पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2021 रोजी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.
नेदरलँडसमध्ये अलीकडेच झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये पंतप्रधान रुट यांना मिळालेल्या विजयानंतर या परिषदेचे आयोजन होत आहे आणि दोन्ही देशांदरम्यान नियमितपणे होणाऱ्या उच्च स्तरीय संवादामुळे द्विपक्षीय संबंधांना प्राप्त झालेली गती त्यामुळे कायम राखली जाईल. या शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करतील आणि दोन्ही देशांमधील संबंध बळकट करणाऱ्या नव्या मार्गांचा वेध घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही ते परस्परांशी विचारविनिमय करतील.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यात लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य यांच्या सामाईक विभागणीमुळे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. युरोप खंडात मोठ्या प्रमाणावर असलेल्या भारतीय समुदायाचे नेदरलँड्स म्हणजे जणू काही घरच आहे. दोन्ही देशांमध्ये जल व्यवस्थापन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, आरोग्य सेवा, स्मार्ट सिटी आणि शहरी वाहतूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नूतनक्षम उर्जा आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्य आहे. दोन्ही देशांदरम्यान अतिशय भक्कम आर्थिक भागीदारी असून नेदरलँड्स हा भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतामध्ये 200 पेक्षा जास्त डच कंपन्या कार्यरत आहेत आणि नेदरलँडसमध्येही तितक्याच प्रमाणात भारतीय कं पन्या कामकाज करत आहेत.