‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही देशातील पहिली अर्ध अति जलद रेल्वे म्हणजे भारतीय रेल्वेच्या मेक इन इंडिया प्रयत्नांचे फलित आहे.
नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाडीच्या सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शुभारंभ करतील. पंतप्रधान रेल्वे गाडीतील सुविधांची पाहणी करतील तसेच उपस्थितांना संबोधित करतील.
रेल्वेमंत्री पियूष गोयल, वरिष्ठ अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींसोबत या रेल्वे गाडीतून शुभारंभाचा प्रवास करतील. ही गाडी कानपूर आणि अलाहाबाद येथे थांबेल.
वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग 160 कि.मी. पर्यंत असेल आणि या गाडीत शताब्दी रेल्वे गाडीप्रमाणेच मात्र अधिक चांगल्या सुविधा असतील. ही गाडी नवी दिल्ली-वाराणसी दरम्यानचे अंतर 8 तासात पार करेल आणि सोमवार, गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी धावेल.