यदिदी हृयेकार (माझे प्रिय मित्र) पंतप्रधान नेत्यनाहू
प्रसार माध्यमातले प्रतिनिधी, सर्वप्रथम मला घरी आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान नेत्यनाहू आणि श्रीमती सारा नेत्यनाहू यांचे आभार मानतो. तुमच्या या आदरातिथ्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
मित्रांनो,
थोडया वेळापूर्वीच मी होलोकॉस्ट येथील दुर्घटनेत बळी पडलेल्या सहा दशलक्ष ज्यू नागरिकांच्या स्मरणार्थ बांधलेल्या “याद वासेम” या स्मृतिस्थळावर जाऊन मृताम्यांना श्रध्दांजली वाहिली. अनेक पिढयांपूर्वी झालेल्या अतिशय निर्घुण हत्याकांडाचे प्रतिक म्हणून याद वासेम ओळखले जाते. मात्र त्यासोबतच शोकांतिका, द्वेष यांच्या पलिकडे जात ज्यू नागरिकांनी जी अभंग निष्ठा जोपासत एका लोकशाही राष्ट्राचे निर्माण केले त्यांचे हे खऱ्या अर्थाने प्रतिक म्हटले पाहिजे. ज्या लोकांचा मानवतेवर आणि नागरी मूल्यांवर विश्वास आहे अशा लोकांनी एकत्र येऊन सर्व दुष्ट शक्तीचा पराभव करायला हवा. ही शिकवण याद वासेम आपल्याला देतात. सध्याच्या काळात जगाला भेडसावत असलेले दहशतवाद, कट्टरतावाद आणि हिंसा अशा दृष्ट प्रवृत्तीपासून जगाचे संरक्षण करण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे.
मित्रांनो,
अनेक शतकापूर्वी जेव्हा पहिल्यांदा ज्यू नागरिकांनी भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर पाऊल ठेवले तेव्हापासूनच भारतासोबत त्यांचे नाते जोडले गेले. तेव्हापासून ज्यू नागरिकांनी भारतात आपल्याला परंपरा जोपासत समृध्दी आणि भरभराट मिळवली. भारतात अलौकीक कामगिरी बजावणारे ज्यू नागरिक जसे लेफ्टनंट जनरल जे.एफ.आर. जेकब, व्हाईस ॲडमिरल बेंजामिन सॅमसन, वास्तूविशारद जोशुआ बेंजामिन, अभिनेत्री नादिरा, सुलोचना आणि प्रमिला अशा सर्व भारतीय सुपुत्र आणि सुपत्रीविषयी आम्हाला अभिमान आहे. भारताच्या इतिहासात ज्यू नागरिकांचे महत्वाचे योगदान असून त्यांनी भारतीय समाज रचेनला अधिक श्रीमंत केले आहे. माझ्या या इस्रायल भेटीत दोन्ही समुदायांमधला हा प्राचीन बंध अधिकच दृढ होणार आहे. तसेच उद्या इस्रायलमधील भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधी मला मिळणार आहे याचा मला विशेष आनंद आहे.
मित्रांनो,
25 वर्षांपासून भारत आणि इस्रायलमधल्या राजनैतिक संबंधांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. आर्थिक विकासाचे सामाईक उद्दिष्ट, भक्कम तंत्रज्ञान आणि संशोधनविषयक बंध तसेच आपल्या समाजाची सुरक्षितता या महत्वाच्या मुद्दयावर दोन्ही देशांमधली एकत्रित भूमिका निश्चित होते. आगामी काही दशकात आमच्या दोन्ही राष्ट्रांच्या आर्थिक नात्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवणारे संबंध आम्हाला प्रस्थापित करायचे आहेत. भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्या विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तंत्रज्ञानाचा आणि संशोधनाचा वापर करण्यावर दिलेला भर यामुळे आमचे शैक्षणिक, विज्ञान आणि संशोधन तसेच व्यापारी संबंध विस्तारण्यासाठी दोन्ही देशांना वाव मिळतो. दोन्ही देशांमध्ये शांतता, स्थैर्य आणि समृध्दीला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी सुरक्षाविषयक भागिदारी वाढविण्याचाही आमचा मानस आहे. ही सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मी पंतप्रधान नेत्यनाहू यांच्या सोबत बसून एक स्पष्ट कृती आराखडा तयार करणार आहे. मी पुन्हा एकदा पंतप्रधान नेत्यनाहू आणि श्रीमती नेत्यनाहू यांचे या हार्दिक स्वागताबद्दल आभार मानतो.
धन्यवाद.
India-Israel ties have seen rapid growth over the last several years: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 4, 2017
India is a fast growing economy and we are using technology and innovation for the progress of our nation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 4, 2017