भारतीय परराष्ट्र सेवेतील 2021 च्या तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थीनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग येथे भेट घेतली.
मनमोकळ्या आणि अनौपचारिक संवादादरम्यान परराष्ट्र सेवेत रुजू झाल्याबद्दल भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थींचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि म्हणाले की त्यांना आता जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. या सेवेत रुजू होण्यामागची कारणेही त्यांनी जाणून घेतली.
2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित झाल्याच्या अनुषंगाने बोलताना शेतक-यांना फायदा होईल या दृष्टीने भरड धान्य लोकप्रिय करण्यात ते कसे योगदान देऊ शकतात याबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच भरड धान्य कसे पर्यावरण-स्नेही आहे आणि आरोग्यासाठी ;लाभदायक आहे याचीही त्यांनी माहिती दिली. त्यांनी LiFE चा (Lifestyle for Environment पर्यावरणस्नेही जीवनशैली) उल्लेख केला आणि पर्यावरणाच्या फायद्यासाठी एखाद्याच्या जीवनशैलीत कशा प्रकारे छोटे-मोठे बदल घडवून आणता येतील याबद्दलही सांगितले.या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडलेल्या पंचप्रण बाबतही अधिकारी प्रशिक्षणार्थींनी चर्चा केली आणि ते साध्य करण्यात भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थीं कसे योगदान देऊ शकतात याचीही माहिती दिली.
पंतप्रधानांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना पुढील 25 वर्षांचा विचार करून या कालावधीत ते स्वत: कसे विकसित होऊ शकतात आणि देशाच्या विकासात उपयोगी ठरू शकतात यासाठी दीर्घकालीन योजना आखण्याचे आवाहन केले.