युरोपीयन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 08 मे 2021 रोजी युरोपियन परिषदेच्या बैठकीत विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होतील. भारत-युरोपियन महासंघ नेत्यांच्या बैठकीच्या यजमानपदी पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा आहेत. पोर्तुगालकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद आहे.
या बैठकीत पंतप्रधान युरोपीय महासंघाच्या सर्व 27 सदस्य देशांच्या प्रमुखांसह सहभागी होतील. युरोपीय महासंघ +27 यापूर्वी मार्चमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत एकदाच या स्वरूपात भेटले होते. कोविड19 महामारी आणि आरोग्यसेवा सहकार्य, शाश्वत आणि समावेशक वाढीला चालना, भारत-युरोपीय महासंघाची आर्थिक भागीदारी तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक समस्या बळकट करण्याबाबत नेते आपली मते व्यक्त करतील.
भारत-ईयू नेत्यांची बैठक ही युरोपीय महासंघ देशांच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चेसाठी एक अभूतपूर्व संधी आहे. हा महत्वपूर्ण राजकीय टप्पा असून जुलै 2020 मध्ये झालेल्या 15 व्या भारत-युरोपिय महासंघ शिखर परिषदेनंतर गतिमान झालेले संबंध अधिक दृढ होतील.