नेटवर्क 18 ने आयोजित केलेल्या रायझिंग इंडिया परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.
एखाद्या राष्ट्राच्या संदर्भात आपण ‘उदय’ हा शब्द वापरतो, तेव्हा त्याला व्यापक संदर्भ असतो. अर्थव्यवस्थेच्या वृद्धी पलीकडे जाऊन रायझिंग इंडिया मध्ये भारतीय जनतेत आत्मसन्मान वाढणे आपल्याला अभिप्रेत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जनतेच्या एकत्रित इच्छा शक्तीच्या बळावर अशक्यप्राय गोष्ट ही साध्य होऊ शकते. आज ही एकत्रित इच्छाशक्ती, नव भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करत आहे.
अनेक राष्ट्रांमध्ये, सरकार विकास आणि परिवर्तनासाठी पुढाकार घेते या सर्व साधारणपणे असलेल्या संकल्पनेच्या उलट चित्र भारतात गेल्या चार वर्षात दिसत आहे, आता जनता पुढाकार घेते आणि सरकार त्यांना अनुसरते. अल्पावधीत स्वच्छ भारत अभियान म्हणजे व्यापक चळवळ ठरली आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या विरोधातले हत्यार म्हणून जनता डिजिटल पेमेंटचा वापर करत आहे. सरकारला मोठे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देशातली जनता स्फूर्ती देत आहे. जनतेच्या निर्धारामुळे भारतात परिवर्तनात्मक बदल घडत असल्याचे ते म्हणाले. उज्वला योजनेच्या माध्यमातून केवळ स्वयंपाक घराचे रूप पालटले नसून संपूर्ण कुटुंबात परिवर्तन कसे घडत आहे हे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केले. आपल्या सामाजिक रचनेतला मोठा असमतोल दूर करण्यासाठी याचा कसा उपयोग होत आहे हे त्यांनी स्पष्ट केले.
मणिपुरमध्ये विज्ञान कॉंग्रेसचे उद्घाटन, क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी, ईशान्येसाठी इतर महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करून एक दिवसाचा मणिपूर दौरा करून आपण परतलो असल्याचे ते म्हणाले. भावनात्मक एकात्मता आणि देशाच्या पूर्वेकडच्या भागाचा डेमोग्राफिकडिव्हिडंड ध्यानात ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. “देशाच्या पूर्व भागासाठी जलद गतीने कार्य करा” हा मंत्र घेऊन सरकार काम करत आहे. केवळ ईशान्यच नव्हे तर उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल, ओदिशाचा यात समावेश आहे. आसाम मधला गॅस क्र्याकर प्रकल्प, गोरखपूर, बरौनी आणि सिंद्री मधला खत प्रकल्प, जगदीशपूर हल्दिया गॅस पाईप लाईन, धौला सादिया पूल यासारखी उदाहरणे देऊन या भागात प्रकल्पांना गती देण्यावर कसा भर दिला जात आहे हे त्यांनी स्पष्ट केले. पूर्व भागात 12 नवे विमानतळ बांधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वीज न पोहोचलेल्या 18000 खेड्यात, देशाच्या पूर्व भागातली 13000 खेडी तर 5000 खेडी ईशान्येकडील होती. या खेड्याच्या विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल असे पंतप्रधान म्हणाले. सौभाग्य योजना प्रत्येक घराला वीज जोडणी पुरवेल असे ते म्हणाले. काहीसे वेगळे पडलेल्या या भागाला एकात्मतेकडे नेणारा हा मार्गच “रायझिंग इंडियाला” बळ देईल.
आरोग्य क्षेत्रात सरकार चार महत्वाच्या स्तंभावर लक्ष केंद्रित करत असल्याचे ते म्हणाले-
प्रतिबंधात्मक उपाय
माफक दरातली आरोग्य सेवा
पुरवठा सुरळीत राहण्या साठीच्या उपाय योजना
अभियान अंमलबजावणी
प्रतिबंधात्मक उपाय यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 2014 मध्ये 6.5 कोटी घरात स्वच्छता गृहे होती, त्या तुलनेत सध्या 13 कोटी घरात स्वच्छतागृहे आहेत. स्वच्छते संदर्भातली व्याप्ती वाढून ती 38 वरून 80 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. “योगाभ्यास” ही व्यापक चळवळ ठरली आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये “वेलनेस केंद्रांचा” उल्लेख त्यांनी केला. लसीकरणाचाही त्यांनी उल्लेख केला.
देशभरात 3000 पेक्षा जास्त जन औषधी केंद्र उघडण्यात आली आहेत. तिथे 800 पेक्षा जास्त औषधे कमी दरात उपलब्ध आहेत. स्टेण्ट आणि गुढघ्याशी संबंधित शस्त्रक्रिया संबंधी किंमतीचे नियमन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
“आयुष्मान भारत” योजने अंतर्गत 10 कोटी कुटुंबाना इलाज खर्चाबाबत दिलासा मिळत आहे.
डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागा वाढवण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय महिलादिनी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाचा त्यांनी उल्लेख केला.
प्रत्येक क्षेत्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण विकास मॉडेल तयार करण्यासाठी केंद्रसरकार करत असलेले काम त्यांनी विषद केले.
उर्जा मंत्रालय, नवीकरणीय उर्जा, कोळसा मंत्रालय आता एकत्रित, संघटितपणे कार्य करतात. वीज तुटवड्या कडून भारत आता अतिरिक्त वीज निर्मितीकडे वाटचाल करत आहे, नेटवर्क फेल्युअरकडून नेट एक्स्पोर्टर कडे वाटचाल करत आहे.
भारत आपली दुर्बल स्थाने मागे टाकून आगेकूच करत असल्याचा जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास हाच रायझिंग इंडियाचा पाया आहे. आज संपूर्ण जग भारताच्या या उद्याची दखल घेत आहे. भारत केवळ स्वताःच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या विकासाला एक नवी दिशा देत आहे. आज भारत सौर क्रांती मध्ये नेतृत्व करत आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या नुकत्याच झालेल्या परिषदेत याची प्रचिती आली. जी 20, संयुक्त राष्ट्र संघ या सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताने संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या दहशतवाद, काळापैसा आणि भ्रष्टाचार यासारखे मुद्दे उपस्थित केले आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.
आर्थिक आघाडीवर, गेल्या तीन चार वर्षात भारताने जागतिक आर्थिक विकासालाही बळ दिले आहे. अर्थव्यवस्थेच्या स्थूल निकष आघाडीवर भारत चांगली कामगिरी करत आहे. मानांकन संस्था, भारताच्या मानांकनात सुधारणा करून त्यात वाढ करत आहेत.
गरीब, कनीष्ठ मध्यम वर्ग, मध्यम वर्ग यांच्या आशा आकांक्षा लक्षात घेऊन सर्वंकष दृष्टीकोन ठेवून सरकार काम करत आहे. प्रधान मंत्री मुद्रा योजना म्हणजे युवा आणि महिला सबलीकरणाचे प्रभावी साधन ठरल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
Read Full Presentation Here