We stand on the cusp of a new chapter in India-Israel relations driven by our people & mutual opportunities for betterment of lives: PM
In India, we have been taking steady steps over 3 years at both macro as well as micro-level, to make a difference. Our motto is Reform, Perform and Transform: PM
To enable entry of capital and technology, most of the sectors including defence, have been opened for FDI...We are now among the most open economies: PM
India’s development agenda is huge. It presents a vast economic opportunity for Israeli companies: PM Modi

इस्रायलचे पंतप्रधान आदरणीय बेंजामिन नेतन्याहू,

भारत आणि इस्रायलच्या उद्योग विश्वातील अग्रणी,

सभ्य स्त्री-पुरूषहो.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलच्या शिष्टमंडळातील सदस्यांचे मी माझ्या देशवासीयांच्या वतीने स्वागत करतो. दोन्ही देशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे आमच्या आनंदात भरच पडली आहे. दोन्ही देशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचाशी मी आणि पंतप्रधान नेतन्याहू, आम्ही दोघांनी नुकताच यशस्वीरित्या संवाद साधला. हा संवाद आणि गेल्या वर्षी सुरू झालेली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भागिदारी यशस्वी ठरेल, अशी मला आशा वाटते.

मित्रहो!

इस्रायल आणि तेथील नागरिकांबद्दल माझ्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना २००६ साली मी इस्रायलला भेट दिली होती. गेल्या वर्षी पुन्हा मी इस्रायलला भेट दिली, मात्र भारतातर्फे अशा प्रकारची ती पहिलीच भेट होती.

ती भेट विशेष होती. इस्रायलला प्रगतीपथावर नेणारे नाविन्य, उद्यमशीलता आणि चिकाटीचे विलक्षण चैतन्य मी तेथे जवळून पाहिले. तेथील नवीन ऊर्जेने आणि नव्या उद्दिष्टांनी गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या परस्पर संबंधांना नवचैतन्य बहाल केले आहे.  त्यामुळे आमच्यातील सहकार्य अधिक वृद्धींगत होईल.

आपापल्या नागरिकांच्या भावना आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या सामाईक संधींसह भारत-इस्रायल संबंधाच्या नवीन अध्यायाच्या उंबरठ्यावर आम्ही उभे आहोत. आमच्या बंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात उद्योग आणि व्यापाराची भूमिका महत्वाची आहे. तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आपल्या संवादाला खरे महत्व प्राप्त होईल आणि त्यातूनच स्थायी यश प्राप्त होईल. भारतीय अर्थकारणाची व्याप्ती आणि इस्रायलचे प्रगत तंत्रज्ञान लक्षात घेता, आपण एकत्रितपणे आभाळापेक्षा मोठे यश प्राप्त करू शकतो, असे मला वाटते.

मित्रहो!

गेल्या वर्षी जुलै महिन्यात माझ्या इस्रायल दौऱ्यादरम्यान घोषित करण्यात आलेल्या भारत-इस्रायल औद्योगिक संशोधन आणि विकास तसेच तंत्रज्ञानविषयक नाविन्यता निधी तथा i4F ने आज  एक पाऊल पुढे टाकले आहे, त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. येत्या ५ वर्षांमध्ये या निधीचा विनियोग करायचा असून, व्यावसायिकदृष्ट्या वापर करता  येण्याजोग्या अभिनव तंत्रज्ञानाला समर्पित अशा, दोन्ही देशांमधील बुद्धिमत्तेसाठी वापरता येण्याजोगी ही उत्तम संधी आहे. 

दोन्ही देशांमधील उद्योगांनी या मंचाचा वापर करून घ्यावा, असे मी आग्रहाने सांगू इच्छितो. डाटा ॲनलेटिक्स आणि सायबर स्पेस सुरक्षा अशा क्षेत्रातील संयुक्त संशोधन आणि विकास प्रकल्पांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाणही उत्साहवर्धक आहे.

