दिल्लीत अधिकृत दौऱ्यावर असलेले श्रीलंकेचे अर्थमंत्री बसील राजपक्षे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
राजपक्षे यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही देशांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली, आणि श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला भारताकडून मिळणाऱ्या वाढीव पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानले.
'शेजाऱ्याला प्राधान्य' या भारताच्या धोरणात श्रीलंकेला असलेले केंद्रस्थान तसेच भारताच्या सागर (सेक्युरिटी अंड ग्रोथ फोर ऑल इन द रिजन) या तत्वानुसार श्रीलंकेचे महत्त्व यावर पंतप्रधानांनी भाष्य केले.
श्रीलंकेच्या मैत्रीपूर्ण जनतेबरोबर भारत नेहमीच उभा राहील असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
सांस्कृतिक आयाम तसेच इतरही बाबींमध्ये दोन्ही देशातील जनतेमधील संबंध दृढ होत आहेत याकडे श्रीलंकन अर्थमंत्री राजपक्षे यांनी लक्ष वेधले.
बुद्धीस्ट आणि रामायण पर्यटन सर्किट यांच्याशी संबंधित पर्यटन स्थळांच्या दोन्ही देशांकडून संयुक्त प्रसिद्धीच्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढवण्याच्या शक्यतांकडे पंतप्रधानांनी निर्देश केला.