गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. 'भविष्यासाठीचे प्रवेशद्वार' ही या वर्षीच्या शिखर परिषदेची संकल्पना आहे. यात 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संघटनांचा सहभाग आहे. ईशान्येकडील प्रदेशांतील गुंतवणुकीच्या संधीची माहिती देण्यासाठी ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय एक व्यासपीठ म्हणूनही या परिषदेचा उपयोग करत आहे.
अनेक उद्योगपतींनी या प्रसंगी आपली भूमिका मांडली.
लक्ष्मी मित्तल: आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये व्हायब्रंट गुजरातच्या 20व्या वर्धापन दिनाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेच्या भव्य जागतिक कार्यक्रमासाठी संस्थात्मक चौकट तयार करण्याकरता प्रक्रियेत सातत्य राखण्यावर पंतप्रधानांनी भर दिल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या तत्त्वांवरील पंतप्रधानांचा विश्वास आणि प्रत्येक जागतिक मंचावर ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करणे यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
राष्ट्र स्वावलंबी बनवण्यासाठी पोलादाचे महत्त्व अधोरेखित करताना मित्तल यांनी 2021 मध्ये आर्सेलर मित्तल निपॉन स्टील इंडिया हाजीरा विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केल्याची आठवण करून दिली. प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026 च्या निर्धारित उद्दिष्ट वर्षापर्यंत पूर्ण होईल अशी माहितीही दिली. अक्षय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन यासारख्या हरित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले.
तोशिहिरो सुझुकी : जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी पंतप्रधानांच्या भक्कम नेतृत्वाचे कौतुक केले आणि देशातील उत्पादन उद्योगांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ बनला आहे असे सांगून, देशाच्या आर्थिक विकासावर पंतप्रधानांच्या पुरोगामी दृष्टिकोनाचा प्रभाव सुझुकी यांनी अधोरेखित केला. उत्पादन क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी भर दिला. कंपनीची भारतात उत्पादित होणारी पहिली ई. व्ही. (विजेवर चालणारी गाडी) सादर करण्यासोबतच ती युरोपियन देशांना आणि जपानला निर्यात करण्याच्या कंपनीच्या योजनांना देखील त्यांनी स्पर्श केला. इथेनॉल, हरित हायड्रोजन आणि शेणापासून बायोगॅसचे उत्पादन करून हरितगृह उत्सर्जन कमी करण्यासाठी योगदान देण्याच्या संस्थेच्या योजनेचाही त्यांनी उल्लेख केला.
मुकेश अंबानी : व्हायब्रंट गुजरात आज जगातील सर्वात प्रतिष्ठित गुंतवणूक शिखर परिषद असल्याचे रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी म्हणाले. अशा प्रकारची इतर कोणतीही शिखर परिषद 20 वर्षांपासून सुरू राहिलेली नाही आणि आता ती बळकट होत चालली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि सातत्याला ही मानवंदना आहे", असेही ते म्हणाले. व्हायब्रंट गुजरातच्या प्रत्येक आवृत्तीत आपण सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली. गुजरात राज्याचा रहिवासी असल्याचा अभिमान व्यक्त करत अंबानी यांनी गुजरातच्या परिवर्तनाचे श्रेय पंतप्रधानांना दिले. "या परिवर्तनाचे मुख्य कारण म्हणजे आधुनिक काळातील सर्वात महान नेते म्हणून उदयाला आलेले आपले नेते, भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी होय. ते बोलतात, तेव्हा केवळ जग बोलतच नाही तर त्यांचे कौतुकही करते. भारताच्या पंतप्रधानांनी कसे अशक्य ते शक्य करुन दाखवले, "मोदी है तो मुमकिन है" हे सार्थ ठरवले असे ते म्हणाले. या घोषवाक्याचा प्रतिध्वनी जागतिक पातळीवरही उमटत असून ते जागतिक समुदायाकडून स्वीकारले गेले आहे असे त्यांनी सांगितले. आपले वडील धीरुभाई अंबानी यांचे स्मरण करत रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि कायम गुजराती कंपनीच राहील असे ते म्हणाले. "रिलायन्सचा प्रत्येक उद्योग माझ्या 7 कोटी गुजराती बांधवांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे", असे त्यांनी सांगितले. रिलायन्सने गेल्या 10 वर्षांत जागतिक दर्जाची मालमत्ता निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतात 150 बिलीयन अमेरिकन डॉलर्सपेक्षा (12 लाख कोटींपेक्षा) जास्त गुंतवणूक केली आहे. यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. अंबानी यांनी गुजरातसाठी 5 संकल्प केले.