जुलै २०१८ मध्ये भारतात भारत-इस्रायल नाविन्य आणि तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, हे नमूद करताना मला अतिशय आनंद होत आहे. या परिषदेमुळे नवीन तंत्रज्ञानाचे पर्याय विकसित होतील, अशी आशा मला वाटते. खरे तर याच्या पायाभरणीचे कार्य उद्या iCREATE  दिनापासून सुरू होईल. आम्ही दोघे या परिसराचे उद्‌घाटन करण्यासाठी उद्या गुजरातला जात असून, नाविन्यता केंद्र म्हणून हा परिसर विकसित केला जाणार आहे.

मित्रहो!

पंतप्रधान नेतन्याहू यांना मी गुजरातच्या ग्रामीण भागात घेऊन जाणार आहे कारण तंत्रज्ञान आणि नाविन्याला खऱ्या अर्थाने सक्षम तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा सर्वसामान्य माणसाला त्यापासून लाभ मिळेल. इस्रायल हा नाविन्य आणि सर्जनशीलतेसाठी अभिनव वातावरण असणारा, स्टार्ट अप साठी जगन्मान्यता प्राप्त झालेला देश आहे.

याचे श्रेय इस्रायलमधील उद्योजकांना जाते. तुम्ही इस्रायलला एक मजबूत, स्थिर आणि नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आणले आहे. ८ दशलक्ष नागरिकांच्या या देशाला तुम्ही तंत्रज्ञानाची जागतिक शक्ती स्थान म्हणून ओळख मिळवून दिली आहे.

जल-तंत्रज्ञान असो वा कृषी-तंत्रज्ञान, अन्न उत्पादन असो, प्रक्रिया असो वा संवर्धन, या सर्व क्षेत्रांत इस्रायल हा देश नवे यश आणि प्रगतीचे चमकते उदाहरण म्हणून समोर आला आहे. संरक्षण, मग ते प्रत्यक्ष असो वा आभासी क्षेत्रातील असो, जमीनीवरील असो, पाण्यातील असो वा अवकाशातील, तुमच्या तंत्रज्ञानाने जगात वाहवा मिळवली आहे. खरे तर मी मूळचा भारतातील पाण्याचा तुटवडा असणाऱ्या एका राज्यातील असल्यामुळे इस्रायलच्या जल सक्षमतेचे मला विशेष कौतुक वाटते.

मित्रहो!

हा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षांत भारतात सुक्ष्म आणि अतिसुक्ष्म पातळीवर अनेक पावले उचलली आहेत. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन, हे आमचे ध्येय आहे.

याचे दुहेरी परिणाम आहेत. एकीकडे आमच्या कार्यपद्धती, प्रक्रिया आणि यंत्रणा या जगातील सर्वोत्तमाशी समकक्ष होत आहेत, त्याचवेळी आम्ही जलद विकासाची गतीही कायम राखू शकत आहोत.

सखोल रचनात्मक सुधारणा सुरू असतानाही वेगाने विकसित होणाऱ्या महत्वपूर्ण अर्थव्यवस्थांमध्ये आमचा समावेश आहे. थेट परकीय गुंतवणुकीत ४० टक्के वाढ झाली असून हा आजवरचा सर्वात मोठा ओघ आहे. युवकांना कौशल्ये प्रदान करण्यात आणि रोजगार देण्यासंदर्भात उल्लेखनीय काम झाले आहे. आमच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के नागरिक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि त्यांना तंत्रज्ञानाधारित विकासाचा हव्यास आहे. 

ही आमच्यासाठी सर्वात मोठी संधी आणि आव्हानही आहे. त्यासाठी आम्ही स्टार्ट अप इंडिया मोहिम हाती घेतली आहे. भारत-इस्रायल भागिदारीसाठी या क्षेत्रात मोठी संधी आहे. आपल्यातील भारत-इस्रायल पूल हा दोन्ही बाजूंच्या नव उद्योगांसाठी दुवा म्हणून काम करेल. ज्ञानाच्या विशाल भांडाराचा लाभ घेण्यासाठी भारतीय उद्योग, स्टार्ट अप्स आणि शैक्षणिक संस्थांनी इस्रायलमधील संबंधित उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी सहयोग वाढवला पाहिजे, असे मी वारंवार सांगत असतो. 

