जपानचे परराष्ट्र मंत्री तोशीमित्सू मोटेगी आणि संरक्षण मंत्री टारो कोनो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. हे दोन्ही मंत्री भारत-जपान यांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयांच्या बैठकसत्रांच्या नवी दिल्लीत होणाऱ्या उद्घाटनाच्या बैठकीत (2+2), जपानचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही मंत्र्यांचे स्वागत केले. जपान येथे ऑक्टोबर 2018 मध्ये जपान येथे झालेल्या 13 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे या दोघांनी घेतलेल्या निर्णयानुसार, परराष्ट्र आणि संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सुरु होत असलेल्या प्रयत्नांविषयी पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीमुळे दोन्ही देशातील राजनैतिक, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
भारत आणि जपानच्या नात्यामध्ये सर्वांगीण प्रगतीचे महत्व अधोरेखित करत या सहकार्याचा लाभ दोन्ही देशातील जनतेला तसेच या आशियाई प्रदेशाला होईल, असे पंतप्रधान म्हणाले. या नियमित उच्चस्तरीय बैठका म्हणजे दोन्ही देशातील घट्ट आणि मजबूत नाते याचेच द्योतक आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ व्हावेत अशी आपली आणि जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे यांची इच्छा आहे, असे मोदी म्हणाले. पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी शिन्जो आबे यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. भारत-प्रशांत महासागर परिसरात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदण्यासाठी भारत आणि जपानमधील संबंध अत्यंत महत्वाचे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या Act East Policy म्हणजे पूर्वेकडील देशांविषयीच्या धोरणाचा, दोन्ही देशांमधले संबंध हा पाया असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.