कोरोनाविरूध्दच्या लढाईदरम्यान देशाने संपूर्णपणे दर्शविलेल्या नि:स्वार्थी भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. कोविड -19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करताना मोदी म्हणाले, गेल्या वर्षाने भारतीयांना एक व्यक्ती, एक कुटुंब, एक देश म्हणून खूप काही शिकवले आणि सहन करायला लावले. तेलगु कवी गुराजडा वेंकटा अप्पाराव यांची एक ओळ उधृत करत मोदी म्हणाले आपण सर्वांनी नेहमी इतरांसाठी नि:स्वार्थीपणे कार्य केले पाहिजे, राष्ट्र म्हणजे केवळ माती, पाणी आणि दगड नव्हे तर, राष्ट्र म्हणजे 'आपण सर्वजण' आणि कोरोना विरुद्धचा लढा याच भावनेतून दिला गेला, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
सुरवातीच्या काळात जेव्हा संसर्ग झाल्यावर लोक जवळच्या लोकांकडे जाऊ शकले नाहीत तेव्हा देशातील लोकांमध्ये असहाय्य संभ्रमाची सुरुवातीची भावना पंतप्रधानांनी संवेदनशीलता व सहानुभूतीपूर्वक व्यक्त केली.
या रोगाने संसर्ग झालेल्यांना अलगीकरणात ठेवले आणि एकटे केले. आजारी मुले त्यांच्या मातेपासून विभक्त केली गेली आणि वृद्ध पालकांना रुग्णालयात एकाकीपणे या रोगाशी लढायला भाग पाडले. जे नातेवाईक लढा हरले त्यांना व्यवस्थित निरोपही देता आला नाही, याची आज आठवण आली तरी दु:ख होते, असे भावूक झालेले पंतप्रधान म्हणाले.
अशा निराशाजनक दिवसांतही काही माणसे आशा आणि यश आणत होते, याची पंतप्रधानांनी आठवण केली. डॉक्टर, परीचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी, रूग्णवाहिका चालक, आशा कर्मचारी, स्वच्छता कामगार, पोलीस आणि इतर आघाडीवर काम करणारे कर्मचारी ज्यांनी आपले जीवन धोक्यात घालून इतरांना वाचविले अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानावर पंतप्रधानांनी लक्ष वेधले. या सर्वांनी त्यांच्या वैयक्तिक आवडींपेक्षा मानवतेसाठी त्यांच्या कर्तव्याला अग्रक्रम दिला. काही जण तर या विषाणु विरुद्धच्या लढ्यात जीव गमाविल्याने त्यांच्या घरीही परत जाऊ शकले नाहीत, असे पंतप्रधानांनी गंभीरपणे नमूद केले. आघाडीवरील या योध्द्यांनी निराशाजनक आणि भीतीयुक्त वातावरणात आशा पल्लवीत केली, आज त्यांना प्रथम लस देताना देश त्या सर्वांचे योगदान कृतज्ञता पूर्वक मान्य करत आहे,असे पंतप्रधान मोदी म्हणाले.