पहिले वचन म्हणजे रिलायन्स उद्योग येत्या 10 वर्षांत लक्षणीय गुंतवणुकीसह गुजरातच्या विकासगाथेत आघाडीची भूमिका निभावेल; विशेषतः गुजरातला हरित वृद्धीच्या बाबतीत जगातील पातळीवर आघाडी घेण्यात रिलायन्सची प्रमुख भूमिका असेल. “वर्ष 2030 पर्यंत उर्जेच्या एकूण गरजेतील निम्मी गरज नवीकरणीय उर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या गुजरातच्या उद्दिष्टाची पूर्ती करण्यात आम्ही मदत करू.” जामनगर येथे 5000 एकर क्षेत्रावर धीरूभाई उर्जा गिगा संकुल उभारण्यात येत असून 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत त्याचे कार्य सुरु होईल अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. दुसरे म्हणजे 5जी च्या वेगवान कार्यसिद्धीमुळे आज गुजरात संपूर्णपणे 5जी तंत्रज्ञानाने सक्षम झाला आहे. यामुळे डिजिटल डाटा मंचावर आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या स्वीकाराच्या बाबतीत गुजरात आघाडीवर असेल. तिसरे वचन म्हणजे दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स रिटेल उद्योग राज्यात विस्तार करेल आणि लाखो शेतकरी तसेच छोट्या व्यापाऱ्यांना यातून मदत होईल.
चौथे वचन म्हणजे नवीन साहित्य आणि चक्राकार अर्थव्यवस्थेत अग्रणी होण्यास मदत करेल. रिलायन्स समूह हाजिरा येथे जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारत आहे अशी माहिती अंबानी यांनी दिली. ते म्हणाले की, 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यजमानपदासाठी प्रस्ताव देण्याची इच्छा व्यक्त करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनुसार, गुजरातमध्ये क्रीडा, शिक्षण आणि कौशल्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी रिलायन्स उद्योग आणि रिलायन्स फाऊन्डेशन इतर अनेक भागीदारांच्या कार्यबळामध्ये सामील होईल. भाषणाच्या शेवटी, मुकेश अंबानी यांनी पंतप्रधानांच्या ‘भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास’ या नेहमीच्या वचनाचे स्मरण करुन सांगितले की ‘पंतप्रधान, जागतिक विकासासाठी भारताचा विकास ही तुमची मोहीम आहे, जगाचे कल्याण करणे आणि भारताला जगाच्या विकासाची प्रेरक शक्ती बनवणे या मंत्रानुसार तुम्ही कार्य करत आहात. केवळ दोन दशकांमध्ये तुम्ही केलेली गुजरात ते जागतिक मंच ही वाटचाल एका आधुनिक महाकाव्याप्रमाणे आहे,’ ते म्हणाले. मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, “आजच्या भारताचा काळ म्हणजे युवा पिढीला अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यासाठीचा, नवोन्मेष करण्यासाठीचा आणि देशातील शेकडो दशलक्ष लोकांना जगण्यातील आणि उपजीविकेतील सुलभता मिळवण्यासाठीचा उत्तम काळ आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही पातळीवरील नेता असल्याबद्दल भविष्यातील पिढ्या पंतप्रधानांप्रती कृतज्ञ असतील. तुम्ही विकसित भारतासाठी मजबूत पाया रचला आहे.” भाषणाच्या शेवटी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सांगितले की पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आता भारताला 2047 पर्यंत 35 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून थांबवू शकत नाही. आणि एकट्या गुजरातचीच अर्थव्यवस्था 3 ट्रिलीयन डॉलरची होताना मला दिसते आहे. प्रत्येक गुजराती माणसाला आणि प्रत्येक भारतीयाला अशी खात्री आहे की मोदी युग भारताला समृद्धी, प्रगती आणि वैभवाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.”
