परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून भारताच्या दौऱ्यावर आलेल्या नेपाळच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. आरजू राणा देउबा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
देऊबा यांची नेपाळच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भारत आणि नेपाळ यांच्यातील उच्चस्तरीय द्विपक्षीय संबंधामध्ये सध्याच्या वेगवान घडामोडींचे कौतुक केले. या संवादांचा द्विपक्षीय संबंधांमध्ये होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित करून भारताने आयोजित केलेल्या तिसऱ्या ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत नेपाळच्या पंतप्रधानांनी सहभाग घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.
भारताच्या शेजारी प्रथम या धोरणाबद्दल तसेच नेपाळसोबत भारताने हाती घेतलेल्या विविध विकासात्मक सह्कार्यविषयक उपक्रमांबद्दल नेपाळच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी पंतप्रधानाचे आभार मानले.भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी आपली वचनबद्धता व्यक्त केली. त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेपाळ भेटीचे आमंत्रण दिले. पंतप्रधानांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि या भेटीसाठी राजनैतिक माध्यमातून दोन्ही देशाच्या दृष्टीने सोयीस्कर तारखा ठरवल्या जातील,असे आश्वासन दिले.