भारताकडे आकार आणि वस्तुमान आहे.

इस्रायलकडे तीक्ष्णता आणि काटेकोरपणा आहे.

भारतात उपयुक्त ठरू शकतील किंवा व्यावसायिकदृष्ट्या अंमलात आणता येतील अशा अनेक कल्पना आणि तंत्रे असू शकतील.

 

मित्रहो!

आजघडीला आम्ही एक सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून उदयाला आलो आहोत. मात्र इतके पुरेसे नाही. आमच्या युवा शक्तीचा पुरेपूर वापर करत जागतिक स्तरावर सर्वोच्च उत्पादक म्हणून भारताला नावलौकीक मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

हे साध्य करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची रचना करण्यात आली. या उपक्रमांतर्गत औपचारिक अर्थव्यवस्थेची नवी यंत्रणा आणि एकसंध कर रचना यांची सांगड घालत आम्ही एका नव भारताची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहोत.

भारताला ज्ञानाधारित, कौशल्य-समर्थित आणि तंत्रज्ञान सक्षम समाज म्हणून विकसित करण्यावर आमचा विशेष भर आहे. डिजीटल इंडिया आणि स्कील इंडिया उपक्रमांच्या माध्यमातून याची दमदार सुरूवात झाली आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी गेल्या काही वर्षांत आमच्या सरकारने अनेक सुधारणा हाती घेतल्या आहेत.

उद्योग आणि कंपन्यांना भेडसावणारे नियमन आणि धोरणविषयक अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले. आम्ही भारतात उद्योग सुलभता वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.

याचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून आले:

जागतिक बँकेच्या उद्योग करण्यातील सुलभतेविषयक निर्देशांकात भारताने गेल्या तीन वर्षात ४२ स्थानांची झेप घेतली आहे;

WIPO च्या जागतिक नाविन्यता निर्देशांकात आम्ही गेल्या दोन वर्षात २१ स्थानांची झेप घेतली आहे.

जागतिक आर्थिक मंचाच्या वैश्विक स्पर्धात्मकता निर्देशांकातही आम्ही गेल्या दोन वर्षात ३२ स्थानांची झेप घेतली आहे, कोणत्याही देशाने नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

जागतिक बँकेच्या २०१६ सालच्या लॉजिस्टिक कामगिरीविषयक निर्देशांकात भारताने १९ स्थानांची झेप घेतली आहे;

थेट परकीय गुंतवणुकीसंदर्भात सर्वोच्च स्थान म्हणून UNCTAD ने पहिल्या १० देशांमध्ये भारताला सूचिबद्ध केले आहे, पण आम्ही इतक्यावर थांबणार नाही.

आम्हाला आणखी जास्त आणि आणखी उत्तम साध्य करायचे आहे.

भांडवल आणि तंत्रज्ञानाचे मार्ग खुले करण्यासाठी संरक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. थेट परकीय गुंतवणुकविषयक ९० टक्क्यांपेक्षा जास्त मान्यता स्वयंचलित पद्धतीने मार्गी लावण्यात आल्या आहेत.

आता सर्वात मुक्त अर्थव्यवस्थांमध्ये आमचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वीच आम्ही एकल ब्रँड किरकोळ आणि बांधकाम विकास क्षेत्रात स्वयंचलित माध्यमातून १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली. एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीतही थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.

प्रत्येक दिवशी आम्ही भारतात उद्योग करणे अधिकाधिक सुलभ करत आहोत. करप्रणालीमध्ये आम्ही ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत. अभिनव वस्तू आणि सेवा कर रचना आम्ही यशस्वीपणे, सुविहितरित्या अंमलात आणली आहे. 