मायक्रॉन टेक्नोलॉजीज, अमेरिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांनी देशात सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासाठी मार्ग खुले करण्याची दूरदृष्टी दाखवल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना हा निर्णय मोठी आर्थिक प्रेरक शक्ती ठरेल. सेमीकंडक्टर क्षेत्रातील सामर्थ्यशाली देश म्हणून भारताची वृद्धी होण्यासाठीच्या दूरदर्शी संकल्पनांना व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद मार्ग खुले करून देईल असे सांगून त्यांनी या क्षेत्रातील बहुविध विकासविषयक संधींवर देखील प्रकश टाकला. जागतिक दर्जाची मेमरी असेम्ब्ली सुविधा स्थापन करण्यासाठी मदत करण्यात राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या पाठबळाचे त्यांनी आभार मानले.या सुविधेसाठी टाटा प्रकल्पांशी पायाभूत सुविधाविषयक भागीदारी करण्यात आली आहे याचा देखील त्यांनी उल्लेख केला. या सुविधेचा पहिला टप्पा सुमारे 500,000 चौरस फुट क्षेत्रावर उभारण्यात येत असून वर्ष 2025 च्या सुरुवातीला त्याचे कार्य सुरु होईल. येत्या काही वर्षांत या ठिकाणी 5,000 थेट रोजगार तर 15,000 अतिरिक्त समुदाय रोजगार निर्माण होणार आहेत. “या सुविधेच्या दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून केंद्र सरकार आणि मायक्रॉन यांची 2.75 अब्ज अमेरिकी डॉलर्सची संयुक्त भागीदारी असणार आहे,” ते म्हणाले. भारतात सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्याच्या बाबतीत कंपनीची भूमिका अधोरेखित करून त्यांनी त्यांचे भाषण संपवले.
आजवर झालेल्या प्रत्येक व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेत सहभागी होता आल्याबद्दल, अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष, गौतम अदानी यांनी यावेळी अभिमान व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अद्वितीय द्रष्टेपणाबद्दल आभार व्यक्त करत, त्यांचे कुशल नेतृत्व, मोठ्या महत्वाकांक्षा, कष्टीक कार्यरत प्रशासन आणि अचूक अंमलबजावणी अशा सगळ्या गुणवैशिष्टयाची प्रशंसा केली. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे एक देशव्यापी चेतना जागृत होऊन, भारताचा औद्योगिक चेहरामोहरा बदलण्याच्या हेतूने, अनेक राज्यांनी परस्परांशी निकोप स्पर्धा आणि सहकार्य करत, नवा प्रवास सुरू केला आहे, असे अदानी म्हणाले. 2014 पासून, भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर, 185 % वाढला आहे, तर दरडोई उत्पन्न 165 टक्क्यांनी वाढले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. जेव्हा जगभरात भूराजकीय अस्थिरता आणि महामारीनंतरची गंभीर आव्हाने आहेत, अशा काळात ही प्रगती अधिकच उल्लेखनीय ठरते, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पंतप्रधानांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे सांगत, भारताचा प्रवास, जागतिक मंचावर आपला आवाज निर्माण करण्याच्या धडपडीपासून, ते आज जागतिक मंच तयार करण्यापर्यंत झाला आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याची स्थापना आणि जी-20 अध्यक्षपदाच्या काळात, पंतप्रधानांचे नेतृत्व, जी-20 मध्ये ग्लोबल साऊथचा समावेश अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत, अदानी पुढे म्हणाले, की भारतीय इतिहासातील हा एक निर्णयक काळ असून, अधिकाधिक सर्वसमावेशक जगासाठी यातून एक बेंचमार्क, एक निकष प्रस्थापित झाला आहे. “तुम्ही भविष्याचा अंदाज बांधत नाही, तर भविष्य घडवता” असे अदानी म्हणाले.
भारताला जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश बनवण्यासाठी तसेच ‘वसुधैव कुटुंबकम’ आणि विश्वगुरू यांच्या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन देशाला जागतिक सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचेही श्रेय पंतप्रधानांना जात असल्याचे, अदानी म्हणाले. 2047 पर्यंत भारताला 'विकसित देश' बनवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे आजचा भारत, उद्याच्या जागतिक भविष्याला आकार देण्यासाठी सज्ज आहे.
अदानी यांनी, वर्ष 2025 पर्यंत राज्यात 55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली त्यासोबतच, विविध क्षेत्रांमध्ये 50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य पार करून 25,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचीही घोषणा केली. आत्मनिर्भर भारतासाठी हरित पुरवठा साखळीच्या दिशेने विस्तार करणे आणि सौर पॅनेल, पवन टर्बाइन, हायड्रो इलेक्ट्रोलाइझर, ग्रीन अमोनिया, पीव्हीसी आणि तांबे आणि सिमेंट प्रकल्पांचा विस्तार यासह सर्वात मोठी एकात्मिक अक्षय ऊर्जा निर्मिती व्यवस्था तयार करण्याच्या विषयालाही त्यांनी स्पर्श केला. येत्या पाच वर्षांत, गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या अदानी उद्योग समूहाच्या योजनेची त्यांनी माहिती दिली, या गुंतवणुकीतून 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
दक्षिण कोरियामधली आघाडीची कंपनी, सिमटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ्री चुन यांनी, सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधांमधील प्रमुख पुरवठा साखळी भागीदार म्हणून, गुजरात राज्यातील मायक्रॉनच्या प्रकल्पानंतर सह-स्थान गुंतवणूक म्हणून त्यांच्या भारतातील प्रकल्पाबद्दल यावेळी उत्साह व्यक्त केला. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद, भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशात नवीन पुरवठा साखळीचे जाळे तयार करण्याच्या जागतिक घडामोडीचेच निदर्शक आहे. भारतात, आणखी एकत्रित गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने आणखी एका फेरीची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या पाठिंब्याची दखल घेतली. यामुळे सेमीकंडक्टर पुरवठा साखळी जाळ्यामध्ये भारताची उपस्थिती अधिक मजबूत होईल आणि भारताच्या स्थानिक घटकाला जागतिक पुरवठा साखळी व्यवस्थेचा भाग बनण्यास मदत होईल.
टाटा सन्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष, एन. चंद्रशेखरन म्हणाले की गुजरातमध्ये गेल्या दीर्घकाळापासून होत असलेली स्थिर मात्र लक्षणीय प्रगती यामागे पंतप्रधानांचे यशस्वी नेतृत्व आणि मानसिकता स्पष्ट दिसते.
आर्थिक विकासामुळे प्रचंड सामाजिक विकासही झाला आहे आणि गुजरातने भविष्याचे प्रवेशद्वार म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. संस्थापक जमशेदजी टाटा यांचा जन्म नवसारी येथे झाल्यामुळे टाटा समूहाचा उगम गुजरातमध्ये झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आज टाटा समूहाच्या 21 कंपन्यांची राज्यात भक्कम उपस्थिती आहे. ईव्ही वाहने, बॅटरी उत्पादन, सी 295 संरक्षण विमाने आणि सेमीकंडक्टर फॅब, प्रगत उत्पादन कौशल्य निर्मिती या क्षेत्रांमध्ये गुजरातमधील समूहाच्या विस्तार योजनेबद्दलही त्यांनी तपशीलवार माहिती दिली. "गुजरात हे टाटा समूहाच्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी असून आम्ही या राज्याच्या विकासाच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहोत” असे,चंद्रशेखरन म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांचा ‘व्हायब्रंट गुजरात’चा दृष्टीकोन प्रत्यक्षात साकारताना पाहून आपल्याला आनंद वाटत असल्याचे डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलेम म्हणाले आणि त्यांनी व्हायब्रंट (गतिशील) गुजरात परिषदेचे आयोजन केल्याबद्दल गुजरात सरकारचे अभिनंदन केले. ते म्हणाले की व्हायब्रंट गुजरात परिषद पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत @ 2047’ दृष्टीकोनाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील प्रमुख व्यावसायिक मंच म्हणून सादर होत आहे. गिफ्ट सिटी, ढोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र आणि गुजरात सागरी क्लस्टर यांसारख्या विविध औद्योगिक क्लस्टर्सचा (विभाग) विकास आणि प्रोत्साहन याचे श्रेय त्यांनी सरकारला दिले आणि ते म्हणाले की ही क्षेत्र भविष्याचे प्रवेशद्वार म्हणून महत्वाची भूमिका