणि रशियाचे आर्थिक विकास मंत्रालय यांनी व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक आर्थिक परस्पर संवाद वाढवण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबरोबरच गाजप्रोम आणि गेल यांच्यात पुढच्या महिन्यात होणाऱ्या दीर्घकालीन करारा अंतर्गत एलएनजीच्या पहिल्या टप्प्याच्या आगमनाचे त्यांनी स्वागत केले. लष्कर, संरक्षण आणि अणु ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांतल्या उत्कृष्ट भागिदारीच्या आठवणींना उजाळा देत दोन्ही नेत्यांनी ही भागिदारी उत्तम असल्याचे मत व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांदरम्यानच्या वार्षिक बैठकीबरोबरच नेतृत्व स्तरावर स्वतंत्र अनौपचारिक चर्चेच्या कल्पनेचेही त्यांनी स्वागत केले.
या वर्षाच्या उत्तरार्धात आयोजित 19 व्या वार्षिक संमेलनात मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.