भारतातील या आजवरच्या सर्वात मोठ्या औद्योगिक आणि आर्थिक सुधारणा आहेत. वस्तू आणि सेवा कर रचना, वित्तीय तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजीटल व्यवहारांच्या माध्यमातून आम्ही अशा एका आधुनिक कर यंत्रणेत प्रवेश केला आहे, जी पारदर्शक, स्थिर आणि अपेक्षांना अनुसरून आहे. 

मित्रहो!

मेकिंग इन इंडिया उपक्रमांतर्गत इस्रायलमधील काही कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्याशिवाय प्रगत जल तंत्रज्ञान आणि कृषी तंत्रे, संरक्षण, सुरक्षा यंत्रणा आणि औषध निर्माण संबंधी अनेक इस्रायली कंपन्यांनी भारतात भक्कमपणे आपले पाय रोवले आहेत. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान, सिंचन आणि औषध निर्माण संबंधी क्षेत्रात भारतीय कंपन्यांनीही इस्रायलमध्ये उल्लेखनीय उपस्थिती नोंदवली आहे.   

हीरा हा आपल्या व्यापारातील एक सक्षम दुवा राहीला आहे. उद्योग क्षेत्रात पूर्वीपेक्षा आज जास्त संयुक्त उपक्रम उपलब्ध आहेत. मात्र ही केवळ सुरूवात आहे. इस्रायलसोबत आमचा व्यापार ५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त विकसित झाला आहे.

मात्र खऱ्या क्षमतेच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. आपण आपले संबंध पूर्ण क्षमतेने विकसित केले पाहिजेत. हे केवळ धोरणात्मक नाही तर आर्थिक दृष्टीकोनातूनही अत्यावश्यक आहे. आपल्या संयुक्त क्षमतांचा कशा प्रकारे वापर करता येईल, याबाबतच्या आपल्या सूचनांचे मी स्वागत करतो. नाविन्य, अनुकुलन आणि समस्यांच्या निराकरणाची वृत्ती हा दोन्ही देशांचा स्थायीभाव आहे. 

तुम्हाला एक उदाहरण देतो:

जर आपण अपव्यय होणाऱ्या स्रोतांना  वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू शकलो तर पर्यावरण संरक्षणाबरोबर आर्थिक लाभही मिळवता येतील आणि आपली फळे, भाज्या तसेच फलोत्पादनही वाढवता येईल. पाण्याच्या बाबतीतही अगदी तसेच म्हणता येईल.

आमच्याकडे भरपूर पाणी आहे आणि काही ठिकाणी पाण्याची कमतरताही आहे. आमच्याकडे काही जण अन्न वाया घालवतात तर अनेक जण उपाशीही राहतात.

मित्रहो!

भारताला मोठ्या प्रमाणावर विकास करायचा आहे. त्याद्वारे इस्रायलच्या कंपन्यांना फार मोठी आर्थिक संधी प्राप्त झाली आहे. इस्रायलमधील जास्तीत जास्त लोकांनी, उद्योगांनी आणि कंपन्यांनी पुढाकार घ्यावा आणि भारतात येऊन काम करावे, यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. 

सरकार आणि नागरिकांबरोबरच भारतातील उद्योग जगतही हातमिळवणी करायला उत्सुक आहे. तुमच्या कंपन्यांना आणि उपक्रमांना मी यश चिंतीतो. माझ्याकडून आणि माझ्या सरकारकडून आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहाय्याची ग्वाही सुद्धा मी देतो. भारत-इस्रायल व्यापार आणि आर्थिक सहकार्य मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान नेतन्याहू यांनी केलेल्या निरंतर प्रयासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपली भागिदारी भविष्यात आणखी यशदायी ठरेल, असा विश्वास मला वाटतो.   

धन्यवाद!

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi