पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन, जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यासह, उद्या 12 मार्च 2021 ला होणाऱ्या क्वाड सदस्य देशांच्या आभासी परिषदेत सहभागी होणार आहेत
यावेळी या नेत्यांमध्ये प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवरील सामायिक रुचीच्या विषयांवर चर्चा होईल आणि हिंद-पॅसिफिक प्रदेशात मुक्त, खुले आणि समावेशी वातावरण राखण्याच्या दृष्टीने सहकार्याच्या व्यावहारिक मुद्यांबाबत विचारांचे आदानप्रदान होईल. या परिषदेमुळे, उपस्थित नेत्यांना संवेदनक्षम पुरवठा साखळ्या, उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा आणि हवामान बदल यासारख्या समकालीन आव्हानांबाबत विचारांचे आदानप्रदान करण्याची संधी मिळेल.
परिषदेदरम्यान उपस्थित नेत्यांमध्ये कोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी सुरु असलेल्या विविध प्रकारच्या प्रयत्नांबद्दल चर्चा होईल आणि हिंद- पॅसिफिक प्रदेशात सुरक्षित आणि न्याय्य पद्धतीने किफायतशीर किंमतीत लसीचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी सहकार्यविषयक संधींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल.