भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकाऱ्यांच्या 2022 च्या प्रशिक्षणार्थी तुकडीने आज नवी दिल्ली येथील 7,लोक कल्याण मार्ग येथे जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यांना सरकारी सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर आतापर्यंत आलेल्या अनुभवांविषयी चौकशी केली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना ग्रामभेटी, भारत दर्शन आणि सशस्त्र दलांच्या भेटींसह प्रशिक्षणाच्या काळात मिळालेल्या शिकवणीबद्दल माहिती दिली. गावागावांमध्ये सरकारने सुरु केलेल्या, जल जीवन अभियान तसेच पंतप्रधान आवास योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या परिवर्तनशील प्रभावाबाबत देखील त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
कल्याणकारी योजनांच्या बाबतीत संपूर्ण संपृक्तता साधण्याच्या दिशेने सरकारने केंद्रित केलेले लक्ष आणि त्यामुळे कोणत्याही भेदभावाविना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत कशा प्रकारे लाभ पोहोचला आहे याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना माहिती दिली. जागतिक पंतप्रधानांनी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या यशाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून जागतिक दाक्षिणात्य देशांना त्यांच्या विकास प्रवासात मदत करण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग होऊ शकेल.
पंतप्रधानांनी या अधिकाऱ्यांशी भारताच्या जी-20 अध्यक्षतेसंदर्भात चर्चा केली आणि जी-20 बैठकांना उपस्थित राहिल्यानंतरच्या अनुभवांबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. पर्यावरणीय समस्यांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी लाईफ (पर्यावरण पूरक जीवनशैली) अभियानाची सविस्तर माहिती दिली. प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत परिणामकारकरीत्या बदल घडवूनच आपल्याला हवामान बदलाच्या समस्येला तोंड देता येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.