पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी @LinkedIn च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत याविषयीचे काही विचार मांडले आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करण्यावर आणि जगभरात त्यांच्यासाठी व्यापक ग्राहकवर्ग तयार करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
यात त्यांनी मांडलेले विचार असे आहेत-
"काही दिवसांपूर्वी मापनशास्त्राविषयीच्या एका राष्ट्रीय परिषदेला मी संबोधित करत होतो.
फारसा चर्चेत नसला तरी, हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे.
मापनशास्त्र म्हणजे मोजमापं घेण्याचं शास्त्र, आत्मनिर्भर भारतासाठी आणि आपल्या उद्योजकांच्या संपन्नतेसाठी कसं योगदान देऊ शकतं- या मुद्द्याला माझ्या भाषणादरम्यान मी स्पर्श केला.
भारत म्हणजे कौशल्य आणि प्रतिभेचं चैतन्यमयी भांडार आहे.
आपल्याकडील स्टार्टअप उद्योगांना मिळणारं यश हे, आपल्या तरुणाईच्या सळसळत्या अभिनव विचारांचं द्योतक आहे.
वेगाने नवनवीन उत्पादनं आणि सेवा निर्माण होत आहेत.
त्याचबरोबर, देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरही प्रचंड मोठी बाजारपेठ आपली वाट बघत आहे.
आज जग स्वस्त, टिकाऊ आणि सोयीस्कर वस्तूंच्या शोधात आहे.
प्रमाण आणि गुणवत्ता या दुहेरी तत्त्वांच्या पायावर आत्मनिर्भर भारत उभा आहे.
आपल्याला अधिक उत्पादन करायचं आहे. त्याचवेळी आपल्याला गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करायची आहेत.
जगातील बाजारपेठा आपल्या वस्तूंनी केवळ भरून टाकण्याची भारताची इच्छा नाही.
तर, भारतीय वस्तूंनी जगभरातील लोकांची मनं जिंकून घ्यावीत अशी आपली इच्छा आहे.
आपण जेव्हा 'मेक इन इंडिया'द्वारे भारतात वस्तू तयार करतो तेव्हा आपण केवळ जगाची मागणीच पूर्ण करतो असं नाही तर जगाची मान्यताही मिळवतो.
कोणत्याही वस्तू किंवा सेवेच्या निर्मितीमध्ये 'शून्य परिणाम, शून्य दोष' असेल असा विचार करण्याचं मी तुम्हा सर्वाना आवाहन करतो.
उद्योगजगताच्या नेतृत्वाशी, व्यापारी प्रतिनिधींशी तसंच स्टार्टअप क्षेत्रातल्या युवकांशी आणि व्यावसायिकांशी संवाद साधताना माझ्या हे लक्षात येतं, की याविषयी त्यांच्यात एक मोठी जाणीव अगोदरच विकसित झालेली आहे.
आज सारं जग हीच आपली बाजारपेठ आहे.
भारतीय लोकांकडे क्षमता आहे.
'एक विश्वासार्ह राष्ट्र' म्हणून जगाचा भारतावर भरवसा आहे.
आपल्या भारतीयांची क्षमता आणि आपल्या देशाची विश्वासार्हता यांच्या बळावर उच्च गुणवत्तापूर्ण भारतीय उत्पादनं जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचतील. जगाच्या संपन्नतेसाठी वेगानं अर्थचक्र फिरविणाऱ्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला दिलेली ही खरी मानवंदना ठरेल."
A few thoughts on Aatmanirbhar Bharat and how it is as much about scale and standards.
— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2021
We want Indian products to be accepted and admired worldwide.
My @LinkedIn post. https://t.co/edYTvDclhM