बजावतील. भारत आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) दरम्यानच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधांवर प्रकाश टाकताना, ते म्हणाले की, युएई हा गुजरातमध्ये 2017 पासून 2.4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केलेल्या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणूकदारांपैकी एक आहे. गुजरातने गेल्या वर्षी 7 अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक किमतीच्या वस्तूंची निर्यात केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचे नमूद करून सुलेम म्हणाले की, पंतप्रधानांच्या भक्कम नेतृत्वाखाली ही वाढ यापुढेही अशीच सुरु राहील. त्यांनी गतिशक्ती सारख्या गुंतवणुकीच्या उपक्रमांनाही याचे श्रेय दिले, जे भारताला आणि गुजरातला आर्थिक महासत्ता (ऊर्जा केंद्र) म्हणून त्यांची क्षमता ओळखायला उपयोगी ठरेल. गुजरातमध्ये कांडला येथे 2 दशलक्ष कंटेनर क्षमतेच्या अत्याधुनिक कंटेनर टर्मिनल्सची (गोदी) गुंतवणूक आणि विकास करण्याच्या डीपी वर्ल्डच्या योजनेबद्दल त्यांनी माहिती दिली. भारतातील लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आपल्याला भागीदारी करण्याची संधी मिळाली, याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला आणि व्हायब्रंट गुजरात परिषदेचा भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल गुजरात सरकारचे आभार मानले.
एनव्हीडिया (Nvidia) चे वरिष्ठ उपाध्यक्ष शंकर त्रिवेदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वाढते महत्त्व नमूद करत सांगितले की, भारत सरकारच्या वरिष्ठ सदस्यांना आणि नेत्यांना व्याख्यान देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी एनव्हीडिया चे सीईओ जेन्सेन हुआंग यांना आमंत्रित केले होते. आणि ते म्हणाले की, एआय बद्दल जागतिक नेत्याने बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद, भारतात आणि गुजरातमध्येही जनरेटिव्ह एआयचा अवलंब करण्याची ही सुरुवात ठरली आहे. जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धीमत्ते संदर्भात कौशल्य विकासासाठी एनव्हीडिया च्या प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले, “भारताकडे प्रतिभा, व्याप्ती आणि आश्चर्यकारक डेटा आणि आगळी वेगळी संस्कृती आहे.” त्यांनी मेक इन इंडियासाठी एनव्हीडिया चे समर्थन असल्याचे देखील अधोरेखित केले.
एनव्हीडिया (Nvidia) चे वरिष्ठ उपाध्यक्ष शंकर त्रिवेदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वाढते महत्त्व नमूद करत सांगितले की, भारत सरकारच्या वरिष्ठ सदस्यांना आणि नेत्यांना व्याख्यान देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी एनव्हीडिया चे सीईओ जेन्सेन हुआंग यांना आमंत्रित केले होते. आणि ते म्हणाले की, एआय बद्दल जागतिक नेत्याने बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद, भारतात आणि गुजरातमध्येही जनरेटिव्ह एआयचा अवलंब करण्याची ही सुरुवात ठरली आहे. जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धीमत्ते संदर्भात कौशल्य विकासासाठी एनव्हीडिया च्या प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले, “भारताकडे प्रतिभा, व्याप्ती आणि आश्चर्यकारक डेटा आणि आगळी वेगळी संस्कृती आहे.” त्यांनी मेक इन इंडियासाठी एनव्हीडिया चे समर्थन असल्याचे देखील अधोरेखित केले.
झेरोधाचे संस्थापक आणि सीईओ निखिल कामत यांनी, उद्योजक म्हणून आपला प्रवास सांगताना, गेल्या दोन दशकांतील देशाच्या सर्वांगीण विकासावर प्रकाश टाकला. देशातील स्टार्टअप परिसंस्था आणि लहान उद्योजक आणि ईकॉमर्सच्या वाढीचे त्यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, या क्षेत्राने गेल्या 10 वर्षांत केलेली प्रगती अविश्वसनीय असून,10 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. स्टार्टअप्सची भरभराट होण्यासाठी स्थिर परिसंस्था निर्माण करण्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.