‘पासपोर्ट म्हणजेच पार-पत्राचा रंग भलेही वेगवेगळा असू शकतो, परंतु मानवतेच्या बंधना इतके मजबूत बंधन दुसरे कोणतेच असू शकत नाही’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगतात. ज्या ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते, त्या त्या वेळी मानवतेच्या हेतूने ताबडतोब मदतीला धावून जातात.
येमेनमध्ये संघर्ष पेटलेला असताना तेथे अनेक देशांचे नागरिक अडकून पडले होते. अशा संकट प्रसंगी भारत सरकारने फक्त भारतीयांनाच येमेन मधून बाहेर काढले नाही, तर इतरही देशांच्या नागरिकांना मदतीचा हात पुढे केला. भारताने ज्या प्रभावी पद्धतीने हे मदत अभियान राबविले, त्याचा खूप मोठा परिणाम झाला. अनेकांचे प्राण वाचले.
येमेनमधील भारतीयांच्या बचावासाठी भारताने उघडलेली मोहीम उच्च पातळी वरून राबवली जात होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून होत्या. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे स्वतः येमेन आणि दिजी बौटीला गेले आणि त्यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
नेपाळला दि. 25 एप्रिल 2015 च्या सकाळी विनाशकारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. नेपाळी बंधू-भगिनींना भारत सरकारने सर्वतोपरी मदत देवू केली. नेपाळचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी, त्यांचा आपत्ती व्यवस्थापन समूह यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे पंतप्रधान स्वतः अध्यक्ष होते. भूकंपग्रस्त नेपाळच्या जनतेला शक्य ती सर्व मदत भारताने दिली.
भारताने केलेल्या मदत कार्याचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. पंतप्रधान मोदी यांची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली. फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांना ज्यावेळी पंतप्रधान भेटले त्यावेळी त्यांनी भारताच्या मदत कार्याचे कौतुक केले. इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनीही पंतप्रधानांचे दूरध्वनी करून कौतुक केले. भारताने निभावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचे अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वेर्मा यांनीही कौतुक केले.
अफगाणिस्तानमध्ये फादर अॅलेक्सीज् प्रेम कुमार यांना आठ महिने ओलिस धरले होते. फेब्रुवारी 2015 मध्ये त्यांची सुटका झाली आणि फादर सुखरूप घरी परतले. समाज कार्याला वाहून घेतलेल्या फादरना काही समाज कंटकांनी ताब्यात घेतले होते. अखेर त्यांची सुटका करण्यात सरकारला यश आले. यामुळे फादर यांच्या घरच्या मंडळींना आनंद तर झालाच, पंतप्रधान आणि सरकारने त्यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले.
अगदी याच प्रमाणे मध्य पूर्वेकडील देशांमध्ये ठिकठिकाणी असंख्य भारतीय परिचारिका अडकून पडल्या होत्या, त्यांच्या सुटकेसाठी सरकारने मोहीम राबवली. इराकमध्ये अडकलेल्या भारतीय परिचारिकांची सुटका केल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्या व्यतिरिक्त कोणीही भारत सरकारचे आभार मानले नाहीत.
अशा वेगवेगळ्या प्रसंगातून केंद्र सरकारने मानवतेपेक्षा दुसरा कोणताही धर्म थोर नाही हे दाखवून दिले आहे. एकूण काय पारपत्राचा रंग भले वेगवेगळा असो, मानवतेचे बंध भक्कम असणे सरकारला महत्वाचे वाटते.